जीवनशैलीतील दूरदृष्टी

0
184

“भाषांतर म्हणजे जे आपल्या भाषेत नसतं, समाजात नसतं ते दुसरीकडून आणणं. तरच आपण त्यांच्यासारखे होतो,” भाषांतराविषयीचे असे चिंतन भवरलाल जैन यांनी साहित्य अकादमीच्या जैन हिल्स येथील भाषांतर कार्यशाळेत मांडले. भवरलाल एक कष्टाळू, निष्ठावंत शेतकरी, पण त्यांनी साहित्य व सामाजिक क्षेत्रात केलेले काम अजोड आहे…

साहित्य अकादमीचे भाषांतराचे वर्कशॉप जैन हिल्स येथे घेतले होते. मराठीतून हिंदीत-कोकणीत-गुजराथीत, गुजराथीतून राजस्थानीत, राजस्थानीतून हिंदीत वगैरे भाषांतरे करणारे चाळीसेक भाषांतरकार लेखक आमंत्रित होते. त्या कार्यशाळेच्या उद्घाटनाला आमंत्रित म्हणून भवरलाल जैन अध्यक्षस्थानी होते. ते त्यावेळी भाषांतरावर इतके चांगले बोलले, की त्यांनी किती वाचले असेल याची कल्पना सर्वांना आली. ते त्यांच्या स्वत:च्या क्षेत्राबद्दल तर उत्कृष्ट बोलले. मला त्यांचे एक वाक्य आठवते, भाषांतर म्हणजे काय ह्या विषयी ते खरे चिंतन वाटले. ते म्हणाले, की “भाषांतर म्हणजे जे आपल्या भाषेत नसतं, समाजात नसतं ते दुसरीकडून आणणं. तरच आपण त्यांच्यासारखे होतो.” मला ते अतिशय आवडले. आपण भाषांतरात नेमके हेच करत असतो. आपल्याकडे नाही ते आणायचे. जे आपल्यात आहे, ते आणण्यात काही अर्थ नाही. म्हणून इंग्रजीत समजा, शेक्सपीअरसारखा एवढा मोठा नाटककार आपल्याकडे नाही, तो नेमका मराठीत आणणे. त्याप्रमाणे भाषांतरमीमांसेत एक मोठा सिद्धांत आहे : तुमच्या भाषेत जे नाही आणि दुसरीकडे जे काही वाचले ते शब्द असो, वाक्य असो, एखादी प्रतिमा असो, एखादा फॉर्म असो – ते सर्व आयात करणे हे एक महत्त्वाचे काम असते.

जळगावच्या विद्यापीठामध्ये भवरलाल जैन यांनी गांधी अध्यासन केंद्र सुरू केले होते. त्याबद्दल बोलणे चालले होते. ते काम समाधानकारक वाटत नव्हते. मी भाषाशास्त्रज्ञ म्हणून मराठीला अभिजात भाषा अशी मान्यता मिळवून देण्याच्या सरकारी कमिटीचा एक सदस्य होतो. तर मी असे सुचवले, की जिला जैन महाराष्ट्रीही म्हणतात ती प्राकृत भाषा ही मराठीची जननी आहे. महाराष्ट्रात मराठीच्या खालोखाल महाराष्ट्री प्राकृत शिकवली गेली पाहिजे (तर आपण जळगावात प्राकृत विद्यापीठ का काढू नये? आणि) मुख्य म्हणजे या प्राकृत भाषेत, विशेषतः इसवी सनाच्या आधीपासून तर दहाव्या शतकापर्यंत आणि नंतरही सगळे महाराष्ट्री प्राकृतचे मोठमोठे लेखक जैन धर्मीय होते. त्यांनी कोषवाङ्मय, व्याकरण, औषध शास्त्र, कथा-कादंबऱ्याकविता, अध्यात्म इतर बाकीच्या क्षेत्रांत खूप मोलाचे वाङ्मय लिहून ठेवले आहे. ते आपण दुर्दैवाने विसरलो संस्कृतचे प्रस्थ वाढल्यामुळे! प्राकृतही संस्कृत इतकीच समृद्ध भाषा आहे. ते प्राकृत विद्यापीठ येथे सुरू करू. तेव्हा ते उत्साहात म्हणाले, “असं करा नेमाडे, तुम्ही अशा प्रस्तावाची एक नोट तयार करून मला द्या.” प्राकृतचे विद्यापीठ का आवश्यक आहे त्यावर ती नोट त्यांच्याकडे कोठेतरी असेल. कारण आता एकदोन ठिकाणी काहीतरी पाठशाळेसारखी प्राकृतची विद्यालये चालतात. पूर्ण प्राकृत भाषा विषय शिकवणारी, संशोधन करणारी अशी युनिव्हर्सिटी नाही. सोलापूरच्या विद्यापीठात हल्ली एक विषय शिकवला जातो, पण अनिवार्य असा एक पेपर मराठी विभागामध्ये सर्व विद्यापीठांत सगळीकडे पाहिजे.

एकूण भवरलाल यांना पटले होते, की प्राकृत भाषेचे एक विद्यापीठ महाराष्ट्रात आवश्यक आहे. मी त्याचे मॉडेल्सही त्यांना काही दाखवले. सुरुवातीला पंधरा ते वीस लोक फक्त नेमावे लागतील. यूजी.सी.ची ग्रॅण्टही नक्की मिळेल. हळूहळू प्राकृतचे महत्त्व वाढवता येईल. ह्या मराठी प्राकृत विद्यापीठाची त्यांना मोठी आस्था होती. ते त्यांच्या बरोबर गेले! सोलापूरच्या एका प्राकृतच्या विद्वान शास्त्रींशी भवरलाल यांची काही चर्चाही झाल्याचे आठवते, साहित्य अकादमीतर्फे आम्ही त्यांना पुरस्कारही दिला आहे असे एक मोठे प्रोजेक्ट त्यावेळी ठरले होते!

(भालचंद्र नेमाडे यांच्या ‘जीवनशैलीतील दूरदृष्टी’ या लेखामधून, कृषितीर्थ, फेब्रुवारी 2022)

————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here