ज्ञानरचनावादी शिक्षणप्रक्रिया व शिक्षक

0
187

शिक्षणप्रक्रिया शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील वयाचा अडसर दूर होऊन समानतेच्या पातळीवर सुरू होते. शिक्षक हा वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्याला वाव देणारा, त्याला अभ्यासाच्या संधी देणारा, अभ्यासक्रमाचे नियोजन करणारा, संशोधन वृत्ती विकसित करणारा, सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या माध्यमाचे उपयोजन करणारा इत्यादी प्रकारचा असतो. शिक्षकाचे शब्द व वर्तन – त्याचा स्पर्श, त्याच्या प्रतिक्रिया मैत्रीपूर्ण असतात. शिक्षक हा रचनावादात सुविधादाता, व्यवस्थापक, नियोजक, चिकित्सक, मूल्यमापक, मित्र, मार्गदर्शक, संशोधक आणि भविष्यवेत्ता अशा विविध भूमिका करणारा घटक असतो.

केंद्र सरकारने ‘ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती’चा उल्लेख 2005 च्या राष्ट्रीय शिक्षणक्रम आराखड्याद्वारे सर्वप्रथम केला. ‘ज्ञानरचनावादी पद्धती’चा वापर अध्ययन-अध्यापनात झाला पाहिजे हा आग्रह 2009 च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार धरला गेला आहे. तत्संबंधीचा २२ जून  2015 चा शासननिर्णय हा शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यावर मुलांच्या शिकण्याची जबाबदारी टाकतो. अशा तऱ्हेने, शिक्षणप्रक्रियेची उभारणी नव्याने करण्याचा प्रयत्न सरकार व शिक्षणतज्ज्ञांकडून केला जात आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष प्रा. यशपाल यांनी नव्या बदलाचे स्वरूप स्पष्ट करताना पुढील मत व्यक्त केलेले आहे : “शिक्षण ही काही एखादी वस्तू नव्हे, की ती पोस्टाने अथवा शिक्षकांकरवी विद्यार्थ्यांपर्यंत पोचवता येईल! कल्पनाप्रचुर आणि सुदृढ शिक्षण हे नेहमी नव्याने निर्माण होत असते; ते बालकाच्या भौतिक व सांस्कृतिक भूमीत खोलवर रुजलेले असते. ते पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि संपूर्ण समाज यांच्याशी घडून येणाऱ्या परस्पर संपर्कातून फुलत जाते.” यशपाल यांनी शिक्षणप्रक्रिया ही शिक्षकांपुरती मर्यादित नसून तीमध्ये विविध घटकांचा समावेश आहे याकडे संबंधितांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे वर्तनवादी पद्धतीतील दोषांचे निराकरण करून आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेला आशयघन करून देणार्याा रचनावादी अध्ययन पद्धतीचा आग्रह शासकीय पातळीवर केला जाऊ लागला. ‘रचनावादी शिक्षणपद्धती’चा परिचय जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये करून देण्यात आला. त्यातील काही धडपड्या व नावीन्याची आस असणार्याा शिक्षकांनी व अधिकाऱ्यांनी त्यांच्या शाळांत रचनावादी पद्धतीने शिक्षणप्रक्रियेचा प्रयोग सुरू केला. त्यातील कुमठे, बीट, वाई (सातारा जिल्हा), ग्राममंगल (पालघर) येथील प्रयोग यशस्वी झाले. ते प्रयोग पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून शिक्षक त्या गावांना भेटी देऊ लागले आणि त्या आधारावर तो प्रयोग त्यांच्या त्यांच्या शाळांत कशा पद्धतीने राबवता येईल याचा विचार करून तशी अंमलबजावणी करू लागले.

