Home वैभव ग्रामदेवता दिग्रसचे दत्तगुरू मंदिर

दिग्रसचे दत्तगुरू मंदिर

0

दिग्रस तालुक्यातील प्रसिद्ध दत्तमंदिर दत्तोबा या नावाने ओळखले जाते. ते रामकृष्ण तायडे यांच्या शेतात आहे. ते दिग्रस शहरापासून साडेबारा किलोमीटर अंतरावर बेलोरा गाव परिसरात येते. त्या शेतात दत्तमंदिर असल्यामुळे शेताचे नावही दत्तोबा असे पडले आहे. तो विदर्भाचा यवतमाळ जिल्हा. दत्तोबा हे स्थान माहूरगड आणि कारंजा लाड या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गावांपासून प्रत्येकी पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे.

लाखरायाजी येथील ते शेत मूळ गोविंदराव पाटील इजारदार (लाखरायाजी) यांचे. तेथील रहिवासी उकंडजी महादजी तायडे यांनी त्यांच्याकडून विकत घेतले. तो एकोणिसाव्या शतकाचा अखेरचा काळ. शेताचा सर्वे नंबर होता चौदा. ते नऊ तिफन म्हणजे छत्तीस एकर होते. गोविंदरावांनी ती जमीन घेतली तेव्हा त्या शेतात महानुभाव पंथाचे दत्त मंदिर म्हणजे दत्तखांडी होती. उकंडजी यांच्याकडे शेत आल्यानंतर, ते दत्त पौर्णिमेला पुरणाचा स्वयंपाक व पूजा करून गडीमाणसांना जेवू घालत. उकंडजी यांची परिस्थिती त्यानंतर झपाट्याने सुधारू लागली. त्यांच्या शेतात भरघोस उत्पन्न निघू लागले. तेव्हा ज्यांनी (गोविंदरावांनी) शेत विकले होते त्यांनी शेतात असलेली दत्तरुपी शिळा काढून स्वतःच्या शेतात घेऊन जाण्याचा निर्णय केला. ती जवळपास दहा क्विंटल वजनाची होती. त्याला उकंडजी यांनी विरोध केला नाही. कौलारू छत असलेल्या दगडाच्या ओट्यावरील मंदिर व त्या जागेवर असलेली शिळा काढून नेण्याचा दिवस ठरला. यथोचित पूजाअर्चा करून मोठमोठ्या लाकडी बल्ल्यांच्या व माणसांच्या मदतीने शिळा बैलगाडीवर चढवण्यात आली आणि शेतातून हलवण्यात आली, पण ती शेताच्या धुर्‍यावर (बांधावर) जाताच भंग पावली !

शेतीच्या मशागतीचे दिवस आले, तेव्हा उकंडजी यांना शेत नांगरायचे होते. गड्याने नांगराला बैल जोडले व नांगरणीला सुरुवात केली. गडी नांगरणी करत करत पूर्वी शिळा असलेल्या ओट्याजवळ गेला. ओट्याजवळ जाताच बैल बुजाडले (उधळले). बैलजोडी, नांगर व गडी दूर फेकले गेले. तसा प्रकार दोन-तीनदा झाला ! गड्याने तो सर्व प्रकार उकंडजी यांना सांगितला. त्यावर घरात चर्चा झाली. उकंडजी पहाटे उठून शेतात मंदिराजवळ गेले. शिळा नेल्यामुळे तेथील जागा रिकामी रिकामी वाटत होती. परंतु शिळेला लावलेल्या काही दगडी पाचऱ्या (मूर्तीचे तुकडे) तेथे पडलेल्या होत्या. उकंडजी यांनी त्या पाचऱ्यांना मनोभावे नमस्कार करून त्यांची पूजाअर्चा केली; आणि त्याचबरोबर, मंदिरापासून थोड्या अंतरावरून शेत नांगरण्याचे ठरवले. नांगरणी केली. त्याही वर्षी भरघोस पीक आले. दत्त जयंती नित्यनियमाने साजरी होतच होती.

