बदल हा मानवी समाजाचा मूलमंत्र आहे आणि तोच बदल घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या मते, देशातील माणूस घडल्याशिवाय समाज घडत नसतो आणि समाज घडल्याशिवाय राष्ट्र घडत नसते. त्यांनी माणसाला घडवण्यासाठी धम्मक्रांती केली. धम्मक्रांती ज्या भूमीवर झाली ती ऐतिहासिक भूमी म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी होय. नाग लोकांची मुख्य वस्ती हा त्या नागभूमीचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊनच बाबासाहेबांनी बौद्ध धम्मदीक्षेसाठी नागपूरची निवड केली होती. बाबासाहेबांनी भन्ते चंद्रमणी यांच्या हस्ते 14 ऑक्टोबर रोजी दीक्षा घेतली; स्वतः आणि त्यांच्या अनुयायांस बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ही धम्मक्रांती घडवून येण्याचा दिवस 14 ऑक्टोबर 1956 होय; दसरा नाही.
बाबासाहेबांनी धम्मदीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली. त्या दिवशी योगायोगाने दसरा नव्हता तर ‘अशोक विजयादशमी’ होती. बाबासाहेबांनी त्या दिवसाची निवड दसऱ्याचा मुहूर्त काढून केली नाही. 14 ऑक्टोबरचे ऐतिहासिक महत्त्व हे आहे, की ज्यावेळी सम्राट अशोकाने कलिंगची लढाई जिंकली तेव्हा त्याने आजुबाजूला पाहिले, सैनिकांचे रक्ताचे पाट, सैनिकांच्या वेदना हे पाहून अशोक स्तब्ध झाला. त्याचे मन हळहळले, त्याचे मन त्यालाच खात होते. आणि कोठेतरी, त्याचे मन त्याच विचारात होते, की लढाई आपण जिंकून काय मिळवले? प्रश्नावर प्रश्न उत्पन्न होत होते. प्रश्नांचे काहूर माजले. त्यामुळे अंतःकरणात करुणा उत्पन्न झाली. त्याचे मन अथांग करूणेने भरलेल्या बुद्धाच्या धम्माकडे वळले. त्यांनी त्याच दिवशी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करून पुढील आयुष्य धम्माचा प्रसार आणि प्रचार यांकरता अर्पण करण्याचे ठरवले. तो दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर. आणि त्याच दिवशी सम्राट अशोकाचे मन बौद्ध धम्माकडे वळले. तो दिवस विजयादशमी म्हणून ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन बाबासाहेबांनी त्या दिवसाची निवड केली. बौद्ध समाज 14 ऑक्टोबरच्या ‘अशोक विजयादशमी’ ऐवजी दसऱ्यालाच महत्त्व देत आहे आणि दसऱ्याला दीक्षाभूमीवर जात आहेच, दलित समाजाने धम्मक्रांती ही 14 ऑक्टोबरला साजरी करावी आणि त्या तारखेला दीक्षाभूमीवर जावे.
– माधुरी उके
(‘रमाई’- सप्टेंबर २०१८ वरून उद्धृत)