ज्ञानरचनावादाची मांडणी करणारे अभ्यासक असे मानतात, की ‘ज्ञान हे व्यक्तिनिष्ठ असते आणि शिकणारा स्वतः त्याच्या ज्ञानाची रचना त्याच्या सभोवतालच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात करत असतो. प्रत्येकाचे सामाजिक व सांस्कृतिक वातावरण वेगवेगळे व भिन्न भिन्न स्वरूपाचे असल्यामुळे प्रत्येकाच्या ज्ञानाची रचना इतरांपेक्षा भिन्न असते,’ पियाजे (Piaget), वॅगॉटस्की (Vyagotsky) व नोव्हाक (Novak) यांनी रचनावादाची मांडणी केली. त्यांनी ज्ञानरचनेच्या वेगवेगळ्या पद्धती सुचवलेल्या आहेत. रचनावाद तत्त्वज्ञानाच्या दोन शाखा प्रमुख मानल्या जातात.  पियाजेप्रणीत बुद्धिवादी रचनावाद (Radical Constructivism) आणि वॅगॉटस्की प्रणीत सामाजिक रचनावाद (Social Constructivism). पियाजे यांच्या मते, मुले ज्ञानरचना व्यक्तिगत पातळीवर करतात. त्यामुळे ज्ञानरचनेत बौद्धिकतेला महत्त्वपूर्ण स्थान असते. बौद्धिकतेसोबत सामाजिक संवाद आणि सामाजिक देवाणघेवाण या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. वॅगॉटस्की, नोव्हाक आणि पॉन्सर हे तिघे वर्गातील संवाद, आदानप्रदान, संभाषण इत्यादी घटक ज्ञानरचनेस प्रेरक आहेत असे मानतात. मुले त्यांचे समवयस्क, शिक्षक, पालक आणि समाज यांच्याकडून देखील अनेक गोष्टी शिकत असतात. ते मुलांच्या शिक्षणप्रक्रियेत शाळेसोबत शाळाबाह्य घटकांचा देखील विचार केला पाहिजे यावर भर देतात. ज्ञानरचनावाद पारंपरिक वर्तनवादी शिक्षणपद्धत अगदी वेगळ्या पद्धतीने फुलवण्याचा प्रयत्न करतो.

रमेश पानसे यांनी रचनावादी शिक्षणपद्धतीची पायाभूत व मूलभूत अशी दोन तत्त्वे सांगितलेली आहेत. एक- विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करतो म्हणजे स्वतःचे स्वतः शिकत असतो आणि दुसरे तत्त्व म्हणजे कृतीच्या माध्यमातून ते मूल (विद्यार्थी) अधिक चांगले शिकते. ते रचनावादाची मांडणी अशी करतात, की ‘कृतिशील स्वयंशिक्षण म्हणजे रचनावादी शिक्षण होय’ किंवा ‘विद्यार्थ्याने स्वतः हातांनी कृती करून पाहत शिकणे, हालचाल करत शिकणे, स्वतःच शिकणे म्हणजे रचनावाद होय’. ज्ञानरचनावादात शिकण्याला प्राधान्य आहे. मूल हे शिकण्याचा केंद्रबिंदू आहे; शिक्षक नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. मुले स्वतः स्वतःच्या ज्ञानाची रचना करतात हे गृहीतक मान्य केल्यानंतर मुलांना ज्ञानाची रचना करण्यास अधिक संधी देणे हे शिक्षणपद्धतीचे ध्येय बनते. ते ध्येय साध्य करण्यासाठी पारंपरिक शिक्षणपद्धतीतील शिक्षकांची भूमिका देखील बदलावी लागते.

