पोतराजाची लोकगीते

_Potrajachi_Lokagite_1.jpg

लोकसंस्कृतीमधील पोतराज हा मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक असतो. तो त्याच्या उग्र भीषण रौद्र अवतारामुळे म्हणून मराठी लोकांना चांगला परिचित आहे. पोतराज ही प्रथा विदर्भात जास्त आढळते. ते विशेषतः मातंग समाजाचे दैवत आहे. पोतराज प्रथेचा मुख्य पाया मांगरिबाबापासून होतो. मांगरिबाबाच्या यात्रा भरतात. मांगरिबाबाच्या यात्रेसाठी हजारो भाविक पुणे, मालेगाव, औरंगाबाद, बोन्द्रा, मंगरूळ, खानदेशात अमळनेर, चांदनकुर्हे, बीड जिल्ह्यातील होळ अशा जिल्हा तालुक्याच्या ग्रामीण परिसरातून येतात.

‘पोतराज’ हा शब्द तमिळ भाषेतील ‘पोट्टूराझ’ या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवर, द्रविड संस्कृतीचा प्रभाव असतो. दक्षिणेत ‘सातबहिणी’ या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्ध आहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एकाला पोत्तुराजु म्हणतात. मरीआईला गौरवाने ‘लक्ष्मीआई’ असेही म्हटले जाते. त्यामुळे पोतराज हा मरीआईवाला किंवा लक्ष्मीआईवाला या नावाने ओळखला जातो.

पोतराज आणि कडकलक्ष्मीवाला या परंपरा वेगवेगळ्या आहेत. कडकलक्ष्मीवाले हे मूळचे आंध्रप्रदेशातील तेलुगु भाषिक असतात. ते पोट भरण्यासाठी डोक्यावर मरीआईचे देऊळ घेऊन भटकत महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले. तो स्वतःला अंगावर आसूड मारून घेणे, दंडात सुया टोचून रक्त काढणे, स्वतःच्या दातांनी मनगटाचा चावा घेणे असे क्लेश करून घेत असतो. महाराष्ट्रात तसे कडकलक्ष्मीवाले आढळतात.

पोतराजाच्या जीवनाचे समग्रदर्शन पार्थ पोळके यांच्या ‘आभरान’ या आत्मकथनात आलेले आहे. पोतराज मरीआई किंवा लक्ष्मीआई यांच्या नावाने भिक्षा मागताना धार फिरवणे, मरीआईचा गाडा, बढन यांसारख्या विधीप्रसंगी विविध प्रकारची गाणी गातो. त्याने ती गाणी वंशपरंपरेने आत्मसात केलेली असतात. मरीआई ही शंकर व पार्वती यांच्या रूपात असल्यामुळे पोतराज हा त्या शक्तीचा मुख्य आधार शिवशंकर याला साकडे घालत असतो. पोतराज हा मरीआईचा उपासक असला तरी तो प्रथम नमस्कार शंकराला करतो. यमाई, अंबाबाई, जगदंबा या देवता शक्तिपंथातील आहेत. दुर्गामाता, यल्लमा, रेणुका या देवता आदिशक्ती पार्वतीची रूपे आहेत. देवीचे शिव व शक्ती या रूपातील माहात्म्य पुढे गीतात मांडले आहे :

“पहिला जपु मुरू गणेशा
दुसरा जपु वारूळ देशा
तिसरा जपु जोतकी माया
चौथा जपु साथीला शंख
औई पातालमें कत्रोंमे
हातमें तागा पाव मे धागा
अलंग बुवा, मलंग सोन्याचा पलंग
रुपेरी झारी, आदि छाया मग धर्तरी
आकाश मग प्रसवी
प्रसवी आलगा साळुका
तोच कैलास नायका.”

पोतराजाच्या या गाण्यात नमन पहिल्यांदा गणेशाला केले जाते.

