ज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर

31
137
carasole

वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो.

देगलूरकर घराण्यातील संत परंपरेचा इतिहास जवळपास दोनशेसाठ वर्षाचा आहे. त्या घराण्याचे मुळ पुरुष गुंडा महाराज यांचा जन्म 1753 साली महिपती नाईक आणि भाग्यवती यांच्या पोटी देगलूर येथे झाला. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सराफीचा होता. गुंडा महाराजांना बालपणापासून संतसंगाची आवड होती. त्यांनी ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा लाभलेले सिद्धयोगी संत चुडामणी महाराज यांचे शिष्यत्व पत्करले. गुंडा महाराजांनी भारतभर तीर्थयात्रा केली. तिचा आरंभ देगलूर ते पंढरपूर पदयात्रेने झाला. त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरात चक्रिभजन रूढ केले. त्यांचे रसाळ कीर्तन आणि प्रवचन पंढरपूर येथे चातुर्मासात होत असे. त्यामुळे गुंडा महाराजांची ख्याती सर्वदूर पसरली. महाराजांचा शिष्यपरिवार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या प्रदेशांत वाढला. औशाचे वीरनाथ महाराज, विजापूरचे  रामचंद्र महाराज तिकोटेकर, तत्त्वज्ञानी बाबा गर्दे, श्रीगोंद्याचे श्रीकृष्णानंद महाराज, कुशतपर्णकर नाथमहाराज इत्यादी श्रेष्ठ मंडळींनी गुंडा महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. गुंडा महाराजांनी पंढरपूर येथे 1817 साली देह ठेवला. गुंडा महाराजांच्या शिष्यत्वाचा वारसा जोपासणारे देशात पंचवीस मठ अस्तित्वात आहेत.

गुंडा महाराजांचा पारमार्थिक वारसा हरिनाथ महाराजांनी चालवला. हरिनाथ महाराजांनतर गुंडामहाराज (द्वितीय) यांनी मठाची गादी सांभाळली. गुंडा महाराज द्वितीय यांच्या पोटी नारायण, महिपती, लक्ष्मण, रामचंद्र अशी चार मुले जन्माला आली. पैकी रामचंद्र महाराज व मनुबाई या दांपत्याच्या पोटी 1905 साली (शके 1826 च्या वैशाख शुद्ध 3, अक्षयतृतीया) धुंडा महाराज यांचा जन्म झाला. महाराज बालपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचा अध्यात्माकडे कल उपजतच होता. धुंडा महाराजांच्या वयाच्या चवथ्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले. धुंडा महाराज आणि बंधू बंडा महाराज यांचे पालनपोषण चुलते महिपती महाराज यांनी केले. महाराजांचे प्राथमिक शिक्षण देगलूर येथे रघुनाथराव कोरडे गुरुजींकडे उर्दू आणि मराठी अशा दोन भाषांत झाले. आई मनुबाईच्या मनात तिच्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन वकील व्हावे असे होते. त्यामुळे त्यांना इंग्रजी शिक्षणासाठी औरंगाबादला पाठवण्यात आले.

महिपती महाराजांना संत सेवेची आवड असल्यामुळे त्यांच्या मठात अनेक संत महंत, तपस्वी साधक नेहमी येत असत. महिपती महाराजांनी विष्णुबुवा जोग महाराजांना एकदा पंढरपूरच्या मठात बोलावले होते. महिपती महाराज बसलेले असताना बाल धुंडा महाराज त्यांच्या समोर आले. महिपती महाराजांनी जोग महाराजांना, हा त्यांच्या भावाचा मुलगा इंग्रजी शिक्षण घेत असल्याचे सांगताच जोग महाराज म्हणाले, ‘याला इंग्रजी काय शिकवता? संस्कृत शिकवा ना!’ धुंडा महाराजांना उद्देशून जोग महाराज म्हणाले, ‘तुला वकील, डॉक्टर कशाला व्हायचे? तू संतकुळात जन्मलास, संस्कृत शीक, तुमच्या घरी ज्ञानेश्वरीची उपासना आहे. चांगली ज्ञानेश्वरी सांग’. जोग महाराजांच्या उपदेशाने धुंडा महाराजांच्या जीवनाला कलाटणी  मिळाली.

धुंडा महाराजांच्या आईचाही त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यू झाला. पोरकेपणाचे दु:ख पदरी आले. धुंडा महाराज जोग महाराजांची आज्ञा प्रमाण मानून त्यांच्या घराण्याच्या संतपरंपरेचा वारसा चालवण्यासाठी शालेय शिक्षण सोडून पारमार्थिक अध्ययनाकडे वळले. महाराजांचे प्रारंभिक संगीत शिक्षण देगलूरच्या मठात पं.विनायकबुवा गवई यांच्याकडे  झाले. देवणी येथील विख्यात वेदांत पंडित शा.सं. दामोदरशास्त्री यांनी देगलूरच्या मठात राहून महाराजांना संस्कृत काव्य, व्याकरण आणि त्यातील तत्त्वज्ञान शिकवले. पुढे, धुंडा महाराज वेदांताकडे वळले आणि त्यांनी वेदांताचा सखोल अभ्यास केला. विविध संस्कृत ग्रंथांचे सूक्ष्मपणे वाचन करून सखोल चिंतन केले. महाराजांना अफाट आणि अलौकिक स्मरणशक्तीची दैवी देणगी लाभली होती. पुढे, त्यांनी पंढरपूर येथील अखिल भारतीय कीर्तीचे भगवानशास्त्री धारूरकर यांच्याकडे न्यायशास्त्र, तर्कसंग्रहदीपिका, वेदांतपरिभाषा, पंचदशी, गीताभाष्य, ब्रह्मसूत्र, उपनिषदादी ग्रंथांचा अभ्यास केला. धुंडा महाराजांनी ‘भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी | कृपा हरि तयावरी’ हा संत एकनाथांचा संदेश उरी बाळगून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी श्रद्धेने, निष्ठेने देगलूरजवळील रामपूर या शिवतीर्थी ज्ञानेश्वरीची एकशेआठ पारायणे केली. त्याच दरम्यान अग्रहारचे वकील मल्हारराव यांची कन्या कृष्णाबाई यांच्यासोबत धुंडा महाराजांचा विवाह झाला.

