नूरजहान – महत्त्वाकांक्षी आणि लावण्यवती (Noorjahan – As Marathi writers saw her over hundred years)

0
108

मोगल साम्राज्यातील जहांगीर आणि नूरजहान यांची माहिती त्या नावांपलीकडे इतिहासात फारशी नसते, पण नूरजहानचे चित्र मात्र क्रमिक पुस्तकात हमखास असायचे. नूरजहान म्हणजे अनारकली आणि मोगल- ए- आझम या चित्रपटाची नायिका हा समज सार्वत्रिक म्हणता येईल एवढा मोठ्या प्रमाणावर दिसतो. परंतु तसा अपसमज महाराष्ट्रात शतकापूर्वी नसावा असे एका लहानशा कादंबरीमुळे म्हणता येईल. त्या कादंबरीचे नाव आहे नूरजहान अथवा जगदीप्तीआणि तिचे लेखक आहेत यादव शंकर वावीकर.

कादंबरी 1905 साली प्रकाशित झाली. तिच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतात, की त्यांनी ती सुमारे पाच वर्षांपूर्वी लिहिली होती. ती तेव्हा प्रकाशित होऊ शकली नाही. म्हणजे ती कादंबरी एकार्थाने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरची म्हणता येईल. ती कादंबरी लिहिली आहे एका मूळ इंग्रजी कथेवरून.

 

ती कथा होती The Romance of History – India  या पुस्तकात. पुस्तकाचे लेखक होते रेव्ह होबर्ट काउंटर. त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत माहिती दिली आहे, की रोमँटिक कथा इतिहासात जगाच्या सर्व भागांत घडल्या होत्या आणि त्या घडत असतातच. काउंटर यांनी इंग्लंड-फ्रांस-स्पेन-इटली आणि हिंदुस्थान या देशांच्या इतिहासातील तशा कथांची पाच स्वतंत्र पुस्तके लिहिली. त्यांनी हिंदुस्तानातील कथांच्या पुस्तकात एक कथा (सुमारे साठ पाने) नूरजहान हिच्यावर लिहिली – Light of the World या शीर्षकाची (ते शीर्षक म्हणजे नूरजहान या शब्दाचा इंग्रजीतील अर्थ). पुस्तक 1836 साली प्रथम प्रकाशित झाले हे लक्षात घेतले, की त्याचे शीर्षक इतके प्राथमिक असल्याचे नवल वाटणार नाही. वावीकर यांनी ती कथा वाचली आणि ती मराठीत आणली.

वावीकर आणि काउंटर यांनी सांगितलेली नूरजहानची कथा थोडक्यात अशी –

नूरजहान हिचा जन्म एका सामान्य गृहस्थाच्या पोटी झाला. तिच्या जन्माच्या वेळी तिचा बाप ग्यासुद्दीन हा वाळवंटातून प्रवास करत होता. तो अतिशय गरीब होता, त्याची पत्नी सरदारकन्या होती. तिच्या घरच्यांना विवाह पसंत नसल्याने ते पळून चालले होते. तेव्हाच नूरजहानचा जन्म झाला आणि तिची आई काही दिवसांत मरण पावली. नूरजहानचा सांभाळ एका अपत्यहीन जोडप्याने केला. ग्यासुद्दीन नोकरीधंदा बघण्यासाठी फतेहपूरला गेला. तेथे त्याला एका मौलवीच्या शिफारशीने अकबराच्या कारभारांत लहानशी नोकरी मिळाली. तो त्याच्या मेहनतीने कामात प्रगती करतो, मोठ्या पदावर पोचतो. मात्र त्या गडबडीत तो मुलीला परत आणण्यास विसरतो किंवा त्याला ते जमत नाही. सुमारे नऊ वर्षे उलटल्यावर त्याची मुलीशी गाठ पडते. तो तिला त्याच्या घरी वाढवू लागतो. ती तरुण होते. तिच्या लावण्याची कीर्ती सर्व शहरांत पसरते. अकबराचा मुलगा सलीम आणि त्याचा सरदारपुत्र असलेला मित्र शेर अफगाण (हा किताब त्याने कोणत्याही शस्त्राशिवाय वाघाला ठार मारले, म्हणून त्याला खुद्द अकबराने दिला होता) दोघे तिच्याशी लग्न करण्यास उत्सुक असतात. तिला स्वतःला शेर अफगाण पसंत असतो. त्याला ती पत्र लिहून घराच्या बागेत बोलावते. ते पत्र वावीकर यांनी कसे दिले आहे ते पाहा –