_Potrajachi_Lokagite_2.jpgपोतराजाच्या गाण्याचे वर्गीकरण :

१. स्फुटगीते – पोतराजाची गाणी स्त्रीगीतांतील ओवीरचनेसारखी असतात. आशयातही तोचतोपणा असतो. त्यांची गीतरचना ओवीसारखी असली तरी गीत गाण्याची लय, सुरावट व पोतराजाचे गीताचे सादरीकरण मात्र वेगळे असते. पोतराजाच्या स्फुटगीतांतून मरीआईचे किंवा लक्ष्मीआईचे रूप-गुण वर्णन केलेले असते. चांद्याची धुरपतामाई-लक्ष्मीमाई-मरीआई आणि म्हसोबा यांची स्तुतीपर गाणी पोतराजाच्या एकूण गीतांचा महत्त्वाचा विशेष आहे.

“चांदगडच्या वाटं, नाही पापाची वासना
पतिव्रतेला सोसंना, धुरपता माय ।।
चांदगडच्या वाटंला, तहान लागलिया बाळाला
झरे फोडिले माळाला, कसे मध्य धुरपतानं ।।
चांदेगडामंदी नवलाखी सोनार
कोपऱ्याची लेणार, धुरपता माय ।।”

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत मरीआई या देवतेचे महात्म्य असते. लोक मरीआईची साथ येणे किंवा आईचा कोप होणे या गोष्टीला वचकून असतात. तिच्याबद्दल पोतराज म्हणतो,

“आलिया मरीबाई
तिनं गाड्याला केला साज
हाती कोरडा त्याला बाक ।।धृ।।
आलिया मरीबाई
तिचा कळेना अनुभवू
भल्याभल्यांचा घेती जिऊ
आलिया मरीबाई”

मरीबाई भल्याभल्यांचा जीव घेण्यास देखील मागेपुढे पाहत नाही, अशी लोकधारणा अाहे. म्हणूनच तिच्याबद्दल भीतीची भावना लोकांच्या मनात असते. मरीबाईला आंबीलीचा नैवैद्य दाखवतात. पोतराज गावात मंगळवारी व शुक्रवारी येतो. तो मरीआईचा फेरा आल्याची घोषणा करतो व गाणी म्हणतो,

“आई मरिमाता
एकाचे एकवीस
पाचाचे पन्नास
येल मांडवाला जाऊ दे
ताक आमरूतानं डेरं घुमू दे
कपाळाचं कुंकू
हाताचा चुडा
पायातलं जोडवं
यसवंत राक लकसीमी.”

पोतराज या गाण्यातून लोकांना आशीर्वाद देतो.

मरीआईच्या कोपाने रोगराई फैलावते आणि लोक मरतात असा समज आहे. मरीआईची कृपा संपादन करण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी तिची विविध प्रकारे उपासना सांगितली आहे.
पोतराजाच्या पारंपरिक गीतांतील काही अपवाद वगळता त्याची बरीच गीते दुर्बोध, काहीशी अर्थहीन पण तालबद्ध असतात. शब्दांच्या जडणघडणीकडे, त्यांच्या सुसंगत रचनेकडे लक्ष फारसे दिलेले नसते. तसे एक गीत :

“हर हर हरा
ध ध ध ध ध धा
मायचा खैऱ्या, कोंबड्या रेड्या
भरलीन दुरड्या
उढतीन खारुड्या
हर हर हरा, ध ध ध ध ध धा ।।
होर होर होर, माय तुज करणी
मज प्रार्थ । लावतो चरणी ।।

पोतराजाच्या अंगात आल्यावर तशा प्रकारचे गीत त्याच्या ओठांतून बाहेर येते. शरीराच्या विशिष्ट हालचाली, घुमण्याची क्रिया आणि मधूनमधून उमटणारे गीतांचे चरण यामुळे अर्थहीन शब्दरचना त्याच्या गीतांतून खपून जाते.

