पाखरा – जव्हार पाड्याच्या मुलांचे पुस्तक !

0
345

पालघर जिल्ह्याच्या जव्हार पाडा भागातील मुलांनी त्यांच्या अवतीभोवती दिसणाऱ्या पक्ष्यांविषयी त्यांच्या नजरेतून लिहिले आहे. तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले गेले आहे. त्यांची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत…

जव्हारच्या जिल्हा परिषद शाळांतील मुलेमुली जंगलाबरोबरीनेच वाढतात… त्यांना जंगलाची भाषा कळते. त्यांना बाफळी, लोत, सरंबल या आणि अशा अनेक भाज्या त्यांच्या जंगलात कोठे सापडतात, त्या कशा शिजवायच्या हे माहीत. कोठला पक्षी एका वेळेस किती अंडी देतो- घरटे कसे बांधतो, भारद्वाज फार उंच कसा उडत नाही-डोंगराच्या टिगीला राहतो, हारुड पक्षी कसा उपडा पडून मरतो, नदीतील मासे, खेकडे… हे सगळं त्यांना कोणीही पुस्तकातून शिकवलेले नाही. तो त्यांच्या दिवसाचा अविभाज्य तुकडा असतो, पण ते सारे शाळेच्या चौकटीत मात्र कोठेतरी हरवते… त्यांचा हा मुक्तपणा, मोकळेपणा त्यांच्यातील चमक कोठे जाते? ती असतेच, पण ती चार भिंतींत सापडत नाही. ती कशी पकडता येईल? खरे तर, तो आशय त्यांच्या ओळखीचाच. आम्ही ‘वयम्’तर्फे एक प्रयोग केला. त्यांच्या रोजच्या आयुष्यातील विषय काढले- गप्पा-गप्पांत छोटे-मोठे अनुभव कागदावर उतरवले. गावात लग्न असते तेव्हा ते काय काय करतात, बाहेरगावी बाचकी बांधून जेव्हा कामासाठी चार पैसे कमावण्यास जातात तेव्हा तेथे कंत्राटदाराबरोबर काय भानगडी होतात, खेळताना काय भांडणे होतात, जंगलात शेवळा गवसायला जाताना सापच कसा पाठी लागतो… आणि पाहता पाहता, पंचवीस शाळांमधील चारशे मुला-मुलींनी त्यांचे अनुभव, सण यांविषयी, भाज्या-खेळ- त्यांच्या प्रक्रिया याविषयी लिहिले.

मुलांना ते विषय ओळखीचे असले तरी त्यांचे अनुभव मांडणे, हे ते नव्यानेच करत होते. त्यातील जागा शोधत होते. त्यांच्या गोष्टींत गावातील लग्नामधील पात्रांविषयी तपशील होते, काही ठिकाणी खेकडे पकडण्याच्या प्रक्रियेविषयी सविस्तर लिहिले होते, पक्ष्यांच्या शिकारीचे अनुभव होते. पोहताना-पाण्यात डुंबताना केलेल्या मज्जा होत्या… त्या नुसत्या घटना नव्हत्या; तर ती मुले त्यांच्या लेखनात कित्तीतरी मजेचे, भीतीचे, रागाचे क्षण पकडू शकली होती. सगळ्यांनाच त्यांचे अनुभव लेखनात पकडता आले असे नाही, त्यांतील काहींनी ते तोंडी सांगितले. त्यावर गप्पा मारल्या. शब्दांत कसे मांडता येईल याचाही प्रयत्न केला.

त्यांच्याकडे सांगण्यासारखे होते, आहेच. पण त्यांचे विषय पुस्तकात सापडत नाहीत असे. त्यामुळे मुलांसाठी पुस्तकातील निबंध आणि हे बंधरहित जगणे सांधले जात नाही, वयाने मोठे होण्याच्या भानगडीत ते तसेच विरून जाते. आम्ही त्या सगळ्या गोष्टी कॅलेंडरच्या माध्यमातून छापल्या. त्या गोष्टी वाचलेले अनेक स्तिमित झाले. त्यांना खेडेगावात राहणाऱ्यांचे दुर्गम-अडचणींचे-अभावाचे जग माहीत होते; पण मुलांच्या आनंदाच्या जागा मात्र मुलांनीच त्यांच्यापर्यंत थेट पोचवल्या होत्या. आम्ही फक्त माध्यम बनलो होतो.

