दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी : वाडवडिलांचे आशीर्वाद जणू!

_english_marathi_dictionary_1

माझ्या संग्रहातील एक पुस्तक आता शंभर वर्षे वयाचे झाले आहे. ‘दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी‘ हे त्या पुस्तकाचे नाव. ती त्‍या डिक्‍शनरीची १९१६ साली प्रकाशित झालेली पहिली आवृत्ती आहे. गंगाधर वामन लेले, (बी. ए., निवृत्त आजीव सभासद, दि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे) आणि कृष्णाजी गोविंद किनरे (शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे) हे त्‍या डिक्शनरीचे संपादक आहेत. शंकर नरहर जोशी यांनी ‘चित्रशाळा प्रेस, ८१८ सदाशिव पेठ, पुणे’ येथे पुस्तकाचे मुद्रण करून ते प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकातील प्रस्तावनेवर २५ जुलै १९१६ हा दिनांक असून पुस्तकात सुमारे पस्तीस हजार शब्द आणि पंधरा हजार म्हणी व वाक्संप्रदाय संग्रहित केले असल्याचे संपादकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पुस्‍तकात प्रत्येक शब्दासमोर मराठी उच्चारण देण्यात आलेले आहे. पुस्तकाची पृष्ठसंख्या आठशेदहा असून अधिक परिशिष्टाची पृष्ठे तेरा आहेत. माझ्याकडील पुस्तकाचे नंतर कधीतरी बाइंडिंग करून घेण्यात आले असल्याने त्या पुस्‍तकाचे बाहेरील आवरण कसे असेल ते कळून येत नाही. काही ढिली झालेली पृष्ठे वगळता इतरांची बांधणी टिकून राहिलेली आहे. पुस्तकाला कोणतीही कीड लागलेली नाही हे विशेष होय!

पुस्तकाची किंमत अडीच रूपये आहे. प्रकाशन वर्ष विचारात घेता, ते त्यावेळचे महाग पुस्तक असावे असे म्हणता येईल.

पुस्तकातील प्रस्तावनेच्या पृष्ठावर आर. के. चांदोरकर अशी स्वाक्षरी असून खाली ४ -१२- १९१६ हा दिनांक टाकण्यात आला आहे. त्याचा अर्थ ते त्या दिवशी खरेदी केले असावे. त्या आधीच्या पहिल्याच पृष्ठावर आर. के. चांदोरकर, पेन्शनर, बालाघाट असे इंग्रजीत लपेटदार अक्षरांत नाव लिहिलेले आहे. डॉ. रामचंद्र कृष्ण चांदोरकर म्हणजे माझी पत्नी प्रीती हिचे पणजोबा होत. त्यांच्याकडून हे पुस्तक आजोबा रावबहादूर डॉ. भास्कर रा. चांदोरकर आणि नंतर वडील कीर्तिभूषण भा. चांदोरकर यांना मिळाले. अशा तीन पिढ्या चालत आलेले ते पुस्तक आम्ही दोघे चौथ्या पिढीत वापरत असतो आणि ते आमच्या पाचव्या पिढीतील मुलांनीही हाताळले आहे. ते वाडवडिलांचे आशीर्वाद म्हणून आणखी पन्नास वर्षे सुद्धा चालेल एवढ्या चांगल्या स्थितीत आहे.

– मुकुंद नवरे
mnaware@gmail.com

पूर्वप्रसिद्धी – ‘मैत्री अनुदिनी’

About Post Author

Previous articleरफीवेडे डॉ. प्रभू आहुजा
Next articleझोडगे गावचे माणकेश्वर मंदिर
8976340520 मुकुंद लक्ष्मण नवरे यांचा जन्‍म १९४७ सालचा. त्‍यांनी पशुवैद्यकशास्त्रातील पदवी नागपूर येथून १९६९ साली मिळवली. त्‍यानंतर त्‍यांनी चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ दुग्धविकासाच्या क्षेत्रात व त्यातील पंचवीस वर्षे भारतात श्वेतक्रांती आणणा-या डॉ. वर्गीज कुरियन यांच्या ऑपरेशन फ्लड योजनेत काम केले. त्‍यांनी वयाच्‍या साठीनंतर लेखनास सुरूवात केली. त्‍यांनी 'धनंजय' दिवाळी अंकात दीर्घकथा लिहल्‍या. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा इतर दिवाळी अंकात व 'अंतर्नाद' मासिकात प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचा 'अकल्पित कथा' हा कथासंग्रह विजय प्रकाशन, नागपूर, यांकडून प्रकाशित करण्‍यात आला आहे.

1 COMMENT

Comments are closed.