जनाब शेर अफगाणके खिदमतमे यह अर्ज हैं कि आज रातको आपकी मुलाकात होगी | जब आदमी सो जायेंगे तब आप आईये| आपकी मुलाकात होनी चाहिये |  इस्स वजेसे मैने गारमे सब ठीक किया है | आपको रस्ता दिखलानेके लिये लवंडी रखनेमे आयेगी | जरूर आईए | आपके मोहब्बतके वास्ते सरगरम – मेहेरुन्निसा

शेवटच्या ओळीचा मराठी तर्जुम्यातील अर्थ – तुमच्या प्रेमाकरता उत्कंठित झालेली असा दिला आहे. (येथे रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र आठवते) शेर अफगाण तिला गुप्तपणे भेटतो, त्या प्रसंगातही उर्दू शायरी आहे.

ख्वाहिश होती है जिसको खुशबूदार गुलाबकी

 

उन्होने सहेना जरूर है सख्त चुभना खारकी  |”

 

शौकत दौलत इल्म भी पाता इन्सान कोशीशसे

 

सच्चा प्यार ना मिले तखदिर बिना किसतोर्से  |”

अकबराने सलीम याला मेहरुन्निसा हिच्याशी लग्न करण्याची परवानगी नाकारली, म्हणून तो संतप्त आहे. मेहरुन्निसा आणि शेर अफगाण लग्न करून बरद्वान येथे गेले. तेथे त्यांना एक मुलगा झाला, पण तो लहान असतानाच मरण पावला. त्यानंतर काही वर्षांनी एक मुलगी झाली. लग्नाला सुमारे वीस वर्षे झाली आणि अकबर निधन पावला. सलीम राज्यावर आला. त्याने जहांगिर हा किताब धारण केला. त्याचे मेहरुन्निसाबद्दलचे आकर्षण संपले नव्हते. त्याने काहीतरी खुसपटे काढून शेर अफगाण याच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. तो बधत नाही असे पाहून सरळ त्याला मारेकरी घालून ठार मारले. एकाकी पडलेली मेहरुन्निसा घर सोडून जाते. वेष बदलून एका भिल्लाच्या घरात राहते. तेथे जहांगीरचे लोक तिला शोधून काढतात. तिला पकडून जहांगीरच्या जनानखान्यात आणले जाते. मात्र जहांगीर तिला ताबडतोब लग्न करण्याची जबरदस्ती करत नाही. सकृतदर्शनी याचे नवल वाटेल, कारण जहांगीरने तोपर्यंत व्यसनी, भोगी आणि कर्तृत्वशून्य असा बदलौकिक मिळवला होता. वावीकर यांच्या कथेत याची दोन कारणे सांगितली आहेत – एक त्याला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती आणि दुसरे त्याला स्वतःच्या कृत्याची – शेर अफगाण याची हत्या घडवून आणली ही अपराधी भावना सतावत होती.

तशी तीन-चार वर्षे गेली. मेहरुन्निसा जनानखान्यातील स्त्रियांना भरतकाम शिकवणे, संगीत शिकवणे यांत कालक्रमणा करू लागली. तिच्यावर आणखी एका आशिकाने जबरदस्ती केल्याची एक उपकथा मराठी रूपांतरात येते, पण ती विसंगत तपशिलांनी युक्त आहे. अखेर, जहांगीर याला त्याने मेहरुन्निसा हिच्याकडे दुर्लक्ष केले हे बरे केले नाही असे वाटू लागते ; कारण तिच्या सौंदर्याची भुरळ त्याच्या भोगप्रिय प्रवृत्तींना पुन्हा पडू लागते. तो तिच्याकडे आल्यानंतर ती त्याला झिडकारत नाही. कारण? ती समजदारीचा विचार करते. या कोंडवाड्यात तिच्यावर कोणीही जबरदस्ती व बळाचा वापर केला तर तिचे रक्षण तिला स्वतःलाच करावे लागेल हे ओळखून ती त्याच्यासमोर काही अटी ठेवते. त्यांतील मुख्य अट म्हणजे तिला सन्मानाने वागवले जावे; ती अट जहांगीर कुराणावर हात ठेवून मान्य करतो आणि तिला मुख्य बेगम करेन असे कबुल करतो. त्यानुसार त्यांचा विवाह धामधुमीने होतो. तिला नूरमहल म्हणजे अंतःपुर दीप्ती असा किताब मिळतो.

