पगडी (Turban)

0
98

विशिष्ट पद्धतीने कायम बांधून ठेवलेल्या बसक्या पागोट्याला पगडी असे म्हणतात. त्यासाठी नऊ इंच रुंद व वीस ते पंचवीस वार लांब तलम सुती किंवा रेशमी, रंगीत वस्त्र वापरतात. लहानसा टोप घेऊन त्याच्या भोवती अशा वस्त्राचे लपेटे देतात. तसे करताना वरच्या भागावर भिन्न जागी, भिन्न प्रकारचे उंचवटे तयार करतात. पगडी गोल, त्रिकोणी-चौकोनी अशी विविध आकारांची असू शकते. काही पगड्या कापडाला पीळ भरून बांधलेल्या असतात. मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, मालवी अशा प्रदेशपरत्वे वेगळ्या प्रकारच्या पगड्याही प्रचलित होत्या.
उन्हापावसापासून डोक्याचे संरक्षण करता करता शिरस्त्राणाचे संकेत तयार झाले. त्यातूनच उघड्या डोक्याने घराबाहेर पडू नये; तसेच, प्रवासाला व मंगलकार्याला जाऊ नये अशी समजूत पूर्वापार घडली गेल्यामुळे पगडी ही गोष्ट अत्यावश्यक ठरली आणि त्यातूनच पुढे पगड्यांचे शेकडो प्रकार निर्माण झाले.

महाराष्ट्रात मराठेशाहीत अनेक प्रकारच्या पगड्या प्रचलित होत्या. छत्रपती शिवाजीमहाराजांची पगडी जिरेटोप या नावाने प्रसिद्ध आहे. ती मागे झुकलेली असून, वर निमुळती होत जाते. तिला मागच्या टोकाला मोत्यांचा घोष बसवलेला असतो. पेशव्यांच्या पगड्या विविध आकारांच्या व रत्नखचित होत्या. प्रसिद्ध मराठे सरदारांच्या पगड्या त्या त्या नावाने प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, शिंदेशाही, होळकरी, गायकवाडी इत्यादी. त्या बहुतेक पिळाच्या असतात.

ब्राह्मणांच्या पगड्या विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या असतात. त्यांचा घेर मस्तकापेक्षा बराच मोठा असून, शिरोभागी चोचदार उंचवटा असे. कापडाचे पट्टे मात्र सरळ सपाट गुंडाळलेले असे. बहुतेक ब्राह्मण तशा पगड्या विसाव्या शतकाच्या प्रारंभीदेखील वापरत होते. मात्र त्यांचा घेर कमी झालेला होता. विवाहादी समारंभांत रेशमी लहान पगडी अजुनही वापरतात. तिला जरीचा गोंडा लावलेला असतो. चकी पागोटे हा सुद्धा पगडीचाच प्रकार होय. त्याचा घेर मोठा असे.

पगड्यांचे रंग व त्यांच्या बांधण्याच्या पद्धती अधिकारपरत्वे वेगवेगळ्या असत. पगड्यांवरून वर्णाचाही बोध होत असे. क्षत्रियांच्या पगड्या उंच असत, तर वैश्यांच्या  ठेंगण्या. स्त्रियाही डोक्याला पगड्या प्राचीन काळी बांधत. त्या पुरुषांच्या पगड्यांपेक्षा वेगळ्या असत. सैनिक आणि नागरिक यांच्या पगड्याही भिन्न आकारांच्या व भिन्न रंगांच्या असत. पगडीचा एक सोगा पाठीवर सोडणे शुभ समजले जाई. प्रसंगविशेषी भिन्न रंगाची व आकाराची पगडी वापरली जाई. पुत्रजन्माच्या प्रसंगी पिवळी अथवा मोतीया रंगाची पगडी बांधत. विवाहप्रसंगी पगडी बांधून तिच्यावर तुरा खोवत. मृताचे क्रियाकर्मांतर उरकल्यावर कर्त्याला पुण्याहवाचनपूर्वक पगडी किंवा मंदिल बांधण्याची प्रथा आहे.

पगड्या मुसलमानांतही वापरण्याची पद्धत आहे. उंच गोल टोपीभोवती तलम कापडाचा लांबलचक पट्टा गुंडाळून त्या पगड्या बनवल्या जातात. दिल्लीचे बादशाह व निरनिराळ्या प्रांतांचे सुलतान यांच्या पगड्या अतिशय उंची रेशमी कापडाच्या असत. त्यांना विविध रत्ने जडवली जात. लहानशी जरीची टोपी घेऊन तिच्यावर वस्त्राचे पट्टे विविध प्रकारे गुंडाळून अशा पगड्या बनवत. शेख व मुस्लिम धर्माधिकारी यांच्या पगड्या हिरव्या असत. मुसलमान लोक पगडी नमाज पढताना घालतात. मुसलमानांच्या पंथोपंथांच्या पगड्या भिन्न पद्धतीच्या असतात.
इतिहासकाळी, विशेषतः राजस्थान व उत्तरप्रदेश, यांत पगडी ही प्रतिष्ठेची वस्तू समजली जाई. मारवाडातील दुर्गादास या वीर पुरुषाच्या संबंधात एक दोहा प्रसिद्ध आहे. तो असा –

जननी सूत ऐसो जने जैसो दुर्गादास
बांध मुंडासा रखियो बिनधरती बिनआकासअर्थ – मातेने दुर्गादासासारख्या अशा सुपुत्राला जन्म द्यावा, की त्याच्या पगडीचा पृथ्वीवर व आकाशातही मान राहील.

(आधार – भारतीय संस्कृतीकोश)
 

 

About Post Author

Previous articleपखवाज
Next articleउदाहरणार्थ, सटाण्याचे पाणी आंदोलन!
नितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरींग आणि एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग असतो. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर 'स्ट्रीट प्ले' आणि 'लघुनाटके' लिहिली आहेत. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांना 'के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुंडट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आहे.