दक्षिणकाशी पुणतांबा

carasole

नगर जिल्ह्याच्या कोपरगांव तालुक्यातील पुणतांबा गावाला धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक परंपरा आहे. गाव गोदातीरी वसले आहे. पुणतांब्याचा उल्लेख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांत होतो.

त्या गावाचे नाव पुण्यस्तंभ अथवा नगर असे होते. ती राजा विक्रमादित्याची राजधानी. पुणतांबा गावाला पूर्ण तटबंदी असून गावाला अकरा वेशी आहेत. बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळली आहे. विक्रमादित्य राजाने त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कालखंड पुणतांबा येथे व्यतीत केला. महायोगी चांगदेव महाराजांची समाधी तेथे आहे. त्याला त्याच्या विद्वत्तेचा व तपसामर्थ्याचा गर्व झाल्याने ते ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीस गेले व तेथे गर्वहरण होऊन परतले. ती कथा प्रसिद्ध आहे. चांगदेव महाराजांनी ज्ञानदेवांची धाकटी बहीण मुक्ताईला गुरू केले. त्यांनी चौदाशे वर्षें घोर तपःश्चर्या केल्यानंतर माघ वद्य ३ शके १२९८ रोजी पुणतांबा येथे संजीवन समाधी घेतली.

 

वैदिक काळात पुणतांबा येथे गोदावरीकाठी ऋषिमुनी तप:श्चर्या करत व मोक्षप्राप्तीसाठी पुणतांबेगावी वास्तव्य करत. पुरातनकाळी ते गाव धार्मिक विधी करण्यासाठी विख्यात होते. गावात बहुतांश वस्ती ब्राह्मणांची होती. गावातील बहुतांश वाडे ब्राह्मणांचेच आहेत. पुण्यप्राप्ती व मोक्षप्राप्ती यासाठी काशीनंतर पुणतांबा हे एकमेव महत्त्वपूर्ण ठिकाण मानले जाई. पुणतांबा येथे गोदावरी दक्षिणवाहिनी होते. अंत्यविधीनंतरचे धार्मिक कार्यक्रम तेथे मोठ्या प्रमाणावर होतात. महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचेही पुणतांबा गावी काही काळ वास्तव्य होते. स्वामींच्या अनुयायांनी गोदाकाठी चक्रधर स्वामींचे भव्य मंदिर बांधले आहे. साईबाबांनीही पुणतांबा गावी बराच काळ वास्तव्य केले. पुणतांब्याचे धार्मिक महत्त्व ओळखून दोनशे वर्षांपूर्वी सद्गुरू गंगागीर महाराज आषाढी एकादशी व महाशिवरात्र या दोन दिवशी पुणतांबा येथे जात. तेथूनच त्यांच्या नामसप्ताहाचा आरंभ झाला. पुणतांबा येथूनच नामसप्ताहाचे आयोजन करणाऱ्या गावाचे नाव जाहीर करण्याची व त्यांना रीतसर नारळ देण्याची परंपरा सुरू आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी पुणतांबेगावी अनेक वर्षें वास्तव्य केले व तेथील काशीविश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारही केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनीही तेथे धार्मिक विधी व्यवस्थितपणे पार पाडता यावेत यासाठी गोदावरीला घाट बांधला. तो घाट सुस्थितीत आहे. अहिल्यादेवींनी बांधलेला वाडा मात्र पडक्या अवस्थेत आहे. तेथे महाशिवरात्र व आषाढी एकादशी या दिवशी यात्रा भरते. तीर्थस्थानाचा शासकीय विकासयोजनेत समावेश करण्यात आला आहे. शिर्डी-पुणतांबा रेल्वेमार्ग उपलब्ध झाल्याने पुणतांबा या धार्मिक स्थळाचे नावही शिर्डीप्रमाणे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नकाशात गेले आहे.
चांगदेव महाराजांनी ज्यांना गुरू केले त्या मुक्ताईचे मंदिर चांगदेव महाराज समाधीजवळ असावे या धारणेतून महंत रामानंदगिरी यांनी दोन वर्षांपूर्वी मुक्ताई मंदिर उभारणीचे काम हाती घेतले होते, ते पूर्ण झाले आहे. तसेच, आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी मुक्ताई मठाची स्थापना करण्यात आली आहे.