आता ती राज्यकारभारांत लक्ष घालू लागते, जहांगीरचा व्यसनाधीनपणा कमी करण्याचा प्रयत्न करते. ती त्याच्या अनुमतीने बऱ्याच बाबींचा निकाल लावते. अनुमतीची गरज नाममात्र असते, कारण तो तिच्या पूर्ण अधीन असतो – सैन्यात अनेक महत्त्वाच्या जागी स्वतःची माणसे नेमते. त्याचा त्रास शाहजहान याला होऊ लागतो. मोहोब्बतखान नावाच्या सरदाराच्या साहाय्याने ती सर्व बंडखोरी मोडून काढते. परंतु तिला त्यानंतर वाटू लागते, की मोहब्बतखान डोईजड होऊ लागला आहे. ती त्याच्या विरूद्ध खोट्या बातम्या पसरवते. त्याचा किल्ला त्याच्याकडून काढून घेते. परिणामी मोहोब्बतखान बंड करतो. जहांगीर आणि नूरजहान यांना अटकेत ठेवतो. जहांगीर लढाई करण्यास असमर्थ असतो, पण नूरजहान प्रतिकार करते, स्वतः धनुष्यबाण हाती घेऊन लढते.

मोहोब्बतखान जहांगीरचे मन नूरजहानच्या बाबतीत कलुषित करतो आणि तिला मारावे असा हुकूमनामा त्याच्या सहीने लिहून घेतो. मात्र तिच्या वधासाठी तिच्या तंबूत आलेला हबशी विचलित होतो. नूरजहान त्याला विनंती करते, की तिला जहांगीरचे अखेरचे दर्शन घेऊ द्यावे, त्यानंतर ती मरण्यास तयार आहे. जहांगीर तिच्या भेटीत विरघळतो नि मोहोब्बतखानाला विनंती करतो, की त्याने नूरजहानला मुक्त करावे. मोहोब्बतखान ते मान्य करतो. मात्र नूरजहानला त्याचा सूड घ्यायचा होता. ती त्याच्याशी वरवर चांगली वागते, पण त्याला मारण्याचा कट रचते. अखेर, मोहोब्बत त्यांना मुक्त करतो. तो त्याचे सर्व अधिकार सोडून देतो.राज्यात बंडावा करून शहा व सुलताना यांना कायमचे बंदिखान्यात टाकून मोगल सिंहासनावर त्याची सत्ता पूर्णपणे प्रस्थापित करण्याचा विचार त्याच्या मनाला शिवलाही नव्हता. त्याच्या प्रतिस्पर्ध्याची खोड मोडावी, त्याचे सामर्थ्य प्रतिस्पर्ध्यांना दाखवावे, एवढ्याचकरता त्याला असे वागणे भाग पाडले .”(पृ 149).

नूरजहान मुक्त झाल्यावर पुन्हा कार्यरत होते. ती मोहोब्बतखानाविरुद्ध जहांगीरचे मन कलुषित करते. त्याला मारण्याचा हुकूम द्यावा असे बादशहाला सांगते. मात्र जहांगीरला मोहोब्बतखानाच्या वागण्याची, त्याच्या निष्ठेची खात्री होती आणि कदरही. त्याने ती मागणी निषेधपूर्वक फेटाळली. तरीही तिने एका नोकराला बादशहाच्या आसनामागे लपून बसून मोहोब्बतखान येताच त्याला ठार करावे असा हुकूम दिला. तिचे ते शब्द जहांगीरने ऐकले आणि मोहब्बतखानाला निघून जाण्यास सांगितले.

थोडक्यात, नूरजहानच्या स्वभावातील महत्त्वाकांक्षा, त्याबरोबरच पाताळयंत्रीपणा आणि प्रसंगी विश्वासघात करण्याची तयारी या काळ्या छटा त्या कथेत दिसतात आणि नूरजहानबद्दल अत्यल्प माहिती असलेला वाचक चक्रावून जातो.

आता ही सारी पूर्वदूषित कलाटणी आहे का?

स्वतः वावीकर यांनी प्रस्तावनेत अनेक कागदपत्रे अभ्यासली असे म्हटले आहे. त्यांनी त्यांचा हा पहिलाच लेखन प्रयत्न आहे असेही म्हटले आहे. त्या नवखेपणाच्या खुणा दिसल्या, तरी त्यांनी कथा रंगतदार करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक प्रसंगी भाषा संपूर्ण मराठी वळणाची- क्वचित शृंगारिक शब्द येऊ नयेत अशी काळजी घेणारी. शेर अफगाण गुप्तपणे भेटण्यास येतो आणि जाताना मेहरुन्निसाचे चुंबन घेतो ही घटना वावीकर अशी सांगतात – असे म्हणून त्याने प्रेमाच्या खुणेदाखल साखरेचा एक @@ घेतला.

