तुंबडीवाल्यांचे गाव

carasole1

‘तुंबडीवाला’ हा गोंधळी , भराडी , वासुदेव , पांगुळ, बहुरूपी या लोकगायकांच्या परंपरेतला लोकसंस्कृतीच्या उपासकांतील महत्त्वपूर्ण घटक होय. तुंबडीवाल्यांचे वास्तव्य महाराष्ट्राच्या वर्धा  जिल्ह्यात आढळून येते. कारंजा (घाडगे) तालुक्यातील खापरी हे गाव तुंबडीवाल्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचा परंपरागत, पिढीजात व्यवसाय म्हणजे ‘तुंबडी’ या वाद्यावर गाणी म्हणून भिक्षा मागणे. त्यांच्यापैकी काही मंडळी शेतीव्यवसाय व पशुपालन करत आहेत, नवी पिढी शिक्षण घेत आहे. मात्र हे प्रमाण नाममात्र आहे.

महाराष्ट्रातले ‘तुंबडीवाले’ मध्यप्रदेशात ‘बसदेव’ आणि उत्तर प्रदेशात ‘हरबोले’ या नावांनी ओळखले जातात. मध्यप्रदेशात त्यांचे वास्तव्य ‘बालाघाट’, ‘रानडोंगरी’, बैतुल’ या प्रदेशांत आहे. त्यांचे वास्तव्य उत्तरप्रदेशात तुरळक दिसून येते. त्यांचे मुख्य उपास्य दैवत ‘महादेव’. तुंबडीवाले हिंदू समाजाप्रमाणे सर्व सण-उत्सव साजरे करतात. त्यांचे रीतिरिवाज, चालीरीती हिंदूंप्रमाणे आहेत. ते श्रीकृष्ण, गणपती, हनुमान यांना विशेष पूजनीय मानतात.

तुंबडीवाला भिक्षा मागताना जी गाणी गातो ती परंपरेने त्यांच्या घराण्यात मौखिक रूपाने प्रचलित असतात. प्रत्येक पिढीत त्यात कमी-अधिक होते. त्यामुळेच त्यांच्या गीतांत नित्यनूतनता दिसून येते. गाणी परंपरागत ‘तुंबडी’ या वाद्यावर गातात. त्यांच्या तोंडी असणारी विविध प्रकारची गाणी, पोवाडे, कथागीते उपदेशात्मक आणि मोहक असतात. त्यांच्या गाण्यांनी ऐकणा-यांचे मन प्रसन्न होते. तुंबडीवाला भिक्षा मागताना एकटाच असतो. शक्य झाल्यास त्याच्या सोबतीला लहान मुलगा असतो. कधी ते बरोबरीचे दोघे असतात. त्यावेळी दुसरा साथीदार कोरसप्रमाणे गीताच्या चरणांची पुनरावृत्ती करतो.

लोक खूश होऊन तुंबडीवाल्याला धान्य, कपडे व पैसे देतात. त्या वेळी तो दान पावल्याची पावती ‘जय हो’ असे म्हणून देतो व दुसर्‍या घरी जातो. तुंबडीवाल्याचा पोशाख साधासुधा असतो. आखुडसे धोतर, बंगाली शर्ट, डोक्याला कसेबसे मुंडासे, काखेत झोळी. एका हातात ‘तुंबडी’, दुस-या हातात करताल (चिपळ्या) असा साधा वेषधारी ‘तुंबडीवाला’ हे गावचे आकर्षण असे.

‘तुंबडी’ या शब्दाचा अर्थ शब्दकोशात गोसावी, बैरागी यांचे भिक्षापात्र, भोपळा असलेले तंतुवाद्य असा दिला आहे. मधुकर वाकोडे यांच्या मते ‘गोसावी, बैरागी किंवा फकीर यांच्या हातातील भिक्षापात्र म्हणजे कटोरा, तो भोपळ्याचा असल्याने त्यास तुंबाही म्हणतात. शरीरातील दूषित रक्त काढण्याच्या यंत्रास देखील तुमडी म्हणतात,’ (लोकविद्या पत्रिका : ऑनोडिसे, 98, परभणी), ‘तुंबडी’ हे भोपळ्याच्या फळासारखे फळ आहे. त्याचा आकार डम्बेल्ससारखा असून त्यात फरक एवढाच आहे, की तुंबडीच्या शेवटच्या भागापैकी एक भाग जास्त ठोकळ असतो आणि दुसरा कमी आकाराचा असतो. मध्यंतरी गळेदार जागा असते. त्याभोवती घुंगरांची माळ बांधून ‘तुंबडी’ हे वाद्य तयार केले जाते. ‘तुंबडी’ हे वाद्य मागे-पुढे हलवत राहिल्याने ‘छक्कS छक्कSS’ असा मधुर नाद होतो. त्या ठेक्यावर तुंबडीवाले गीतगायन करतात. तुंबडीवाल्यांच्या कथनानुसार त्यांना तुंबडीचे फळ मोठ्या महादेवाहून (मध्यप्रदेश) आणावे लागते. ‘तुंबडी’ या परंपरागत वाद्यावर गाणी गात असल्यामुळे त्यांना ‘तुंबडीवाले’ म्हणून नाव व प्रसिद्धी मिळाली.