भगवान शिवशंकराकडून वरदान मिळवून त्रैलोक्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या त्रिपुरासुराचा वध कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला झाला. भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून त्रैलोक्याला त्याच्या जाचातून मुक्त केले. म्हणून तेव्हा मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला. भगवान शिवशंकराच्या विजयाची स्मृती म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाऊ लागली. त्याच दिवशी कार्तिकेयाचा जन्म झाला. म्हणून कार्तिकेयाचीही पूजा केली जाऊ लागली. पुणतांबेगावी पुरातनकालीन कार्तिकेय मंदिर आहे. त्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला कृत्तिका महोत्सव साजरा केला जातो. मंदिरासमोर त्रिपूर पेटवून प्रवाहीत केले जातात. कार्तिकी (त्रिपुरारी) पौर्णिमेला मंदिरात जप-तप साधना केल्यास साधकाला फलप्राप्ती होते. त्यादिवशी मध्यरात्री नदीचे पाणी दुधासारखे पांढरे स्वच्छ होते व कार्तिकेय स्वामी त्यावेळी नदीत स्नानासाठी येतात अशी आख्यायिका आहे. मंदिरात स्त्रियांना प्रवेश वर्ज्य आहे. मात्र त्रिपुरारी पौर्णिमा व कृतिका नक्षत्रांवर महिलांना मंदिरात प्रवेश मिळतो व कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेता येते. कार्तिकस्वामींना नारळ, मोरपीस, रूद्राक्ष, सोने, पिवळे जानवे, तीळ, मूग वाहून प्रसन्न केले जाते. कृत्तिका नक्षत्रावर मंदिरात होणाऱ्या कृत्तिका महोत्सवास लाखो भाविक कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतात.

कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. घडीव व कोरीव दगडाचे काम असलेल्या त्या मंदिराचा कळस पन्नास फूट उंचीचा आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. मंदिरात मध्यभागी शंकराची पिंड असून मंदिरामध्ये दक्षिणमुखी कार्तिकस्वामींची मूर्ती, उत्तरेस गणपती तर पश्चिमेस पार्वती व गंगामातेची मूर्ती आहे. मंदिराबाहेर रावणाची मूर्ती आहे तर मंदिराच्या चारही बाजूंला भगवान शंकराचे गण व मंदिराच्या उजव्या बाजूंला नवग्रहांचे मंदिर आहे.

पुणतांबा गावाच्या पश्चिमेला गोदातीरी चारशे वर्षांपूर्वींचे मंदिर आहे. मंदिरात स्वयंभू देवीमूर्ती आहे. ती देवी नगर जिल्ह्यासमवेतच खानदेशातील भाविकांची कुलदेवता मानली जाते. इसवी सनपूर्व काळात तेथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्या राजाच्या मुलाला जलोदर हा पोटाचा आजार झाला. त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले, पण आजार बरा होईना. त्यावर उपाय म्हणून गावाच्या कडेला यज्ञ करून त्यात एका बालकाचा बळी द्यावा, त्यामुळे आजार बरा होईल असे सांगण्यात आले. राजाने यज्ञाची तयारी केली पण बळी देण्यासाठी मुलगा मिळेना, म्हणून मग दवंडी देण्यात आली. तेव्हा शेजारी असलेल्या पुरणगावातील मुद्गल गोऱ्हे नामक मुलगा घरची हलाखीची परिस्थिती ध्यानी घेऊन बळी जाण्यास तयार झाला. धार्मिक विधीनंतर मुलास यज्ञात टाकले जात असताना यज्ञकुंडात देवी प्रकट झाली व देवीने त्या मुलास वरचेवर झेलून यज्ञाबाहेर सोडून दिले. देवीने बळी जाणाऱ्या मुलाला वर सोडून दिले, त्यामुळे त्या देवीचे नाव यज्ञसेनी असे पडले. राजाचा मुलगा आजारातून मुक्त झाला. पुढे यज्ञातून जीवदान मिळालेल्या मुद्गलाने त्याच गावात आश्रय घेतला. त्याला एकशेचाळीस वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्याने देवी मंदिरापासून काही अंतरावर समाधी घेतली. देवी मंदिराशेजारी सुरेख असे मुद्गलेश्वर (मुंजाचे) मंदिर आहे. याज्ञसेनी मंदिराचे पुजारी बिडवाई तर मुद्गलेश्वर मंदिराचे पुजारी म्हणून गोऱ्हे कुटुंबीय काम पाहतात.

– श्रीमती बी.एम. मराठे

(‘असे होते कोपरगांव’ या पुस्तकावरून उद्धृत)

Last Updated On – 14th July 2017

About Post Author

4 COMMENTS

  1. पुणतांबे गावाचा ऎतिहासिक
    पुणतांबे गावाचा ऎतिहासिक माहीती कळली
    पुणतांबेकरा चे कुल दैवत काय आहे ही माहिती मिळावी

  2. राम कृष्ण हरी..
    पुणतांबा…

    राम कृष्ण हरी..
    पुणतांबा येथे दोन चांगदेव महाराजांच्या समाध्या आहेत असे ऐकले आहे. हे खरे आहे काय. दुसरे चांगदेव महाराज कोणते..?
    कृपया मार्गदर्शन करावे…

  3. पुणतांबा येथे दोन…
    पुणतांबा येथे दोन चांगदेवांच्या समाध्या आहेत का? एक ‘संत चांगदेव’ आणि दुसरी ‘मुधेश चांगा’ यांची. कृपया सांगा… ?

  4. मला महिपतराव पवार पाटील…
    मला महिपतराव पवार पाटील यांच्या कुळातील सदस्यांना बदल माहिती हवी आहे ते माझे पणजोबा आहे

Comments are closed.