पांढरीचे झाड अर्थात कांडोळ

6
149

पांढरीचे झाड किंवा कांडोळइंग्रजीत त्या झाडाला ‘घोस्ट ट्री’ असे म्हणतात. मराठीत त्याचे नाव ‘कांडोळ’ किंवा ‘पांढरीचे झाड’ असे आहे. कांडोळ वृक्षाचे खोड अंधाऱ्या रात्री पांढरे, चंदेरी चमकल्यासारखे दिसते. ते पाहून मनात काहीसे भय तयार होते. झाडाच्या पांढऱ्याशुभ्र आणि काहीशा चंदेरी तुळतुळीत खोडावर, त्वचेवर भाजून काळे डाग पडावेत तसे व्रण असतात. झाडाचा बुंधा आखीवरेखीव असून त्याला छत्रीसारखा पसारा असतो. पांढरीच्‍या झाडावर डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास एकही पान नसते आणि फांदीच्या टोकाला मॉस (शेवाळे) गुंडाळल्यासारखा फुलोरा असतो. त्याला फुलोरा किंवा फुले का म्हणतात हा प्रश्नच आहे, कारण लांबून ना त्यांचा आकार दिसतो ना त्याचे अस्तित्व जाणवते. जवळून निरीक्षण केल्यावर लक्षात येते, की ती फुले चांदणीच्या आकाराची, अतिशय छोटी असतात. प्रत्येक फूल पाच पाकळ्यांचे असते. फुले हिरवट रंगाची असतात आणि त्यांवर थोडीफार लालसर रंगाची नक्षी असते. ती दिसायला अनाकर्षक आणि नगण्य असतात. त्यांचा वासही घाण असतो. स्टर्कुलिया कुटुंबातील वृक्षांना दुर्गंध असतोच!

त्याची फुले जेवढी अस्ताव्यस्त असतात तेवढी त्याची फळे व्यवस्थित, नीटनेटकी आणि आकर्षक. झाडाला फळे लागतात तेव्हा त्याचे रूपच बदलून जाते. ती स्टारफिशसारखी किंवा पंचपाळ्यासारखी दिसतात. ती फळे उठावदार किरमिजी रंगाची असतात आणि त्यावर मखमली लव असते. काही जातींत फळांचा रंग गुलाबी असतो. फळे दिसतात अतिशय साजरी आणि ती मखमली भासत असली तरी त्यांची लव काट्यासारखी रूपते. फळे थोडी मोठी होत असतानाच फांद्यांच्या टोकावर पालवी फुटू लागते. पांढऱ्याशुभ्र झाडावर पोपटी-हिरवीगार पालवी शोभून दिसते. पानांचा आकारही पाच कोन असलेल्या द्राक्षासारखा, पण थोडा विस्तारित असतो. उन्हाळा वाढत जातो तसतशी पालवी मोठी होऊन झाड हिरवेगार दिसू लागते. फळांवर लव असते तशीच लव झाडांच्या पानांवरसुद्धा असते. लवेमुळे ती स्पर्शाला मऊसूत लागतात.

पांढरीच्‍या झाडाची फुलेझाडाची साल आणि डिंक आख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. झाडाची साल औषधी आहे; डायरियावर गुणकारी म्हणून वापरली जाते. दातांच्या कवळ्या बनवण्यासाठी साच्यांमध्ये पावडर टिकून राहण्यासाठीही त्याचा डिंक वापरला जातो. खाद्यपदार्थाच्या उद्योगातसुद्धा त्याचा डिंक वापरला जातो.

पांढरीच्‍या झाडाची आणि माझी पहिली ओळख झाली ती ताडोबाच्या जंगलात! मी कॉलेजमध्ये असताना ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या कॅम्पला गेलो होतो. ताडोबाच्या प्रवेशद्वारापाशी तो भलामोठा, वृक्ष पसरलेला होता. त्याच्या पारावरच आमची नोंदणी सुरू होती. पांढराशुभ्र असा पसरलेला तो वृक्ष त्याच्या सौंदर्याने पहिल्यांदा पाहत असल्याने पटकन नजरेत भरला आणि कायमचा लक्षात राहिला.

पांढरीच्‍या झाडाची फुलेत्यानंतर आमच्या ठाण्यात येऊरला आणि अनेक वेगवेगळ्या जंगलांत वृक्ष परत परत भेटत गेला. प्रत्येक मोसमात त्याचे बदलणारे रूप न्याहळताना, छायाचित्रण करताना वेगळाच अनुभव यायचा. येऊरच्या सुक्या धबधब्याच्या उतरंडीवर तो वृक्ष आहे. त्याला फळे धरल्यावर त्याचे छायाचित्रण करायला गेलो असताना, ती फळे जरा जास्त उंचावर असल्यामुळे पाय उंचावून एका हाताने फांदी खाली खेचली आणि दुसऱ्या एकाच हाताने छायाचित्रण सुरू केले. मात्र ती कसरत करताना पायाखालची माती सरकली आणि वर फांदीवर धरलेला माझा हात खाली थेट फळांवर आला. आता, फळांचे काटे टोचतात म्हणून फांदी सोडली असती तर मी कॅमेऱ्यासकट खाली कोसळलो असतो, त्यामुळे मला त्या काटेरी, टोचणाऱ्या फळांचा आधार घेऊनच स्थिर व्हावे लागले. अर्थात त्या काळात काही मोजकी छायाचित्रे मिळाली होती. पण त्यानंतरचे दोन/तीन दिवस हातातील खाजणारे काटे काढण्यात गेले!

युवराज गुर्जर
९८९२१३८३३८
ygurjar@gmail.com
(‘स्मॉल वंडर बाय युवराज गुर्जर’ ब्लॉगवरून साभार.)

About Post Author

6 COMMENTS

  1. As far as I remember this
    As far as I remember this tree iis available at Matheran ( I was there about 65 years back) The sticks of this tree are suitable/give support to person while walking there. on mouintains

  2. It was nice information sir…
    It was nice information sir thank you so much for information.

  3. Excellent information sir…
    Excellent information sir. Please send me the location of availability.

  4. धन्यवाद अतिशय छान शास्त्रीय…
    धन्यवाद अतिशय छान शास्त्रीय माहिती. चौल अलिबाग, रायगड येथे बरीच झाडे आहेत पण इथे त्याला सालढोल असे नाव आहे.

  5. नमस्कार सर, मी ह्या…
    नमस्कार सर, मी ह्या पांढरीच्या झाडाबद्दल वाचले आणि ऐकलेही आहे, कृपया मला मार्गदर्शन करा कि ह्याची छोटीशी फांदी किंवा खोडाचा एक फुट तुकडा कुठे मिळेल ते आवर्जून सांगा

  6. पाहीजे आहे कठी
    पाहीजे आहे कठी

Comments are closed.