धुंडा महाराजांनी त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी देगलूर ते पंढरपूर आषाढी पदयात्रेला आरंभ करून दिला. पुढे, यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी पंढरपूर वारी पासष्टाव्या वर्षांपर्यंत निष्ठेने चालू ठेवली. महाराज चातुर्मासात चार महिने पंढरपुरी विठुरायाच्या दरबारात व्रतस्थपणे सेवा करत असत. देगलूर संस्थानाला तेलंगणातील मोघ्यांची जहागिरी होती. नारायण महाराजांचे निर्वाण शके 1925 मध्ये झाल्यानंतर निजाम सरकारकडून महिन्याच्या आत वारसा हक्काची नोंद करण्याचा आदेश आला. महिन्याच्या आत वारसाचे नाव नाही लागले तर जहागिरी जप्त करण्यात येईल असे कळवण्यात आले होते. तेव्हा महिपती महाराजांनी धुंडा महाराजांना हैदराबादला जाण्यास सुचवले. धुंडा महाराज त्यांना म्हणाले, ‘देवसेवा ही आपली खरी जहागिरी आहे, पूर्वजांनी ती सांभाळली. आपल्याला तीच वर्धिष्णू केली पाहिजे. लौकिक जहागिरीच्या मागे लागण्यात अर्थ नाही. शिवाय, जे आपले असेल ते कशानेही जाणार नाही आणि जाणारच असेल तर ते प्रयत्नानेदेखील मिळणार नाही.’ पण महाराजांचा तो विचार अनेकांना अव्यवहार्य वाटला. धुंडा महाराज चातुर्मास संपल्यानंतर, विठुमाऊलीचे दर्शन घेऊन हैदराबादला गेले. महाराजांनी निजाम सरकारला भेटीसाठी वेळ मागितला. त्यांना उलट निरोप मिळाला, की ‘जप्त केलेली जहागिरी परत मिळणार नाही. म्हणून भेटण्याचे कारण नाही.’ त्यावर महाराजांनी निरोप पाठवला, की ‘मी तुम्हास भेटून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो आहे. जहागिरी परत मिळवण्यासाठी नव्हे.’ परवानगी मिळाली. महाराज निजामाला नम्रपणे म्हणाले, की तुम्ही आमची जहागिरी जप्त केली आहे.  ती तुम्हीच दिली होती. आमच्या कुळाने त्या जहागिरीचा सुमारे सव्वाशे वर्षं उपभोग घेतला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आलो आहे. पण तुम्ही जी जहागिरी दिली त्या दानपत्रातच तुम्ही आम्हाला चातुर्मासात पंढरपूर येथे राहून धर्मसेवा करण्याची आज्ञा दिली आहे. आम्ही आज्ञेचे पालन केले. तुम्ही बोलावले असताही आम्ही चातुर्मासात आलो नाही. हे तुमच्या आज्ञेचे उल्लंघन नाही, तर तुमच्या पूर्वजांनी दिलेल्या आज्ञेचे परिपालन आहे. निजाम क्षणभर भांबावला! त्याने दप्तरातील कागदपत्रांतून महाराजांच्या बोलण्यातील सत्यता पडताळून पाहिली व म्हणाला, ‘आम्ही तुम्हाला तुमची जहागिरी परत देत आहोत. आम्ही तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत.’ धुंडा महाराजांनी निजामाला जिंकले! मात्र त्यांनी ते कुठल्या चमत्काराच्या बळावर साध्य केले नाही; तर त्यांनी निजामाला विवेक आणि सौजन्यशीलता यांच्या बळावर जिंकले.

धुंडा महाराजांनी चातुर्मासात पंढरपूर सोडायचे नाही हे व्रत आयुष्याच्या शेवटपर्यंत पाळले. त्यातून त्यांची त्यांच्या परमार्थावरची निष्ठा लक्षात येते. चातुर्मासाच्या काळात महाराजांच्या जीवनात एकापेक्षा एक भयंकर असे कसोटीचे प्रसंग आले. महाराजांनी त्यांची चित्तवृत्ती त्यांच्या जीवनात डोंगराएवढे दु:ख येऊनही ढळू दिली नाही. महाराजांचा मोठा मुलगा वसंत पुण्यातील महाविद्यालयात शिकत होता. तो दिवाळीच्या सुट्टीत मामाकडे हैदराबादला गेल्यानंतर मोटार अपघातात दगावला. तेव्हा चातुर्मास चालू असल्याने महाराज पंढरपूरला होते. महाराजांचे प्रवचन चालू असताना त्यांच्या हातात मुलाच्या मृत्यूची तार देण्यात आली. महाराजांनी तार वाचली आणि शांतपणे ती तार तशीच ठेवून त्यांचे प्रवचन पूर्ण केले. महाराजांनी ती बातमी इतरांना प्रवचन संपल्यानंतर सांगितली. तेव्हा सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसला. महाराजांच्या संबंधातले लोक सांत्वन करण्यास आले तेव्हा महाराज म्हणाले, ‘ऋणानुबंध संपला आणि तो गेला. तिकिट संपले की गाडीतून उतरावेच लागते.’ महाराजांनी त्यांचा तोल, संयम आणि विवेक तशा दु:खद प्रसंगीही ढासळू दिला नाही.