उकंडजी यांना बायका तीन होत्या. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाकडे म्हणजे नानासाहेब ऊर्फ बालाजी सावकार यांच्याकडे ते शेत (दत्तोबा) वारसा हक्काने आले. नानासाहेबांना पाचर म्हणून ज्या दोन शिळा आढळल्या त्यांपैकी एका शिळेवर त्यांनी दत्तपादुका करून घेतल्या आणि दुसरी शिळा स्थापन करून तेथे छोटे मंदिर बांधले. ते इतके लहान होते, की पूजा मंदिराबाहेर बसून करावी लागे. मंदिरात रोज पूजाअर्चा होत असे, दत्त जयंती साजरी होत असे. पुरणपोळीचा स्वयंपाक करून सर्व गडीमाणसांना जेवू घालण्याची प्रथा कायम होतीच. त्या टप्प्यावर देव, देऊळ यांबाबत वेगवेगळ्या आख्यायिका प्रसृत होऊ लागल्या. त्याच दरम्यान नानासाहेबांचा मोठा मुलगा आजारी पडला. त्याच्यावर बरेच उपचार केले, पण आराम मिळाला नाही. तेवढ्यात एक घटना घडली. दत्तोबाची राखण करणारा गडी झाडावर बांधलेल्या मचाणावर बसला होता. त्याच्या कानावर कोठल्या तरी प्राण्याने मोठी जांभळी (जांभई) दिल्याचा आवाज पडला. त्याने आवाजाच्या दिशेने बघितले तर पुढ्यात वाघ उभा होता ! त्याने जागेवरच घाबरून डोळे गच्च बंद करून घेतले. काही वेळाने, हळूच डोळे उघडून बघितले तर समोर गोसाव्याच्या रूपात एक मनुष्य उभा होता. त्याच्या हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा व खांद्यावर झोळी होती. तो गड्याला आवाज देऊन म्हणाला, “हा अंगारा घे आणि मालकाच्या पोराला लाव.” गडी मचाणावरून खाली उतरला, पण अंगारा न घेता घाबरून गावाकडे पळाला. तो मुलगा दोन दिवसांनी वारला. गड्याने ती गोष्ट काही दिवसांनी मालकिणीला सांगितली व गडी पश्चाताप करू लागला.

दुसरी गोष्ट बऱ्याच नंतरची म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. नानासाहेबांकडे त्यावेळी मन्नान नावाचा मुस्लिम गडी शेतीची रखवाली करत असे. तोच त्या मंदिरात सायंकाळी दिवाबत्ती करायचा. कालांतराने, मन्नान पोस्टमास्तर झाला व त्याचा मुलगा सरकारी नोकरीत मोठ्या हुद्यावर लागला. त्याच्या पुढील पिढ्यांतील वारस दत्तगुरूंना मानतात. मात्र या गोष्टीची कागदपत्रे वा छायाचित्रे नाहीत.

नानासाहेबांना पॅरालीसीसचा ॲटॅक 1975 साली आला व नानासाहेबांचे निधन 1977 साली झाले. तायडे कुटुंब खचून गेले. नित्य पूजा व दत्त जयंती 1977 ते 1982 या कालावधीत बंद होती. ती पाच वर्षे हलाखीची गेली. त्या वेळी कोणत्याही शेतात चांगले न पिकल्यामुळे एवढ्या गडीमाणसांचा संसार सांभाळणे कठीण होऊन गेले. त्याच काळात दत्तोबा हे शेतही महाराष्ट्र शेतजमीन कमाल मर्यादा अधिनियमात (सिलिंग कायद्यात) अडकले. एकूण एकशेसात एकर जमीन ‘सिलिंग’मध्ये गेली. नानासाहेबांचा मुलगा रामराव ऊर्फ दादाजी सावकार शेतीचा सांभाळ पाहत होता. त्याची दत्तोबाचे शेत सिलिंगमध्ये जाऊ नये यासाठी धडपड चालू होती. तो त्याच संदर्भात मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भेटण्यास पुसदला जात असताना बेलगव्हाणच्या घाटात त्याचा व त्याच्या काकांचा दुचाकीचा अपघात झाला. अपघातात काकांना लागले नाही, पण दादाजींचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना पुण्याला ऑपरेशनसाठी नेण्यात आले.

