नागा राजांचा माणिकगड (Manikgad)

1
155
-nag-rajancha-gad-manikgad

माणिकगड किल्ला चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘जिवती’ तालुक्यातील घनदाट जंगल आणि उंच डोंगररांगा आणि त्यातील एका डोंगरावर दाट वनराजीमध्ये भग्न अवस्थेत आहे. तो शहराच्या दक्षिणेला साठ किलोमीटरवर, गडचांदूरपासून जवळ आहे. ‘माना’ जमातीचा नागवंशीय राजा नवव्या शतकात ‘वैरागड’ येथे विराजमान झाला. पहिला राजा होता ‘कुरुम प्रल्हाद’; त्यानंतर ‘गहिलू’ या राजाने माणिकगड किल्ल्याची पायाभरणी नवव्या शतकात केली. नागवंशीय राजांचे साम्राज्य माणिकगडपर्यंत इसवी सनाच्या नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत पसरले होते. त्यानंतर गोंड राज्याचा उदय झाला. ‘माणिकगड’ हे नाव माना राजांची कुलदेवता ‘माणिक्यादेवी’ हिच्या नावाचा अपभ्रंश होऊन पडले असावे. किल्ला विविध मोठमोठ्या वृक्षराजींनी नटलेला आहे. किल्ल्यात नव्याने वनीकरणही मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर वरील भागात नागाचे चित्र कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत किल्ल्यामध्ये प्रवेश करताच पन्नासेक मीटर चिंचोळा, नंतर उंचसखल, खोल खोल खाई असा मार्ग विखुरलेला आहे. आत बेल, हिवर, बाहवा, कडुनिंब अशी उंच उंच झाडे आणि लांबच लांब हिरवेगार चिंचबन आहे, मोठमोठ्या आकाराची ‘आग्या मोहळे’ फांदोफांदी लगडलेली मनाला मोहून टाकतात. किल्ल्यात खोल ‘पाताळ विहीर’ पाहण्यास मिळते. तिचा वरचा काही भाग गोलाकार आणि आणखी खोलीत चौरसाकार आहे. 

किल्ल्यात ‘राणी तलाव’, ‘न्हाणीघर’, ‘टेहळणी बुरुज’ अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. तुटलेल्या अवस्थेतील तोफापण आहेत. विविध पक्षी आणि खास लालतोंडी छोटी छोटी माकडे झाडांवर सरसर चढताना पाहण्यास मिळतात. त्या परिसरात काळतोंडी मोठी माकडे का दिसत नाही हा प्रश्नच आहे. 

किल्ल्याच्या बाहेर, पायथ्याशी विष्णू मंदिर आहे. ते पंचवीस कोरीव खांबांवर उभे आहे, परंतु त्यास कळस नाही. मंदिराला दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात शेषशायी विष्णूची मूर्ती तर दुसऱ्या गाभाऱ्यात शिवलिंग प्रस्थापित आहे. मंदिर अप्रतिम अशा चित्रशैलींनी नटलेले आहे. मंदिराला लागूनच खोल ‘अमरकुंड’ आहे. पुरातत्त्व विभागाने गडाच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. 

-manikgadमाणिकगडच्या आजुबाजूला विलोभनीय डोंगर पाहताना मन हरपून जाते. ते डोंगर विविध वनस्पती, घनदाट जंगले यांनी वेढलेले आहेत. जंगली डोंगरांमध्ये सिमेंटसाठी लागणारा दगड मुबलक प्रमाणात सापडतो. त्यामुळे डोंगरांचे उत्खनन प्रचंड प्रमाणात चालू आहे.

– राजेंद्र घोटकर 9527507576 
ghotkarrajendra@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.