चातुर्मासात पंढरपुरी संतांची मादियाळी असे. त्या काळात ह.भ.प. विनायकबुवा साखरे, बंकटस्वामी, सोनोपंत दांडेकर, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, केशवमहाराज देशमुख इत्यादी विद्वानांचे अभ्यासपूर्ण कीर्तन आणि प्रवचने धुंडा महाराज जिज्ञासेने विनम्रतापूर्वक श्रवण करत. चातुर्मासात चार महिने पंढरपूर क्षेत्री कीर्तन आणि प्रवचन सेवा करण्याबरोबरच जिज्ञासू अभ्यासकांसाठी वेद, शास्त्र, गीता, भागवतादी ग्रंथांवर पाठ देत असत. महाराजांच्या पाठास संपूर्ण देशातून आलेले तीनशे-चारशे जिज्ञासू अभ्यासक विद्यार्थी उपस्थित राहत. महाराजांच्या अल्पावधीतील व्यासंगाचे भारतातील तत्कालीन विख्यात पंडित ब्रह्मलीन लक्ष्मणशास्त्री द्रवीड यांनी तोंड भरून कौतुक केले होते. देशाला अनौपचारिक शिक्षण देणाऱ्या पंढरपूर विद्यापीठाचे धुंडा महाराज देगलूरकर आजीवन कुलपतीच बनून गेले होते!
‘पाहूनिया ग्रंथ करावे कीर्तन’ हा तुकोबांचा विचार उरी बाळगून, महाराज वयाच्या विसाव्या वर्षापासून नित्य अभ्यासपूर्ण कीर्तन, प्रवचन करू लागले. अफाट वाचन आणि चिंतन यांमुळे वयाच्या विसाव्या-एकविसाव्या वर्षी महाराजांच्या वाणीला ओज प्राप्त झाले. कीर्तनाचा चाहतावर्ग उत्तरोत्तर वाढू लागला. महाराजांच्या वाणीला दैवी माधुर्य होते. वाचन, पाठांतर, चिंतन आणि मनन यांमुळे त्यांच्या वाणीचा गोडवा जनसागराला आकर्षित करत असे. त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून ‘वक्ता दशसहस्रेषु |’ या उक्तीचा प्रत्यय श्रोत्यांना येई. महाराज त्यांच्या प्रवचनांतून ज्ञानेश्वरीप्रमाणेच अमृतानुभवासारख्या श्रेष्ठ समस्येच्या सिद्धांताची उकल लीलया करत. अवघड, गूढ तत्त्वज्ञान सुगमतेने सांगण्यात महाराजांचा हातखंडा होता. महाराजांचे कीर्तन-प्रवचन अखंडितपणे चालत असे. चातुर्मासाचे चार महिने वगळता महाराज आठ महिने कीर्तन-प्रवचनार्थ संपूर्ण महाराष्ट्र संचार करत असत. महाराष्ट्रातील कोणताही मोठा नाम सप्ताह महाराजांच्या कीर्तन-प्रवचनाशिवाय संपन्न होत नसे. महाराजांनी हृदयविकाराचे दोनदा झटके येऊनही त्यांचे कीर्तन, प्रवचन आणि प्रवास थांबवला नाही. त्यांनी दळणवळणाची साधने फारशी नसूनही बस-रेल्वेने प्रवास केले. त्यांनी ग्रामीण भागात कीर्तन-प्रवचनाला जाण्यासाठी प्रसंगी बैलगाडीतून तर काही वेळा पायीही प्रवास केला. उतारवयात एवढी दगदग कशासाठी? असा सवाल कुणी केल्यास महाराज म्हणत, ‘श्रोते प्रवचनाला येतात, मी त्यांना बघतो, मला आनंद होतो, धन्यता वाटते, की हजारो डोळयांनी माऊली माझ्याकडे बघत आहे व माझे ऐकत आहे.’ त्यांची कीर्तन-प्रवचनावरील निष्ठा अशी होती. महाराजांचे जीवन म्हणजे अखंड ज्ञानयज्ञच! धुंडा महाराजांच्या रसाळ, अमोघ वाणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. त्यांची महाराष्ट्राबाहेर मद्रास, मच्छलीपट्टण, हैदराबाद, बडोदा, इंदूर, काशी, कोलकाता इत्यादी ठिकाणी मराठी, हिंदी व काही वेळा तेलगुतूनही प्रवचने झाली. प्रकृती चांगली नसताना कुणी ‘कीर्तन करू नका’ असा सल्ला दिला तर महाराज म्हणत, ‘ज्ञानेश्वरी नाही ते जगणे काय?’ त्यांचे अवघे जीवन ज्ञानेश्वरीमय झाले होते.

