दलाई लामा व तिबेट यांचे निकट दर्शन (Close Look At Tibet & Dalai Lama)

1
48
दलाई लामा
तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरू दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्याला एकसष्ट वर्षे होऊन गेली. त्यांची कृती शांतताप्रसारासाठी व्याख्याने देणे, समारंभात भाग घेणे एवढ्यापुरती उरली आहे. जगात एकंदरच शांततावादी लोकांना करण्यासारखे काही न उरल्याने, दलाई लामा यांच्याविषयी प्रसार माध्यमातून फार काही येत नाही. या पार्श्वभूमीवर सेव्हन इयर्स इन तिबेटहे, 1953 साली प्रकाशित झालेले पुस्तक मिळाले तेव्हा तिबेटविषयक उत्सुकतेने उचल खाल्ली. हाती घेतल्यानंतर खाली ठेवू नये असे वाटण्याजोगी पुस्तके असतात त्यांपैकी ते एक आहे. त्या पुस्तकाचे भाषांतर त्रेपन्न भाषांत झाले आहे. ते अमेरिकेत बेस्टसेलर 1954 साली ठरले होते. त्याच्या तीस लाख प्रती विकल्या गेल्या. त्या पुस्तकावर आधारित चित्रपट 1997 साली आला आणि त्यात नायकाची – पुस्तकाचा लेखक हेन्रीच हारेर (Heinrich Harrer ) याची भूमिका ब्रॅड पिट याने केली आहे.
लेखक हेन्रीच याचा जन्म 6 जुलै 1915 रोजी झाला (योगायोग म्हणजे सध्याचे चौदावे दलाई लामा यांचा जन्मही 6 जुलैचाच1935) जन्म ऑस्ट्रियात. त्याचे वडील पोस्ट खात्यात नोकरीला होते. त्याने भूगोलाचा अभ्यास 1933-1938 ह्या काळात केला. त्याचा गिर्यारोहण हा प्रथम छंद होता; मग तो ध्यास बनला. त्याने दोन जर्मन आणि एक ऑस्ट्रियन सहयोगी गिर्यारोहक यांना घेऊन स्वित्झर्लंडमधील आयगर (Eiger) हे अत्यंत कठीण – बर्फाची उभी भिंत असलेले – शिखर 54 जुलै 1938 रोजी काबीज केले. आयगर पादाक्रांत केले जाण्याची ती पहिली वेळ होती. त्यामुळे त्याची हिमालयात जाण्याची इच्छा तीव्र झाली. तो नंगा पर्वत चढण्यासाठी जी मोहीम आखली जाईल त्यात त्याचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करू लागला. त्यात त्याचा बराच काळ गेला. तरीसुद्धा यश येत नाही असे वाटून त्याने स्कीईंगवर फिल्म बनवण्याचा करार केला, आणि अकल्पित रीत्या, त्याची निवड हिमालयात जाण्याच्या मोहिमेसाठी झाली. त्यावेळी मोहिमेला फक्त चार दिवस उरले होते. त्याने फिल्म बनवण्याचा करार विनाविलंब मोडला आणि तो मोहिमेत दाखल झाला. तो त्याच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतो, ”मी नंगा पर्वताच्या त्या मोहिमेत हिमालयाच्या जादूला बळी पडलो. त्या महाकाय पर्वताचे सौंदर्य, हिंदुस्तानातील लोकांचे वेगळेपण; या साऱ्यांनी माझ्या मनावर गारुड केलेत्याच्या तुकडीने नंगा पर्वतावर जाण्याचा एक मार्ग ऑगस्ट 1939 मध्ये शोधून काढला.
