चंद्रपूरचा उपेक्षित राजमहाल (Historic Fort of Chandrapur)

 

चंद्रपूर शहर नागपूरपासून दीडशे किलोमीटरवर आहे. चंद्रपूर हे ऐतिहासिक व पौराणिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. चंद्रपूरचा किल्ला जमिनीवरील किल्ला म्हणून नागपूरविदर्भ प्रदेशात ओळखला जातो. त्या नगरीत पुराणांप्रमाणे सत् युगात कृतध्वजा सुनंद, त्रेता युगात चंद्रहास्य तर कलि युगात सत्यांग, पांडववंशीय उदयन यांनी; तर इतिहासकाळात चालुक्य आणि नागवंशीय राजांनी राज्य केले आहे. चंद्रपूरच्या महाकाली शक्तीचा प्राचीन काळापासून महिमा आहे. त्या महाकालीला ऐतिहासिक संदर्भदेखील आहे. त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असताना लोकपुरातून पुढे गेले, त्यांनी चिमूरजवळच्या चिमूरटेकड्य़ांतील एका टेकडीवर निवास केला. ते ठिकाण चंद्रपूरच्या ईशान्येस पन्नास मैलांवर आहे. ती जागा रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे सीताकुंडआहे. त्या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे.

 

चंद्रपूर नगर खांडक्या बल्लाळ बीरशाह यांनी पंधराव्या शतकामध्ये वसवले. गोंड घराण्याची राजधानी चंद्रपूरच्या आधी बल्लाळपूर ही होती. त्यांच्या पदरी असलेले वास्तुतज्ज्ञ तेला ठाकूर यांनी नव्या राजधानीची परीघआखणी व पायाभरणी केली. खांडक्या बल्लाळ बीरशाह यांनी किल्ल्याची मुहूर्तमेढ रोवली. परंतु किल्ल्याचे बांधकाम त्यांच्या नंतर आठ पिढ्यांपर्यंत, म्हणजे सतराव्या शतकापर्यंत चालू राहिले. खांडक्या बल्लाळ बीरशाह यांचा दत्तक मुलगा हिरशहा याने राजधानीच्या चार वेशी उभारल्या आणि हत्तीवर आरूढ सिंह हे राजचिन्ह ठरवून, ते प्रत्येक वेशीवर खोदण्याची व्यवस्था केली.
खांडक्या बल्लाळ बीरशाह यांचा कार्यकाळ सत्तावीस वर्षांचा (1470 ते 1497) होता. त्यामध्ये काही प्रमाणात तफावत आढळते. त्यांच्या अंगावर खांडक म्हणजेच कुष्ठ होते. म्हणून त्यांना खांडक्या या नावाने ओळखले जाई. त्यांच्या त्वचेवरील व्रण चंद्रपूरजवळच्या झरपट नदीमध्ये आंघोळ करत असताना, त्या पाण्यामुळे दूर झाले. ती गोष्ट त्यांची राणी हिराई यांना समजली. तेव्हा त्यांनी तेथे अंचलेश्वर मंदिर निर्माण केले. अंचलेश्वर मंदिराची निर्मिती होत होती, त्याच वेळी नदीच्या जवळ एक गुंफा सापडली. त्यामध्ये महाकाली देवीची मूर्ती आढळली. त्यामुळे राणी हिराई यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार (1704 – 1719)  केला. ते सध्याचे मंदिर आहे. देवळाला उंच मनोरा असून, गोल घुमट आहेत. तळघरात पाच फूट उंचीची तेजस्वी मूर्ती आहे. देवीसमोर चैत्र पौर्णिमेस यात्रा भरते. राणी हिराई जितकी युद्धकुशल, कर्तव्यदक्ष होती, तितकीच ती धार्मिकही होती. तेथील महाकाली मंदिर म्हणजे विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.
