पंढरीची वारी

0
54

पंढरीची वारी निश्चित कधी सुरू झाली ते सांगणे कठीण आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. विविध संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरपुरास जातात. त्यात प्रामुख्याने श्रीज्ञानेश्वर महाराज (आळंदी), निवृत्तिनाथ (त्र्यंबकेश्वर), सोपानदेव (सासवड), मुक्ताबाई (एदलाबाद), विसोबा खेचर (औंढ्या नागनाथ), गोरा कुंभार (तेर), चांगदेव (पुणतांबे), जगन्मित्र नागा (परळी वैजनाथ), केशव चैतन्य (ओतूर), तुकाराम महाराज (देहू), बोधलेबुवा (धामगाव), मुकुंदराज (आंबेजोगाई), जोगा परमानंद (बार्शी), कान्होराज महाराज (केंदूर), संताजी जगनाडे (सुदुंबरे) ह्या पालख्यांचा समावेश होतो. ह्या सा-या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात.

हैबतबाबा आरफळकर ह्या सत्पुरुषांनी पालखीच्या सोहळ्याला नेटके रूप दिले. ते ज्या विशिष्ट क्रमाने अभंग म्हणत असत त्यातून आजची भजनमालिका सिध्द होत गेली. त्यांनी ज्ञानेश्वरमाऊलींच्या पादुका पालखीतून नेण्याची व्यवस्था केली. ते लष्करात होते; त्यामुळे त्यांनी वारीला शिस्त घालून दिली, ती आजही पाळली जाते. त्यामुळे लक्षावधी वारक-यांना शिस्त लावण्यासाठी फौजफाट्याची आवश्यकता भासत नाही.

वारकरी परंपरेचा अभाव केवळ 'अशिक्षित' समजल्या जाणा-या हिंदुधर्मीय ग्रामीण जनतेवर पडला आहे असे नव्हे. डॉ. गुंथर सोंथायमर या मराठीच्या अमेरिकन अभ्यासक नियमितपणे पुण्याला येत असत आणि एखाद्या भाविक वारक-याप्रमाणे भक्तिभावाने आषाढी-कार्तिकीची यात्रा करत असत. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास केवळ श्रुतिस्मृतींमधून करण्यापेक्षा लोकजीवनातून केला पाहिजे असा डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी ह्यांचा आग्रह होता. तो मान्य करून डॉ. सोंथायमर ह्यांनी पंढरीच्या वा-या केल्या आणि संशोधनपर निबंध लिहिले. त्यांचे जून 1992 मध्ये अकस्मात निधन झाले.

संदर्भ :

1. देखणे, रामचंद्र, महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला, तृतीयावृत्ती, पद्यगंधा प्रकाशन, पुणे, 2000, 48-58

2. जर्मन 'जेजुरीकरा'ची परंपरा, (अग्रलेख), लोकसत्ता, 16 जून 1992

 

About Post Author