तुंबडीवाल्यांच्या गीतांचे स्वरूपरचनेच्या दृष्टीने कथागीते, उपदेशपर गीते आणि पोवाडे असे तीन वर्ग करता येतात. त्यांचे वास्तव्य महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात असल्यामुळे त्यांची भाषा मराठी-हिंदी मिश्रित खडी बोलीसदृश आहे. त्यातून प्रादेशिकता लक्षात येते. गोंधळी, बहुरूपी, वाघ्या-मुरळी, वासुदेव यांच्या गीतांना असलेली नृत्यांची साथ तुंबडीवाल्यांच्या गीतांना नसते.

तुंबडीवाला उपदेशपर गाणी भिक्षा मागताना गातो. तुंबडीवाला त्या गीतांतून दात्याची महती वर्णन करून दान देण्याचे आवाहन मोठ्या कौशल्याने करतो. ही रचना साधी-सोपी आणि गद्य असते. त्यात कल्पकता, अलंकारिकता फारशी नसते. उपदेश आणि मनोरंजन हा त्यामागील प्रमुख हेतू असतो.

बेटा भागवान लछमी, तू भाग्याची होना
जिया तेरा बेटा, राज करते रहना
बेटा भागवान लछमी, तू भाग्याची होना
खेती में बरकते, तेरी दुगनी होना
तेरी बनी रहे बरकत, साह्य भगवान तुझे देना
बाल और गोपालों की, दुवा हो जाना
बेटा बहुत दिनों में, तुंबडीवालों का होना
मेरे भारत के, दाता लोगा, खुषी बने रहेना
जिते रहे, किरसानोंकी, माया बडे दुगनी

उदरनिर्वाहाकरता भटकंती करत असताना येणारे सुखदु:खाचे प्रसंग, अनुभव इत्यादींचे चित्रण तुंबडीवाला वास्तवदर्शी करतो :

दिल की मुशाफिरी करना जी
कोई दिन हाथी, कोई दिन घोडा
एक दिन पैदल, चलना जी
दिल की मुशाफिरी करना जी
कोई दिन हलवा, कोई दिन पुरी
एक दिन भूखे रहना, जी
दिल की मुशाफिरी करना जी

या गीताची गायनशैली कर्णमधुर आहे. चरणांची पुनरावृत्ती होत असली तरी ती हवीहवीशी वाटते.

कथागीते

रंजन आणि उदबोधन यांचा मधुर संगम कथागीतांत असतो. कथागीतांतील कथाबीजे पुराणवाङ्मय, वर्तमानकालीन घटना, प्रसंग यांतून घेतलेली असतात. पुराणातील आदरणीय व्यक्ती, त्यांच्या जीवनातील घटना-प्रसंग इत्यादींचे रसाळ वर्णन कथागीतांत केलेले असते. राजा हरिश्चंद्र , श्रावणबाळ, राजा मोरध्वज, श्रीयाळ-चांगुणा, सत्यवान-सावित्री अशा गीतांचे गायन तुंबडीवाला रसाळ वाणीने करतो. कथागीतांद्वारा समाजाला सत्प्रवृत्तीचे दर्शन व्हावे, हा त्यामागे हेतू असतो.

पोवाडे

भारतात वीरपुरुषांची गाथा गाण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. त्यात तुंबडीवाल्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या ऐतिहासिक पोवाड्यांतून ऐतिहासिक सत्याचा शोध घेता येतो. त्यांनी 1942च्या स्वातंत्र्य आंदोलनात पोवाड्यांद्वारा राष्ट्रीय जागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांची पोवाडेगायन करण्याची शैली व धाटणी श्रेष्ठ दर्जाची आहे. शिवाजीमहाराज, रघुजी भोसले, झाशीची राणी, बाजीराव-मस्तानी, 1942चा आष्टीचा (वर्धा) स्वातंत्र्यसंग्राम इत्यादी पोवाडे, दहा-पाच लोकांची मैफल जमली, की ते मोठ्या खुषरंग पद्धतीने गातात. भाषेचा अस्सलपणा, वर्णनाची अकृत्रिम धाटणी आणि आश्चर्यचकित करणारा कल्पनाविलास ही त्यांच्या पोवाड्यांची वैशिष्ट्ये आहेत. लोकसमजुती, लोकरूढी, अंधश्रद्धा, म्हणी इत्यादींचा वापर या पोवाड्यांची ऐतिहासिकता स्पष्ट करणार्‍या आहेत. राजे रघुजी भोसले यांच्या पोवाड्याची रचना-पद्धत कथानिवेदनाप्रमाणे आहे. प्रारंभी देवदेवतांना आवाहन, नमन व नंतर मुख्य कथेचा प्रस्ताव, त्यानंतर प्रसंगनिर्मितीतून कथानिवेदन असा क्रम असतो.
 

