पंचामृत (Panchamrut)

4
86
carasole

गाईचे दूध, दही व तूप; तसेच मध आणि साखर या पाच पदार्थांच्‍या मिश्रणाला पंचामृत असे म्‍हणतात. पंचामृत देव-देवतांच्या षोडशोपचार पूजेत अत्यावश्यक मानले गेले आहे. त्‍या पूजेत स्‍नानानंतर देवाला पंचामृताचे स्‍नान घालतात. पूजाविधीमध्‍ये पंचामृतात समाविष्‍ट असलेल्या प्रत्‍येक पदार्थासाठी एक मंत्र दिलेला असतो. गर्भवतीला दिनशुद्धी पाहून एकदा पंचामृत पिण्‍यास द्यावे, अशी सूचना ज्‍योतिस्‍तत्‍वात केलेली आहे.

दूध : शास्त्रकारांनी दुधाला ‘अमृत’ म्हटले आहे. दूध बुद्धिवर्धक असते. दूध तापवल्यानंतर त्यावर जमा होणारी साय पचनास जड पण बलवर्धक, पौष्टिक असते.

दही : फारसे आंबट नसलेले, मधुर दही हे दुधापेक्षाही अधिक गुणकारी आहे. ते शक्यतो रात्री खाऊ नये. दही आवळ्याच्या चूर्णाबरोबर घेतल्यास रक्ताचे व पित्ताचे आजार कमी होतात.

तूप : गाईचे तूप सर्वश्रेष्ठ समजले जाते. तुपाच्या सेवनाने धातूची वृद्धी होते, मेंदू शांत राहतो, शरीरातील उष्णता कमी होऊन रक्ताची शुद्धी होते. खाण्यासाठी ताजे तर औषधासाठी जुने तूप वापरले जाते. जुन्या तुपाचा वापर मलमाप्रमाणे करता येतो. नाकातून रक्त येत असल्यास नाकात तुपाचे दोन-दोन थेंब सोडावेत. पित्तामुळे डोके दुखत असल्यास टाळूवर व कानशीलावर थोडे तूप चोळल्यास डोकेदुखी थांबते. मात्र तुपाचे अतिरिक्त सेवन झाल्यास ते हानिकारक ठरते. आम्लपित्त, मेदवृद्धी, दम्यासारख्या आजारात तुपाचा जास्त वापर करू नये.

मध : मध मनुष्यास निरोगी, बलवान व दीर्घायुषी बनवण्यास मदत करते. मध श्वसनसंस्थेच्या विकारांवर गुणकारी असते. मध दाह, खाज सुटणे, फोड यांसारख्या त्वचाविकारांवर उपयोगी असते.

मध ठरावीक प्रमाणात रोज नियमाने घेतले तर हृदय सुदृढ होण्यास मदत होते. मात्र मध गरम पदार्थाबरोबर घेऊ नये. मध व तूप समप्रमाणात खाऊ नये. मधाच्या सेवनाने चरबी घटते. एक चमचा मध, अडुळशाचा रस व अर्धा चमचा आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास खोकला बरा होतो. मलावरोधावरही मध उपयुक्त आहे.

साखर : थकवा त्वरित भरून काढण्‍यासाठी साखरेचा खास उपयोग होतो. खडीसाखर जुलाबावर गुणकारी आहे. साखर प्रामुख्याने पित्तदोष दूर करणारी आहे. खडीसाखरेच्या अतिसेवनाने मधुमेह, संधिवात यांसारखे आजार उद्भवतात. भारतात काही ठिकाणी पंचामृतात साखरे ऐवजी उसाचा रस वापरला जातो.

पंचामृतामध्‍ये तुळशीची पानेही टाकली जातात. भारतातील अनेक देवस्‍थानांमध्‍ये शेकडो वर्षांपासून देवदेवतांच्या मूर्तींचे पंचामृताने अभिषेक केले जातात. देवाला पंचामृताने स्‍नान घडवल्‍यानंतर ते पंचामृत प्रसादाच्‍या रुपामध्‍ये वाटले जाते. तथापी वर्षानुवर्षे पंचामृताच्‍या अभिषेकामुळे मंदिरांमधील पुरातन मूर्तींची झीज होऊ लागली असल्‍याचे लक्षात आले. त्‍यामुळे काही वर्षांपूर्वी पंढरपूर येथील विठोबाच्‍या मूर्तीवर महापूजेच्‍या वेळी केला जाणारा पंचामृताचा अभिषेक बंद करण्‍यात आला. आता विठोबाच्‍या मूर्तीला दररोज सकाळी पाच वाजता नित्‍यपूजेच्‍या वेळी दूध, मध आणि तूप यांनी स्‍नान घातले जाते. त्‍यामध्‍ये साखर आणि दही अत्‍यल्‍प प्रमाणात वापरले जाते.

