तेरचा प्राचीन वारसा

2
237
_tercha_varsa

तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते. भारतातील मोठ्या बाजारपेठांमध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून त्या शहराचा समावेश होता- ती प्रसिद्धी चालुक्यांच्या आणि राष्ट्रकुटांच्या काळातही कायम होती. ग्रीक प्रवाशाने ‘पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या नावाचा ग्रंथ इसवी सन 50 ते 130 या काळात लिहिला. त्या ग्रंथामध्ये तेरचा उल्लेख तगर असा आलेला आहे. तो ग्रीक प्रवासी म्हणतो – “दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. त्यांतील पहिले बॅरिगाझा (गुजरातमधील भरूच – भडोच). त्यापासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर. तगर हे फार मोठे शहर असून तेथे पैठणहून पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर पोचता येते.

पैठणहून बॅरिगाझा येथे माळरानातून मार्ग काढत दगड आणला जातो. त्याउलट, तगर येथून साधे कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोणपाट बॅरिगाझा येथे पाठवले जाते. त्याचप्रमाणे, समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरिगाझा येथे पाठवला जातो.”

तेरचा उल्लेख टॉलेमीने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहिलेल्या प्रवासवर्णनातही आढळतो. त्याने तगर ही नगरी समुद्रकिनाऱ्यापासून आत असून, अरियके प्रदेशात आहे असे सांगितले आहे. त्याने तगर नगरी सिरी टॉलेमाओस (सातवाहन घराण्यातील श्रीपुळुमावी) या राजाची राजधानी वैथन (पैठण) च्या ईशान्येस आहे अशीही माहिती दिलेली आहे. टॉलेमी हा भूगोलतज्ज्ञ होता. टॉलेमीने जास्त भर प्राचीन स्थळांचे अक्षांश-रेखांश देऊन त्यांचा ठावठिकाणा निश्चित करण्यावर दिला. मात्र त्याची भारताच्या आकाराबद्दलची समजूत बरोबर नाही. त्यामुळे त्याच्या भारतातील अनेक स्थळांच्या जागांच्या नोंदी चुकीच्या ठरल्या आहेत. अर्थात, त्याच्या पुस्तकातील भूगोलविषयक माहिती मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची आहे.

फ्लीट आणि कझिन्स यांनी प्राचीन तगरची सांगड सध्याच्या तेरशी घालण्याचे काम केले. फ्लीट यांनी सुरुवातीला बॉम्बे गॅझेटियरमध्ये तगर म्हणजे कोल्हापूर किंवा करवीर असे नवीनच मत मांडले होते; परंतु त्यांनी नंतर, ते मत बदलून तगरचा तेरशी संबंध जोडला. कझिन्स यांनी तेरला 1901 सालच्या नोव्हेंबरमध्ये भेट दिली आणि तेथील निरनिराळ्या प्राचीन वास्तूंची माहिती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या 1902-1903 या वर्षाच्या वृत्तांतामध्ये प्रसिद्ध केली. नंतरच्या काळामध्ये खुद्द तेरला तसे पुराभिलेख सापडले. पश्चिमी चालुक्यांच्या इसवी सन 612 या काळातील एका अभिलेखात ज्या ज्येष्ठशर्मन याला दान दिले तो तगरनिवासी (तगर येथे राहणारा) होता असा उल्लेख आहे. सांगळूद ताम्रपट अकोला जिल्ह्यात मिळाला. तो राष्ट्रकूट नृपती नन्नराज याच्या आमदानीतील आहे. तो ताम्रपट उम्बरिकाग्राम आणि वटपूरग्राम या दोन खेड्यांतील जमीन तगरनिवासी हरगण द्विवेदी याला दान दिली हे नमूद केले आहे. ते लक्षात घेता मराठवाड्यातील तेर आणि वऱ्हाडातील अकोला यांचा संपर्क सातव्या शतकात येत होता हे स्पष्ट होते. कारण तो लेख शके 615 म्हणजे इसवी सन 693 मधील आहे.

