चैत्र चैत्रांगण अन् चैत्रगौर…! (Chaitragaur)

0
73
-chaitra-chaitranagn

चैत्रगौर चैत्रांगण! चैत्र महिन्यात देव्हाऱ्यात पितळेच्या पाळण्यात चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची. नंतर घरातल्या सर्वांच्या सोयीनुसार चैत्रगौरीचे हळदी-कुंकू समारंभाचा उत्साह अजूनही आठवतो. माझ्यासारख्याच तुमच्याही आठवणी असतील! पेटीतील भरजरी साड्या काढून त्या साड्यांना घरीच इस्त्री केली जायची. अत्तरदाणी, गुलाबपाणी, कुंकवाचे करंडे घासून, पुसून लखलखीत केले जायचे. हळदी-कुंकवाच्या दोन दिवस आधी लाडू, करंज्या, चिरोटे व बेसनवड्या हे पदार्थ केले जात. समारंभाच्या आदल्या दिवशी मंडईतून कलिंगड, टरबूज, केळीचा फणा, द्राक्षाचे घड व कैरी हे सामान आणायचे. पिण्याच्या पाण्यात वाळा टाकला जायचा आणि घरात आनंद, उत्साहाला उधाणच यायचे! 

आणि मग हळदी-कुंकू व चैत्रगौरीच्या सजावटीचा दिवस उजाडायचा. माहेरवाशीण आत्या घरी आली, की हसत-खेळत जेवणे व्हायची! जेवण झाल्यावर लगेचच आरास करायला सुरुवात. जरीच्या साड्यांचे पडदे भिंतीला लावून झाले, की त्या पडद्यावर फुलांच्या माळा, आंब्याच्या, पानांच्या माळा कुशलतेने लावल्या जायच्या. मग लोखंडी पत्र्यांच्या ट्रंका एकाखाली एक ठेवून पाच पायऱ्या तयार केल्या जायच्या. त्या पायर्यांरवर गालिचा घालायचा. पहिल्या पायरीवर चैत्रगौरीचा फुलांनी सजवलेला पाळणा मध्यभागी ठेवून पाळण्यातील चैत्रगौरीला खणाची साडी नेसवली, की तिच्या गळ्यात मंगळसूत्र, पोहेहार व तन्मनी घातला, की गौरीचा थाट डोळे दिपवून जायचा. पहिल्या पायरीवर तिच्यासाठी छोटुल्या तांब्यात वाळ्याचे गार पाणी, छोट्या ताटलीत आंब्याची डाळ, खोबऱ्याची खिरापत, वाटीत केशरी पन्हे व हरभऱ्याची ओटी ठेवली, की दुसऱ्या पायरीपासून सजावटीला सुरुवात. कलिंगड, टरबुजाची कमळे तांब्यावर ठेवायची. द्राक्षांचे घड लोंबते ठेवायचे. छोट्या ताटांमध्ये लाडूचा कळस, बेसनवड्यांचे स्वस्तिक व चिरोट्यांचा षटकोन रचूना झाले, की घरातील छोट्या-छोट्या शोभिवंत वस्तू कौशल्याने मांडायच्या…! 

-think-sanskik-nondi

आणि मग शेवटच्या पायरीवर मोठ्या ताटावर रेखाटलेले चैत्रांगण ठेवायचे. माझी आजी मोठ्या ताटात गुळाच्या पाकात चैत्रांगण काढायची. तो पाक वाळायच्या आत त्या कलाकृतीवर खसखस पेरायची या चैत्रांगणाच्या मध्यभागी गणपती बाप्पा विराजमान असायचा. मग त्याच्या बाजूने सूर्य, चंद्र, नक्षत्रे, गाय-वासरू, आम्रवृक्ष, कोकिळा, कळस, श्रीफळ, सुरारी, स्वस्तिक, कमळ, इंगर, नंदादीप आणि चैत्रगौर अतिशय कुशलतेने आजी रेखायची. हे खसखशीचे चैत्रांगण म्हणजे एक उत्कृष्ट कलाकृतीच असायची. हल्ली हे बघायलासुद्धा मिळणार नाही. पायर्यां च्या दोन्ही बाजूला फुलांच्या कुंड्या ठेवल्या, की एक वेगळीच शोभा यायची. अशा पद्धतीने चैत्रगौरीची आरास व खसखशीचे चैत्रांगण सजायचे. हे चैत्रांगण म्हणजे आपल्या संस्कृतीचा मनोज्ञ आविष्कारच…! 

हे ही लेख वाचा –
आली चैत्रमासी गौराई
रांगोळीत रांगोळी – चैत्रांगण (Chaitrangan)

हळदी-कुंकवाला बायका, मुली आल्या, की त्यांनी कुंकू लावून खसचे अत्तर हाताला लावायचे. गुलाबदाणीतून गुलाबपाण्याचा शिडकावा करायचा. सुरेख मोगऱ्याचे गजरे द्यायचे. साखर खोबऱ्याची खिरापत, पळसाच्या पानाच्या द्रोणातून खमंग आंब्याची डाळ व केशरी पन्हे दिले, की प्रत्येकीची हरभऱ्यांनी ओटी भरायची, हे सत्र अगदी रात्री दहा वाजेपर्यंत चालायचे. चैत्र महिन्यात आमच्या वाड्यातील प्रत्येक घरांत चैत्रगौर अशीच सजायची. या चैत्रगौरीच्या निमित्ताने बायका, मैत्रिणी व नातेवाईक स्त्रिया संघटित होत असत. चैत्रगौर व चैत्रांगण यामुळे प्रत्येकीच्या मूलभूत गुणांना प्रोत्साहन मिळत असे. चैत्रगौरीची देखणी सजावट, फुलांची आकर्षक रचना, अचूक रंगसंगती, दीपकाम, भरतकाम केलेले रुमाल, पाककौशल्य रांगोळ्यांचे विविध प्रकार यामुळेच आपले कलाकौशल्य दाखवण्यासाठी उत्तम दिवस म्हणजे चैत्रगौरीचे हळदीकुंकू. 

आणि आज चैत्रगौरीचा हा थाटमाट पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येतो आहे. पण आता या विज्ञान, संगणक, मोबाईल व यंत्रयुगात अशा प्रकारची चैत्रगौर व चैत्रांगण रेखाटण्यास तरुण पिढीजवळ वेळच नाही. किंबहुना चैत्रगौर, चैत्रांगण हा विषयही हल्लीच्या मुलींना ठाऊक नसेल आणि माहित असेल तर यासाठी पाच-सहा दिवस तयारीसाठी वेळ देणे त्यांना कठीण वाटत असणार. या साऱ्या अडचणी लक्षात घेण्याइतकी -chaitranagnमागील पिढी, म्हणजे तुम्ही, मी सुज्ञ आहोतच. कालाय तस्मै नमः या धोरणानुसार नव्या-जुन्याचा समन्वय साधायला हवाच ना? पण चैत्र महिना सुरू झाला, की असे वाटते करून पहावा ना असा सुरेख चैत्रोत्सव! समजून घ्यावी त्यामागची उदात्त व संघटित भावना, चैत्रांगण काढण्यामागचा सखोल दृष्टीकोन, समजून घ्यावी उष्ण दिवसांतील सुयोग्य आहार प्रणाली कला कौशल्याचा देखणा आविष्कर, समजून घ्यावी निसर्गाची, ऋतूनुसार बदलणारी सृजनशीलता आणि समजून घ्यावी जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता व त्यामुळे मिळणारा आनंद व ऊर्जा! 

– मीना गोडखिंडी
(12 एप्रिल, ‘सकाळ’वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)

About Post Author