नाशिकचे कीर्तन संमेलन, पुण्याचे व गोव्याचे कीर्तन संमेलन, नारदीय कीर्तनकार शिबिर अशा ठिकाणी महाराजांची प्रमुख उपस्थिती असे. तो उपस्थित कीर्तनकारांसाठी सुवर्णयोगच ठरत असे. महाराज जणू कीर्तनकारांचे दीपस्तंभ होते. गोव्याच्या कीर्तन संमेलनाचे संयोजक चारशे कीर्तनकारांच्या वतीने धुंडा महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, ‘या गौरीशंकर शिखरापुढे आम्ही सारे कीर्तनकार ठेंगणे आहोत याची प्रचीती आली.’ वारकरी संप्रदायाचे विचार रुजवण्यासाठी विसाव्या शतकात धुंडा महाराज आणि प्राचार्य मामा दांडेकर यांनी संपूर्ण भारतभर अव्याहतपणे संचार केला.

धुंडा महाराज स्वत: ज्ञानेश्वरी जगले. ‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी’ या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वरीतील अद्वैत विचार महाराजांच्या आचरणात होता. महाराजांचे एकुलते एक सख्खे बंधु श्री बंडामहाराज  देगलूरकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने 1961 साली अकस्मात मृत्यू झाला. त्याआधी काही वर्षे त्यांचा थोरला मुलगा देवाघरी गेला होता. एकापाठोपाठ एक महाराजांवर दु:खद प्रसंग आले होते. पुण्याहून मामा दांडेकर धुंडा महाराजांचे सांत्वन करण्यासाठी देगलूरला आले होते. त्याच दरम्यान पुण्याला पानशेतचा प्रलय येऊन गेला होता. मामांचे पूरग्रस्तांना मदतकार्य चालू होते. तशा प्रसंगी, भावाच्या मृत्यूच्या दु:खात असूनही धुंडा महाराजांनी मामांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाचशे रूपयाचा चेक दिला. तेव्हा मामा आश्चर्याने म्हणाले, की अशा समयी तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. महाराज म्हणाले, कर्तव्याला कधीही पारखे होता यायचे नाही. नंतर मामांचे पत्र आले, त्या पत्रात मामांनी लिहिले, ‘एवढ्या दु:खातही आपण मदत केली. परमार्थ पचवल्याशिवाय मनाची अशी स्थिती होत नाही.’

रझाकारांनी निजामी राज्यात हिंदूंचा अनन्वित छळ चालू केला होता. तेव्हा निजामी राज्यातील बरीच मंडळी त्यांचा जीव वाचवण्यासाठी पंढरपूरकडे धाव घेऊ लागली. महाराजांनी त्या सर्व लोकांची राहण्याची व जेवणाची सोय त्यांच्या मठात केली. ते त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

पारायण, चिंतन, मनन, प्रबोधन, प्रवचन, कीर्तन, वारी, चातुर्मास आणि प्रवास म्हणजेच महाराजांचे जीवन होते. त्याकाळी पंढरपुरात पाठप्रबोधनाबाबत महाराजांची ख्याती होती. एकदा जोग महाराजांचे शिष्य शांताराम गुरुजींनी धुंडा महाराजांकडे सिद्धांत ग्रंथ समजावून सांगण्याचा आग्रह धरला. तेव्हा वेळ नसल्यामुळे त्यांना महाराजांनी प्रवासाला सोबत चलण्यास सुचवले. शांताराम गुरुजी धुंडा महाराजांसोबत बैलगाडीतून प्रवासाला निघाले. धुंडा महाराज शांताराम गुरुजींना सिद्धांत समजावून सांगत होते, तेवढयात बैलगाडी कलंडली. सर्वच खाली पडले. महाराजांच्या पायावरून चाक गेले. शांताराम गुरुजींनाही लागले होते. गाडीतून खाली पडल्यावर अचानक महाराज व शांताराम गुरुजी एकमेकांसमोर आले तेव्हा महाराजांनी विचारले, शांताराम, कोणता विषय चालू होता? क्षणाचाही विलंब न लावता महाराजांनी त्यांचा पाठ पुढे सुरू केला. शांताराम गुरुजींना धडा मिळाला!

