जागतिक कीर्तीचे गणितज्ञ (कै) श्रीराम अभ्यंकर (World Renowned Mathematician (Late) Shriram Abhyankar)

1
158

 

जागतिक कीर्तीचे गणितज्ञ प्रकांड पंडित (कै) डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे चरित्र जाणले की गणितज्ञ हे जन्माला यावे लागतात, घडवले जात नाहीतहे विधान पटते. ते विधान जगविख्यात फ्रेंच शास्त्रज्ञ हेन्री पोंकारे यांचे आहे. श्रीराम अभ्यंकर यांच्या घराण्यासच सरस्वतीचा वरदहस्त पूर्वापार लाभलेला आहे. अभ्यंकर यांचे पूर्वज हे कोकण प्रांतातील रत्नागिरी जिल्ह्यामधील कुर्धे गावचे. त्या घराण्याचे मूळ पुरुष नारायण विठ्ठल अभ्यंकर. ते पहिल्या बाजीराव पेशव्यांबरोबर देशावर गेले आणि नंतर त्याच भागात, कान्हूर पठार (तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर) येथे स्थायिक झाले. त्यांचा व्यवसाय सावकारी, पौरोहित्य व भिक्षुकी हा होता. श्रीराम यांचे आजोबा केशव मोरेश्वर हेदेखील जन्मापासून (1855) पहिली एकोणीस वर्षे कान्हूर पठार येथेच वास्तव्यास होते. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी मध्यप्रदेशात देवास येथे स्थलांतर केले. ते त्यांच्या मामांचे गाव.

केशव मोरेश्वर हे स्वत: विद्योपासक होते. त्यांनी देवासला घराच्या ओट्यावर शाळा सुरू केली. ते त्या शाळेत मराठी, गणित, इंग्रजी भाषा, धार्मिक-आध्यात्मिक-ऐतिहासिक असे बहुपदरी शिक्षण मुलांना देत असत. केशव मोरेश्वर यांचा जम देवासला बसू लागल्यावर त्यांनी स्वत:चे घर बांधले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील व तीन भाऊ कान्हूर पठाराहून देवासला आले व अवघे अभ्यंकर कुटुंब महाराष्ट्रातून हलले ! केशव मोरेश्वर यांनी तीस वर्षे शाळा चालवली. केशव व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना दामोदर, विष्णू आणि शंकर ही तीन मुले झाली. तिघेही पाठशाळेत शिकली. पैकी शंकर अभ्यंकर यांच्या पोटी श्रीराम यांचा जन्म झाला. शंकर हे स्वत: बुद्धिमान. ते देवास येथून मॅट्रिक झाले. त्यांनी इंदूर येथून उत्तम गुणांसह बी एससी (गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र) पदवी प्राप्त केली. नागपूर विद्यापीठातून गणित विषयात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळवून एम एससी पदवी मिळवली. शंकर केशव यांचा विवाह बऱ्हाणपूर येथील उमा गोविंद ताम्हनकर यांच्याशी 1926 साली झाला. शंकर यांनी गणिताचे व्याख्याते म्हणून उज्जैन येथे महाविद्यालयात नोकरी स्वीकारली. शंकर व उमा अभ्यंकर यांना दोन मुली आणि पाच मुलगे अशी सात अपत्ये झाली. त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या मुलाचे नाव श्रीराम; जन्म 22 जुलै 1930. जन्मगाव उज्जैन. ते मध्यप्रदेशातील ऐतिहासिक तीर्थक्षेत्र. भारतीय ज्येष्ठ गणिती भास्कराचार्य ज्या ठिकाणच्या जगप्रसिद्ध वेधशाळेचे प्रमुख होते अशा नामांकित ग्रामभूमीत जगद्‌विख्यात गणिती श्रीराम अभ्यंकर यांचा जन्म होणे ही घटना उल्लेखनीयच म्हणावी लागेल ! श्रीरामचे वय दोन वर्षे असताना त्याच्या वडिलांची शंकर अभ्यंकर यांची उज्जैन महाविद्यालयातून ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये बदली झाली आणि अभ्यंकर कुटुंब ग्वाल्हेरला राहू लागले.