जंगलफेऱ्यांदरम्यान तर आपणच तोकडे वाटू लागतो, इतके भरभरून सांगतात ही मुले! कोठला पक्षी घरटे कसे बनवतो, अंडी एका वेळी किती घालतो, उन्हाळ्यात, पावसाळ्यात की हिवाळ्यात दिसतो? शेगटाच्या झाडावर की हेदीच्या झाडावर दिसतो… असे सगळे त्या मुलांना पाठ असते. रंगाने सारखा असला तरी एका खुणेने वेगळा पक्षी आहे हे ओळखणारी त्यांची ही त्यांची नजर थक्क करणारी होती. घरट्यांची वर्णने तर अशी करतात की पक्षी आणि घरटे जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहत होते. आणि मग कातऱ्याला कातऱ्या का म्हणतात- त्याची नखे कात्रीसारखी कशी असतात, बांडोळा धुराशीच कसा दिसतो, कन्हूर वीस-चोवीस अंडी एका वेळी कसा देतो. अशा सगळ्या तपशिलांवर मुलांबरोबर ‘पक्षीगप्पा’ चांगल्याच रंगतात.

त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना माहीत असलेल्या पक्ष्यांची यादी काढली; तर अडुसष्ट पक्षी निघाले ! पक्षीगोष्टी लिहिताना त्यात पक्ष्यांच्या शिकारीचेही अनुभव होते. मुलांनी त्यांच्या अनुभवलेखनात पक्षी कसा पकडावा, कसा भुजून खावा याचेही सविस्तर वर्णन केले. अशा प्रसंगी तुम्ही पक्ष्यांची शिकार करणे कसे योग्य नाही हे मुलांना सांगता आले असते, पटवताही आले असते; पण तेथल्या तेथे हा शिक्का मारला असता तर त्याचा परिणाम कदाचित वेगळा झाला असता.

शिकार वाईट, पक्षी पकडून भुजून खाणे वाईट येथूनच बोलण्याची सुरुवात केली तर संवाद सुरू होण्याच्या आधीच संपेल. मग आपल्याच अनुभवांना तटस्थ कसे पाहता येईल? एखादे पक्षी आपल्या भागात केव्हा केव्हाच दिसतात, नंतर गायब होतात; असे का बरे होत असावे? आपण खातो त्या पक्ष्यांची घरटी आपल्याकडे दिसतात का? अशा प्रश्नांकडे वळवून अभ्यासातून मते तयार होण्याकडे कल व्हावा. त्यांच्या निरीक्षणांना एका मोठ्या चित्राची जोड देणे, सूक्ष्म रीत्या त्याला अभ्यासणे याकडे वळणे अधिक योग्य ठरेल.

मुलांनी त्यांच्या भागातील पक्ष्यांविषयी लिहिले, त्यांची पक्ष्यांविषयीची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत. या प्रकल्पादरम्यानची प्रक्रिया, निरीक्षणे हे सगळे मुलां-मुलींनी त्यांच्या भाषेत, शैलीत लिहिले आहे. तेच आम्ही ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले आहे. त्या पक्षी प्रकल्पादरम्यान पक्ष्यांची केवळ माहिती नाही तर त्यापलीकडे जाऊन तर्कसंगती, अंदाज लावता येणे, खोलात निरीक्षणे करता येणे, सहसंबंध ओळखता येणे या आकलन टप्प्यांवरही काम झाले आहे. पुस्तकातील अनोळखी माहिती वाचणाऱ्या मुलांनी स्वत:च माहितीचा स्रोत ‘पाखरां’ आणि कॅलेंडर यांच्या निमित्ताने तयार केला आहे. त्यांच्यासाठी ते समृद्ध शैक्षणिक अनुभव ठरले आहेत.

चार भिंतींच्या शाळेत गप्प गप्प बसणाऱ्या मुलामुलींनी लिहिलेले पहिलेवहिले पुस्तक- ‘पाखरां’ आणि त्यांच्याच जगाविषयी त्यांनीच लिहिलेल्या गोष्टींचे कॅलेंडर !

जयश्री कुलकर्णी 9594941301 jayashreerk.30@gmail.com

(सकाळ, अवतरण वरील लेखावर आधारित)

————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here