तेरजवळील धाराशिव या गावाचा उल्लेख राष्ट्रकुटांच्या आणखी तीन ताम्रपटांत आहे. ते ताम्रपट राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय याच्या काळात इसवी सन 807, 810 आणि 812 या वर्षांत दिले गेले. धाराशिव आणि तेर यांचे सान्निध्य लक्षात घेता, राष्ट्रकूट शासनाचा प्रभाव तेरवरही पडला असावा. धाराशिवजवळ जैन लेणी आहेत आणि ती फर्ग्युसन व बर्जेस या संशोधकांच्या मते, इसवी सनाच्या सातव्या शतकातील असावीत. हरिषेणाने बृहत्कथाकोष इसवी सनाच्या दहाव्या शतकात लिहिला. त्या ग्रंथात धाराशिव येथील जैनमंदिरातील मूर्तींचा उल्लेख आहे. त्या मूर्ती तेरापूर या गावाच्या दक्षिणेस धाराशिवच्या जंगलात सापडल्याची माहिती त्या ग्रंथात दिलेली आहे. त्यावरूनही धाराशिव आणि तेर यांचा संबंध स्पष्ट होतो. ‘करकंडचरिउ’ या अकराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ग्रंथातही तशीच माहिती आढळते.

तेरची प्राचीनता इसवी सनपूर्व बरीच मागे उत्खननातून नेता आली आहे. मोरेश्वर दीक्षित यांनी तर तो कालखंड इसवी सनपूर्व सुमारे 400 ते 200 म्हणजे मौर्यपूर्व काळापर्यंत मागे नेला आहे. निजाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने 1939च्या सुमारास तेरमधून शेकडो प्राचीन वस्तू गोळा केल्या होत्या. त्यातील काही वस्तू हैदराबादच्या शासकीय संग्रहालयात पाहण्यास मिळतात. ती वस्ती तेरणा नदीच्या पुरामुळे नष्ट झाली _trivikra_mandirअसावी असे मत मोरेश्वर दीक्षित यांनी मांडले आहे. त्यानंतरच्या मौर्य काळातील वस्तीचा पुरावा त्यांना झिलईदार निळसर काळ्या मडक्यांच्या स्वरूपात मिळाला. त्या उत्खननातून साधारणत: पंच्याण्णव फूट व्यास असलेल्या मोठ्या आकाराच्या स्तुपाचे आणि अर्धवर्तुळाकृती पृष्ठभाग असलेल्या चैत्यगृहाचे अवशेषही सापडल्याने तेर हे बौद्घ धर्माचे मोठे केंद्र असल्याचे सिद्घ झाले. स्तुपाची बांधणी मोठ्या चक्रात दुसरे लहान चक्र अशा स्वरूपाची असून त्या चक्रांना अनुक्रमे सोळा व आठ आरे होते. आतील चक्राच्या मध्यभागी चौरसाकृती रचना असून, ती विटांच्या चौतीस थरांनी उभारलेली होती. स्तुपाच्या बाहेर साडेपाच मीटर रुंदीच्या वर्तुळाकृती जागेबाहेर पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही दिशांना पाच मीटर लांबीचे आणि दीड मीटर रुंदीचे चबुतरे विटांनी बांधलेले होते. त्यांतीलच पश्चिम बाजूच्या चबुतऱ्याजवळ एका दगडावर ’मूक’ ही अक्षरे ब्राम्ही लिपीत कोरलेली आढळून आली. स्तुपाच्या घुमटाचे एकोणतीस थर उत्खननात सुस्थितीत आढळून आले. स्तुपाच्या सभोवती असलेल्या प्रदक्षिणापथात सातवाहन राजघराण्यातील राजा पुळुमावी याचे नाणेही सापडले. उत्खननात नऊ मीटर लांबीचे व साडेपाच मीटर रुंदीचे बौद्घ  चैत्यगृहाचे अवशेषही सापडले. चैत्यगृहाला लाकडी चौकटीचा दरवाजा होता. चैत्यगृहाच्या भिंती जाड होत्या आणि त्यातील विटांचे बांधकाम सांधेमोड पद्धतीने केले गेलेले होते. त्यात विटांच्या चौथऱ्यावर बांधला गेलेला सव्वा मीटर व्यासाचा स्तूप होता. विटांनी बांधलेले बौद्ध चैत्य तेरशिवाय भारतात फारसे उपलब्ध नाहीत.