हेन्रीच आणि त्याचे साथीदार
मोहीम सफल झाली. हेन्रीच व त्याचे साथी यांना युरोपात त्यांना परत नेणारी बोट कराची बंदरात येणार होती. ते तेथे बोटीचे वाट पाहत राहिले. पण युद्धाचे ढग गडद होऊ लागले. बोट येत नाही असे दिसू लागले. त्याच्या साथीदारांपैकी पीटर औफश्चइंटर (Aufschnaiter) सोडून इतर दोघे आणि लेखक, तिघांनी कराची सोडून पर्शिया आणि तेथून युरोप गाठण्याचा बेत आखला. दुर्दैवाने तो फसला. तिघे पकडले गेले. त्यांना कराचीत पुन्हा आणले गेले. त्यानंतर दोन दिवसांनी इंग्लंडने जर्मनीविरूद्ध युद्ध जाहीर केले. लेखक आणि त्याचे साथीदार यांना युद्धकैदी म्हणून घोषित करून अहमदनगर येथे कैद्यांच्या छावणीत ठेवले गेले. तेथून देवळाली येथे नेले जात असताना, त्यांनी ट्रकमधून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तोही फसला. सर्वाना देवळाली येथून डेहराडून येथे हलवले गेले.
लेखक आणि त्याचे साथीदार डेहराडून येथून पळून जाऊन तिबेटमध्येकसे पोचले त्याची विस्तृत हकिगत पुस्तकाच्या पहिल्या अर्ध्या भागात येते. तिबेटमध्ये पोचण्यात भौगोलिक, शारीरिक, आर्थिक आणि राजकीय अशा चारी प्रकारच्या अडचणी होत्या असे लेखक नमूद करतात. ते लिहितात, आम्ही पाच दिवस सतत चालत राहिलो आणि अखेर, गार्टोक येथे पोचण्यापूर्वी सिंधूच्या वरील प्रवाहाला पोचलो. तेथील दृश्य अविस्मरणीय होते. रंगांची मोहिनी विलक्षण होती. चित्रकाराच्या रंगपेटीतील सारे रंग इतक्या चपखलपणे मिश्रित झालेले आम्ही प्रथमच पाहत होतो. हिमालयाच्या अगदी टोकाचे पहिले गाव होते त्राशीगांग. केवळ काही घरे आणि त्यांच्या मध्यभागी असलेला मठ. त्या सगळ्यांना सरंक्षक असा एक खंदक. शांगत्सेपासून अकरा दिवस चालून आलो आणि आम्ही शिपकी या गावात पोचलो. ती तारीख होती 9 जून. तिबेटमध्ये पोचून तीन आठवडे झाले होते. आम्ही भटकत राहिलो होतो. बरंच काही पाहिले होतं; आम्ही आयुष्यातील एका कडू अनुभवातून एक धडा शिकलो होतो. आम्हाला निवासाच्या परवानगीशिवाय तिबेटमध्ये राहणे शक्य नव्हते.
          ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या मनावर आणि शरीरावर त्या दिवसाइतका ताण कोणत्याच प्रसंगाने यापूर्वी आला नव्हता. खांपापासून (लुटारू) आम्ही वाचलो होतो, ते केवळ प्रदेश निर्मनुष्य असल्याने. त्या निर्जनपणामुळे एक नवीनच अडचण उभी राहिली होती. मी माझा थर्मामीटर फेकून दिला होता ते बरंच झालं होतं. इथं त्याने तापमान निश्चितपणे -30 अंश दाखवलं असतं, कारण थर्मामीटर त्यापेक्षा कमी तापमान दाखवू शकत नसे. वास्तवात आम्ही जेथे होतो तेथे तापमान त्याहून खूप कमी असले पाहिजे. स्वेन हेडन (Sven Heiden) याने त्या मोसमात ते -40 एवढे नोंदले होते. आमचे सदा सर्वदा साथीदार होते वारा आणि थंडी. आम्हाला सारं जग म्हणजे -30 तापमान असलेलं हिमवादळ वाटत होतं. अपुऱ्या कपड्यांमुळे आमची अगदी हालत झाली होती. माझं नशीब म्हणून तंबू ठोकून राहणाऱ्या एका स्थानिकाकडून मला मेंढीच्या कातड्याचा जुनापुराना कोट विकत मिळाला. तो मला अगदी घट्ट बसत होता आणि त्याला अर्धी बाहीपण नव्हती. अर्थात मला तो स्वस्तही पडला होता – अवघे दोन रुपये. आमचे बूट चिंधाळले होते आणि ते फार काळ टिकण्यातील राहिले नव्हते. ग्लोव्हज तर नव्हतेच! पीटरच्या हाताला हिमदंश झाला होता. माझे पाय भेगाळले होते. अतिशय प्रयत्नपूर्वक आम्ही आमचे अवसान राखले. रोजचा ठरलेल्या मैलांचा कोटा पूर्ण करायचा म्हणजे प्रचंड ताकद जरुरीची होती.