(जाता जाता – वावीकर यांनी ज्या मूळ कथेवरून त्यांची लघु कादंबरी रचली त्या The light of the World या कथेत लेखक रेव्ह होबर्ट काउंटर यांनी उत्तरराम चरिताच्या इंग्रजी भाषांतरातून पुढील ओळी मांडल्या आहेत –  

”Her smiling countenance resplendent shines

 

With youth and loveliness ; her lips disclose

 

Teeth white as jasmine blossoms ; silky curls

 

Luxuriant shade her cheeks ; and every limb ,

 

Of slightest texture, moves with natural grace ,

 

Like moonbeams gliding through the yielding air“ ( पृष्ठ 358)

हे वर्णन जहांगीरच्या जनानखान्याच्या वर्णनाच्या ओघात येते – (अर्थात मेहरून्निसा हिचे)

नूरजहानच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाकांक्षा आणि राजकारण करण्याची वृत्ती यांचे अधिक प्रखर दर्शन वावीकर यांच्या कथेच्या प्रकाशनानंतर अगदी थोड्या काळात, म्हणजे 1918 साली प्रकाशित झालेल्या एका कादंबरीत होते. कादंबरीचे नाव – Mistress of Men – लेखिका Flora Annie Steel. त्या बाईंचे पती इंडिया सिव्हिल सर्व्हिसमध्ये होते आणि त्यांचे वास्तव्य हिंदुस्तानात – मुख्यतः पंजाबमध्ये 18671889 एवढा काळ होते. त्यांनी हिंदुस्तानातील शैक्षणिक परिस्थितीत सुधारणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नावावर वीसहून अधिक पुस्तके आहेत. त्यांनी उपरोक्त कादंबरीशिवाय पंजाबी लोककथांवर आधारित एक पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक The garden of fidelity असे आहे (त्या नावाची एक बाग बाबर याने तयार केली होती असे समजते).

ऐतिहासिक कादंबरी म्हटली, की लेखक इतिहासातील घटना रंगवताना किती स्वातंत्र्य घेतो हा मुद्दा नेहमीच चर्चेचा असतो. फ्लोरा स्टील यांच्या त्या कादंबरीतही असे काही प्रसंग आहेत, की त्यामुळे तो मुद्दा वाचकाला उपस्थित करावा असे वाटेल.

अकबराला समजते, की सलीम नि शेर अफगाण दोघांना मेहरुन्निसा हवी आहे. तेव्हा तिच्या वडिलांचे मत जाणून घेण्यासाठी तो बिरबल याला तिच्या घरी पाठवतो. ग्यासुद्दीन याला सलीम पसंत नसतो. कारण सलीमचे चारित्र्य – तो म्हणतो, सुंभ जळला तरी पीळ जळत नाही.” (But a rope once burnt keeps it’s twist – पृष्ठ 75) नंतर अकबर तिला भेटण्यास बोलावतो आणि ती स्वतःचे मत सांगते – मी राजाची राणी होईन का याचे उत्तर राजा कोण आहे त्यावर अवलंबून आहे. मी एका चांगल्या माणसाची राणी होऊ इच्छिते. मला माझे उचित स्थान मिळवायचे आहे.म्हणजे अकबर तिला बोलावतो. हे स्वातंत्र्य लेखिकेने घेतले असेल तरी मेहरुन्निसाची महत्त्वाकांक्षा फार प्रथमपासून स्पष्ट होते.

जहांगीर याला सद्भावनांचे वावडे नव्हते हे दाखवण्यासाठी लेखिकेने जहांगिरनामा या जहांगीरच्या आठवणींच्या पुस्तकातून दोन उतारे उद्धृत केले आहेत. एकात त्याच्या पहिल्या रजपूत राणीबद्दलच्या भावना आहेत, दुसऱ्यात नूरजहानच्या सेवेबद्दल आणि तिच्या वैद्यकीय उपचारातील प्राविण्याबद्दल प्रशंसोद्गार आहेत.

