गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)

भारताचे चौथे गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत व नामवंत साहित्यिक कृ.पां. कुलकर्णी हे ओंड या गावचे सुपुत्र. या गावाची पदवीधरांचे गाव म्हणून ओळख आहे…

‘ओंड गाव म्हणजे सुशिक्षितांचे गाव’ अशी त्या गावची ओळख कराड तालुक्‍यात असल्याचे सांगितले जाते. पेठ-कराड महामार्गावरून जाताना कराडच्या अलिकडे तीन किलोमीटर अंतरावर पश्चिमेच्या बाजूला चांदोली धरणाकडे, रत्नागिरीच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता आहे. त्या रस्त्याने साधारण दहा किलोमीटर अंतरावर ओंड नावाचे गाव आहे. ओंडला जाताना काले हे गाव लागते. त्या गावात दगडी मूर्ती घडवण्याचे काम चालते. त्या कलाकारांची कार्यकुशलता घडवलेल्या मूर्तीकडे पाहून सहज लक्षात येते. तेथे वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती मांडलेल्या दिसतात. हाताने मूर्ती घडवण्याचे काम सद्यकाळात कमी ठिकाणी होते. मूर्ती वेगवेगळ्या छापातून घडवणे सहज सोपे झाल्याने मूळ हस्तकलेला वाव राहिलेला नाही. ओंड जवळच्या खेड्यातील मूळ मानवी हस्तकलेकडे पाहताना खूप आनंद वाटतो.

ओंड गाव साधारण सात-आठ हजार लोकवस्तीचे आहे. पूर्वी त्या गावाचे नाव ‘ओम’ होते म्हणे. त्याचा अपभ्रंश होऊन ओंड झाले. सुरुवातीच्या काळात त्या गावात जैन समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास होता. पण काळाच्या ओघात त्यांचे अस्तित्व गावात फारसे राहिलेले नाही. गावात शाळा आणि माध्यमिक शिक्षण यांची सोय आहे.

भारताचे चौथे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचे मूळ गाव ओंड होय. ओंडमध्ये त्यांच्या नावाने माध्यमिक विद्यालय आहे. पंडित गोविंद वल्लभ पंत हे महात्मा गांधी यांचे चिटणीस होते. तसेच, ते उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्रीही होते. त्यांचे आजोबा ओंड गावचे रहिवासी. त्यांचा मुलगा म्हणजे गोविंद वल्लभ यांचे वडील, ते गाव सोडून गुजरात, उत्तर प्रदेश असे व्यवसायासाठी फिरत राहिले. गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 रोजी झाला. त्यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे नेते के.सी.पंत यांनी त्या गावास भेट दिली होती. गोविंद वल्लभ पंत हे नंतर राज्यपाल झाले. गोविंद वल्लभ पंत यांचा उल्लेख त्यागी, निष्ठावान नेते म्हणून केला जातो.

त्या गावचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नामवंत साहित्यिक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचेही ओंड हे गाव. कृ.पां. कुलकर्णी हे सव्यसाची लेखक आणि मराठी भाषातज्ज्ञ होते. त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भात लेखन केले. ते मुंबईत प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. ते अंमळनेर येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (1952) झाले होते. त्यांचा मृत्यू मुंबई येथे 12 जून 1964 रोजी झाला.

कृ.पां. कुलकर्णी यांच्या ‘कृष्णाकाठची माती’ या आत्मचरित्रात गावकऱ्यांचे वर्णन आलेले आहे. कृपांचे कोणी वारस गावात राहत नाहीत. तेवढेच नव्हे तर गावातील एकमेव ब्राह्मण कुटुंब, जे बाहेरून या गावी राहण्यास आले आहे; तेवढे वगळले तर ब्राह्मण समाज तेथे नाही. कृपांच्या वारसांनी एकदा तरी गावी यावे अशी तेथील ग्रामस्थांची इच्छा आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट ग्रामस्थ मोठ्या अभिमानाने सांगतात, की बाबासाहेब आंबेडकर यांनी या गावाला भेट 20 एप्रिल 1938 रोजी दिली होती. त्यांनी तेथे स्वतंत्र मजदूर पक्षाच्या सभासद नोंदणीला प्रारंभ केला ! त्यांनी त्यांचे भाषण ज्या ठिकाणी केले तो चबुतरा तेथे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यावेळी झालेल्या सभेसाठी सहा हजार श्रोते उपस्थित असल्याची नोंद उपलब्ध आहे. चुडाप्पा लोकशाहीर ही तेथील नामवंत आणि प्रसिद्ध व्यक्ती होय.

ओंड गावात राघोबा नावाचा विठ्ठल भक्त होऊन गेला. तो पंढरपूरला पायी जात असताना वाटेत मृत्यू पावला. त्याच्या स्मरणार्थ माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी मोठी यात्रा भरते. यात्रेत जनावरांचा बाजार व प्रदर्शन असते. जनावरांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते. यात्रेत सिनेमाचे तंबू असतात. तमाशाचे कार्यक्रमही असतात. कुस्त्यांचे सामनेही यात्रेच्या निमित्ताने भरवले जातात. गावात महादेव, बिरोबा, मायाक्का, कामाबाई, सुराप्पा, मारुती, जोतिबा, निनाई, विठ्ठल-रुक्मिणी, मरीआई, सती, दत्तगुरू अशी मंदिरे आहेत. गावात ‘दिवाण विहीर’ नावाची एक विहीर आहे. तिची खासीयत अशी, की त्या विहिरीमधून भुयारी मार्ग आहे. गावात बुधवारचा बाजार भरतो. ओंड हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे त्या बाजारात पंचक्रोशीतील नांदगाव, मणव, सवादे, तुळसण, उंडाळे, कोंडोशी, घोगाव, टाळगाव या गावांतून लोक येतात.

– प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com

—————————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here