पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ब्रिटिशकालीन पोशाख बदलण्याचा निर्णय एकशेचौदाव्या पदवीदान सोहळ्यात, 2018 सालापासून घेतला आहे. ब्रिटिशकाळात पदवीदान सोहळ्यासाठी लाल, काळा घोळदार गाऊन आणि झुपकेदार टोपी असा पोशाख होता. त्याला जुन्या जमान्याचा, सरंजामी वाटणारा डौल होता. त्या जागी, विद्यापीठाने पांढऱ्या रंगाचा कुडता, पायजमा आणि उपरणे व डोक्यावर पुणेरी पगडी असा भारतीय शैलीचा पोशाख ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना पदवी घेताना ब्रिटिशकालीन पोशाख काळा गाऊन व झुपकेदार काळी टोपी परिधान करावी लागे. देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे सत्तर वर्षें उलटली तरी इंग्रजांच्या काळातील त्या जुन्या पाऊलखुणा तशाच शिल्लक राहिल्या होत्या.
नव्या पोषाखात असणाऱ्या पुणेरी पगडीवरून विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यास विरोध केला. पण सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थी संघटनांचा तो विरोध डावलून, विद्यार्थ्यांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करून कुर्ता, पायजमा आणि पारंपरिक पुणेरी पगडी घालून पदवीदान सोहळा साजरा केला. विद्यार्थी संघटनांच्या त्या विरोधाला पुण्यात त्याच वर्षी, त्या आधी झालेल्या राजकीय वादंगाची काहीशी पार्श्वभूमी आहे. पुणेरी पगडी वादात आली ती शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना त्यांचा सत्कार करत असताना, त्यांना महात्मा फुले वापरत ते पागोटे घालून त्यांचा सन्मान करावा अशी सूचना केली त्यावरून. संयोजकांनी पुण्यातील त्या समारंभात मूलत:, भुजबळ यांच्या सत्कारासाठी त्यांना पुणेरी पगडी घालण्याचे योजले होते. कोणाचाही सत्कार करताना त्याला शाल, श्रीफळ दिले जाते, त्याप्रमाणे पुण्यात सत्कारमूर्तीला पुणेरी पगडी घालण्याची पद्धत होती. ती गेल्या दोन-तीन दशकांत सर्वत्र पसरली गेली, कारण समाजात सन्मान समारंभ वाढले. त्या ठिकाणी अशा प्रतीकात्मक गोष्टींना महत्त्व असते. भूजबळ यांचा सत्कार त्या रीतीला धरून योजला गेला होता.
पण शरद पवार यांनी आयत्या वेळी पागोटे सत्कारासाठी वापरण्याची सूचना केली. ते व अन्य टिकाकार यांना पुणेरी पगडी प्रतिगामी आहे असे जर सुचवायचे असेल तर लोकमान्य टिळक यांची पुणेरी पगडी प्रतिगामी समजावी का? नामदार गोपाळ कृष्ण गोखले, म.गो. रानडे हे पुणेरी पगडीधारक होते म्हणून त्यांची पुणेरी पगडी प्रतिगामी समजायची का? पुणेरी पगडी हे प्रतिगाम्यांचे प्रतीक वगैरे म्हणणे योग्य नाही. पेशवाईपासून ते टिळक-आगरकरांपर्यंत अनेक नेते पुणेरी पगडी वापरत असत. त्यावरून ब्रिटिश आणि स्वातंत्र्य काळात ब्राह्मणांमध्येसुद्धा सर्व ब्राह्मण पगडी वापरत नसत. हुशार आणि बुद्धिमान लोक पुणेरी पगडीचा वापर करतात असा समज होता. त्यामुळे पदवीदान समारंभात पुणेरी पगडी वापरणे हा बुद्धीचा सन्मान आहे असे समजले जाई. पगडीला तो मान र.पु. परांजपे यांच्यापासून विशेष मिळाला, कारण ते पगडी नित्य वापरत असत आणि ते तर त्या काळातील जगद्विख्यात केंब्रिजची रँग्लर पदवी मिळवलेले विद्वान होते (सई परांजपे यांचे आजोबा). रँग्लर र.पु. परांजपे हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. कुलगुरू, विशेषत: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू हे मराठी संस्कृतीत काही काळ ‘आयकॉन’ होते.
