प्रतीकचा सांभाळ हीच स्मिताची ओढ !

0
68

हॉस्पिटलला जाण्याची चार वाजताची वेळ होत आली. ती हट्टानं अधिकच बेभान झाली. “मी जाणार नाही हं !” हा तिचा पक्का निश्चय ! तिच्या लक्षात आलं, की हे बाळाला सोडून मला घेऊन जाणार. ‘तो’ आणि तिचा कुक असं त्या दोघांनी मिळून तिच्या दोन्ही बखोटांस धरून बेडरूमच्या दारापर्यंत खेचून आणलं. तिने दोन्ही पायांचे पंजे उंबऱ्याला घट्ट  टेकवून दोन्ही हात दाराच्या चौकटीला दाबून धरले. तिचा आक्रोश सुरूच होता – “मला बाळाला टाकून नाही जायचं…मी नाही जाणार.”

मग त्या दोघांनी त्यांची सारी ताकद पणाला लावली. तिला बाहेर काढली अन् अक्षरशः फरफटत ओढत बाहेरच्या दारापर्यंत आणली. ते सारं पाहून तिची आई जमिनीवर कोसळलीच. तिची गाडी जसलोक हॉस्पिटलच्या गेटपर्यत पोचली, पण तोवर ती कोमात गेली, ते अखेरपर्यंत.

तिला कृत्रिम लंग्जवर ठेवलं गेलं. 13 डिसेंबरची दुपार टळली आणि बाळाच्या बारशापासूनची त्याची कैक स्वप्नं पाहणारी एक बाळवेडी ‘आई’ त्याला सोडून कायमची निघून गेली. त्याआधी किती तरी दिवसांपासून तिची जी जीवघेणी घालमेल सुरू होती ती निमाली. दुःखाचा डोंगर कोसळला, बाळाला क्षणभरही पापणीआड न करणारी, आईपणाला अखंड आसुसलेली ती थोर आई तिच्या बाळासाठी फक्त एक स्वप्न बनून राहिली. तिची प्रसूती 28 नोव्हेंबरला झाली.

या परिच्छेदातील ‘ती’ म्हणजे स्मिता पाटील, ‘तो’ म्हणजे राज बब्बर, बाळ – प्रतीक बब्बर …

खरे तर, इस्पितळात जाण्यास तिचा नकार म्हणजे तिचा स्वतःवरचा सूड होता. कारण तिचे पोट वाढत गेले आणि ‘त्या’चे तिच्याकडे येणे कमी होत गेले. तिला बारीक कळा येऊन पोट दुखायचे. मळमळायचे. आपला त्रास इतरांना होऊ नये याचा हट्ट इतका असायचा, की आपली आई विद्या पाटील यांनाही ती जवळ राहू देत नसे.

‘इन्साफ का तराजू’ने थोडेफार नाव कमावलेल्या राज बब्बरने ‘आज की आवाज’मध्ये त्याची नायिका झालेल्या स्मिताला जाळ्यात अडकावले. स्मितानेदेखील त्या काळात कोणाचे मत जुमानले नाही, ती होतीच तशी बंडखोर ! लग्न झालेला संसारी पुरुष तिने निवडला, त्याचा मूळ संसार काही काळासाठी तरी मोडीत निघाला. नायिका ते साथीदार असा तिचा राजसोबत प्रवास झाला. दोन अपत्यांचा बाप असलेला राज बब्बर त्याच्या बायको मुलांना त्याच्यापासून विलग करायला राजी नव्हता. त्याने त्यांच्यापासून फक्त अंतर राखलं.

ती दोघे ‘लिव्ह इन’मध्ये 1980 च्या दशकात राहत होते यावरून त्यांच्या बेफिकीर आणि धाडसी वृत्तीची प्रचीती यावी. त्या नात्याला स्मिताच्या घरातून तीव्र विरोध झाला, पण त्याला तिने जुमानले नाही. ती गरोदर राहिल्यावर राजच्या वागण्यात फरक पडत गेला. त्याचे येणेजाणे हळुहळू कमी होत गेले, त्याचा राग तिने स्वतःवर काढला. आईपणाच्या वेदना तिला नैसर्गिक रीत्या हव्या होत्या. त्या साठीचे सुलभ उपचार तिला नको होते.

तिच्या स्वभावाची कल्पना असणाऱ्या आई विद्या पाटील यांना शेवटी झुकावे लागले. त्या तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण स्मिताने तिचा हट्ट सोडला नाही. याची परिणती जी व्हायची होती तीच झाली. प्रसूतीपश्चात तिचा रक्तदाब कमालीचा घटत गेला. ती कोमात गेली आणि तिच्या प्रेमाचे ‘प्रतिक’ मागे ठेवून गेली.

त्या नंतरच्या काळात राज बब्बरने मुलाला नाव दिले, मात्र वडिलांचे सच्चे प्रेम तो देऊ शकला नाही ! ते प्रतीकलाही नंतर उमगले. प्रतीकचा सांभाळ स्मिताच्या आई, विद्याताई यांनीच केला. त्याला वाढवले नि मोठे केले. स्मिता ही त्याची दुखरी रग (नस) आहे. तो या विषयावर काही बोलत नाही. एका मनस्वी प्रतिभाशाली अभिनेत्रीची एका फुटकळ अभिनेत्यापायी फरफट होत गेली. नियतीने हे का केले हे कधी कोणाला कळले नाही.

स्मिताची इच्छा होती, की तिच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाला विवाहित स्त्रीप्रमाणे सजवावे. तिची अंतिम इच्छा पुरी करण्याचे काम अमिताभचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी पार पाडले. तरीही मृत्यूपश्चात तिचे शव तीन दिवस अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षेत राहिले.

स्मिताच्या मृत्यूनंतर काही काळात ‘मिर्चमसाला’ हा सिनेमा ‘रिलीज’ झाला. त्यातील ‘सोनुबाई’ तिला साजेशी होती, पण वास्तवातील स्मिताला सोनुबाई होता आलं नाही !

फोटोतील 1955 हे स्मिताचे जन्मसाल तर ∞ चे चिन्ह आहे इन्फिनिटीचे म्हणजेच अनंतत्वाचे ! आईविना पोरक्या मुलासाठी त्याची आई त्याचे हृदय बनून धडकत असते, अनंत काळासाठी ती त्याच्यासोबत असते !!

समीर गायकवाड 8380973977 sameerbapu@gmail.com

———————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here