तेलवण विधी

0
42
carasole

तेलवण हा महाराष्ट्रातील लग्नविधीतील एक लोकाचार. ब्राह्मणेतर जातींत विवाहाच्या आदल्या दिवशी वधूच्या अंगाला तेल-हळद लावली जाते आणि उरलेली तेल-हळद (उष्टी हळद!) घेऊन वधुपक्षाकडील मंडळी वरपक्षाकडे जातात. ती हळद एक परटीण (धोबीण) आंब्याच्या पानांनी पाय, गुडघे, खांदे व कपाळ या क्रमाने वराच्या अंगाला लावते. काही ठिकाणी वरमाता व काही सुवासिनी मिळून वराला तेल-हळद लावतात.

आगरी लोकांत तेलवणाचा विधी वेगळा आहे. त्यांच्यामध्ये देवक बसवल्यानंतर कुलदेव तांबड्या वस्त्रावर ठेवतात आणि त्याची पूजा करून त्याला कोंबडा किंवा बकरा बळी देतात. स्त्रिया गाणी गातात आणि गाता गाता वर अथवा वधू यांच्यावर थोडे थोडे तेल सोडतात.

दैवज्ञ ब्राह्मणांत विड्याच्या पानाला भोक पाडून ते वधूच्या डोक्यावर ठेवतात आणि त्यातून तेल सोडतात.

देवदेवतांच्या पूजाविधीमध्येही तेलवणाचा समावेश असतो. देवाच्‍या मूर्तीला तैलस्नान घालणे यास तेलवण असे म्हटले जाते. जेजुरीचा खंडोबा किंवा लोणावळ्याजवळील कार्ला गडावरील एकवीरा आई या देवस्थांनांमध्ये तेलवणाचे विधी पार पाडले जातात.

जेजुरीचा खंडोबा आणि म्हाळसाई यांच्या विवाहात तेलवणाच्या विधीचा समावेश असतो. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला खंडोबाला तैलस्नान घातले जाते. त्या दिवशी घरातील व्यक्तींच्या संख्येच्या दुपटीने बाजरीचे नागदिवे, दोन मुटके आणि पुरणाचे पाच दिवे तयार करण्‍याची रीत आहे. ते सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून त्यांनी देवास ओवाळले जाते.

तेलवणाच्या कार्यक्रमास तेलहंडा असेही नाव आहे. जेजुरी गावापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर जयद्रीच्या पठारावर कडेपठार देवतालिंग हे खंडोबाचे स्थान आहे. ते जुनागड या नावानेही ओळखले जाते. भाविक जेजुरीतील तेलवण हळदीच्या कार्यक्रमाच्या वेळी कडेपठार देवतालिंग मंदिरामध्ये खंडोबाची सर्व आयुधे घेऊन पोचतात. त्यास तेलहंडा सोहळा असे म्हटले जाते. त्यानंतर सर्व मंडळी सनईच्या सुरात मंदिराला प्रदक्षिणा घालून नंदी मंडपासमोरील कासवावर पोचतात. तेथे ग्रामस्थ आणि मानकरी यांनी आणलेले तेल गोळा केले जाते. जेजुरगडावरील मंदिरामधून कोळी समाजातील व्यक्ती हंडा घेऊन पुजा-यांसह वाजतगाजत नजरपेठेतील चावडीवर येतात. वीर व चोपदार पुकारा करून मानक-यांना हंड्यामध्ये तेल ओतण्यासाठी निमंत्रित करतात. सर्व मानक-यांचे तेल घालून झाल्यानंतर इतर ग्रामस्थ व भाविक हंड्यामध्ये तेल ओततात. त्या नंतर तो सोहळा वाजत गाजत दिवटी बुधलीच्या प्रकाशात व सनईच्या सुरात गडाच्या पहिल्या पायरीजवळ पोचतो. त्यावेळी नाईक समाजाचे लोक हंड्यामध्ये तेलाच्या सोबत सजवलेला बाण ठेवतात. सोहळा मंदिरामध्ये पोचल्यानंतर परीट समाजातील लोकांकडून देवासमोर धान्याचा चौक भरला जातो. पारंपरिक गाणी गात देवाला तैलस्नान घातले जाते.

एकवीरा आईच्या देवस्थानी चैत्र अष्टमीला तेलवणाचा कार्यक्रम असतो. चैत्र सप्तमीची पालखी आणि अष्ट‍मीचा तेलवणाचा विधी यासाठी शेकडो भाविक तेथे हजर असतात. सध्या पेणचे वासकर आणि चौलचे आग्राव हे तेलवणाचे मानकरी आहेत. त्या विधीमध्ये मानक-यांच्या घरातील प्रत्येकी चार महिला तेलवणाची पारंपरिक गीते गात देवीला तेल चढवतात.

संदर्भ – भारतीय संस्कृतिकोश – खंड चौथा आणि www.jejuri.in

वाचकांनी त्यांच्याकडे अशा विधींसंबंधात माहिती असल्यास जरूर कळवावी.

संपर्क – info@thinkmaharashtra.com फोन (०२२) २४१८३७१०

– आशुतोष गोडबोले

About Post Author