शिक्षक हा पारंपरिक शिक्षण पद्धतीत शिक्षण प्रक्रियेचा कर्ता-करविता होता. तो ज्ञानदान करण्याच्या प्रक्रियेतील मक्तेदार घटक होता. शिक्षकांनी बोलावे व विद्यार्थ्यांनी ऐकावे आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे करावे. शिक्षक तो मुलांचा उद्धारकर्ता आहे या भूमिकेतून वावरायचा. ती एकांगी भूमिका मुलांना Passive Learner बनवत असे. म्हणून रचनावाद शिक्षकाची भूमिका बदलण्यावर भर देतो. रचनावादात शिक्षक हा शिक्षणप्रक्रियेचा केंद्रबिंदू न राहता सुविधादाता (Facillitator) बनतो. त्या पद्धतीत शिक्षक मुलांना शिस्तीत जखडून ठेवत नाही, तर मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. मुलांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करतो, शिक्षकाचे काम प्रत्येक मुलाला नवनवी आव्हाने स्वीकारण्यास लावणे, त्यांच्या कल्पनाशक्तीची मांडणी करण्यास लावणे आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्याची संधी उपलब्ध करून देऊन अनुभवाचा अवकाश विस्तारण्यास साहाय्य करणे हे आहे. रचनावादात, विद्यार्थ्याला जेथे अडचणी येतील तेथे शिक्षक मदत करतो; त्याला प्रश्नाकडे वा घटनेकडे बघण्याचे विविध आयाम, पैलू समजावून देतो. अभ्यासघटकांचे नियोजन सर्व विद्यार्थ्यांना समजेल आणि उपलब्ध असलेल्या वेळेत अभ्यास पूर्ण होईल याकरता काटेकोर करतो. विद्यार्थ्याच्या पुनर्भरणाच्या पायऱ्या पारदर्शक व वस्तुनिष्ठ मूल्यमापनाच्या माध्यमातून निश्चित करतो. शिस्तीचा बडेजाव न मिरवता विद्यार्थ्याला त्याच्या बलस्थानांची जाणीव करून देतो. रचनावादी अध्ययन पद्धतीत शिक्षकाला नावीन्याचा ध्यास धरणे गरजेचे असते. रचनावादी शैक्षणिक प्रक्रियेत नवनवीन तंत्रे व साधने वापरली जातात. ती कल्पक पद्धतीने वापरण्यासाठी शिक्षकामध्ये नाविन्याची ओढ असणे गरजेचे असते. ज्ञान हे सतत बदलत असते. शिक्षकाने बदलत्या ज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी संशोधनात राहणे गरजेचे असते. शिक्षकाने भविष्यकालीन गरजा व आव्हाने पेलण्याची पूर्वतयारी म्हणून संशोधन करणे आवश्यक मानले जाते. शिक्षक माहितीचे उपयोजन करून शिक्षण प्रत्यक्ष जगण्याशी जोडण्यासाठी प्रयोग करतो वा विद्यार्थ्याकडून उपक्रम करवून घेतो.

ज्ञानरचनावादी अध्ययन पद्धत शैक्षणिक पर्यावरणाला महत्त्वाचे स्थान देते. शैक्षणिक पर्यावरणात शाळेचे वातावरण, वर्गरचना, विद्यार्थी-विद्यार्थी संबंध, अभ्यासक्रम, पालक आणि समाज इत्यादी घटकांचा समावेश होतो. रचनावाद शैक्षणिक प्रक्रिया शाळेतील भौतिक सुखसुविधांवर अतिरेकी भर, रंगरंगोटी, भपकेबाजपणा, जाहिरातबाजी इत्यादींना टाळून सहजसुंदर व मुलांसाठी आल्हाददायक कशी करता येईल यावर भर देतो. रचनावादाचा पाया प्रत्येक मुलाला समजून घेणे हा मानला जातो. प्रत्येक मुलाचे विचार, भावना, कल्पना यांचा विचार करून शैक्षणिक वातावरणाची उभारणी कशी करता येईल यावर रचनावादात विचार केला आहे. ज्ञानरचनावादी अध्ययन पद्धत शाळेच्या वातावरणात बंदिस्तपणा नको असे सुचवते. विद्यार्थ्याला शाळेत नवनवीन उपक्रम करण्यास संधी दिली गेली पाहिजे. शाळेने वर्गाबाहेरचे समाजजीवन अनुभवण्याची संधी देऊन निसर्गाची सफर घडवून मुलांचे अनुभवविश्व विस्तारण्यास हातभार लावणारे उपक्रम आखले पाहिजेत. शालेय प्रशासन-नियोजनात प्रत्येक मुलाच्या शक्तीचा वापर कल्पकतेने करून घेतला गेला पाहिजे अशीही अपेक्षा या शिक्षणपद्धतीत आहे. मूल व्यक्तीश: शोध घेऊन काहीतरी निर्माण करते, ते मी निर्माण केले असे सर्वांना सांगते. शाळेने निर्मितीचा तो आनंद मुलाला उपभोगू देण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शिस्तीच्या ओझ्याखाली मुलांची सर्जनशीलता, कल्पकता, नावीन्य दडपले जाता कामा नये. नंबर वा बक्षिस यांची लालूच वा भीती; तसेच, दहशतीच्या मार्गाने शिक्षणप्रक्रिया रेटण्याला रचनावाद नकार देतो. रचनावाद मुलांच्या अभ्यासू वृत्तीला स्वातंत्र्य देतो. परस्पर सहकार्याने शिकण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देतो आणि एकमेकांच्या विचारांचा सहभाग घेतो व आदर करतो. रचनावाद हा शिकण्यातील लोकशाही जपणारा विचार आहे, त्यात शिक्षक व शाळा हुकूमशाही स्वरूपाचे असणार नाहीत, तर त्यातील माध्यमे मुलांना लोकशाही मार्गाने पुढे घेऊन जाणारी आणि आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया राबवणारी असतील.