जीव घेणे – माणसाचा व पशूचा – हे बौद्ध धर्मतत्त्वाच्या विरूद्ध आहे, त्यामुळे येथे शिकारीवर बंदी आहे. तिबेट जमीनदारी पद्धतीने चालते. परिणामी, माणसे, प्राणी आणि जमीन दलाई लामांच्या मालकीची असते. कोणत्याही जिवंत प्राण्याची हत्या करायची नाही या प्रवृत्तीमुळे देशाच्या सर्व भागात हुकूम दिले गेले आहेत. दलाई लामा पहिली तीन वर्षे ध्यानावस्थेत असताना ते हुकूम जारी केले गेले होते. इमारत बांधली जात असताना किडे आणि कीटक सहज मृत्युमुखी पडू शकतात, त्यामुळे सर्व इमारतींचे बांधकाम थांबवण्यात आले आहे. पुढे काही काळानंतर मी सुद्धा जेव्हा काही बांधकामात गुंतलो गेलो तेव्हा मी प्रत्यक्ष बघितले, की माझे मजूर खणून बाहेर काढलेल्या मातीचे प्रत्येक फावडे नीट तपासत असत आणि एखादा जिवंत प्राणी मिळाला तर त्याला उचलून तो सुरक्षित जागी ठेवत असत.
हेन्रिच याचे सेव्हन इयर्स इन तिबेटहे पुस्तक कोणत्या वाङ्मयप्रकारात मोडते हे सांगणे अवघड आहे. ते हेन्रिच याचे आत्मचरित्र आहे की ते एक प्रवासवर्णन आहे ? ते तिबेटचे गाईड आहे की चीनने तिबेट ताब्यात घेतले त्याची हकिगत आहे ?
          पुस्तक वरील सर्व काही आहे आणि तरीही त्याच्याहून अधिक म्हणजे मुक्ततेसाठी माणूस काय करू शकतो आणि ते स्वातंत्र्य अपरिचित लोकांमार्फत मिळाल्यावर त्या लोकांशी एकरूप कसा होतो याचे नाट्यमय कथन आहे. आणि ते करत असताना तिबेटचे जीवन , बौद्ध धर्मातील सूत्रांवर चालणारे प्रशासन , खुद्द बौद्ध धर्माची तत्त्वे आणि गुन्हेगारांना दिली जाणारी शिक्षा यांतील विसंवाद, सत्तर वर्षांपूर्वीची तिबेटची मागासलेली अवस्था … हे सारे काही येते.
          दोघे मित्र तिबेटमध्ये अनेक वर्षे राहिले. हेन्रीच याने तिबेटी लोकांच्या उदार आदर सत्काराची अनेक उदाहरणे दिली आहेत. त्याने जवळून केलेली काही निरीक्षणेही दिली आहेत – तिबेटला लोकसंख्या वाढीचा प्रश्न किंवा दुष्परिणाम ठाऊक नाहीत. गेल्या कित्येक वर्षात तिबेटची लोकसंख्या जवळ जवळ वाढलेलीच नाही. बहुपतित्व आणि भिक्षुपंथ स्वीकारण्याची प्रथा यामुळे हे घडले आहे. शिवाय बालमृत्यूचे प्रमाण तेथे मोठे आहे. तिबेटी माणसांचे सरासरी आयुर्मान तीस वर्षे आहे. 1887 मध्ये तिबेटला गेलेल्या नोतोविच याने सविस्तर वर्णन केलेली बहुपतित्वाची चाल 1946 पर्यंत चालू होती असे हेन्रीचच्या नोंदींवरून दिसते – जेव्हा अनेक भावांची बायको एकच असते, तेव्हा त्यांच्यातील वडील भाऊ हा कर्ता/स्वामी असतो. इतर भावांचा हक्क कर्ता पुरुष घराबाहेर असताना किंवा तो त्याचे मन इतरत्र रमवत असताना असू शकतो . परंतु बायकांची विपुलता असल्याने कोणी पुरुष स्त्रीसुखापासून वंचित राहत नाही. नात्यातील नात्यात लग्ने होत असली तरी लग्न मोडण्याचा प्रकार तेथे फारसा होताना दिसत नाही. त्याचे कारण बहुधा ती माणसे त्यांच्या भावना स्वैर सोडत नाहीत.
