नामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना

carasole

वारकरी संप्रदायाच्या सुंदर शिल्पाचा पाया ज्ञानदेवांनी घातला, पण त्या संप्रदायाच्या विस्ताराची कामगिरी पार पाडली ती संत नामदेवांनी. ते काम नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी |’ असा विश्वास मनाशी बांधून केले. नामदेव स्वत:ला त्या संप्रदायाचे ‘किंकर’ मानतात. नामदेवांनी त्यांच्या आयुष्याची वाटचाल ‘आम्हा सापडले वर्म | करू भागवत धर्म ||’ असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून केली. अभंग हे त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब. त्यामधून त्यांच्या जीवनात आणि काव्यात घडलेली परिवर्तने यांचा मेळ घालता येतो. त्या अभंगांमधून ज्ञानदेवांचे लोकोत्तर जीवन, ज्ञानदेवांच्या समाधीच्या वेळचे वर्णन, ‘आदि’, ‘तीर्थावेळी’ आणि ‘समाधी’ यांचे स्वरूप वाचकांसमोर येते. त्यांतून समकालीन संतांची चरित्रेही स्पष्ट होतात. ते ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही पातळ्यांवरचे विवेचन करतात.

वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला नवे जीवनदर्शन घडवले. सर्वसामान्यांना जीवनाकडे पाहण्याची अभिनव दृष्टी दिली आणि त्यासाठी भक्ती हे ‘समर्थ’ माध्यम दिले. साहजिकच, त्यामुळे महाराष्ट्रात सद्विचारांची, आचारांची मांदियाळी उभी राहिली. संत नामदेवांच्या घरातील सर्वांवर त्यांचा, त्यांच्या विठ्ठलभक्तीचा, सद्विचारांचा संस्कार झाला. त्यातून सत्प्रवृत्त मंडळी निर्माण झाली. त्यात नारा, विठा, गोदा, महादा हे जसे त्यांचे चौघे मुलगे होते, तशीच आऊबाई ही त्यांची बहीण, राजाई-पत्नी तर लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना आणि लिंबाई ही मुलगी होती. जनाबाई स्वत:ला नामदेवांच्या घरची दासी असे म्हणवून घेते. जनाबाईने तिच्या अभंगात म्हटले आहे –

 

गोणाई, राजाई दोघी सासू-सुना | दामा, नामा जाणा बापलेक |
नारा, विठा, गोदा, महादा चौघे पुत्र | जन्मले पवित्र त्याचे वंशी |
लाडाई, गोडाई, येसाई, साखराई | चवघी सुना पाही नामयाच्या |
लिंबाई ती लेकी, आऊबाई बहिणी | वेडीपिशी दासी त्याची जनी

नामदेव : व्यक्ती आणि त्यांची परिस्थिती’ यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या कुटुंबीयांची कविताच उपयोगी पडते. दामाशेटी आणि गोणाई हे नामदेवांचे वडील आणि आई होती. नामदेवांच्या विठ्ठलभक्तीला दोघांचाही विरोध नव्हता, पण प्रपंच सोडून विठ्ठलभक्तीचा अतिरेक करावा असे त्यांना वाटत नव्हते. त्यांनी त्यांच्या परीने व स्वभावानुसार नामदेवांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण नामदेव ऐकत नाहीत असे लक्षात आल्यावर दामाशेटी गप्प बसले, पण गोणाईने मात्र ‘पंढरी गिळीन विठोबासहित’ असा त्यांना दमच दिला होता! खुद्द विठोबालाही नामदेव किती प्रिय आहे हे तिला पटवून दिले गेल्यावरच तिचा राग शांत झाला! ‘देव झाला नामा | नामा झाला देव |’ हे तिच्या प्रत्ययाला आले.

नामदेव प्रपंचाकडे पाठ फिरवून विठ्ठलनामाच्या छंदात रंगून गेले होते. त्यांचे लग्न होऊनही संसारात लक्ष नाही हे पाहून त्यांची पत्नी राजाई ही अतिशय वैतागून गेली होती. तिच्याही मनात विठ्ठलाविषयी राग होता. पण अखेर नामदेवांच्या सहवासाने राजाईचा चित्तपालट झाला आणि ‘आता ये संसारी मीच धन्य जगी | जे तुम्हा अर्धांगी विनटले ||’ अशी तिची स्थिती झाली. तिनेही तिच्या मनातील भावना अभंगरूपाने व्यक्त केल्या आहेत. मात्र तिच्या अभंगांची संख्या अल्प आहे.

