गवाऱ्यांचे गाव, गोरेगाव (Gaware’s Village, Goregaon)

0
87
_goregav

पुणे जिल्ह्याच्या राजगुरूनगर तालुक्यातील गोरेगाव हे माझे गाव. ते तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शंभर टक्के आदिवासी गाव आहे. ‘भीमाशंकर’ हे महादेवाचे मंदिर त्या गावापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. ‘भीमा नदी’ तेथेच नागमोडी वळणावर आहे. गावात लोकसंख्या चारशेच्या आसपास असावी. त्यांपैकी ऐंशी टक्के लोक ‘गवारी’ आडनावाचे आहेत; म्हणून गावाचे नाव ‘गोरेगाव’ पडले असावे.

गावाच्या बाजूला उंच डोंगर आहे. डोंगरउतारावर उंबर, जांभूळ, आंबा हे मोठमोठे वृक्ष आहेत. लोकांनी डोंगरावरून पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याला ‘नळीचा झरा’ आणि ‘महारजळीचा झरा’ अशी नावे दिली आहेत. महारजळीच्या झऱ्याचे पाणी हे दरा या ठिकाणी येते तर नळीच्या झऱ्याचे पाणी ‘फॉरेस्ट’मध्ये जाते. भातशेती डोंगराच्या पायथ्याशी केली जाते. पठारावर भुईमूग, नाचणी, उलगा, शाळू ही पिके घेतली जातात.   

गावात मारुतीचे मंदिर आहे. मंदिरात पूर्वी सागवानाची लाकडे होती. श्री भैरवनाथ सेवा; गोरेगाव आणि मुंबईकर व पुणेकर ग्रामस्थ मंडळे यांनी मिळून घरटी वर्गणी काढून तेरा लाख रुपये जमा केले. त्यातून मारुती मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गणेश, विठ्ठल-रुक्मिणी आणि मारुती यांच्या मूर्तींची स्थापना धार्मिक विधीने करण्यात आली. विष्णू गवारी यांना मंदिराचे पुजारी या पदावर नेमण्यात आले आहे. मंदिरात हरिपाठ आणि काकड आरती वेळेत केली जाते. चैत्र महिन्यात रामनवमी आणि हनुमान जयंती या काळात सात दिवसांचा हरिनाम सप्ताह असतो. त्या सात दिवसांत चौदा-पंधरा लोकांचे गट करून, त्या गटांद्वारे भोजन आणि विणेकरी (ज्यांच्या हाती वीणा असते) यांची व्यवस्था केली जाते. काल्याचा महाप्रसाद शेवटच्या दिवशी असतो. गावकरी देवीची पालखी धुण्यासाठी भीमानदीवर नेतात. ती यात्रा टाळ, मृदुंग यांच्या तालात आणि अभंग-गवळणीच्या नादात दुपारी तीन वाजता निघते. पालखी धुऊन भैरवनाथाच्या मंदिरात आणली जाते. पालखीमध्ये नाथाचा व देवीचा मुखवटा आणि हळद-कुंकू, तांदूळ, नारळ इत्यादी वस्तू ठेवल्या जातात. देवाची पूजा केली जाते. सर्वजण भजनात रममाण होतात. तसेच, फुगड्या खेळतात. देवीला नारळ फोडून गुळ-खोबऱ्याचा व पेढ्याचा प्रसाद वाटला जातो. त्यानंतर गावात पालखी फिरवून मुक्तादेवीच्या मंदिरात ठेवली जाते. संध्याकाळी हरिपाठ होतो. आजूबाजूच्या गावांची भजनी मंडळीही आलेली असतात. प्रत्येक भजनी मंडळीला एक तास देऊन नंतर गावचे भजन होते. रात्री ‘लोकनाट्य _muktabai_mandirकला पथका’तर्फे नाट्य सादर केले जाते. देवाची पालखी गावभर पुन्हा फिरवली जाते. भारुड रात्री अकरा वाजता सुरू होते. ते सकाळी पाच वाजता संपते. गावकरी दुसऱ्या दिवशी एकूण कार्याचा व कार्यक्रमाचा हिशोब करतात.

यात्रेच्या निमित्ताने गावात काटेकुटे, बांधाची डागडुजी, रोपे भाजणे अशी शेतीची कामे सुरू होतात. पाऊस डोबावल्यावर म्हणजे पाऊस येण्याची दाट शक्यता असते त्यावेळी शेतकऱ्यांची भातपेरणीची घाई सुरू होते. त्यांना त्या कामातून फुरसत मिळत नाही. भाताची आवणी (लावणी) रोपे मोठी झाल्यावर केली जाते. चार-पाच कुटुंबांची पडकई (समूह, गट) तयार करतात आणि लावणी संपवून टाकतात. शेतकरी एकमेकांना मदत करतात. आमच्या गावी पाऊस धो-धो पडतो. रानातील जनावरे गोठ्यांकडे धाव घेतात. आवणीनंतर बेणणीला सुरुवात होते. पूर्वी शेतात शेणखताचा (सेंद्रीय खत) वापर केला जायचा; आता रासायनिक खते सर्रास वापरली जातात. गावात गावठी गायी नसून जास्त दूध देणाऱ्या जर्सी गायी आहेत. दुधाचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी जर्सी गायींची पैदास केली. गावात दूध डेअरी निर्माण केली. शेतकरी चाळीस-पन्नास लिटर दूध घेऊ लागले आहेत. एक वेळ अशी होती, की आम्हाला नदीपलीकडे असणाऱ्या गावातून नदीतून प्रवास करून दूध घेऊन यावे लागत होते. पण, आता आमच्या गावात दुधाला जास्त भाव मिळतो.