    तिबेटी बौद्धांच्या मृताच्या पार्थिव देहांची विल्हेवाट लावण्याची पद्धत कशी होती तेही या पुस्तकात आले आहे – नववर्षाच्या स्वागत समारंभाच्या दरम्यान दलाई लामा यांचे वडील मरण पावले. ब्रिटिश डॉक्टरांचे उपचार केले असते तर त्यांचे प्राण कदाचित वाचले असते. पण दलाई लामा यांच्या कुटुंबाने परंपरागत कर्मठ उपचारच केले पाहिजेत हा बौद्धांचा नियम आहे. नेहेमीप्रमाणे त्यांचे पार्थिव मंतरलेल्याजागी नेण्यात आले. मग त्याचे तुकडे करून पक्ष्यांना भक्ष्य म्हणून देण्यात आले. आम्ही लोक करतो त्या अर्थाने बौद्ध शोक करत नाहीत.पुनर्जन्माच्या संभवामुळे दुःख आवरते घेतले जाते. मृत्यू हा काही भयंकरआहे असे बौद्ध मानत नाहीत. लोण्याचे दिवे एकोणपन्नास दिवस तेवत ठेवले जातात. त्यानंतर मृताच्या निवासस्थानी प्रार्थना होते आणि मामला संपतो. विधवा अथवा विधुर काही दिवसांनंतर पुनर्विवाह करण्यास मोकळे होतात.
हेन्रीच आणि पीटर यांनी तिबेटच्या लोकांना उपयोगी पडणारी कामे त्या काळात केली. पीटरने पाणीपुरवठा करण्यासाठी कालवे खोदण्याचे काम केले, हेन्रीचने नदीला बांध घातला आणि दरवर्षी येणाऱ्या पुरापासून होणारे नुकसान थांबवले. हेन्रीचने स्केटिंग सुरू केले. त्यानंतर त्याने वर्तमान दलाई लामा यांच्या विनंतीवरून चित्रपट (माहितीपट) दाखवण्यासाठी छोटे थिएटर उभारले. कळस म्हणजे, दलाई लामा यांनी त्याला त्यांचा शिक्षक नेमले! विद्यार्थी आणि शिक्षक हा प्रकार थोडा अवघड होता. त्या संदर्भात तो लिहितो – त्याने (दलाई लामा) अगदी नम्रपणे स्वतःची वही काढून मला दाखवली. मी चकित झालो. लॅटिन भाषेतील मुळाक्षरे त्या वहीत गिरवलेली होती. काय विविधता होती त्याच्या बौद्धिक जडणघडणीत! अतिशय काटेकोर आणि मानेवर खडा ठेवून केलेला धर्मग्रंथांचा अभ्यास, गुंतागुंतीच्या उपकरणांशी केलेल्या तांत्रिक झटापटी (दलाई लामा यांनी कोणाच्याही मदतीशिवाय आणि इंग्रजी भाषा फार अवगत नसताना संपूर्ण प्रोजेक्टर मोकळा करून पुन्हा जोडला होता) आणि आता हा भाषांचा अभ्यास! त्याने असा आग्रह धरला, की मी त्याला इंग्रजी शिकवावे. इंग्रजी उच्चार तिबेटी भाषेत लिहून समजावून सांगावेत. (तिबेटची राजधानी ल्हासा येथे प्रवेश करणे आणि तेथे कायम राहण्याची परवानगी मिळवणे यासाठी बराच काळ लागला होता. त्या काळात पीटर आणि हेन्रीच, दोघेही सराईतपणे बोलण्याइतकी तिबेटी भाषा शिकले होते)
          अर्थात हे सांगायला नको, की माझ्यावर पडलेल्या या नव्या कामाचा मला अतिशय आनंद झाला होता. फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन एकत्रित केल्यावर होईल एवढ्या मोठ्या भूभागाच्या सत्ताधीशाला आणि तोही हुशार असलेला मुलगापाश्चिमात्य जगतातील ज्ञान आणि विज्ञान समजावून सांगायचे हे काम करण्याजोगेच होते. त्याच्या अमर्याद कुतूहलामुळे माझी थोडी पंचाईत कधी कधी होत असे. उदाहरणार्थ, अॅटम बॉम्बबद्दल सांगायचं म्हणजे मूलतत्त्वांची माहिती देणं आलं, पुढे जाऊन धांतूच्या क्रिया-प्रक्रिया समजावून सांगण्यास हव्यात – त्यासाठी तिबेटी भाषेत समर्पक शब्द नव्हते.