धुंडा महाराजांनी ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर असंख्य प्रवचने दिली. त्यांनी हरिपाठाच्या सातत्यपूर्ण चिंतनातून सहाशे पानांचा प्रदीर्घ स्वरूपाचा ‘हरिपाठविवरण अथवा भक्तिशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. मामा दांडेकरांनी त्यांच्या प्रस्तावनेतून त्या ग्रंथातून महाराजांच्या अथांग व्यासंगाचे दर्शन घडत असल्याचे सांगितले आहे. हरिपाठातील नाममहात्म्य आणि तत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. संत एकनाथांच्या हरिपाठावरही सुमारे दोनशे पानांचे भाष्य पुढे, 1974 च्या सुमारास लिहून हरिपाठाचा वस्तुक्रियापाठच भाविकांच्या हाती दिला. धुंडा महाराज देगलूरकरांनी महर्षी नारदांच्या ‘भक्तिसूत्रा’वर चारशे पानांचे विस्तृत भाष्य लिहिले. भक्तिशास्त्रावरील मौलिक ग्रंथ म्हणून ‘नारदभक्तिसूत्र’ या ग्रंथाची ख्याती सर्वदूर पसरली. त्यानंतर त्यांनी दीडशे पानांचा ‘संतवचनामृत’ हा ग्रंथ लिहिला. त्यात संत ज्ञानेश्वरांच्या दहा अभंगांवरील संकीर्तन आहे. ‘तो ग्रंथ म्हणजे भक्तिप्रेमानंद चाखणाऱ्या विद्वान पंडितांना मेजवानीच आहे’ असा अभिप्राय मामा दांडेकरांनी व्यक्त केला. त्याबरोबर महाराजांचे तुकारामांच्या अभंगावरील निरूपणाचे दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी 1976 साली सोलापूर येथील ज्ञानेश्वर महाराज जन्मशताब्दीनिमित्त ‘पदायदान – संत ज्ञानेश्वरांचे मागणे’ या ग्रंथाचे लेखन केले. पसायदानातील केवळ नऊ ओव्यांवर त्या ग्रंथात धुंडा महाराजांनी अडीचशे पानांचे विस्तृत भाष्य लिहिले. त्यातून महाराजांच्या चिंतनाची सखोलता लक्षात येते. ग्रंथाचे प्रकाशन तत्कालीन उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्या हस्ते झाले. त्यांनी त्या ग्रंथाचे तोंड भरून कौतुक केले. पुढे, आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टण येथे आंध्र भाषातज्ज्ञांच्या मदतीने तेलुगू भाषेत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन केले. त्या ग्रंथलेखनाबरोबरच मुमुक्षू, प्रतिष्ठान, पुरुषार्थ, प्रसाद, तत्त्वज्ञान, माऊली, यज्ञवाक्य, जीवनविकास, श्रीज्ञानेश्वरदर्शन ग्रंथ, सांगाति, कल्याण, पंढरी संदेश, पंचधारा इत्यादी मासिक-पाक्षिक-नियतकालिकांतून महाराजांनी प्रसंगानुरूप संत साहित्यावर लेखन केले. महाराजांनी शेकडो ग्रंथांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिलेल्या आहेत.

विदर्भ साहित्य संघ, लातूर साहित्य परिषद, कऱ्हाडचे साहित्य संमेलन, वैदिक परिषद, संस्कृत संमेलन, यक्षादि कार्यक्रम पुणे आणि नाशिक येथील वसंत व्याख्यानमाला अशा विविध ठिकाणी धुंडा महाराजांची विचारप्रवर्तक व्याख्याने झाली. त्यांनी प्रयाग येथे 1966 साली झालेल्या विश्व हिंदू परिषदेस उपस्थित राहून ‘जीवनात धर्माचे स्थान’ या विषयावर हिंदीतून अस्खलीत भाषण दिले. परिषदेतील देशविदेशातील संतमहंत महाराजांचे व्याख्यान ऐकून अचंबित झाले. विश्व हिंदू परिषदेचे भव्य अधिवेशन आळंदी येथे 1987 च्या अखेरीस झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद श्री धुंडा महाराजांना देण्यात आले होते. महाराजांनी त्यांची शारीरिक अवस्था चांगली नसूनही ओजस्वी स्वरूपाचे अध्यक्षीय भाषण केले. त्याशिवाय अनेकांचा सत्कार समारंभ, एकसष्टी, अमृत महोत्सवानिमित्त झालेली महाराजांची भाषणे अविस्मरणीय ठरली. एकंदर महाराजांच्या बोलण्यात, वागण्यात, लेखनात आणि कृतीत सहजता, समयज्ञता, संयमशीलता आणि सहिष्णुता यांचे दर्शन घडते.

धुंडा महाराज म्हणजे जणू फिरता ज्ञानकोश होते. विजया संगवई यांनी महाराजांना एका मुलाखतीत ‘तुमची विद्वत्ता पाहून विद्यापीठाने सेवेची संधी दिली तर स्वीकाराल का?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा महाराजांनी दिलेले उत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, “माझे कार्यक्षेत्र वेगळे आणि विद्यापीठाचे कार्यक्षेत्र वेगळे. मी सांप्रदायिक आहे. त्या संप्रदायाच्या निष्ठा हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेऊन माझे विचार मांडणे किंवा ज्या विषयाचा माझा थोडाफार अभ्यास आहे त्यावर एखादे व्याख्यान देणे वेगळे आणि विद्यापीठाच्या क्षेत्राशी बांधून घेणे वेगळे… पुन्हा विद्यापीठाचे कार्य बौद्धिक स्तरावर चालते. मी बौद्धिक स्तराबरोबरच भावनिक स्तराला महत्त्व देतो. त्याद्वारेच माणसाच्या वृत्तीत काही चांगले परिवर्तन होणे शक्य असते व असे कार्य व्यक्तिगत स्तरावरून अधिक चांगले होत असते असा माझा विश्वास आहे. या कार्याचे लोकांना एवढे महत्त्व वाटते, की त्यासाठी आमच्या प्रपंचाचा भार ते आमच्या शिरावर राहू देत नाहीत! इतके लोकांचे अफाट प्रेम मला लाभले आहे. त्यांच्या प्रेमाने माझ्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. असे असल्यामुळे तुम्ही म्हणता तशी संधी आलीच तर ती मी बहुधा स्वीकारणार नाही… पुन्हा माझे स्वत:चेच एक स्वतंत्र विद्यापीठ बनून गेले आहे. ज्ञानोबा- तुकोबांनी स्थापलेले. ते जंगम विद्यापीठ आहे! मी त्या विद्यापीठाच्या सेवेत आधीच आहे. त्या सेवेतून रिटायर होता येत नाही.” धुंडा महाराजांना एकसष्टावे वर्ष लागल्यानंतर त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या स्नेही मंडळींनी 1966 साली घाट घातला. महाराजांनी आरंभी त्यास नकार दिला, पण मामा दांडेकरांनी त्या बेतास ‘ज्ञानेश्वरी सेवा गौरवा’चे रूप दिले. त्यावेळी महाराज नम्रपणे म्हणाले, ‘धोंडयावर सोन्याचे दडपण आले!’ तो गौरव सोहळा म्हणजे अविस्मरणीय असा कीर्तन आणि प्रवचन महोत्सवच घडून आला. अनेक थोर कीर्तनकारांची कीर्तने आणि प्रवचने झाली. स्वत: महाराजांनीही ‘कैवल्याचा पुतळा | प्रगटला भूतळा | चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा ||’ या अभंगावर दोन दिवस रसाळ असे कीर्तन केले. त्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरूजी यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार झाला. समारंभाचे प्रमुख मामा दांडेकर होते. महाराजांनी त्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना देहात प्राण असेपर्यंत ज्ञानेश्वरीसाठीच झिजणार असल्याचे सांगितले. मग एकसष्टीनिमित्त चाळीसगाव, बडोदा, नाशिक, देगलूर अशा अनेक ठिकाणी महाराजांच्या सत्काराची रांगच लागली आणि त्यांना ना म्हणणे शक्य राहिले नाही.