ओ, सुनो सरस्वती, शारदा का नाम
लेते रहो नाम, गणु गणपती का ध्यान
अरे, सुनाऊं नाम, राजधानी का गाना
बैठे सरदार मेरा, सुनो घडी गाना
कैसी-कैसी, बातों में, गया राजधानी का नाम

पोवाड्याचा प्रारंभ करताना, कुणाचा पोवाडा गातो त्याची पूर्वसूचना ते करतात.
 

नागपूर के अंदर में, भोसले का राज
जिसकी बावन बर्‍हाड, नऊ लाख थीक झाडी
ऐसी लाख गोंडवान, मुलख का भारी
जगे, जगे पिकती थी, सोने की काडी
मराठे के रहिसों में खूप खाया, खाना
रुपया मिलता था, देड कुडो दाना
आगे एकने कमाना, और दस मिलकर खाना
अब दस मारते बोंब, नही एक का ठिकाना…

रघुजी भोसले यांचे पूर्वीचे वैभव व त्यास दिलेली वर्तमानाची झालर, शब्दांची उत्स्फूर्त रचना यांतून तुंबडीवाल्याची कल्पकता जाणवते.

पोवाड्याचा शेवट मोठ्या कलाकुशलतेने करण्यात येतो. त्यात साचेबंदपणा प्राप्त होऊ नये म्हणून उत्स्फूर्तपणे त्यात बदल केला जातो. पोवाडागायन ज्या ठिकाणी आहे ते स्थळ, परिसर, जमलेल्या व्यक्ती, गाव, पैसे देणार्‍याचे नाव इत्यादी संदर्भ दिले जातात. एकाच ठिकाणी गायन करत राहिलो तर पोट भरणार नाही असा उल्लेख आवर्जून केला जातो.
 

तुम बैठे हो सरदार, मेरे मोतियों का दाना
कैसी-कैसी बात, राजधानी की गाना
गाते रहू गाना, इसका, बहुत हैरा मानना
पेट का दरीदी, मैं दस, घर में जाना
दस द्वार मैं जाऊंगा, तब लगेगा ठिकाना
अरे, जैसी हो तुम्हारी मर्जी, मुक्ता बनाऊं गाना
जैसी मिले देणगी, वैसा गाऊं गाना,
नही हिजडे का नाच कोई बायलें का गाना
बैठे मेरे भैयासाहब, खुशी बने रहना
एक सौ रुपया मुझे, तुमने इनामी से देना
अजी आपका भी नाम, मैंने दुनिया में लेना

पोवाड्याची समाप्ती नाममुद्रेने करतात. त्यात गाव व स्थळाचा उल्लेख येतो.
 

अजी खापरि कें रहनेवाले, तुंबडीवाले होना
जिल्हा हमारा वर्धा है, कारंजा हमारा ठाना
कारंजा तहसील में गाता हूं गाना
नाम मेरा पंछीलाल, सत्त्या है मर्दाना
अच्छे-अच्छे ठिकानों पे, गाता हूं गाना
खूष रहो चार-भाई, भारत के सरदार

‘जय हो’ या गजराने प्रत्येक गीताची समाप्ती करतात. पोवाड्यात वाड.मयीन मूल्ये पाहता त्यात प्रसंगवर्णने, भावनिर्मिती, प्रतिमायोजना, आशय इत्यादी वाङ्मयीन गुण दिसतात. शिवाय, समाजाव्या दृष्टीने त्यात मनोरंजन तर आहेच: त्याच जोडीला समाजसंकेत, लोकाचार, लोकसंस्कृती हेही गुण नजरेत भरणारे आहेत. बदलत्या परिस्थितीचे वास्तव दर्शन घडवणारे हे गीत पहा:
 