श्रीराम यांची असाधारण बुद्धिमत्ता त्यांच्या बालवयापासूनच सर्वांच्या लक्षात येऊ लागली होती. श्रीराम यांनी शाळेत रीतसर प्रवेश घेण्यापूर्वीच, ते मोठ्या बहिणीचे बघून लिहू लागले. घरी त्यांच्यावर वडिलांच्या तालमीत संस्कृत, गणित विषयांचे ज्ञानग्रहण आणि संस्कार होऊ लागले. वयाच्या दहाव्या वर्षीच वडिलांच्या शिकवणीखाली श्रीराम यांची भास्कराचार्यांच्या बीजगणित व भूमिती या विषयांतील पुस्तकांशी मैत्री झाली. त्या कुमारवयात श्रीराम यांचा स्वभाव एकलकोंडा होता. त्यांना समवयस्क मुलांच्या खोड्या वगैरे यात अजिबात रस नसे. त्याऐवजी ते सतत गणिताच्या पुस्तकातील सूत्रे, अवघड गणिते सोडवण्यात रमलेले असत. त्यांनी वडिलांनी लिहिलेले एलिमेंटरी जॉमेट्रीचे पुस्तक वयाच्या नवव्या वर्षीच समजून घेतले. श्रीराम यांनी वडिलांच्या कपाटातील उच्च गणिताची पुस्तके, आयझॅक न्यूटन, एडिसन, आईन्स्टाईन यांची जीवनचरित्रे, पुढील वर्गातील गणिताची अवघड सूत्रे आवडीने वाचून काढली होती. त्यांची गणितामधील तयारी शाळेत शिकत असतानाच, महाविद्यालयातील गणिताचे आकलन करून घेण्यापर्यंत झाली होती. शाळकरी श्रीराम कित्येकदा उच्च गणितातील काही सूत्रांबद्दल त्यांच्या वडिलांना अनेक शंका विचारत असत. त्यांच्याबरोबर त्यावर चर्चा करत असत.

श्रीराम यांचा निर्णय शालेय शिक्षण झाल्यावर पुढे कोठे शिक्षण घ्यावे याबद्दल होत नव्हता. ग्वाल्हेर येथील महाविद्यालयातील रीतसर विद्यापीठीय अभ्यासक्रमातून त्यांच्या बुद्धीला फारसे नवीन आव्हानात्मक शिक्षण मिळणार नाही असे श्रीराम यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे, काही हितचिंतक स्नेहीप्राध्यापकांचे मत होते. त्यामुळे ज्येष्ठांच्या सल्ल्याने श्रीराम यांनी मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी प्रथमच इंदूर, ग्वाल्हेर आणि मध्यप्रदेश या त्यांच्या परिचित सुरक्षित परिघाबाहेर ते पाऊल टाकले होते ! त्यांना प्रवेश रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पदार्थविज्ञान विषयात बी एससी पदवी अभ्यासक्रमासाठी मिळाला होता.