२. धुपारतीच्या ‘वया’ – पोतराजाच्या गीतांचा महत्त्वाचा भाग म्हणजे धुपारतीच्या ‘वया’ (किंवा वह्या). त्यालाच ‘धुपात्री’ किंवा धुपारतीच्या वेळी म्हणण्यात येणाऱ्या पोतराजाच्या वह्या असे म्हणतात. त्या तो त्याच्या धर्मविधीप्रसंगी मरीआईच्या उपासनेत म्हणतो. त्या वया म्हणजे त्या विधीचे मंत्र होत. पोतराजांच्या घरपरत्वे ‘वयां’त बदल झालेला दिसतो. ‘वया’ वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.

बढणाच्या विधीतील ‘जळपूजना’च्या प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या धुपारतीच्या काही वया :

“जळ नेमलं जळ थोपलं
जळाच्या काठी झोटिंग झोटी,
साती आसरा, आठवा म्हैशासुरा,
जळात लक्ष्मी जळात उभी राही.
तुजकार, पोतराज मी धुपार्ती बाईची घडी घडी करी ।।”

धुपारतीच्या वयांना पोतराजाच्या धर्माचरणात महत्त्व असते. तो त्या ‘वया’ नेहमी गात नाही तर विधीप्रसंगीच त्यांचे गायन करतो. नृत्य आणि संगीत यांची साथ ‘वया’ गाताना फारशी महत्त्वाची मानली जात नाही.

३. कथात्मगीते – पोतराजाच्या कथागीतांतून लोकमानसाचा आविष्कार होत असतो. पोतराज गीतांतून कथा सांगत असतो. पोतराजाच्या कथागीतांचे विषय होमातून आईचा अवतार, मुंबादेवीची कथा, पंढरपूरचा तुकडा, मरीअम्माची कथा, भिल्लीणीची कथा अशा प्रकारचे असतात.

कथागीते जागरणाच्या विधीच्या वेळी म्हटली जातात :

“पहिले नमन गणरायासी
दुसरे नमन मात्यापित्यासी
तिसरे नमन गुरूच्या चरणाशी
चौथे नमन उगवत्या सूर्यासी
पाचवे नमन पाची पांडवासी
सहावे नमन सकळ जनांसी
सातवे नमन साती आसरासी
आठवे नमन महिषासुरांसी
नववे नमन नवनाथासी
दहावे नमन दहा अवतारासी.”

पोतराजाची कथागीते अभिनयासह गायली जातात. कथन एका विशिष्ट सुरात डफावर चालू असते. पोतराज मधूनच कथन थांबवून नाचू लागतो. तो कार्यक्रम एका कथेतून दुसरी कथा गुंफून जात असल्यामुळे रात्रभर चालतो; सांगण्याची पद्धत ठेक्यात असल्यामुळे त्याला तालबद्धता येते.

– माधवी सुरेंद्र पवार

(भाषा आणि जीवन ३०:१/हिवाळा २०१२)

About Post Author

Previous article…परी जीनरूपे उरावे
Next articleधोमचे नृसिंह मंदिर
माधवी सुरेंद्र पवार या सातारा जिल्ह्यातील 'कृष्णा महाविद्यालय रेठरे' महाविद्यालयात मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक अाहेत. त्यांना अध्यापनाचा सहा वर्षांचा अनुभव अाहे. त्यांनी एमफिल पदवीसाठी 'पोतराजाच्या गीतांचा सांस्कृतिक आणि वाङ्मयीन अभ्यास' असा विषय विनडला होता. त्यांनी तो अभ्यास डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. पवार यांनी लिहिलेले सुमारे तेरा शोधनिबंध विविध मासिकांतून प्रकाशित झाले अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 8698257249

1 COMMENT

  1. अतिशय महत्वाची आणि काळाच्या…
    अतिशय महत्वाची आणि काळाच्या ओघात लुप्त होत चाललेली कलेची हि महत्वाची माहिती दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद !
    आजून काही माहिती असल्यास कृपया कळवावी

    आपला आभारी,
    राहुलकुमार लहरे
    ९४०३६२८२९४

Comments are closed.