महाराजांना पंच्याहत्तर वर्षे 1980 साली पूर्ण झाली. त्या निमित्त पंढरपूर येथे भव्य नामसप्ताह आयोजित करण्याचे ठरले. नामसप्ताह श्री गजानन महाराज संस्थानच्या मंदिर प्रांगणात 08 ते 15 नोव्हेंबर (1980) असा साजरा झाला. त्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन-प्रवचने झाली. महाराजांच्या अमृत महोत्सवानिमित्त दैनिक सोलापूर संचार या वृत्तपत्राने विशेषांक काढून कृतज्ञता व्यक्त केली. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार 14 नोव्हेंबर 1980 रोजी करण्यात आला. त्यांना एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांची गुरुदक्षिणा समर्पित करण्यात आली. अमृतमहोत्सवी नामसप्ताहाच्या समारोपाचे भाषण करताना ज्ञानेश्वर माऊली असा शब्द उच्चारताच त्यांना गहिवरून आले. त्या भाषणात वारकऱ्यांनी दिलेल्या दक्षिणेतून वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षासाठी धार्मिक ट्रस्ट उभा करण्याचे घोषित केले. समाजाने दिलेला पैसा महाराजांनी समाजासाठीच आर्पित केला.

धुंडा महाराजांनी संत साहित्यावर मौलिक स्वरूपाचे लेखन करून त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून पंचाहत्तर वर्षे संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाचे विचार रुजवले. त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल शिक्षण क्षेत्राकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे विद्यापीठातर्फे धुंडा महाराजांचा सत्कार आयोजित करण्यात आला. महाराज प्रकृती अस्वास्थ्यामुळे तेथे जाऊ शकले नाहीत. तेव्हा पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू श्रीधर गुप्ते, पुणे विद्यापीठातील ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. वि.रा.करंदीकर, नामदेव अध्यासनाचे प्रमुख अशोक कामत स्वत: पंढरपूर येथे गेले. कुलगुरूंच्या हस्ते महाराजांचा हृद्य सत्कार झाला. त्या प्रसंगी किसनमहाराज साखरे उपस्थित होते. वयोमानानुसार भाषण करण्याचे अवसान नसूनही महाराजांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. महाराज म्हणाले, “विद्यावंतांच्या नगरीतल्या विद्यापीठाने माझा सन्मान केला तो यासाठी की मी गेली सत्तर-बहात्तर वर्षं  ज्ञानेश्वरीची प्रवचने करतो. जनजागरण करतो. पण खरे सांगू का? मी जी ज्ञानेश्वरी सांगतो ती मला कळली म्हणून सांगत नाही, तर स्वत:ला ज्ञानेश्वरी कळावी म्हणून सांगत राहिलो. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी जशी मला ती कळू दिली तशी मी ती सांगितली. ‘बोलविले बोल ज्ञानदेवे |’ यात माझे कर्तृत्व काय! तरी मोठ्या मनाच्या पुणे विद्यापीठाने माझा गौरव केला.” महाराजांच्या हृदयात ज्ञानेश्वरी रुजली आहे, म्हणून अशी नम्रता आणि विवेक अंगी आला आहे अशी भावना वक्त्यांनी व्यक्त केली.

पुणे येथील पेशवे सरकारने स्थापन केलेल्या देवदेवेश्वर मंदिर (पुणे) तर्फे धुंडा महाराजांचा 1987 साली मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. समारंभ भारतीय संस्कृती कोशकार महादेवशास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी त्यांच्या मनोगतातून ‘नरामाजी राजा धुंडीराजा !’ अशा शब्दांत महाराजांचा गौरव केला.

पंढरपूर नगरपालिकेने फेब्रुवारी 1991 मध्ये महाराजांचा भव्य सत्कार करून त्यांना मानपत्र दिले. त्या कार्यक्रमास महाराजांचे स्नेही पांडुरंगशास्त्री आठवले व महाराजांचे सुहृद अनंत महाराज आठवले उपस्थित होते.

विदर्भातील श्री जिजाऊ प्रतिष्ठान या शिवरायांच्या मातेच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्य करत असलेल्या संस्थेने आळंदीक्षेत्री महाराजांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याप्रसंगी धुंडा महाराजांना जे मानधन देण्यात आले ते त्यांनी जिजाऊ मातेच्या चरणी समर्पित केले.