ये काली बदलीयां पानी की, पानी का एक भी बूंद नही
अभी रात कुछ बाकी है, बात कुछ बाकी है
बेटा तेरे भारत में, क्या ये दुनियां दीवानी है
क्या बनाऊं जो नक्कंल, क्या बनाऊं गाना
हो गयी भ्रष्टाचारी में, नही परता खाना
देश पे आ गया, कंट्रोल का जमाना
कैसे स्वराज ये, कैसी आझादी
कोई भूखे मरते, कोई बना बैठे खाली
बडे-बडे लीडरो नें, कर दिया बरबादी
घरपट्टी लगा दिया, चुल पट्टी लेना
लूट गयी दिल्ली, सारा बिगड गया पूना
हो गयी भ्रष्ट्राचारी में, नही पुरता खाना
ये करते आ गया, कंट्रोल का जमाना
माता-पिता का लगा, दिया ठिकाना
मर्दीने ये लिया, औरत का बाना
छोड दिया धोती, लुंगी के उपर आना
देखने में सूरत बडी, खुषरंग होना
सफेद बडे कपडे, खिसे खाली होना
घर में नही दाना, भूख का ठिकाना
एक पाव डटाना, और गरीबी हटाना
लंगाते पंजापर, छक्का आ जाना
बेटा तेरे भारत में…….

तुंबडीगीते आणि लोकजागृती

तुंबडीगीत या लोकशैलीचा आकृतिबंध स्वीकारून, प्रभावी लोकजागृतीसाठी गीतांची निर्मिती होत आहे. तुंबडीगीताचा अनुबंध दर्शवणारे वृक्षसंवर्धन गीत पाहा.
 

लख्खSलख्खSSलख्खSSSलख्ख
तुंबडी भर देना, मेरी तुंबडी भर देना
लख्खSलख्खSSलख्खSSSलख्ख
एक झाड आंगन में, तुम लगा देना
इस दुनिया में, कभी वापस नही आना
तुंबडी भर देना मेरी, तुंबडी भर देना
लख्खSलख्खSSलख्खSSSलख्ख
झाड आहे देवरूपी, त्याले नका तोडू
झाडा विना पानी नाही, मग नका रडू
बोंब माराल लेको, म्हणानं घरात नाही दाना
लख्खSलख्खSSलख्खSSSलख्ख
झाड असलं म्हंजी, नको पावसाची चिंता
झाडाविना सर्वांची, कशी जळेल चिंता
झाडामाथं ठाकूरकी, त्याचं गाणं म्हणा

रंजन आणि उद्बोधन हा दुहेरी हेतू तुंबडीगीतांतून साधला जातो. नाट्यात्मकता, लयबद्धता, खटकेबाज काव्यात्मकता, लोकजीवनाला स्पर्श करणारी पारंपरिकता नि जीवनसापेक्षता ही तुंबडीगीतांची विशेषता आहे. लोकसाहित्यातील ह्या अक्षरलोकगंगा खरेखुरे लोकमानस व्यक्त करतात.

तंत्रविकासामुळे जीवनमूल्ये, सामाजिक गृहीते बदलली, त्याचा परिणाम सामाजिक संस्था, लोकप्रकटन संस्थांवर झाला. चित्रपट, व्हिडिओ, दूरचित्रवाणी गावोगावी पोचली आणि लोकगायकांच्या लोककलेला ग्रहण लागले. लोकगायकांच्या पारंपरिक कलेचे जतन करण्याची वा त्याचे मूळ स्वरूप शोधून काढून त्याचे दस्तऐवजीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या कलेची जोपासना भारतीय मातीशी, लोकजीवनाशी, संस्कृतिपरंपरेशी असलेली नाळ न तोडता लोकाश्रयावर केली. त्यांच्या कलागुणांचे संवर्धन करणे म्हणजे आपला वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणे होय.

– पुरुषोत्तम कालभूत

मराठी विभाग : आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा

(‘साहित्यसूची’वरुन साभार)

About Post Author

2 COMMENTS

  1. तुंबडीवाले वा इतर वासुदेव
    तुंबडीवाले वा इतर वासुदेव वगैरे लोकांनी वणवण भटकत राहून आपला सांस्‍कृतिक वारसा वगैरे जपावा हे लिहिणे-बोलणे सोपे आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने असेच करावे अन् आपण सुशिक्षित मंडळीनी आपल्या मुलांना कलेक्टर डाॅक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहवे हे न पटणारे आहे. दुस-याच्‍या घरी गरिबी, वंचना, उपासमारी चालावी; आपण मात्र सुखसोयी बघाव्या? विचार करा या दृष्‍टीनेही!

  2. लावणी

    लावणी, पोवाडा, वासुदेव, अशा अनेक प्रकारचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा ठेका काय बहुजनांनी घेतला आहे का? उच्‍चवर्णियांनी आपल्या पाल्यांना आणावे की अशा व्यवसायात! मग कळेल गरीबी, अपमान! दुसरी बाजू – वारसा वगैरे या प्रकाराला मान, प्रसिध्दी, पैसा मिळू द्या! जेव्‍हा उच्‍चवर्णिय आपल्या पाल्यांना अशा प्रकारांत पोटपाणी भरण्याबद्दल सांगतील तेव्हा हे सांस्‍कृतिक वैभव भविष्यातही खरोखर जपून राहील!

Comments are closed.