ज्ञानरचनावाद पारंपरिक वर्गखोल्यांतील आखीव-रेखीव बैठक व्यवस्था नाकारतो. त्या बैठक व्यवस्थेत सर्व विद्यार्थ्यांची तोंडे शिक्षकाकडे असतात. त्या पद्धतीत वर्गात बोलणारा एक असतो आणि ऐकणारे सर्व असतात. त्यामुळे बोलणाऱ्या व्यक्तीस (शिक्षक) सर्वांशी संवाद साधण्यात मर्यादा येतात. रचनावादी अध्ययनासाठी वर्गातील बाक वर्गाबाहेर काढून गोलाकार पद्धतीत वर्गातील बैठक रचना निर्माण केली जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधणे सहज शक्य होते. विद्यार्थ्यांचे विविध गट करून परस्परसंवादाची माध्यमे उपलब्ध करून देता येतात. रचनावादी अध्ययन पद्धतीत विद्यार्थी-विद्यार्थी संबंधाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. विद्यार्थी परस्पर संपर्क व संवाद यांतूनदेखील शिकत असतात. विद्यार्थ्यांमधील त्यांच्या त्यांच्यात संवाद आणि वैचारिक देवाणघेवाण सामाजिकता निर्माण करण्यास प्रोत्साहन देते. तसेच, विद्यार्थ्यांतील स्नेहबंध अनेक मूल्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थ्यांमध्ये भावनिक बंध निर्माण करण्यास प्रोत्साहन देतो. त्यामुळे शाळा व शिक्षक यांनी विद्यार्थी-विद्यार्थ्यांतील संबंध वृद्धिंगत कसा होईल यावर कटाक्षाने भर द्यावा. वर्गातील वर्गखोल्यांच्या भिंती व जमीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेने रंगवलेल्या असाव्यात. त्यावर विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, म्हणी, वाक्प्रचार, तक्ते, नकाशे, सुभाषिते, बोधकथा यांचा समावेश असावा. प्रत्येक वर्गासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्याची जबाबदारी शासनाने नियुक्त केलेल्या समिती, मंडळ व बोर्ड यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. शिक्षक व शाळा त्यांच्या मर्जीप्रमाणे अभ्यासक्रमाची आखणी करू शकत नाहीत. शिक्षकांचे मुख्य कर्तव्य शासनाने दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हे मानले जाते. क्रमिक पुस्तकांची रचना करताना रचनावादाचा आधार घेतला जाऊ लागला आहे. अभ्यासक्रमातील विविध घटकांचे अवलोकन सूक्ष्म करून शिक्षकाने प्रत्येक घटक प्रत्येक मुलापर्यंत कसा पोचवता येईल यासाठी नियोजन करणे, घटक शिकवल्यानंतर चाचण्या घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला कितपत आकलन झाले आहे याचा शोध घेणे आणि आकलनात कमी पडलेल्या विद्यार्थ्यांचे पुनर्भरण कसे करता येईल याच्या विचारातून मूलभूत कौशल्ये विकसित करता येऊ शकतात. त्यासाठी शिक्षकांमध्ये त्यांच्या त्यांच्यात चर्चा होणे गरजेचे असते.

