गाडगेबाबांची कीर्तनाभाषा

0
29
carasole

गाडगेबाबांची कीर्तनभाषा ही जनभाषा आहे. संवाद हा त्या भाषेचा गाभा. ते एकेका शब्दाचा प्रश्‍न लोकांना विचारत आणि लोकांचा होकार मिळवत. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे विषय स्वच्छता, जातिनिर्मूलन, अस्पृश्यतानिषेध, गरिबांना मदत, व्यसनमुक्ती, प्राणिमात्रदया, अन्न-वस्त्र-निवारा-विचार, शिक्षण, ज्ञान हे मुख्यतः आहेत. ते शिक्षणाला अग्रस्थान देतात. त्यांच्या कीर्तनभाषेचा लहेजा माया, प्रेम, जिव्हाळा यांनी डवरलेला आहे. बाबा क्रियावंत विचारवंत आणि कमालीचे संवेदनशील आहेत. गरीब ही त्यांची लेकरे आहेत. ते नाते त्यांनी कधी सुटू दिलेले नाही. भाषेची लाघवी, गोड रूपे त्यांच्या कीर्तनात ते अशी पेरतातः

‘हे पाहा’ याऐवजी ‘हे पाहेजा’, ‘मग’ ऐवजी ‘मभ’, ‘मग म्हणाल’ ऐवजी ‘मंग म्हनसान’, ‘ठेवणे’ ऐवजी ‘ठुने’, ‘का’ ऐवजी ‘काहून’, ‘पाहण्याची’ ऐवजी ‘पाह्याची’, ‘पृथ्वी’ ऐवजी ‘पुर्थई’,  ‘ऐकून’ ऐवजी ‘आयकून’, ‘करण्याची’ ऐवजी ‘क-याची’, ‘काय’ म्हणून’ ऐवजी ‘काहून’,’ ‘प्यायले’ ऐवजी ‘पेले’, ‘इतके’ ऐवजी ‘इतले’, ‘म्हटले’ ऐवजी ‘म्हतलं’, ‘तेव्हापासून’ ऐवजी ‘ताहापसून’, ‘प्रत्येकांस’ ऐवजी ‘पर्तेकाले’, ‘परवा’ ऐवजी ‘परवार’, ‘काढणार’ ऐवजी ‘काहाडनार’, ‘वाजवतात’ ऐवजी ‘वाजोतत’, ‘बायकोला’ ऐवजी ‘बायकोले’, ‘असे असे’ ऐवजी ‘अशे अशे’, ‘भांडण’ ऐवजी ‘कलागत’, ‘भाषण’ ऐवजी ‘भाशेन’, ‘दाखवतो’ ऐवजी ‘दाखोते’, ‘विचारणे’ ऐवजी ‘पुसणे’, ‘ख्रिश्‍चन’ ऐवजी ‘क्रिश्शन’, ‘वेगळंवेगळं’ ऐवजी ‘वालंवालं’ ‘नसेल’ ऐवजी ‘नसील’, ‘असशील’ ऐवजी ‘अशील’, ‘असेल’ ऐवजी ‘आशीन’, ‘अजून’ ऐवजी ‘आखीन’.

ही जनभाषा, ही व्यवहारबोली, ही लोकसंवाद शब्दकळा साखरेत भिजवलेली आहे. ती भाषा प्रभावापुरती नाही; गाडगेबाबा ती लोकसुधारणेची भाषा करतात.

वैदर्भी बोली इंग्रजी-हिंदीच्या शब्दांनी जास्तच मिठ्ठास बनते. त्या प्रभावातून बाबांचे कीर्तनही मुक्त नाही. अशी गोड मिश्र भाषा वापरून त्या प्रकारची शब्दरूपे कीर्तनात येतात. उदाहरणार्थ, ‘तबियत’, ‘हुकमान’, ‘बंबई’, ‘ठेसन’, ‘जत्रा’, ‘फत्रा’, ‘तीरथ’, ‘गांधीजीकू’, ‘पैदा’, ‘बरसात’, ‘इस्पिताल’, ‘खडा’, ‘बडा’, ‘साला’, ‘साली’, ‘खटारा’, ‘चले जाव’, ‘इधर आ’, ‘देड आणा’, ‘लैन’, ‘मालूम’, ‘फेपरवारी’ (फेब्रुवारी), ‘हिंदुस्थान’, ‘खलास’, ‘चड्डी’, ‘चीज’, ‘शरम’, ‘रूमा’ (खोल्या), ‘बिल्डिंगा’ (इमारती) गाडगेबाबांच्या कीर्तनात या वळणाची मिश्र भाषांतील शब्दरूपे खास ‘अस्तित्व’ आणि विशेष ‘परिणाम’ उमटवत येतात.

(भाषा आणि जीवन 32/4, दिवाळी 2014, या अंकातील केशव सखाराम देशमुख यांच्या लेखामधून)

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here