शांताराम भालचंद्र देव यांनी केलेल्या उत्खननात तेरच्या भोवती निर्माण केलेल्या लाकडी तटबंदीचा पुरावा 1975 साली मिळाला. ती तटबंदी प्रचंड आकाराच्या लाकडी खांबांची आडवी व उभी रचना करुन निर्माण करण्यात आली होती. ती निर्मिती इसवी सनपूर्व पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील असावी असे मत देव यांनी मांडले आहे. सातवाहनांच्या राज्यात तटबंदीयुक्त तीस शहरे आहेत असे प्लिनी या प्रवाशाने केलेले वर्णन त्या दृष्टीने महत्त्चाचे ठरते.

माया पाटील यांनीही तेरमध्ये उत्खनन करुन सातवाहनपूर्व इतिहास धुंडाळण्याचा प्रयत्न केला. ते संशोधन 2015 सालातील. डॉ. भगवान नारायण चापेकर यांनी उत्खनन करून तेरचा सातवाहनकालीन इतिहास 1958 साली प्रकाशात आणला. त्यांना उत्खननातून सांडपाण्याचे कूप, सातवाहन राजांची नाणी, केओलिनच्या मूर्ती आणि काचेचे मणी मिळाले. तशा वस्तीचा पुरावा केवळ मातीपासून केलेल्या काही वस्तूंच्या स्वरूपात मोरेश्वर दीक्षित यांना उत्खननातून मिळाला होता.

तेर गावात विटांनी बांधलेली तीन मंदिरे तीन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्रिविक्रम मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. उत्तरेश्वर मंदिर हे त्रिविक्रम मंदिराच्या पश्चिमेला आहे. कालेश्वर मंदिर हे त्रिविक्रम मंदिराच्या उत्तरेला आहे. त्रिविक्रम मंदिराची बांधणी चैत्यासारखी असून, त्याचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक असा आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. गजपृष्ठाकार छत असलेले गर्भगृह आणि सपाट छत असलेला गूढ मंडप अशी मंदिराची रचना आहे. गूढ मंडप म्हणजे आयताकृती बंदिस्त दालन आहे. त्याची लांबी तेवीस फूट तर रुंदी एकवीस फूट आहे. गूढ मंडपाला प्रवेशद्वारे दोन आहेत- एक पूर्वेला आणि दुसरे उत्तर दिशेला. त्या प्रवेशद्वारांच्या द्वारशाखा या नंतरच्या काळात कोरल्या गेल्या असाव्यात. मंडप हा खूर, कुंभ आणि वेदिका या थरांच्या पीठावर असलेल्या स्तंभिकांनी बनलेला आहे. मंडपाचे छत चार लाकडी खांबांनी तोललेले आहे. मंडपाच्या भिंतींमध्ये अर्धस्तंभ आहेत. छताच्या मध्यभागी सपाट भाग असून स्तंभावर चार तुळ्या अशा रचल्या आहेत, की त्यातून तयार झालेला मधला चौकोन कोरीव कामाने सजवला गेला आहे. त्या तुळ्यांवर गिलावा केलेले विटकाम आहे. वेदिका आणि कक्षासन यांवर असलेल्या वामन स्तंभांवरील अलंकरण उल्लेखनीय आहे. वेदिका खोलगट देवकोष्ठ आणि अर्धस्तंभ यांनी अलंकृत आहे. देवकोष्ठांमध्ये गण असून अर्धस्तंभावर फुलांची नक्षी आहे. वेदिकेवरील वामनस्तंभाचे तळखडे पूर्णकुंभाचे असून, त्यावरील खांब अर्धकमल तबकांनी अलंकृत केलेले आहेत.