लाडाई ही नामदेवांची थोरली सून (नारा या मुलाची पत्नी) तिचे मनोगत व्यक्त करताना म्हणते,

 

 

द्वादश बहात्तरी कृष्ण त्रयोदशी | आषाढ हे मासी देवद्वारी |
सर्वांनी हा देह अर्पिला विठ्ठली | मज का ठेविले पापिणीसी |

लाडाईला बाळंतपणासाठी नामदेवांनी गावाला पाठवले होते. तेथे तिला मुलगा झाला. मुलगा झाला त्या वेळी आषाढ कृष्ण १३, शके १२७२ या दिवशी नामदेवादी सर्व कुटुंबीयांनी समाधी घेतली! आपण त्या वेळी परगावी एकट्याच पडलो याचे दु:ख ती व्यक्त करते.

 

 

पूर्वसंबंधे मज दिधले बापाने | शेखी काय जाणे कैसे झाले |
प्रसुती लागी मज आणिले कल्याणा | अंतरला राणा पंढरीचा |
मुकुंदे मजसी थोर केला गोवा | लोटियले भवनदीमाजी |
ऐकिला वृत्तांत सर्व झाले गुप्त | माझेंचि संचित खोटे कैसे |
आणि लाडाई म्हणे देह अर्पिन विठ्ठला | म्हणोनि आदरिला प्राणायाम |

आपण बाळंतपणासाठी कल्याणला आलो आणि मुकुंद या मुलाच्या जन्मामुळे या भवसागरात अडकून पडलो. त्यातून आता घरची सारी मंडळी विठ्ठलाकडे निघून गेली, आपण एकटे पडलो. आपलेच संचित कमी पडले, आपण दुर्दैवी ठरलो आणि आता आपल्या वाट्याला भोग भोगणे प्राप्त झाले. तेव्हा प्राणायाम करून, देह कष्टवून पण विठ्ठलाकडे धाव घ्यावी, असा निश्चय जणू तिच्या मनाने केला.

लाडाईच्या मनात पांडुरंगाचा साक्षात आशीर्वाद लाभलेल्या घरात त्या सून म्हणून आल्या याचा अभिमान होता. पण सर्वांनी समाधी घेतल्यामुळे त्या घरातील संस्कारांना, सहवासाला, सत्संगाला ती मुकणार ही खंत कुठेतरी तिला जाणवत होती. म्हणून अखेर तिनेही एकटे न राहता त्या परब्रह्माशी एकरूप व्हावे ही मनीषा तिच्या ठिकाणी जागृत होते.

नामदेवांची बहीण – आऊबाई त्यांच्याच घरी राहत होती. परमेश्वराबद्दलची ओढ तिच्याही मनात आहे. पण सारे शून्यवत वाटावे अशी तिची मनस्थिती झाली आहे.

 

शून्य साकारले साध्यात दिसे |
आकार नासे तेथे शून्याकार दिसे ||१||
शून्य ते सार, शून्य ते सार |
शून्यी चराचर सामावले ||२||
नामयाची बहिण आऊबाई, शून्यी सामावली
विठ्ठली राहिली चित्तवृत्ती ||३||

अर्थात येथे निराशा, दु:ख दारुण असावे असे वाटत असले तरी सुद्धा शेवटच्या दोन ओळींत तिने जणू तत्त्वज्ञानाचा, अध्यात्माचाच आधार घेतला असावा असे वाटते. कारण सारे सार त्या शून्यातच सामावाले आहे हे स्पष्ट झाले नाही तरी हे विश्व म्हणजे एक पोकळी आहे. आकाशात असणाऱ्या साऱ्या ग्रहगोल-ताऱ्यांनी सृष्टी-विश्व परिपूर्ण आहे. म्हणजेच तो त्या परमात्मा परमेश्वराचा आविष्कार आहे. या अर्थाचा भाव कदाचित तिला व्यक्त करायचा असावा. त्या ओळींमध्ये ती स्वत:ची वृत्ती विठ्ठलरूप झाली असे प्रतिपादन करते हे विशेष. शून्यातून आकाराला येणारा पांडुरंग शेवटी शून्यवतच भासतो हेच जणू तिला सुचवायचे आहे.