बी एससी पदवी अभ्यासक्रम करत असताना, श्रीराम गणितावर चर्चा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फण्डामेंटल रिसर्च संस्थेतील प्राध्यापकांशी करत असत. ते नवनवीन शोधनिबंध जिज्ञासेने समजावून घेत. त्यांनी त्यांची गणित हीच मूळ आवड आहे हे तेथे ओळखले आणि त्यांनी पदार्थविज्ञानाऐवजी गणितावर लक्ष अधिक केंद्रित केले. टाटा इन्स्टिट्यूट संस्थेतील प्राध्यापकांनीच अभ्यंकर यांना अमेरिकेत जाऊन गणितात पुढील उच्च शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. श्रीराम यांनीही अमेरिकेतील नामांकित हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. त्यांचे वय होते एकवीस वर्षे. ते हार्वर्ड विद्यापीठात ऑक्टोबर 1951 मध्ये दाखल झाले होते. त्यांनी गणितात मास्टर्स पदवी 1952 मध्ये पूर्ण केली. तेथे ते आत्मविश्वासाने गणितातील किचकट विषयांवर सखोल चर्चा करत. त्यांचे एक प्राध्यापक डॉ. ऑस्कर झारिस्की हे होते. योगायोग असा, की अभ्यंकर यांनी हार्वर्डमध्ये पाऊल ठेवल्या दिवशी सर्वप्रथम त्यांचा ऑस्कर यांच्याशी परिचय झाला ! ऑस्कर यांनी श्रीरामची अफाट बुद्धिमत्ता ओळखली. श्रीराम यांनीही त्यांच्याकडे पीएच डी करण्याचे ठरवले. त्यांनी स्वत: प्रथम झारिस्की यांचे काही अवघड शोधनिबंध वाचून, समजून घेतले आणि त्या विषयांमध्ये गोडी वाटल्यामुळेच त्यांनी झारिस्की यांच्याकडे पीएच डी करण्याचे ठरवले होते. त्यांना संशोधनपर अध्ययनासाठी हार्वर्ड विद्यापीठाकडून शिष्यवृत्तीही त्यांच्या प्राध्यापकांच्या शिफारशीने मिळाली. त्यांची पीएच डी बैजिक भूमिती (Algebraic Geometry) या विषयात होती. ती त्यांना 1955 मध्ये मिळाली. बैजिक भूमिती हा विषय अतिशय अवघड व किचकट मानला जातो. श्रीराम यांनी मात्र तो सहजपणे हाताळला. त्यांच्या प्रबंधाच्या विषयाचे शीर्षक – Local uniformization on algebraic surfaces over modular ground fields असे होते. त्यांच्या त्या प्रबंधाचा गणितातील मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात बोलबाला झाला आणि त्या पाठोपाठ, श्रीराम अभ्यंकर यांनी मानाचे स्थान जागतिक पातळीवर श्रेष्ठ गणितज्ञांच्या पंक्तीत पटकावले ! त्यांनी हार्वर्डमध्ये पाच वर्षे काढली.

 

श्रीराम यांची पुढील कारकीर्द रोमहर्षक आहे. त्यांनी अमेरिकेतील नामांकित कोलंबिया विद्यापीठात दोन वर्षे रिसर्च इन्स्ट्रक्टर व प्रोफेसर, एक वर्ष कार्नेल विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर, एक वर्ष प्रिन्स्टन विद्यापीठात व्हिजिटिंग असिस्टंट प्रोफेसर आणि चार वर्षे जॉन हॉपकिन्स विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर या पदांवर कामे केली. दुसरीकडे, श्रीराम अमेरिकेतील पर्डू विद्यापीठात प्रोफेसरपदावर 1963 मध्ये रुजू झाले. पुढे, चार वर्षांनी, त्यांची नियुक्ती पर्डू विद्यापीठात मार्शल डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स या मानांकित सर्वोच्च पदावर झाली. अभ्यंकर यांनी ते पद 1967 ते 2012(मृत्यूपर्यंत) भूषवले. ते मधली काही वर्षे मात्र भारतात होते. त्यांचे गणितीय संशोधन व गणिताच्या विविध परिषदांना शोधनिबंध सादर करणेही चालू होते.