_uttareshwar_mandirत्रिविक्रम मंदिराचे गर्भगृह आयताकृती असून त्याची मोजमापे आतील बाजूने सव्वीस फूट- बारा फूट अशी आहेत. छताची उंची तीस फूट असून विटांचे बांधकाम अशा पद्धतीने केले आहे, की प्रत्येक थर किंचित आत सरकावलेला आहे. गर्भगृहाच्या चापाकार भागामध्ये केंद्रस्थानी अधिष्ठान आहे. अधिष्ठानावरील त्रिविक्रमाची मूर्ती माणसाच्या आकाराएवढी मोठी आहे. त्या मूर्तीवरून हे मंदिर विष्णूच्या त्रिविक्रम अवताराचे आहे असे म्हटले जाते. कझिन्स यांच्या मते, मात्र ते मुळात बौद्ध मंदिर होते. बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर त्या मंदिरात त्रिविक्रमाची स्थापना झाली असावी. ते सिद्ध करण्यासाठी शिल्पशैलीच्या पुराव्याव्यतिरिक्त पुराभिलेखाचा पुरावा न मिळाल्याने कझिन्स यांनी चार कोरीव स्तंभांचा उपयोग पुरावा म्हणून केला. ते स्तंभ त्यांना मंदिराच्याजवळ सापडले. त्यावरून त्यांनी ते स्तंभ मंदिरामध्ये असलेल्या स्तुपाचे भाग असावेत असा निष्कर्ष काढला. कझिन्सच्या नंतर मात्र; डगल्स बॅरेट, एम. एन. देशपांडे, डॉ. मोरेश्वर दीक्षित, डॉ. शांताराम देव यांना त्याच ठिकाणी स्तूपाचे अनेक अवशेष मिळाले. ते सर्व अवशेष बौद्ध कलेचे आणि स्थापत्याचे आहेत. त्यावरून तेर या प्राचीन नगरीत बौद्ध स्तूप अस्तित्वात होता हा निष्कर्ष निघतो. तेरचे महत्त्व एक प्राचीन बौद्ध केंद्र म्हणून वादातीत आहे.

त्रिविक्रम मंदिराचे प्राचीनत्व चैत्यगृह स्थापत्याचा प्रभाव, लाकडाचा वापर आणि विटांचा आकार यांमुळे सिद्ध होते. कझिन्स यांच्या मते, त्या मंदिराची निर्मिती इसवी सनाच्या चौथ्या शतकातील किंवा त्याही पूर्वीची असावी. डग्लस बॅरेट यांनीसुद्धा अर्धस्तंभाचे स्वरूप, चैत्यावरील पट्ट (एका पट्टीत कोरलेल्या आकृती), चैत्यमुख यांच्या अभ्यासावरून त्या मंदिराच्या निर्मितीचा काळ इसवी सनाचे दुसरे ते पाचवे शतक असा ठरवला आहे. पर्सी ब्राऊन यांनी त्या मंदिराचा समावेश विटांनी बांधलेल्या प्राचीन वास्तूंच्या यादीमध्ये केलेला आहे. डॉ. प्रभाकर देव यांनीही त्या मंदिराचा सखोल अभ्यास करून त्याच्या निर्मितीचा काळ इसवी सन 350 ते 450 असावा असे स्पष्ट मत मांडलेले आहे.

तेर येथील उत्तरेश्वराचे मंदिर लक्षणीय आहे. ते मंदिर उत्तरेच्या ईश्वराचे म्हणजेच शंकराचे आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, त्यात गर्भगृह आणि मंडप यांचा समावेश आहे. मंदिर विटांनी बांधलेले असून, त्याच्या दरवाज्याची चौकट लाकडी होती. लाकडी चौकटीच्या बुडाचा भाग नष्ट झालेला आहे. ती चौकट पुढे, सुरक्षिततेच्या व जतनाच्या कारणास्तव तेर येथील रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयात हलवली गेली. त्या चौकटीच्या द्वारशाखांवर भौमितिक नक्षीकाम, हंस, मिथुन, व्याल (समकालीन देवता), स्त्री-पुरुषांच्या जोड्यांच्या माळा कोरलेल्या आहेत. चौकटीच्या मध्यभागी माथ्यावर विविध देवता, त्यांचे गण, सेवक दाखवलेले आहेत. उत्तरेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्यांगावर दिसून येणारी वास्तुवैशिष्ट्ये, द्राविड शैलीतील कूटशिखरे, शालाशिखरे आणि त्यात व्याल घटकांच्याऐवजी मकर घटकांचा केलेला वापर, मध्यभागी चैत्यगवाक्ष असलेल्या स्तूपिकेची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि दरवाज्याच्या लाकडी चौकटीवरील शिल्पांची शैली यावरून ते मंदिर इसवी सन 550 च्या सुमारास बांधले गेले असावे.

मंदिराच्या अधिष्ठानाच्या थरावर गर्भगृहाची भिंत असून, त्या भिंतीवर ठरावीक अंतरावर द्राविड शैलीचे स्तंभ सडपातळ आढळतात. स्तंभांच्या मधील जागेत चैत्यगवाक्षांची नक्षी असून, त्यावरील कमानीच्या खालील भागात मकर दाखवलेले आहेत. भिंतीच्या वर त्रिमितीयुक्त घराचे छत असून, त्यावर स्तूपिकेसारखा वास्तुघटक आहे. पंचरथ प्रकारच्या त्या गर्भगृहावर छताच्या दोन थरांत शालाशिखर व कूटशिखर हे वास्तुघटक आहेत. स्तूपिकेची बाह्यरेषा त्रिरथ प्रकारची असून, वरचा भाग त्रिमितीयुक्त आहे.