          शिक्षक आणि शिष्य हे नाते उभयपक्षी होते. हेन्रीच सांगतो – तिबेटचा इतिहास आणि बुद्धाची शिकवण याबाबतीत त्याने मला खूप काही शिकवले. त्या दोन्ही विषयांवर त्याचे खरेखुरे प्रभुत्व होते. तो मला म्हणाला, की तो अशा काही जुन्या ग्रंथांचा अभ्यास करत आहे, की ज्यात शरीर आणि आत्मा यांची फारकत कशी करता येईल याचे रहस्य सांगितलेले आहे. दलाई लामा याची खात्री होती, की त्याची श्रद्धा आणि ग्रंथात नेमून दिलेले विधी केले, की इथे बसल्या बसल्या, दूर अंतरावर वसलेल्या साम्ये गावात त्याला काही घटना घडवून आणता येतील. तो म्हणे माझी तयारी पुरेशी झाली की मी तुला साम्ये इथे पाठवेन आणि ल्हासाहून तुझ्या हालचाली नियंत्रित करेन. मला आठवते, मी त्यावर हसून म्हटले होते, ठीक आहे तर मग! कुंडून, तू तसे जेव्हा करशील तेव्हा मी बौद्ध धर्म स्वीकारेन” (दलाई लामा ही उपाधी आणि सत्तास्थान आहे. कुंडून हे त्यांचे मूळ नाव)
दलाई लामा यांचा परिवार
त्या दोघांचे संबंध कसे बदलत गेले यावर एखादी दीर्घकथा वगैरे लिहिता येईल. येथे एवढेच सांगता येते, की अखेरीस ते संबंध जिव्हाळ्याचे, रक्ताचे नाते असल्यासारखे झाले होते. दलाई लामा म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे बालपण हरवले होते. त्यांचा सर्व वेळ धार्मिक ग्रंथांचा अभ्यास आणि पुढे येऊ घातलेली राज्यकारभाराची जबाबदारी पेलण्यासाठीची तयारी करण्यात जाई. सख्या आई वडिलांशी भेटही निमित्तानिमित्ताने, औपचारिक स्वरूपात होत असे. त्यामुळे मोकळेपणे विचारांची देवाणघेवाण आणि हास्यविनोद करण्यास हेन्रीच हाच पहिला माणूस होता असे म्हणता येईल आणि तरीही हेन्रीचलाच सातत्याने तोल सांभाळणे आवश्यक होते.त्याच्याबद्दल मला वाटणारी आपुलकी आणि तो मला त्याचा मित्र म्हणत असला तरी , तिबेटच्या भावी राजाला उचित तो आदर दाखवण्याची काळजी मी घेत असे. त्याने माझ्यावर अंकगणित, इंग्रजी आणि भूगोल शिकवण्याची जबाबदारी टाकली होती. शिवाय, मी त्याचा प्रोजेक्टर चालवत होतो आणि बाह्य जगात काय चालले आहे याचे यथार्थ ज्ञान त्याला देत होतो.त्यांचे संबंध उभयपक्षी कसे खेळकरपणाचे होते त्याची निदर्शक अशी आठवण हेन्रीच याने दिली आहे. त्याने एकदा मला माझे वय विचारले. मी म्हणालो, सदतीस. त्याला आश्चर्य वाटले. सर्वसाधारण तिबेटी लोकांप्रमाणे त्यालाही वाटत होते, की माझे पिवळे केस ही माझ्या बुजुर्गअसण्याची निशाणी होती. लहान बालकाच्या निरागस कुतूहलाने त्याने माझे नाक, डोळे, कान यांच्याकडे निरखून पाहिले. माझ्या लांब नाकावरून माझी थोडी थट्टा केली (अर्थात माझे नाक सामान्य लांबीचेच आहे, मंगोलियन्सना ते लांबुडके वाटते, एवढेच). माझ्या हाताच्या मागील बाजूला असलेले केस दिसताच तो खिदळला – हेन्रिच, तू माकडासारखा केसाळ आहेस.