भारतीयांना इंग्रजी पोशाख ब्रिटिश राजवटीत चढला. सुटाबुटाबरोबर गळ्यात नेकटाय आला. पेशवाई बुडाल्यावर भारतीयांचा आचारविचार बदलला. इंग्रजांची नक्कल सुरू झाली. इंग्रज आल्यावर इंग्रजी विद्या शिक्षित लोकांच्या डोक्यावरील पगडी जाऊन हॅट आली. आधुनिक विद्याविभूषित लोक हॅट ऐटीत वापरत. ब्रिटिश भारतात येऊन, येथे समाजात समानता आणण्याचे प्रयत्न घडून येण्यापूर्वी येथील समाजात जातीनिहाय चालीरीती प्रचलित होत्या. त्यात ब्राह्मणांनी पगडी घालावी, मराठ्यांनी फेटे वापरावे, बहुजनांनी-विशेषतः धनगरांनी पागोटी पेहरावी अशी सर्वसाधारण पद्धत होती. त्यातही आणखी छोटे छोटे भेद होते. स्वातंत्र्य लढ्यात टिळकयुग संपून गांधीयुग आले. गांधीटोपी ही स्वातंत्र्याचे प्रतीक बनून गेली. देशाला स्वातंत्र्य हे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली लाभले; त्या काळात अवघी जनता काँग्रेसमय होऊन गेली होती. त्यामुळे पांढरी खादी टोपी काँग्रेसशी जोडली गेली. पंडित नेहरू बाकी सर्व आचारविचाराने ‘मॉर्डन’ होते तरी ते आजन्म गांधी टोपी वापरत. स्वातंत्र्यकाळात त्याआधीच्या वर्णजातिव्यवस्थेची जागा शिरोभूषणांपुरती तरी राजकीय पक्षांनी घेतली. त्यानुसार टोप्यांचे रंग तयार झाले. संघ-जनसंघ-भाजप यांनी त्यांच्यावरील आरंभीच्या काळातील ब्राह्मण्याची छाप पुसण्यासाठी घोंगडीची काळी टोपी घेतली, समाजवादी व डाव्या पक्षांनी लाल टोपी तर रिपब्लिकन पक्षाने निळी टोपी धारण केली. या प्रत्येक गोष्टीस प्रतीकात्मक महत्त्व आहे हे जाणावे. जसे भारतीय लोक अधिकाधिक परदेशी जाऊ लागले तेव्हा त्यांनी तिकडे, उन्हापासून संरक्षण म्हणून रूढ असलेल्या लवचीक टोपली पद्धतीच्या टोप्या आणल्या. त्यात अनेकानेक डिझाईन तयार केली गेली. त्यांचा मुख्य हेतू उन्हापासून संरक्षण हाच असतो. तो सांभाळण्यासाठी त्या टोपीस पुढे छपरासारखी पट्टीदेखील जोडलेली असते. आता राजकीय पक्षांच्या टोप्या जवळ जवळ बाद झाल्या आहेत.
पगडीला विद्वत्तेचे, प्रतिष्ठेचे स्थान पेशवाईचा अस्त झाल्यानंतर लाभले. सामाजिक जीवनात तर रँग्लर र.पु. परांजपे यांच्यानंतरच लाभले. ते आधुनिक विद्याशिक्षित विद्वान होते, ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांना तशी मान्यता समाजाच्या विविध स्तरांत होती. त्यांच्या जमान्यात होती तशी विद्वत्तेची लक्षणे हळूहळू लोपत गेली. मग पगडी ही विद्वत्तेची फक्त खूप महत्त्वाची निशाणी बनली व विशेषतः पांढरपेशी सभा-समारंभात पगडी सन्मानार्थ सर्रास घातली जाऊ लागली. पवार यांची प्रतिक्रिया त्या, तारतम्य न ठेवता पगडीचे प्रतीक म्हणून मुबलक वापरण्यावरून आली असावी. मुळात पगडी हे संस्कृतीचे कालबाह्य प्रतीक आहे हे मान्य व्हायला हरकत नाही.
पुणे विद्यापीठाने पगडीची पुनर्स्थापना करण्याचे योजले असेल तर त्यास मुद्दाम विरोध करण्याचेही कारण नाही. समाजाचे विविध घटक विविध तऱ्हांची सांस्कृतिक चिन्हे विविध कारणांनी जपू पाहत असतात, दुसरीकडे त्यात नावीन्य आणण्याचा प्रयत्नही चालू असतो. तो समाजसंस्कृतिप्रवाह आहे. भारतातील समाजसंस्कृती सरमिसळ होण्याची प्रक्रिया गेली तीन-चार दशके विशेष वेगाने होत आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याने, तेथे ती सरमिसळ तीव्रपणे जाणवते आणि त्यामुळे वादंगांसही वाट फुटत राहते. संस्कृतीच्या सरमिसळ वा संकर काळात प्रत्येक गटाचे आग्रह तीव्रपणे व्यक्त होतात. ही समाजप्रक्रिया जाणून घेतली पाहिजे. पगडी काय किंवा पागोटे काय हे सांस्कृतिक चिन्ह आहे हे लक्षात ठेवावे, कारण ‘सर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण थोडी बदलून घ्यायची तर असे म्हणता येईल, की आशय महत्त्वाचा असेल तर सांस्कृतिक चिन्ह बदलत राहू दे की!
– प्रतिनिधी
संस्कृती ही बदलाभिमुख असते…
संस्कृती ही बदलाभिमुख असते. सांस्कृतिक बदलातूनच संस्कृती विकास पावत जाते. हा लेख आवडला.
Comments are closed.