नामदेवांची लेक लिंबाई हिने तिची परमेश्वरभेटीची आर्तता अभंगातून व्यक्त करताना म्हटले आहे –

तारी मज आता रखुमाईच्या कांता | पंढरीच्या नाथा मायबापा |
अनाथांचा नाथ ऐकियलें  कानीं | सनकादिक मुनी बोलताती |
त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास | धरिली तुझी कास पांडुरंगा |
नामयाची लेकी लिंबाई म्हणणे देवा | कृपाळु केशवा सांभाळावे ||

लिंबाईने परमेश्वराला विनवले आहे, की ‘मी आजवर कथा, पुराणे ऐकली-वाचली, त्यातून ऋषिमुनींनीसुद्धा त्यांच्या उद्धारासाठी तुलाच साद घातली होती हे समजले. अनाथांना सनाथ बनवणारा तूच आहेस, तुझ्या कृपाप्रसादाने तू आमच्या जीवनाचा उद्धार करून, सन्मार्ग दाखवतोस हे त्यांनी आम्हाला पटवून दिले. म्हणूनच मीही तुझ्याकडे माझ्या उद्धाराचीच याचना करत आहे. त्या संतवचनांवर विश्वास ठेवून, त्यांच्याच मार्गाने जाण्याचा मी प्रयत्न करत आहे, तेव्हा आता या लेकराला सांभाळण्याची जबाबदारी सर्वस्वी तुझीच आहे. कृपावंत होऊन, दयावंत होऊन तू माझा उद्धार करावास ही नम्र याचना मी तुझ्या चरणी करत आहे.’

लिंबाईची भावंडे लग्न होऊन संसारात रममाण झाली असल्यामुळे तिला तिचा तारणहार केवळ पांडुरंगच वाटतो, यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. लिंबाई ही अविवाहित होती.

परंपरेने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला असला तरी नामदेवाच्या, त्यांच्याच कुटुंबातील स्त्रियांचे काव्य हे आध्यात्मिक पातळीवर उच्च दर्जाचे ठरते. त्यांनी कौटुंबिक बंधने पाळूनही त्या क्षेत्रात नाव मिळवले. त्यांना कुटुंबात राहून, पंढरीची वारी करताना बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यांना नामदेवांच्या सहवासातील इतर संत मंडळींचा सहवासही लाभला.
– सुप्रिया अत्रे

About Post Author

Previous articleस्मृती जपणारे सोलापूरचे उद्यान!
Next articleभाई महेश शंकर ढोले – निरपेक्ष कार्यकर्ते
डॉ. सुप्रिया मधुकर अत्रे पुण्‍याच्‍या एस.एन.डी.टी महाविद्यालयात मराठी विषयाच्‍या प्राध्‍यापिका म्‍हणून तीस वर्षे काम केल्‍यानंतर निवृत्‍त झाल्‍या. त्‍यांना महाविद्यालयाकडून 'उत्‍कृष्‍ट शिक्षक' पुरस्‍कार तर पुणे महापालिकेकडून 'संत मुक्‍ताबाई पुरस्‍कार' प्राप्‍त झाला आहे. त्‍यांना संत साहित्‍याची आवड आहे. त्‍यांनी त्‍यासंदर्भात लेखन करण्‍यासोबत व्‍याख्‍यानेही दिली आहेत. त्‍यांनी अनेक पुस्‍तकांसोबत महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक मंडळाच्‍या इयत्‍ता नववी आणि बारावीच्‍या मराठी पाठ्यपुस्‍तकांचे संपादन केले आहे. त्‍यांनी आकाशवाणी आणि दूरदरर्शनवर अनेक कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण केले आहे. त्‍यांनी मराठी भाषा व शिक्षणविषयक समित्‍यांवर कामे केली असून त्‍या विविध नियतकालिकांमधून नियमित लेखन करत असतात. लेखकाचा दूरध्वनी (020) 25430442

3 COMMENTS

Comments are closed.