दलाई लामा आणि हेन्रीच यांच्या मैत्रीला आणखी एक अनपेक्षित असे परिमाण आहे. हेन्रीच हा हिटलरच्या SS या लष्करी संघटनेचा सदस्य होता.  हिटलरने ऑस्ट्रिया 15 मार्च 1938 रोजी जिंकून घेतला आणि त्यानंतर काही काळातच हेन्रीच SS चा सदस्य झाला. त्याला स्क्वाड्रन लीडर म्हणून बढती 1 मे 1938 रोजी मिळाली. हे तपशील अनेक वर्षांनंतर उघडकीस आले. मात्र हेन्रीच याने असे सांगित, की SS चा गणवेश त्याने फक्त एकदा घातला व तोही त्याच्या पहिल्या लग्नाच्या दिवशी. SS मध्ये तो दाखल झाला ते केवळ काश्मीर मोहिमेत सहभागी होता यावे म्हणून. हेन्रीच याचा SS शी संबंध होता याबद्दल चीननेही बरीच आगपाखड केली आहे. यातील खरे-खोटे हा संशोधनाचा विषय ठरेल. मात्र एक सत्य आहे, की सात वर्षे तिबेटमध्ये काढल्यानंतर हेन्रीच तिबेटला कधीच विसरला नाही. त्याच्या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात तो म्हणतो, ” मी कोठेही राहिलो तरी तिबेटच्या आठवणींनी मला चुकल्या चुकल्यासारखे होईल. माझी अशी खरीखुरी इच्छा आहे की या पुस्तकामुळे, स्वातंत्र्य व शांतता यांनी युक्त असे जीवन जगू इच्छिणाऱ्या लोकांबद्दल या बेफिकीर जगात सहानुभूती निर्माण व्हावी.
           अमेरिकनलोकांनी 1945 मध्ये नाझींच्या ज्या फाइली हस्तगत केल्या त्यावरून एक दप्तरतयार केले. त्या दप्तरात हेन्रीच याच्यावर ऐंशी पृष्ठांची एक फाइल आहे. त्या फायलीनुसार, हेन्रीच याने त्याच्या पहिल्या विवाहासाठी सरकारची (नाझींची) परवानगी मागितली होती आणि तत्कालीन नियमांप्रमाणे आवश्यक तो पुरावा – तो आणि त्याची भावी पत्नी शुद्ध आर्यन रक्ताचे आहेत हे सिद्ध करणारा – सादर केला होता. दोघांनी त्यांचे आर्यत्व सिद्ध करण्यासाठी त्यांची वंशवेल (1800-1938) दिली होती असा उल्लेख फाइलमध्ये आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीने म्हटले आहे, की हेन्रीच 1955 मध्ये युरोपात परतला तेव्हा त्याचे नाझीत्व पुसले गेले होते.
(मुख्य स्रोत- “Dalai lama’s Friend – Hitler’s Champion “-article by Gerald Lehner and Tilman Muller . Dated 1-7-1997) छायाचित्रे – संबंधित पुस्तक आणि इंटरनेटवरून
रामचंद्र वझे 9820946547
vazemukund@yahoo.com
रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची शेष काही राहिले‘, ‘क्‍लोज्ड सर्किट‘, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडलेआणि टिळक ते गांधी मार्गे खाडीलकरही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
——————————————————————————————————–

About Post Author

Previous articleअशोक समेळ; सारे काही नाटक! (Stage Personality Ashok Samel)
Next articleबुद्धविहार संस्कृतीच्या शोधात… (Integration Of Buddhavihar Culture)
रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here