समाज माध्यमांच्या वापरातून कृषी विस्तार अधिक व्यापकपणे व्हावा या उद्देशाने तिफण फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांपर्यंत नवनव्या शेती पद्धतींची माहिती, आधुनिक शेतकीचे ज्ञान व कौशल्ये पोचावी याकरता सहाय्यक कृषी अधिकारी हे फेसबुक पेज व द फार्म बुक या युट्यूब चॅनलचा वापर केला जातो…
मार्कोनी या शास्त्रज्ञाने पाठवलेला पहिला बिनतारी संदेश ते फेसबुकचे ‘मेटाव्हर्स’ तंत्रज्ञान इतका मोठा पल्ला संदेशवहनाने गेल्या शतकभरात गाठला आहे. माहितीची निर्मिती, साठवणूक आणि वहन यांमध्ये इलेक्ट्रॉनिक क्रांती मोठ्या प्रमाणात झाली आहे. तज्ज्ञ त्या प्रक्रियेला ‘माहितीचा विस्फोट’ म्हणून संबोधतात. प्रत्येक गोष्ट आंतरजाल म्हणजेच इंटरनेटवर उपलब्ध आहे. भारतात ‘जिओ’ क्रांतीनंतर स्मार्टफोन खेड्यापाड्यात पोचला असून त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘गुगल कर’ हा शब्द आता खेड्यात सर्वसामान्यांच्या तोंडूनही ऐकण्यास येत आहे.
समाज माध्यमांच्या उदयानंतर त्यांनी मानवी दैनंदिन जीवन बहुतांश व्यापून टाकले आहे. त्यामुळे माहिती प्रसारणाच्या व्याख्याच बदलून गेल्या. माहिती प्रसारित करणे सद्यकाळात सर्वसामान्यांच्या हातात आले आहे.
अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग समाज माध्यमांच्या द्वारे शेती, शेतकऱ्यांसाठीही राबवले जात आहेत. कृषी विस्तार ही अशी संकल्पना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत शेती पद्धतींची माहिती, आधुनिक शेतकीचे ज्ञान व कौशल्ये विविध माध्यमांतून पोचवण्यात येते. नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचते करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती पूर्वापार वापरात आहेत. त्यामध्ये सभा, संमेलने आणि सर्वात लोकप्रिय म्हणजे शेती शाळा या गोष्टींनी कृषी विस्तारात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. तिफण फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील असे चारशेहून अधिक मोफत ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
शेती व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक आहे. महिलांचा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये सहभाग असतानादेखील समाजव्यवस्थेतील काही अडचणींमुळे कृषी विस्तार त्यांच्यापर्यंत पोचणे शक्य होत नाही. शेतकरी महिलाचूल–मूल आणि शेतीतील कामे यांतच पुरेपूर गुंतलेल्या दिसतात. त्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी घराबाहेर जाणे शक्य होत नाही. समाज माध्यमांमुळे महिलांपर्यंत सहजासहजी पोचता येऊ शकते. अनेक ठिकाणी महिला शेतकऱ्यांचे व्हॉट्स अॅप ग्रूप तयार करण्यात आलेले आहेत. त्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोचते करण्यात येत आहे.
शेतीदिनाचे औचित्य साधून जालना तालुक्यातील चितळी पुतळी या गावी महिला शेती शाळा ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आली होती. त्यासाठी अंजना सोनवलकर यांनी पुढाकार घेतला. तो कार्यक्रम सहाय्यक कृषी अधिकारी या फेसबुक पेजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात आला. शेतीदिनाचा तो कार्यक्रम फार तर पन्नास लोकांपर्यंत मर्यादित होता. परंतु तो समाज माध्यमांमुळे चौदा हजार प्रेक्षकांनी पाहिला. सोयाबीनची टोकण पद्धतीने लागवड करणे हा व्हिडिओ चाळीस हजार शेतकऱ्यांनी पाहिला. या दोन उदाहरणांवरून हे लक्षात येईल, की कृषी विस्तारात समाज माध्यमांचा वापर प्रभावीपणे केला जाऊ शकतो.
कृषी विस्तारात समाज माध्यमांचा वापर करताना महत्त्वाचे म्हणजे दर्जेदार ‘कण्टेण्ट’ तयार होणे गरजेचे आहे. अन्यथा, समाज माध्यमांची मालकी सर्वसामान्यांकडे असल्याने चुकीचा कण्टेण्ट ‘अपलोड’ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
समाज माध्यमातून कृषी विस्तार अधिक व्यापकपणे व्हावा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘तिफण फाउंडेशन‘ अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या ‘सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज’ व ‘द फार्म बुक’हे युट्यूब चॅनल या दोन्ही व्यासपीठांना शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– सुखदेव जमधडे 9881907000 sukdeo@gmail.com
——————————————————————————————————————————————————————————-