चोविसावे साहित्य संमेलन (Twenty fourth Marathi Literary Meet – 1939)

 

            नगर येथे 1939 साली भरलेल्या चोविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महामहोपाध्याय पद्मभूषण दत्तो वामन पोतदार हे होते. ते इतिहाससंशोधक होते. ते पट्टीचे वक्ते होते. पण दत्तो वामन यांच्या नावावर म्हणावी, तेवढी ग्रंथसंपदा मात्र जमा झालेली नव्हती, तरीही ते अध्यक्ष झाले.

दत्तो वामन म्हणजे महाराष्ट्राचा चालताबोलता इतिहास ! दत्तो वामन हे मोठे सार्वजनिक कार्यकर्ते होते. त्यांचा महाराष्ट्रातील ऐंशी सार्वजनिक संस्थांशी कार्यकर्ता म्हणून विविध प्रकारे संबंध होता. म्हणूनच त्यांना महाराष्ट्र पुरुषअसे संबोधले जाई. पोतदार यांनी जन्मभर ज्ञानयज्ञ केला. त्यामुळे त्यांना जन्मशिक्षक असेही म्हणत. ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे 1915 साली आजीव सदस्य झाले. ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे 1933 ते 1936 ह्या काळात संपादक होते. त्यांचे इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत आणि मराठी या पाच भाषांवर प्रभुत्व होते. ते त्या पाचही भाषांतून भाषणे करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत. पोतदार यांना अत्यंत चाणाक्ष, तेजस्वी व्यक्तिमत्त्व लाभले होते; त्याच बरोबर ते मिश्किलही होते.

दत्तो वामन पोतदार यांचा जन्म 05 ऑगस्ट 1890 रोजी महाडजवळील बिरवाडी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले. ते सुरुवातीला, नूतन मराठी शाळेत शिक्षक, नंतर न्यू पूना कॉलेज आणि एसपी कॉलेज येथे प्राध्यापक होते. ते इतिहासाचे आणि मराठी भाषेचे प्राध्यापक होते. त्यांनी सतत पन्नास वर्षे इतिहास संशोधन मंडळात काम केले. ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठात कुलगुरू (1948 साली) आणि पुणे विद्यापीठात काही काळ कुलगुरू (1961 साली) होते. त्यांनी निरनिराळ्या निमित्तांनी भारतात, तसेच परदेशांतही प्रवास केला होता.

मराठी गद्याचा इंग्रजी अवतारहे पुस्तक त्यांच्या ग्रंथकर्तृत्वाचे प्रतीक म्हणून मानावे लागेल. त्यांनी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे सारे लक्ष संशोधनात घालवले. त्यांनी इतिहास संशोधनावर विविध नियतकालिकांतून पाचशेच्यावर लेख लिहिले. त्यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी शिवछत्रपतींचे चरित्र लिहण्यास घेतले होते, यावरून त्यांची विलक्षण ताकद आणि ज्ञानलालसा यांची कल्पना येते. मात्र त्यांच्या हातून शिवचरित्र लिहिले गेले नाही. त्यांचे शिवचरित्र हा थट्टेचा विषय ठरला, तो तशाच पद्धतीने विधानसभेतही चर्चिला गेला. त्यांनी 1. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार, 2. शिवचरित्राचे पैलू, 3. विविध दर्शन, 4. लोकमान्यांचे सांगाती, 5. मी युरोपात काय पाहिले अशी ग्रंथ निर्मिती केली. त्यांनी दिलेली काही व्याख्याने श्रोतेहो ह्या पुस्तकात संग्रहीत आहेत.

दत्तो वामन यांची अध्यक्षीय निवड हेसुद्धा गंमतीदार प्रकरण आहे. वास्तविक चोविसाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी रियासतकार गो.स. सरदेसाई आणि दत्तो वामन पोतदार यांच्यात निवडणूक झाली. त्यात रियासतकार जिंकले, पण पोतदार यांच्या समर्थकांनी सरदेसाई यांच्या रियासतीबद्दल अनुदार उद्गार काढले. त्यामुळे रियासतकार नाराज झाले. त्यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला. सरदेसाई यांच्या नकारामुळे पोतदार अध्यक्ष झाले ! मात्र त्याची बोच पोतदार यांना सतत राहिली. म्हणून त्यांनी म्हटले की “केवळ नड म्हणून मी अध्यक्ष झालो. आता मला माझ्या इच्छेप्रमाणे अध्यक्ष होऊ दे.” त्याप्रमाणे घटना बदलली गेली आणि 1946 साली बेळगावला भरलेल्या तिसाव्या साहित्य संमेलनाचे ते पुन्हा अध्यक्ष झाले. पण आगगाडीने दगा दिला आणि ते बेळगाव मुक्कामी काही पोचू शकले नाहीत आणि ग. त्र्यं. माडखोलकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे अचानकपणे आली. दत्तो वामन अखिल भारतीय इतिहास परिषदेचे दोन वेळेला अध्यक्ष झाले.

          त्यांनी केलेल्या अव्याहत विद्याव्यासंगामुळे त्यांना काही पदव्या प्राप्त झाल्या : केंद्र शासनाने महामहोपाध्यायही पदवी दिली (1948). हिंदी साहित्य संमेलनाने त्यांना साहित्यवाचस्पतिही उपाधी प्रदान केली. वाराणसेय विश्वविद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांनी डी लिट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. केंद्र शासनाने ठरवलेल्या पंडितांपैकी ते एक होते.

ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की “मराठीविषयी सर्वांची अंत:करणे बालपणापासून नितांत प्रेमवृत्तीने भरून-ओसंडून गेली पाहिजेत. असे जर करू तरच आपल्या राष्ट्राची काया पालटेल, मराठीचे दुर्दिन संपतील. मराठीचे बी वाढेल, ती आपल्याला हसवील, रिझवील, नाचवील, मराठीचा झेंडा सर्वत्र मिरवील.”

ते अविवाहित होते. त्यांचा मृत्यू पुणे येथे 6 ऑक्टोबर 1979 रोजी झाला.

वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

————————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here