आळंदी येथील महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान कडून महाराजांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. महाराजांची विद्वत्ता आणि वक्तृत्व यांची ख्याती ऐकून कांची कामकोटी पीठाचे परमाचार्य जगदगुरू चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे पंढरपूर येथे धुंडा महाराजांच्या भेटीस मठात आले.

मराठी साहित्य परिषद, आंध्रपदेशच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘पंचधारा’ त्रैमासिकाने धुंडा महाराजांवर स्वतंत्र विशेषांक प्रकाशित केला. याशिवाय ‘पंढरी संदेश’ या नियतकालिकानेही धुंडा महाराजांवर विशेषांक संपादित केले.

महाराजांचे फिरणे 1986 पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे बंद झाले, पण त्यांनी ज्ञानेश्वरीच्या चिंतनात, अभ्यासात मात्र खंड पडू दिला नाही. महाराजांनी रात्र रात्र जागून निरूपणात्मक ज्ञानेश्वरीचे लेखन त्याच काळात केले. महाराजांना पुढे, 1989 च्या अखेरीस बोलण्याचाही त्रास होऊ लागला. लेखन मंदावले. शरीर क्षीण होत गेले. तब्येत खालावली. महाराजांची प्राणज्योत पौष वद्य पंचमी, शके 1914 (23 जानेवारी 1992 रोजी) सायंकाळी मालवली. त्यांच्या धर्मपत्नी कृष्णामाँ यांचा त्यानंतर काही तासांनी मृत्यू झाला. ती दोघे जोडीनेच आयुष्यभर सफल प्रपंच आणि परमार्थ करून कैवल्याचा राणा पांडुरंगाकडे परमशांतीसाठी गेली. ती महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय आणि अपूर्व अशी घटना होय.

– डॉ. रवींद्र बेम्बरे

About Post Author

Previous articleआग्रह मराठी भाषेच्‍या शुद्धतेचा!
Next articleभुलाबाईचा उत्सव – वैदर्भीय लोकसंस्कृती
रवींद्र वैजनाथराव बेम्बरे हे देगलूरच्या वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील शेतकरी : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन करून पीएच डी पदवी मिळवली आहे. तसेच, ‘संत तुकारामांचा संत विषयक दृष्टीकोन : एक अभ्यास’ या विषयावर विद्यापीठ अनुदान आयोगाकडे लघु संशोधन प्रकल्प सादर केला आहे. त्यांचे प्रतिष्ठान, पंचधारा, अनुबंध, साहित्य, माझी मराठी, विचारशलाका, अक्षरगाथा, सर्वधारा, तुकावाणी, बसवपथ, बसवमार्ग, रिंगण अशा विविध नियतकालिकांत लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन आघाडीच्या सर्व वर्तमानपत्रांतूनही प्रसिद्ध झाले आहे. त्यांची महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगना, गुजरात या तीन राज्यांमधील परिसंवाद, परिषदा, संमेलने, शिबिरे आणि कार्यशाळेत मराठी व कन्नड संत साहित्यावर व्याख्याने झाली आहेत.

31 COMMENTS

  1. अभिनंदन सर !

    अभिनंदन सर! लेख फार सुंदर, माहितीपूर्ण आणि नेमका झाला आहे. उत्तरोत्तर असेच लिहित रहा. आपणांस पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा!

  2. मनापासून मी आपले अभिनंदन करतो
    मी आपले मनापासून अभिनंदन करतो. लेख खूप सुंदर आहे सर. आपल्याला खूप खूप शुभेच्छा!

  3. अभिनंदन सर आपल्याला खूप खूप
    अभिनंदन सर! आपल्याला खूप खूप शुभेच्छा!

  4. खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण
    खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.

  5. संदीप दिनकर हातकर महागोंडवाडी ता.आजरा कोल्हापूर

    वारकरी संप्रदायातील अत्यंत
    वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्वाचे स्थान असणारे देगलूरकर घराणे व श्री गुरु धुंडामहाराज यांचे जीवन व कार्य सुंदर, माहितीपूर्ण आहे. खूप खूप आभार. श्रीचंद्रशेखर महाराजांच्या चरणांचा दास.

  6. डॉ . वैजनाथ सोपान अनमुलवाड, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ ,नांदेड.

    सदर लेख अतिशय अभ्यासपूर्ण व
    सदर लेख अतिशय अभ्यासपूर्ण व देगलूरकर (महाराज) घराण्याचे ऐतिहासिक तथा आध्यात्मिक चिंतन करणारा आहे. लेखकाचे मनापासून अभिनंदन!

  7. देगलूरकर घराण्यांचे वार करी
    देगलूरकर घराण्यांचे वारकरी संप्रदायात फार मोठे योगदान आहे.

  8. eaka vratast yaktimatvacha
    eaka vratast yaktimatvacha parichay apan maharashtrala karun dila. samadhan vatale.

  9. अप्रतीम लेख.महाराज म्हणजे
    अप्रतीम लेख. महाराज म्हणजे चालता-बोलत विद्यापीठ. त्यांच्याविषयी इतक भरभरुन लिहलंय लेखकाने आणि तेही अभ्यासपुर्ण .मन भरुन आलं. निःशब्द.

  10. लेख वाचल्यावर गग्रंथावर अतुट
    लेख वाचल्यावर ग्रंथावर अतुट श्रध्दा कळली.