मंदिरातील गर्भगृहाच्या भिंती साध्या आहेत. ठरावीक अंतरावर अर्धस्तंभ आणि दोन अर्धस्तंभांच्या मध्ये अर्धकमानी कोरलेल्या आहेत. कमानींवर मकर कोरलेले आहेत. तेथे वीटकामाचे उत्तम उदाहरण पाहण्यास मिळते. त्रिविक्रम मंदिरासाठी वापरलेल्या विटांपेक्षा या विटा आकाराने किंचित लहान आहेत. गर्भगृहावरील शिखराच्या मोडकळीस आलेल्या अवशेषांवरून विटांच्या बांधकामाची कल्पना येते. शिखराच्या उतरत्या भागाच्या भिंती अंतर्वक्र होत जातात. शिखर जेथून सुरू होते, त्या ठिकाणापासून म्हणजेच गर्भगृहाच्या भिंतीवरील पहिल्या थरापासून विटांचे बांधकाम करताना, प्रत्येक थराची रचना वैशिष्ट्यपूर्ण केल्यामुळे शिखर निमुळते होत जाते. उत्तरेश्वराचे स्थापत्य हे राष्ट्रकूट आणि चालुक्य कालीन स्थापत्याशी मिळतेजुळते असल्याने डग्लस बॅरेट यांनी त्या मंदिराच्या निर्मितीचा काळ इसवी सनाचे आठवे शतक असा सुचवलेला आहे. डॉ. प्रभाकर देव यांनी मात्र विटांचा आकार, स्थापत्यशैली, स्थापत्याची वैशिष्ट्ये यांवरून उत्तरेश्वर मंदिराच्या निर्मितीचा काळ इसवी सनाचे सहावे शतक ठरवला आहे. त्यांच्या मते, मंदिराच्या स्थापत्याची पद्धतही इसवी सनाच्या सहाव्या शतकाशी सुसंगत आहे.

_kaleshwar_mandirकालेश्वर मंदिर गावाबाहेर उत्तरेकडे तेरणा नदीच्या काठावर आहे. ते मंदिरही विटांमध्ये बांधलेले असून, विटा मात्र आकारमानाने वेगवेगळ्या आहेत. त्या विटा पक्क्या भाजलेल्या व वजनाने हलक्या असल्याने पाण्यावर तरंगू शकतात. कालेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी जे साहित्य वापरले, त्याच्या अभ्यासातून असे दिसते, की कालेश्वराचे मंदिर इसवी सनाच्या सातव्या शतकात बांधले गेले. मंदिरातील विटांची मोजमापे आणि आकार यांवरून प्रभाकर देव यांनी ते मत मांडलेले आहे.

कालेश्वर मंदिराचे भाग मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे आहेत. गर्भगृह आणि शिखर मूळचे असून, अंतराळ आणि मंडप हे नंतर बांधले गेले असावेत. मंदिरावरील शिखर सुस्थितीत आहे. मंडपासाठी वापरलेल्या विटा लहान आकाराच्या आहेत. मंडपाला चार स्तंभ आहेत. वरील छत सपाट असून, तो मंडप नंतरच्या काळात बांधला गेला असावा. अंतराळाची द्वारशाखा लहान असून, अंतराळाचे छत घुमटाकृती आहे. गर्भगृहाच्या भिंतींना गिलावा असून, त्या सपाट आहेत. गर्भगृहावर उत्तरेश्वर मंदिरासारखेच घुमटाकार शिखर आहे. गर्भगृहासाठी वापरलेल्या विटा मात्र मोठ्या आकारमानाच्या आहेत. गर्भगृहात द्वाराच्या ललाटपट्टीवर गरुडाचे शिल्प आहे, त्यावरुन ते विष्णु मंदिर आहे हे निश्चित कळते.