ते कोलंबिया विद्यापीठात शिकवत असताना, 1958 साली श्रीराम अभ्यंकर यांचा त्यांची विद्यार्थिनी असलेल्या इव्हॉन क्राफ्ट यांच्याशी प्रेमविवाह झाला. इव्हॉन यांचे नाव श्रीराम यांच्या आईने उषा असे  ठेवले होते. उषा यांनीही मराठी शिकून घेतले. त्या घरी मराठी भाषेत संभाषण करत, मराठी पुस्तके वाचत. अमेरिकेत राहूनही अभ्यंकर यांना मराठी भाषेविषयी आणि भारतीय संस्कृतीबद्दल नितांत आत्मीयता होती. विशेष म्हणजे त्यांचा भारतीय संस्कृती, योगसूत्रे, महाभारत, संतवाङ्मय, वेद, उपनिषद, मोरोपंत, वामन पंडित यांच्या लिखाणाचा अभ्यास दांडगा होता. ते त्यांच्या गणिताच्या गहन चर्चेतही योग्य ठिकाणी योग्य दाखले भारतीय संस्कृतीतील देत असत. त्यांचे मराठी पुस्तकांचे वाचनही उत्तम होते. श्रीराम व इव्हॉन अभ्यंकर या दांपत्याचा मुलगा हरी आणि मुलगी काशी यांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुण्यात मराठी माध्यमात झाले. त्यावेळी अभ्यंकर कुटुंब अमेरिका सोडून पुण्यात राहण्यास आले होते. त्यांनी पुण्यात भास्कराचार्य प्रतिष्ठानची स्थापना 1976 मध्ये केली. प्रतिष्ठानचा उद्देश होता गणितातील मूलभूत संशोधनाला चालना देणे ! परंतु ती कल्पना प्रत्यक्षात मनाजोगती आकारास येऊ शकली नाही. मात्र कालांतराने, त्या संस्थेत जागतिक गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना मार्गदर्शन करणे सुरू झाले; तसेच, संस्थेतर्फे गणितातील प्रगत विषयांवर व्याख्यानमाला, परिषदा आयोजित केल्या जातात.

अभ्यंकर हे पुणे विद्यापीठात गणित विभागाचे प्रमुख 19781985 या काळात होते. परंतु गणित-संशोधनात रमणाऱ्या अभ्यंकर यांच्या वृत्तीस त्या पदासोबत तेथे अपेक्षित असलेला विभागीय कार्यालयाच्या व्यवस्थापनाच्या जबाबदारीस आवश्यक असा द्यावा लागणारा वेळ, तेथील कार्यपद्धत मानवणारी नव्हती. ते पुनश्च पर्डू विद्यापीठाकडे वळले. त्यांनी पर्डू विद्यापीठात इंडस्ट्रियल इंजिनीयरिंग व कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रोफेसर म्हणूनही दोन वर्षे (198788) काम केले. त्यांच्या कामाचे स्वरूप मूलभूत गणिताच्या संशोधनाविषयी, शोधनिबंधांविषयी चर्चासत्रे, परिषदा यांवर अधिक भर आणि त्या ओघाने निवडक विद्यार्थ्यांसाठी अध्यापन, मार्गदर्शन या प्रकारचे होते. अभ्यंकर यांना विद्यापीठ अभ्यासक्रमाच्या विशिष्ट चाकोरीत विद्यार्थ्यांच्या वर्गावर शिकवणे, परीक्षा घेणे, पेपर्स तपासणे अशी कामे फारशी पसंत नव्हती. मात्र त्यांच्या अंगी गणिताची आवड असलेल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्याचे कसब होते. त्यामुळे ते विद्यार्थीप्रिय होते. त्यांनी गणिताची आवड असलेल्या, त्यात गती असणाऱ्या भारतातील काही बुद्धिमान विद्यार्थ्यांना अमेरिकेतून गणितामध्ये उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले व मदतही केली आहे. त्यांचे विद्यार्थी पुढे काही विद्यापीठांत, कॉर्पोरेट क्षेत्रात चमकले.

हरीने मोठेपणी अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून ऑपरेशन्स मॅनेजमेंटमध्ये पीएच डी केले आणि मुलगी काशी हिने अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातून गणित विषयात पीएच डी केले आहे. इव्हॉन या प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याचे उत्तम उदाहरण ठरल्या. त्यांनी त्यांच्या संसारात समर्पित व प्रेमळ वृत्ती दाखवून दिली. तसा दाखला अभ्यंकर कुटुंबीयांची मित्रमंडळी देतात. इव्हॉन आणि श्रीराम अभ्यंकर यांनी मुला-नातवंडांसह अमेरिकेत चौपन्न वर्षे सुखाने संसार केला.