  11. आदरणीय श्री धुंडामहाराजा बाबत
    आदरणीय श्री धुंडामहाराजा बाबत अभ्यासत्मक लेख लिहुन एका ज्ञान सुर्याबाबत आपण वैचारिक विवेचन केले ते खुपच छान महाराजांच्या बाबतीतील काही गोष्टी (अध्यात्मिक) पासुन आम्ही अनभिज्ञ होतो केवळ आपल्या मुळे त्या समजल्या खुप खुप धन्यवाद लेखक महाराजांचे मनापासुन अभिनंदन

  12. खुप सुंदर आदरणीय लेख
    खुप सुंदर आदरणीय लेख

  13. खुप छान माहिती फोटॊ पण …
    खुप छान माहिती फोटॊ पण असतील तर share करा

  14. वारकरीभूषण धुंडा महाराज…
    वारकरीभूषण धुंडा महाराज देगलूरकर हे महाराष्ट्रातील प्रगाढ ज्ञान असलेले कीर्तनकार व प्रवचनकार आहेत .आम्हा देगलूरकरांची ओळख महाराजांमुळे होते .मी चैतन्य महाराज देगलूरकराचा दास आहे

  15. आदरणीय धुंडा महाराज फार मोठे…
    आदरणीय धुंडा महाराज फार मोठे युगपुरुष होवून गेलेत

  16. अतिशय सुंदर व दुर्मिळ असे…
    अतिशय सुंदर व दुर्मिळ असे धुंडीराजाचे चरित्र वाचून आज मी धन्य झालो. या महान विभूतीस माझे कोटी कोटी नमन. चैतन्याचा जिव्हाळा धुंडीराज माझा . त्या कालावधीत माझा जन्म झाला असता तर या जीवाचे नक्कीच सोने झाले असते . अतिशय सुंदर असा लेख वाचून मला धन्यता वाटली .

  17. अतिशय दुर्मिळ व सुंदर असे…
    अतिशय दुर्मिळ व सुंदर असे संत चरित्र वाचून आज मी धन्य झालो . या महान विभूतीस कोटी कोटी नमन . अतिशय सुंदर असे संतचरित्र .

  18. लेख आवडला.पण धुंडामहाराजांची…
    लेख आवडला.पण धुंडामहाराजांची पुस्तके हल्ली दुर्मिळ झाली आहेत.ती कुठे मिळतील?
    मोबाईल ७५०६१०९१७६

  19. सर आपण या लेखातून धुंडा…
    सर आपण या लेखातून धुंडा महाराजा विषयी सर्व सामान्यांना माहिती नसणारी माहिती सांगितली सद्गुरू धुंडा महाराज यांचे ७५वि चा कार्यक्रमास पूर्वसुकृताने मी उपस्थित होतो ज्ञानेश्वरी वर त्यांचे प्रभुत्व होते.त्यांना विनम्र अभिवादन व आपले आभार.माऊली माऊली.??

  20. धुंडा महाराज आणि पांडुरंग…
    धुंडा महाराज आणि पांडुरंग शास्त्री यांचे पैठण येथे झालेले दर्शन याविषयी काही माहित असेल ते जरूर कळवा

  21. धुंडा महाराजांबद्दल आज वाचन…
    धुंडा महाराजांबद्दल आज वाचन झाल…नाव ऐकुन होतो. महाराज विभुति च होते यात संशय नाही.चंद्रशेखर महाराजांकडे बघीतल तर कल्पना येते की ज्याच फळ असं सुंदर तो वृक्ष किती सत्वमय असेल.?️?

  22. खुप दिवस धुंडा महाराज…
    खुप दिवस धुंडा महाराज यांच्या विषयी शोधत होतो. आज वाचायवेस मिळाले. धन्यवाद.

  23. अप्रतीम लेख सर. शतशः धन्यवाद…
    अप्रतीम लेख सर. शतशः धन्यवाद ?

  24. सुंदर माहिती आदरणीय धुंडा…
    सुंदर माहिती आदरणीय धुंडा महाराज यांचे पूर्ण चरित्र व महत्ता याचे आकलन झाले.
    आपल्या या उपक्रमाबद्दल हार्दिक आभार.

  25. पूज्य धुंडामहाराजामुळे आम्ही…
    पूज्य धुंडामहाराजामुळे आम्ही देगलुरचे आहोत हे सांगताना उर अभिमानाने भरून येतो.त्यांच्या अमृतवाणीतून ज्ञानेश्वरी ऐकणें म्हणजे जीवनातील परमोच्च आनंद प्राप्त करणें! ” देहाची साधनें कर्माची आहेत,आपल जीवन कर्मप्रधान आहे,ज्ञानाची सामुग्री म्हणजे बुध्दी,मन म्हटलं की भावना आली….. अशा विचारांच्या प्रवचनातून श्री धुंडा महाराज ज्ञानेश्वरीच मनोज्ञ दर्शन घडवितात…???

  26. अतिशय माहिपूर्ण लेखाद्वारे…
    अतिशय माहिपूर्ण लेखाद्वारे महाराजाच्यां घरण्याचा व जिवनाचा पूर्ण उलगडा झाला.धन्यवाद

  27. खरोखर या लेखाने धुंडा…
    खरोखर या लेखाने धुंडा महाराजांवरील भाव अजुन अनेक पटींनी वाढला.मला महाराजांचे वाङ् मय वाचायला मिळाले तर माझे जीवन समृध्द होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here