पालखी

0
202
carasole

संस्कृतमधील 'पर्थंकिंका'वरून प्राकृत 'पल्लंकिआ' असे रूप झाले व त्यावरून 'पालखी ' हा शब्द आला.
 

पालखी लाकडी असून तिला दोन दांडे असतात. हे दांडे खांद्यावर घेऊन भोई पालखी वाहतात. तिला कापडाचे लाल रंगाचे रेशमी छत व गोंड्याची झालर लावलेली असते. मधोमध, हात धरण्यासाठी गोंडा सोडलेला असतो. पालखी व मेणा ह्यांच्या अर्धवर्तुळाकृती दांड्याच्या शेवटच्या दोन्ही टोकांना हत्ती, वाघ, सिंह किंवा घोडा ह्या प्राण्यांची धातूची तोंडे बसवलेली असतात.
 

एकच माणूस बसेल ती लहान पालखी आणि अनेक बसतात ती शिबिका असे पालख्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. मोठ्या पालख्यांना खिडक्या असून त्यांना पडदे लावलेले असतात. शिबिका चौकोनी असून ती भरजरी कपड्यांनी सजवतात. तिच्या शेंड्यावर चवरी बसवलेली असते.
 

नालकी किंवा नालखी ही डोक्यावर आच्छादन नसलेली व सरदार वगैरे बड्या लोकांनी वापरण्याची पालखी होती. ती चार भोई वाहून नेत असले तरी ती उचलण्यास बाराजण लागत असत. राजी पालखी सरकारातून अधिकृतपणे मिळालेली पालखी होती. तिचा खर्च सरकार करत असे. याउलट, मुंबई व मद्रास इलाख्यांत भाड्याने मिळणारी पालखी होती; तिला शिग्राम म्हणत असत. ह्याप्रमाणे लग्नात एकेरी, काळी-पांढरी व भरसवारी नावाच्या पालख्या वापरल्या जात असत.
 

पालखी सर्वसामान्यांसाठी नसे. पेशवाईत तो मान लब्धप्रतिष्ठित माणसांनाच मिळत असे. सामान्यत: पालखी वाहून नेण्यासाठी पुढे एक किंवा दोन व मागे तेवढेच भोई असत. पण काही विशेष व्यक्तींना 'आडव्या पालखी'चा मान मिळत असे. म्हणजे पालखी नेहमीप्रमाणे न नेता आडवी नेली जात असे. त्यामुळे सर्व रस्ता व्यापला जाई.
 

ज्याला पेशव्यांकडून पालखीत बसण्याचा मान मिळत असे त्याला 'पालखीनशीन' तर एखाद्या राजाकडून ज्याला मान मिळे त्याला 'पालखीपदस्थ' म्हणत असत.
 

स्त्रियांसाठी व सर्वसामान्यांसाठी बंदिस्त पालख्या असत; त्यांना 'मेणे' म्हणतात. झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांचा खास 'तामझाय मेणा' होता. त्या मेण्याच्या लाकूड, चांदी, सोने ह्यांच्यावरील नक्षीकाम नाजूक व सुंदर होते. सोन्याच्या मढवलेल्या पत्र्यावर माणिकमोत्ये जडवली होती.
 

पालखीचा मान आधुनिक युगात देवादिक किंवा ग्रंथदिंडी ह्यांच्यापुरता मर्यादित झाला आहे.
 

संदर्भ :1. भारतीय संस्कृतिकोश, खंड पाचवा, पृ. 539

 

2. Yule, Henry and Burnell, A.C., Hobson-Jobson, Fourth impression, Rupa Co., New Delhi, 2002, p. 827

 

3. रानडे, प्रतिभा, झाशीची लक्ष्मीबाई, राजहंस, पुणे, 2003, पृ. 51-52

 

– सुरेश वाघे
दूरध्वनी (022) 28752675

About Post Author