श्रीराम यांचे एकंदर अडीचशेहून अधिक शोधनिबंध जागतिक पातळीवरील नावाजलेल्या नियतकालिकांमधून प्रकाशित झाले. त्यांच्या शोधनिबंधांचे एकत्रित असे बारा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. जगभरातून त्यांनी गणितविषयक साडेपाचशेपेक्षा अधिक व्याख्याने दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणतीस विद्यार्थ्यांनी पीएच डी पदवी मिळवली. त्यांना इंडियन नॅशनल सायन्स, इंडियन ॲकडमी ऑफ सायन्स व अनेक देशांतील विद्यापीठांतून रिसर्च फेलो पदवी, मेडल ऑफ ऑनर (स्पेन युनिव्हर्सिटी), ऑनररी डॉक्टरेट (युनिव्हर्सिटी ऑफ ॲन्जर्स, फ्रान्स) मेडल ऑफ ऑनर (ब्राझील युनिव्हर्सिटी), इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (मुंबई) कडून विज्ञानसंस्था-रत्न पुरस्कार व इन्स्टिट्यूटच्या सन्माननीय यादीत समावेश असे अनेक मान मिळाले आहेत. त्यांच्या साठाव्या, सत्तराव्या, पंच्याहत्तराव्या व ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त पर्डू विद्यापीठाने; त्याशिवाय पुणे विद्यापीठ व भास्कराचार्य प्रतिष्ठान(पुणे) यांनी संयुक्त रीतीने त्या त्या वेळी जागतिक गणित परिषदांचे आयोजन केले. अभ्यंकर यांना त्यांच्या मूलभूत गणितामधील संशोधनाने नावलौकिक मिळाला. त्याच बरोबर त्यांनी संगणकशास्त्र, इंजिनीयरिंग, जनुकीय/अनुवंशिकता शास्त्र आणि इतर विज्ञान शाखांमध्येही भरीव व मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी केलेले संशोधन पुढील अनेक पिढ्यांतील गणितींना मार्गदर्शक ठरेल.

श्रीराम यांची बुद्धी अखेरपर्यंत तल्लख होती. ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गणित करत राहिले, गणित शिकवत राहिले. ते गणित हाच माझा धर्म आहे असे सांगत. त्यांनी पर्डू विद्यापीठाच्या परिसराजवळच असलेल्या त्यांच्या राहत्या घरी अभ्यासिकेत गणित विषयावर काही संशोधनपर लेखन करत असताना अखेरचा श्वास 2 नोव्हेंबर 2012 रोजी घेतला.

विनता कुलकर्णी (शिकागो) vinata@gmail.com

विनता कुलकर्णी या प्राध्यापक. त्या मास्टर्स आणि डॉक्टरल पदवीअभ्यासक्रमासाठी सांख्यिकी आणि संगणक विज्ञान शिकवतात. त्या भारत व उत्तर अमेरिकेतील काही प्रकाशनांमधून लिहितात. त्या बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या बीएमएम वृत्त’ (उत्तर अमेरिका) मासिकाच्या संपादक आहेत. त्यांना मराठी आणि इंग्रजी साहित्याची आवड आहे. त्यांची मराठीमध्येक्षितिज पश्चिमेचे’, पुस्तकचोर (अनुवादित) आणि ठसे आठवांचेही तीन पुस्तके ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाली आहेत. तर इतर त्यांनी लिहिलेली चार पुस्तके – तीन शैक्षणिकआणि एक युनिव्हर्सिटी डिग्री लेव्हल फॉर क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स अशी आहेत. विनता कुलकर्णी यांना समाजसेवेची आवड आहे.

————————————————————————————————–——————————————————————-

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here