– संतोष दहिवळ 9822012435 santoshdahiwal@rediffmail.com
——————————————————————————————————

‘तेर’संबंधी

तेर येथे वारंवार सापडणारी सातवाहन कालीन नाणी व इतर वस्तू यावरून त्या गावच्या पंरपरेस दुजोरा देतील अशा प्रकारचे अवशेष गडप झालेले एखादे विस्तीर्ण क्षेत्र त्या गावाच्या जवळपास निश्चित असावे असा कयास संशोधकांनी बऱ्याच वर्षांपूर्वी बांधला होता. अशाच गडप झालेल्या ढिगाऱ्यांतून विशेषत: पावसाळ्यानंतर अनेक अवशेष तेरच्या जवळपासच्या शेतांमधून उपलब्ध होत होते. त्यामुळे सर्वप्रथम तेरच्या अवशेषांची सविस्तर पाहणी हेन्री कझिन्स यांनी 1901 मध्ये करून त्याचा वृत्तांत 1902-03 मध्ये प्रसिद्ध केला. त्यानंतर 1929-30 साली तत्कालीन निजाम सरकारच्या पुरातत्त्व विभागाने तेरच्या त्रिविक्रम मंदिराची जतनाच्या दृष्टीने पाहणी केली. तेर येथे अनेक अवशेष जमा करणे सुरू झाले. हैदराबाद संस्थानच्या पुराणवस्तू खात्यातर्फे एक दालन सहज भरून जाईल इतक्या प्राचीन वस्तूंचा साठा 1939-40 मध्ये गोळा करण्यात आला. परंतु त्याची योग्य त्या प्रमाणात वास्तपुस्त घेतली गेली नाही. इतकेच नव्हे तर त्या खात्यात्रफे प्रतिवर्ष प्रसिद्ध होणाऱ्या अहवालात त्याबाबतची नोंददेखील केली गेली नाही. जुने साहित्य उपलब्ध होऊनही ते लोकांच्या नजरेस आले नाही. त्यानंतर पुढे, पुण्याच्या डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूटमधील काही विद्यार्थी तेर येथे गेले असता नमुन्यादाखल शाडूच्या काही मृण्मयमूर्ती, नाणी, मणी वगैरे साहित्य त्यांनी पुण्यास नेले व तेथूनच तेरच्या शास्त्रीय पाहणीस किंवा उत्खननाच्या इतिहासास सुरुवात झाली. त्यांनी तेरच्या आसपासची प्राचीन अवशेष आढळणारी टेकाडे शोधून काढली व उत्खननासाठी योग्य अशी स्थळे हेरून ठेवली. त्या स्थळांच्या उत्खननासाठी शासकीय मदत मागण्यात आली. त्यावेळी उत्खनन महाराष्ट्र शासनाच्या (त्यावेळी द्विभाषिक मुंबई प्रांत) पुराभिलेख व ऐतिहासिक स्मारकांच्या विभागातर्फे व्हावे, त्यांनी जरूर तो पैसा पुरवावा किंवा खर्च करावा व उत्खननासाठी लागणारी तांत्रिक मदत डेक्कन कॉलेजने द्यावी व चाचणी दाखल लहानशा प्रमाणावर तेरे येथे उत्खनन करावे असे ठरले. त्या योजनेनुसार 1958 साली तेर येथे पद्धतदशीर उत्खनन सुरू झाले. त्या उत्खननाची तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी डेक्कन कॉलेजने डॉ. कृष्ण दयाल बॅनर्जी व डॉ. भगवान नारायण चापेकर ह्या दोघांची नियुक्ती केली होती व त्या संस्थेतील पुरातत्त्व विभागाचे मुख्य डॉ. हसमुख सांकलिया ह्यांच्या सल्ल्याने उत्खननाचा अहवाल शासनाकडे द्यावा असे ठरले होते. पुरातत्त्व विभागातर्फे सहाय्यक संचालक दु.रा. अमलाडी व इतर दोन-तीन जण ह्यांना पाठवले गेले होते. वरील मंडळींनी 1958 च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत तेथे आठ आठवडे काम केले व तेरणा नदीच्या पात्राजवळच कुंभारवाड्यात दोन खड्डे खणले होते. चाचणी म्हणून ते उत्थनन फलदायी झाले.

About Post Author

2 COMMENTS

  1. अप्रतिम लेख , मोठा आहे …
    अप्रतिम लेख , मोठा आहे. पण, प्रत्यक्षात बघितल्यानंतर भारी वाटलं सारे बघितलेले डोळ्यासमोर येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here