ऐतिहासिक कादंबरी लिहिताना, काही वेळा लेखक त्याच्या काळातील मूल्ये कथानकातील व्यक्तिरेखांच्या तोंडी प्रकट करण्याचा संभव असतो. तसा काहीसा प्रकार येथेही झाला आहे. सलीमने राज्यारोहणानंतर शेर अफगाण याला प्रस्ताव दिला, की त्याने एक मोठी रक्कम घेऊन मेहरुन्निसा हिला तलाक द्यावा. तो प्रस्ताव आल्यावर ती शेर अफगाणला विचारते, की तू तो प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहेस का? तो प्रतिप्रश्न करतो, की तिला सलीमकडे जायचे आहे का? ती म्हणते, नाही. एकदा नाही, उत्तर हजार वेळा नाही असेच असेल.ती स्वतः सलीमला पत्र लिहिते आणि त्यात अखेरीस म्हणते – एक स्त्री म्हणून मी विकत घेतली जाणे आणि विकणे या गोष्टी नाकारत आहे. हा अर्थात तत्कालीन (विसावे शतक) सुधारक विचार आहे. मोहोब्बतखान आणि जहांगीर (व नूरजहान) यांच्यातील संघर्षही चांगला रंगवला आहे.

संजीवनी खेर यांनी नूरजहान हिच्यावर अलिकडील काळात मराठीत एक कादंबरी लिहिली आहे (1999). त्यांच्याशी त्या संबंधात बोलणे झाले तेव्हा असे समजले, की त्यांनाही त्यांच्या अभ्यासात नूरजहान महत्त्वाकांक्षी होती हे आढळून आले, मात्र ती खुनशी अथवा सुडबुद्धीने वागणारी होती असे कोठे दिसले नाही. त्यांनी Gulbadan – Rumer Godden या नूरजहानवरील आणखी एका पुस्तकाची माहिती दिली.

संजीवनी खेर यांच्या मलिका ए हिंदोस्तान या पुस्तकाचे मलपृष्ठ

 

संजीवनी खेर पुढे म्हणाल्या, मी माझी मलिका – ए – हिंदोस्तान’ (श्री विद्या प्रकाशन, पृ 194 मूल्य 175 रू.) ही कादंबरी ज्या आधारे लिहिली, ती त्या कथानकाबद्दल जे वाचलं; जे पुरावे, साहित्यिकइतिहासाबद्दल मिळाले त्यावर आधारित आहे. इतिहासाचार्य कै.गो.स. सरदेसाई यांच्या मुगल रियासतीतील एक वाक्य मला नूरजहानच्या व्यक्तिमत्त्वाचा अर्क वाटला. ते लिहितात, “तिच्या अंगी राज्यकर्त्या पुरुषाला आवश्यक ते सर्व गुण आहेत. अत्यंत कसोशीने तिचे वर्तन तपासू लागल्यास, ती जात्या बायको होती, ह्या पलीकडे अन्य अवगुण तिच्यात मिळायचा नाही”

कादंबरीच्या मुखपृष्ठावर असलेले तिचे पेंटिंग हे अस्सल तिचे आहे. छ.शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाच्या कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले तिचे नाव सोन्याच्या शाईने लिहिलेले  आहे.

रोज प्रिन्सेस’’ ह्या गुल बद्न ह्या शाही घराण्यातील स्त्रीने लिहिलेल्या पुस्तकात तेव्हाच्या राणीवेशातील स्त्रियांच्या राहण्याचे, राजकारणाचे, सुसंस्कृत जीवनाचे वेधक चित्रण आहे. शिवाय नूरजहान अन एम्प्रेस ऑफ मुगल इंडिया ह्या अलिसन बँक्स फिनले ह्या विद्वान स्त्रीच्या ग्रंथातूनही तो काळ अन् ती समजण्यास मदत होते. साहित्य, कला, वास्तुशास्त्र , वस्त्र कला, धार्मिक एकोपा यासाठी उत्तम शासनव्यवस्था ठेवण्यात तिचे योगदान होते.

एखादी लावण्यवती स्त्री उत्तम प्रशासक असू शकते हे पुरुषप्रधान व्यवस्थेला पटत नाही. महत्त्वाकांक्षा हे राज्यकर्तीचे लक्षण मानावे लागेल.

तेव्हा नूरजहानबद्दल उत्सुकता जागृत झाली असेलच ! वरील तिन्ही पुस्तके जरूर वाचा. मिसेस फ्लोरा स्टील यांचे पुस्तक इंटरनेट अर्काइव्हवर उपलब्ध आहे.

रामचंद्र वझे98209 46547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध  झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

—————————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here