पंचामृतात वापरल्या जाणा-या पाच घटकांचा प्रतिकात्‍मक विचार करण्‍यात आला आहे. त्‍यातील दूध हे शुभ्रतेचे, पावित्र्याचे प्रतिक मानले गेले आहे. यामध्‍ये माणसाने दूधाप्रमाणे निष्‍कलंक व्‍हावे असा अर्थ अभिप्रेत आहे. दही हे दूधाप्रमाणेच दिसते मात्र ते इतर पदार्थांना स्‍वतःच्‍या गुणामध्‍ये रुपांतरीत करते. माणसाने प्रथम निष्‍कलंक व्‍हावे आणि त्‍यानंतर त्याच्‍या सहवासामध्‍ये येणा-या इतर व्‍यक्‍तींवर तोच संस्‍कार करावा असा अर्थ त्‍यामागे आहे. तसेच ते भरभराटीचे प्रतिक आहे. पंचामृतातील तूप हे स्निग्‍धतेचे अर्थात स्‍नेहाचे द्योतक आहे. माणसाची सर्व नाती स्‍नेहपूर्ण असावीत असा त्यामागचा अर्थ. तूप हे विजयाचे प्रतिक असल्‍याचेही मानले जाते. मध गोड असला तरी त्‍याच्‍या ठायी ताकदीचे, एकीचे गुण आहेत. व्‍यक्‍तीने श्‍ारीराने आणि मनाने मधाप्रमाणे शक्तिवान असावे आणि परस्‍परांशी एकीने वागावे असा अर्थ त्‍यातून व्‍यक्‍त होतो. तर पंचामृतात वापरल्‍या जाणा-या साखरेप्रमाणे व्‍यक्तिने त्‍याच्‍या आयुष्‍यात, संभाषणात माधुर्य ठेवावे असा त्‍यामागचा अर्थ सांगितला गेला आहे. साार हे सुख आणि आनंद यांचे प्रतिक ठरते.

वेदांमध्‍ये पंचामृतात वापरल्‍या गेलेल्‍या पाच घटकांचे पाच वेगवेगळे परिणाम विषद करण्‍यात आले आहेत. पंचामृताच्‍या वापरामुळे मानवास देवांकडून हव्‍या असलेल्‍या गोष्‍टी प्राप्‍त होतात असे म्‍हटले आहे.

पंचामृत तयार करताना त्‍यातील घटकांचे प्रमाणही ठरवले गेले आहे. दूध, दूधाच्‍या अर्ध्‍या प्रमाणात दही, दह्याच्‍या अर्ध्‍या प्रमाणात तूप, तूपाच्‍या अर्ध्‍या प्रमाणात मध आणि मधाच्‍या अर्ध्‍या प्रमाणात साखर मिसळून पंचामृत तयार केले जाते. काही ठिकाणी मध आणि साखर वगळता बाकी सर्व घटक समप्रमाणात घ्‍यावेत असे सुचवले आहे.

पंचामृताचा समावेश देवपूजेप्रमाणे आहारातही केला जातो. गोड्या मसाल्यामध्ये तयार होणारे पंचामृत निराळेच. या पंचामृतात प्रामुख्याने गूळ, खोबरे, शेंगदाणे, लाल व हिरव्या मिरचीचे काप, महाराष्ट्रीय मसाला यांचा समावेश होतो. ब-याच वेळा यात कारल्याचे कापही घालतात. या सर्व जिन्नसांमुळे याला गोड, आंबट, थोडी कडवट चव येते. हा पदार्थ अल्प प्रमाणात भूक वाढवणारा व अन्नाचे पचन घडवून आणणारा असतो. सणांच्या दिवसात खूप गोड व तळलेले पदार्थ आपण खातो. त्यासोबत पंचामृत असले म्हणजे अन्न पचण्यास मदत होते. पोळी किंवा वरणभातासोबत पंचामृत सेवन करतात. काही नवीन स्वयंपाकाच्या पद्धतीमध्ये पंचामृतामध्ये काजू व मनुकासुद्धा घालतात. पंचामृतामधील मोहरी, जिरे, हिंग, कढीलिंब व मिरची या पदार्थांमुळे मंदावलेली भूक वाढते व अन्न पचायलाही सोपे जाते. त्यामधील खोबरे, शेंगदाणे व मनुकांमुळे त्यामध्ये पोषक मूल्ये भरपूर असतात. त्यासोबत विविध प्रकारची आवश्यक जीवनसत्त्वे आपणास पंचामृतामधून मिळतात. याची चव पंचपक्वान्नांसोबत वेगळीच मजा देऊन जाते.

पंचामृत आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही औषधी आहे. ते रोज योग्य प्रमाणात सेवन केले तर लहान मुले, वयोवृद्ध यांना उपयुक्त ठरते. पंचामृतामुळे शरीर पुष्ट होते. पोटात आग पडणे, जळजळणे यावर ते उपायकारक आहे. पंचामृतामुळे मानसिक ताण कमी होतो. ते बुद्धीवर्धक असून त्‍यामुळे वजन वाढते. सकाळी उठल्याबरोबर पंचामृत घेतले तर अर्धशिशीवर उतार मिळतो. ते रोज सेवन केल्यास शरीरास  शक्ति प्राप्‍त होते. त्‍यामुळे स्मरणशक्ती वाढते, कान्ति उजळते, वात्-पित्त-कफ ह्या त्रिदोषान्चे सन्तुलन होते.

– आशुतोष गोडबोले

About Post Author

4 COMMENTS

Comments are closed.