नागमंत्री

0
33
carasole1

मराठवाड्यातील जालना वगैरे काही भागांत नागमंत्री म्हणजे नागमांत्रिक आहेत. त्यांचे काम मंत्र टाकून सर्पदंश झालेल्या माणसाला विषउतार देणे. नागउपासनेने आणि मंत्राने ते साधले जाते असा त्‍यांचा समज आहे. नागमंत्री हे नागाचे उपासक. ते नागाला त्यांचे दैवत मानतात. नागाच्या उपासनेचे व्रत कडक आहे. ते स्वतःला शिवभक्‍त समजतात.

नागमंत्राचा गुरु त्यांच्या कानात तो मंत्र फुंकतो. ते चंद्रग्रहणाच्या दिवशी कंबरभर पाण्यात रात्रभर उभे राहून चंद्राची उपासना करतात. गुरुने मंत्र दिल्यावर नागमंत्री कोणताही वाटोळा पदार्थ खात नाहीत, तळलेला पदार्थ खात नाहीत, आप्तस्वकियांच्या घरात जाऊन भोजन करत नाहीत. ते त्यांच्या उंबऱ्याबाहेरच भोजन घेतात. नागमंत्री तोंडातील बत्तीस दात शाबूत असेपर्यंत नागमंत्राने सर्पविष उतरवू शकतात.

परिसरात कोणाला सर्पाने दंश केला तर नागमंत्र्याला बोलावणे पाठवले जाते. नागमंत्री येतो. नागप्रतिकृतीची पेटी मांडतो. नागदेवतेची पूजा करतो. सर्पदंश झालेल्या माणसाला लिंबाच्या पाल्यात गुंडाळून नागमंत्र्यापुढे आणून टाकले जाते. नागमंत्री पितळेच्या कळशीवर पितळेची पितळी उपडी ठेवतात. हातातील कड्याने पितळीवर ताल धरतात. नागदेवतेला, देवतांना गण म्हणून आवाहन करतात. भांड्याचा आवाज घुमत असतो. त्यात घुम्याने सर्पदंशी विव्हळत, सरपटत, लोटांगण घालत नागदेवतेकडे पुढे पुढे सरकत असतो. वाजपाचा आवाज घुमत असतो. सर्पदंशी माणसाच्या विषाला हळु-हळू उतार पडत जातो. तो माणूस निपचित पडतो. नागमंत्री नागदेवतेचा अंगारा त्याच्या कपाळी लावतो आणि त्या माणसाचे विष उतरते.

लोकजीवनातील उपासनेतून आलेली ही उपचार-पद्धत आहे. ते एक प्रकारचे उपचारनाट्यच घडून जाते. छोट्या जीवनातील छोटे ‘हॅपनिंग’.

पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्पांपैकी चार टक्के सर्पसुद्धा विषारी नसतात, बाकी सारे बिनविषारी – हे ‘लोकनाट्य’ घडत असताना, सर्पदंशीला चावलेला साप बिनविषारी होता हे आपोआप सिद्ध होते. माणसाच्या आदिम अवस्थेतील गरजेतून निर्माण झालेली ही प्रथा. महाराष्ट्रात अन्यत्र नागमंत्री म्हणून वेगळे व्यावसायिक नाहीत. स्थानिक गुरव, उपाध्याय, सात्त्विक पुरुष हा मंत्र घेतो व अनुषंगिक व्यवसाय करतो अशी प्रथा आहे.

(मूळ लेख – ‘महाराष्ट्रदर्शन दिनदर्शिका’, जुलै १९९२)

About Post Author