राजा बीरशाह (बिरसिंग) यांच्या हत्येनंतर गादीला वारस नव्हता, राणी हिराई यांनी दत्तक पुत्र घेतला आणि त्या स्वत: राज्यकारभार बघू लागल्या. राणी हिराई यांनी त्यांच्या वीर पतीची आठवण कायम राहवी म्हणून राजा बीरशाह यांची समाधी बांधली. तशी अतिशय सुंदर समाधी कदाचित विदर्भामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये नसावी. त्यातही ते स्मारक एकमेव – एका राणीने राजाची स्मृती जपण्यासाठी बांधलेले म्हणून असेल. त्या समाधीवर सुंदर, कलात्मक आणि रेखीव नक्षीकाम केलेले आहे. शिल्पे, कमानीवरील नक्षीकाम बघण्यासारखे आहे. कमानीवरील शिल्पांमध्ये गोंड स्त्रियांचे पारंपरिक नक्षीकाम व गोंड राजांचे राजचिन्ह (हत्तीवर आरूढ झालेला सिंह) दिसते.
राजा बीरशाह यांच्या स्मारकाशिवाय त्या ठिकाणी इतर सात समाधी स्मारके आहेत. राजा बीरशाह यांच्या स्मारकाच्या समोरील बाजूस असलेली विहीर आणि त्यावरील दालनसुद्धा प्रेक्षणीय आहे. विहिरीत उतरणाऱ्या पायऱ्यांची दुरवस्था काही प्रमाणात झाली आहे. किल्ल्याला चार ठिकाणी प्रवेशद्वारे आहेत – उत्तरेकडील बाजूस जटपुरा, दक्षिणेकडील बाजूस पठाणपुरा, पश्चिमेकडील बाजूस गोंड-मैदान किंवा विंबा आणि पूर्वेकडील बाजूस अंचलेश्वर किंवा महाकाली. प्रशस्त बुरुज दरवाज्याच्या दोन्ही बाजूंला तोफा ठेवण्यासाठी आहेत. पठाणपुरा दरवाजा हा प्रमुख दरवाजा होय. राजमहालाच्या तटबंदीबाहेरील बाजूस अंचलेश्वर महादेवाचे छोटे मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग जमिनीत जवळपास दोन फूट खाली आहे. दिवे लावण्यासाठी बाहेरील बाजूस वेगळ्या प्रकारची मांडणी आहे.
त्या किल्ल्याबद्दल महाराष्ट्रातील इतर भागात जास्त माहिती नाही, किंबहुना अनुभव असा आहे, की खुद्द चंद्रपूरमधील बऱ्याच लोकांना राजमहाल म्हणून विचारले तर ते माहीत नाही म्हणून सांगतात. परंतु बल्लाळ बीरशाहची समाधी आणि महाकाली देवीचे मंदिर कोठे आहे ते मात्र त्यांना माहीत असते.
– भाग्येश प्रकाश वनारसे 9923400694
bvanarse@gmail.com
(संदर्भ: गोंडवाना की महान वीरांगनाएंगोंडकालीन चंद्रपूर मराठी विश्वकोश)
———————————————————————————————-————————–

About Post Author

7 COMMENTS

  1. खूप छान माहिती…. मी विद्यार्थी दशेत अनेकदा गेलो .. सभोवती खडानखडा फिरलो .. अतिशय सुंदर ठिकाण आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्य़ातील बरेच लोक या किल्ल्या बाबत अनभिज्ञ आहेत हे खरे आहे

  2. खूप छान माहिती…. मी विद्यार्थी दशेत अनेकदा गेलो .. सभोवती खडानखडा फिरलो .. अतिशय सुंदर ठिकाण आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्य़ातील बरेच लोक या किल्ल्या बाबत अनभिज्ञ आहेत हे खरे आहेश्री राजूरकर लिखित चंद्रपूरचा इतिहास यामध्ये चंद्रपूर च्या इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती मिळते..मी अनेक ठिकाणी ह्या पुस्तकाचा शोध घेतला परंतु मला हे पुस्तक प्राप्त झाले नाही …

  3. खूप छान माहिती…. मी विद्यार्थी दशेत अनेकदा गेलो .. सभोवती खडानखडा फिरलो .. अतिशय सुंदर ठिकाण आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्य़ातील बरेच लोक या किल्ल्या बाबत अनभिज्ञ आहेत हे खरे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here