शैक्षणिक पर्यावरणात पालकांची भूमिकादेखील महत्त्वाची मानली गेली आहे. शाळेने पालकांच्या संपर्कात सतत राहणे गरजेचे आहे; मुलांच्या प्रगतीबद्दल पालकांना कळवत राहणे आवश्यक आहे. शाळेत शिक्षक पालक संघ निर्माण केलेला असतो. त्यांच्या नियमित बैठका घेऊन शालेय उपक्रम व इतर बाबी यांबाबत पालकांशी चर्चा करून नियोजन केले पाहिजे. पालकांशी सल्लामसलत करणे, पालकांकडून सूचना मागवणे, पालकांना शाळेतील उपक्रमांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देणे इत्यादी गोष्टी शाळा व शिक्षक यांनी केल्यास शाळेविषयी पालकांच्या मनात भावनिक बंध व आत्मीयता विकसित होईल. तोच सकारात्मक विचार शिक्षक व पालक यांचे नाते वृद्धिंगत करण्यास हातभार लावेल. पालकांनीदेखील शाळेला नियमित भेटी देऊन त्यांच्या पाल्यांच्या प्रगतीविषयी माहिती जाणून घेतली पाहिजे. पालकांनी मुलांना शिस्त लावताना प्रेम आणि धाक यांचा समन्वय घातला पाहिजे. मुले फाजील लाडांमुळे बिघडण्याची शक्यता आहे; तसेच, मुलांचा आत्मविश्वास अतिधाकामुळे कमी होऊन न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. मुलांनी काय शिकावे हे पालकांकडून लादले जाते तेव्हा मुलाचा स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न थांबतो. पालकांचा अनाठायी आग्रह मुलांच्या भवितव्याबद्दल अनेक प्रश्न अनेकदा निर्माण करतो. पालक हा मुलांना संधी देणारा, नाविन्याला प्रोत्साहन देणारा असला पाहिजे. सामाजिक सुसंवाद हादेखील ज्ञानाच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक मानला जातो. प्रत्येक मूल विशिष्ट सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक व आर्थिक वातावरणात येत असते. डुवेसारखा मानसशास्त्रज्ञ मानतो, की ‘मुले सामाजिक व सांस्कृतिक वातावरणात वाढत असतात. मुले त्यांना मिळालेल्या ज्ञानाची रचना त्या वातावरणास अनुसरूनच करतात. त्यामुळे सर्व मुलांना सारख्या पद्धतीने शिकवता येणार नाही, कारण वर्ग म्हणजे एक चेहरा नसतो, वर्गातील प्रत्येक चेहरा वेगळा असतो. त्यासाठी रचनावादात मुलांनी, मुलांसाठी, मुलांकडून शिकण्याची सगळी प्रक्रिया घडली पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःच्या ज्ञानाची रचना केली पाहिजे. ती रचना करण्यास मदत व्हावी म्हणून शिक्षकांनी ज्ञानाचे उपयोजन करण्यास संधी दिली पाहिजे आणि ज्ञानाचा जगण्याशी संदर्भ जोडला पाहिजे.

– प्रा. महेंद्र पाटील,

(शिक्षण संक्रमण, एप्रिल 2018 वरून उद्धृत)

 

About Post Author

Previous articleसूर्यकांत कुलकर्णी यांची स्वप्नभूमी
Next articleधनगरवाडा – जखडलेल्या जगण्याचे आत्मकथन
प्रा. महेंद्र विठ्ठल पाटील हे शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालायाचे उपप्राचार्य आहेत. ते महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्रमुख आहेत. त्यांना पदवी स्तरावर अध्यापनाचा एकोणीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'साने गुरुजींच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा विश्लेषणात्मक अभ्यास व त्यांचे योगदान' विषयावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी मिळवली. यु.जी.सी अंतर्गत 'सानेगुरुजींच्या राजकीय विचारांचा विश्लेषणात्मक अभ्यास' या विषयावर लघुशोध प्रबंध सादर केला. खानदेश राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत त्यांच्या संशोधन निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांची आधुनिक राजकीय विश्लेषण, राजकीय समाजशास्त्र आणि महाराष्ट्र प्रशासन (संपादित) इत्यादी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संशोधन मासिकांमध्ये दहापेक्षा जास्त संशोधन प्रसिद्ध झाले आहेत. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषद सेमिनार व चर्चासत्रामध्ये पन्नासपेक्षा जास्त संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी विविध विषयावर विभिन्न महाविद्यालय आणि विविध संस्थांनी आयोजित कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9422233792