त्या काळात पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असलेला दादाजींचा मुलगा रामकृष्ण याला शेती पाहण्यासाठी लाख(रायाजी) येथे यावे लागले. शेतीचे ज्ञान नाही, ‘सिलिंग’चा धाक, हलाखीची परिस्थिती, पण त्याने आजीच्या उत्तम मार्गदर्शनाने शेती कसण्यास सुरुवात केली. त्याने दत्तोबा मंदिरात जाऊन दत्तगुरूंना साकडे घातले. त्याने दत्तोबा ‘सिलिंग’मध्ये जाऊ नये, दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव साजरा करीन. ती पाच एकर जमीन वंशपरंपरेने दत्त मंदिरासाठी ठेवण्यात येईल व त्या शेतातील उत्पन्न उत्सवासाठीच खर्च केले जाईल असा संकल्पही केला. दत्त जयंती उत्सव होतच होता. देऊळ योग असा, की शासन ‘सिलिंग’मध्ये दत्तोबाऐवजी दुसरी जमीन घेण्यास तयार झाले. शेताचा प्रश्न सहज सुटला. अरुणावती धरणाच्या कॅनॉलमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदलाही भरघोस मिळाला ! रामकृष्ण तायडे यांच्या, धरणात गेलेल्या शेताची केस 1990 मध्ये कोर्टात सुरू झाली. तेव्हा त्यांनी दत्तगुरुंसमोर उभे राहून कबूल केले, की धरणाची केस जिंकली तर त्याच जागेवर भव्य मंदिर उभारून दत्तमूर्तीची स्थापना करीन. त्यांनी केस 1992 साली जिंकली, भरपूर मोबदला मिळाला.

मंदिर बांधकामास 1993 साली सुरुवात झाली. तेव्हापासून मंदिरात तेलाचा अखंड दिवा चालू आहे. सकाळ-संध्याकाळ पूजाअर्चा होऊन आरती केली जाते. उत्तम जाधव महाराज ती सेवा देतात. मंदिरातील दत्तमूर्ती बनवण्यास टाकण्याच्या आधी गाणगापूरला जाऊन मंदिरात गुरुचरित्राचे पारायण करावे आणि नंतर मूर्तीची ऑर्डर द्यावी असा विचार रामकृष्ण तायडे यांच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी गाणगापूरला गुरुमंदिरात पारायण केले. त्या दरम्यान, रामकृष्ण यांची चातुर्मासानिमित्त तेथे आलेल्या हंपी तीर्थक्षेत्राचे जगद्गुरु विरूपाख्य मंदिराचे शंकराचार्य श्री नृसिंहसरस्वती त्रिविक्रम भारती यांच्याशी मंदिरातच भेट झाली. दत्तमंदिर बांधकाम व दत्तमूर्ती यांबद्दल चर्चा झाली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे हैदराबाद येथील पुल्लाईचारी तेलंगी ब्राह्मणाकडे मूर्ती घडवण्यास टाकण्याचे रामकृष्ण यांनी ठरवले. ते गाणगापूर येथून हैदराबादला गेले. त्यांनी तेथे मूर्तीची ऑर्डर दिली. मूर्ती शंकराचार्यांच्या मार्गदर्शनानुसार स्थापन करण्याचे ठरले. तोपर्यंत 1993 ते 1995 या कालावधीत बांधकाम पूर्ण झाले. मूर्ती स्थापनेचा भव्य सोहळा 1995 ला उत्तरायण सुरू झाल्यानंतर, भारतातील चारही धामांवरून बोलावलेले महाराज ब्राह्मण, सप्त नद्यांचे व सागराचे जल, स्वतः शंकराचार्य, तसेच महाराजांसाठी बांधून घेतलेल्या पर्णकुट्या, यज्ञकुंडे, दूर दूर गावावरून आलेले भक्तगण यांच्या उपस्थितीत साजरा झाला. मंदिरात पाचराच्या रूपात असलेल्या दोन शिळा, एकावर पादुका कोरलेल्या, गुरु दत्तात्रेयांची विलोभनीय मूर्ती आणि गणपतीची मूर्ती विराजमान आहे.

गाणगापूरला गुरुमंदिरात सुरू केलेले पारायण मूर्ती स्थापनेनंतर ‘दत्तोबा’त सुरू केले आहे. गुरुचरित्राचे पारायण करण्यास दर श्रावण महिन्यात राखी पौर्णिमेपूर्वी प्रारंभ होतो. गुरुचरित्राचे पारायण करण्याकरता भक्तगण दूर गावावरून येतात. अडीच दिवसांचे पारायण करून समाप्ती सर्व वाचक मिळून करतात. पाच एकरांच्या परिसरातील भव्य अशा मंदिरात मूर्ती स्थापन झाल्यानंतर दत्तजयंती उत्सवात प्रचंड वाढ झालेली आहे. प्रसाद व दर्शनाला येणारी हजार-पंधराशे भक्तगणांची गर्दी आठ-दहा हजारांवर पोचली आहे ! एका दत्तमंदिराची दीडदोनशे वर्षांची अशी ही कहाणी आहे.

– ऋजुता तायडे 9404137398 rujutatayde91503@gmail.com

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version