गणपती आले, की शेताला उंडे म्हणजेच तांदळाच्या पिठाचे लहान लाडू करून ठेवले जातात. कारण शेतात पिक आल्यावर शेताला उंदीर लागतो. दिवाळीत, शेतकरी धान्याची रास खळ्यामध्ये तयार करून पोती-कणगी भरून ठेवतात. तो धान्याचे उत्पादन चांगले होते, तेव्हा आनंदी होतो आणि वरूण राजाला हात जोडून प्रार्थना करतो, की ‘असाच दरवर्षी पडत जा!’ भैरवनाथ हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. त्यासाठी रविवारी गावात अनेक ठिकाणांहून भाविक तळीभंडार करण्यासाठी येतात. तळीभंडार म्हणजे हळदीमध्ये देवाच्या भंडाऱ्यात सुक्या खोबराचे तुकडे करून देवाच्या कळसाला त्यांचा स्पर्श होईल इतक्या वर उडवले जातात. ते एक प्रकारचे तीर्थक्षेत्रच आहे. त्यांच्यासाठी गावात पाण्याची व्यवस्था केली जाते. भैरवनाथाचा अधिकमास सप्ताह हा पाच दिवसांचा असतो. त्या ‘अधिकमास सप्ताहाच्या महायज्ञा’त वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यावेळी काकड आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन होते. ग्रामस्थ ती सर्व तयारी करतात. काही अन्नदाते गावांना विचारून त्यावेळचे जेवण अन्नदान करतात. सप्ताहाचे नियोजन गावातील ग्रामस्थ आणि मुंबईकर-पुणेकर ‘जय हनुमान मित्र मंडळ’ करतात; गावातील कार्यकर्त्यांचे सहकार्यही मोलाचे लाभते. सप्ताहातील महाकाल्याचा कार्यक्रम संपल्यावर रात्री लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. त्या कार्यक्रमांचे नियोजन ‘एकात्मिक बालविकास अंगणवाडी’च्या शिक्षिका शारदा भागित या करून घेतात. अशा कार्यक्रमातून बालकांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यातूनच चांगला कलाकार निर्माण होतो.

_shalaगावकऱ्यांनी मुक्तादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले आहे. मुंबई-पुणे आणि ग्रामस्थ मंडळाने 2018 पासून गावात मंदिरासाठी वर्गणी घेण्यास सुरुवात केली आहे. भैरवनाथ आणि मुक्तादेवीच्या यात्रेदरम्यान बैलगाड्यांच्या शर्यती आणि कुस्तीचे जंगी सामने व्हायचे. ग्रामस्थांनी तशा स्पर्धा बंद करून गावात कीर्तन, भजन आणि प्रवचन यांची प्रथा पाडली आहे. गावात अखंड हरीनाम सप्ताह होतो. सप्ताहाला 2019 मध्ये पंचेचाळीस वर्षें पूर्ण झाली आहेत. मुंबईकरांचे भजन, संगीत मुक्तादेवीच्या मंदिरात उत्सवाच्या वेळेस केले जाते. हार्मोनियम वादक कै. तुकाराम लाडके बुवा यांनी भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळाची प्रथा चालवली. त्यांचा वारसा किसन गवारी, सदाशिव लाडके, ज्ञानेश्वर लाडके चालवत आहेत. प्रवचनकार कै. लक्ष्मण तळपे यांचा प्रवचनाचा वारसा त्यांचे नातू पांडुरंग तळपे हे चालवत आहेत. धारू गवारी हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आहेत. रोहिदास गवारी, शांताराम गवारी, रामदास गवारी या व्यक्ती आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. रामचंद्र लोहकरे यांनी वारकरी संप्रदायामध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावात भजन मंडळ तयार केले. अंकुश चिमटे हे वारकरी असून ते मृदंग वादक आणि भजनी गायक आहेत. गोविंद गवारी महाराज यांचे वय एकशेएक वर्षें आहे. ते त्या वयातही आळंदी-पंढरपूरवारी करतात. गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरातील मूर्त्या आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

गावात जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. शाळेच्या इमारतीचे काम तीन वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. देणगीदारांनी शाळेला रंगरंगोटी, चित्र, नकाशे, साहित्य इत्यादी भेट दिली आहे. शाळेजवळच, ग्रामपंचायतीचे सुंदर कार्यालय बांधण्यात आले आहे. बाजूला व्यायामशाळाही आहे. गावात 1984 पासून क्रिकेट खेळ खेळण्यास सुरुवात झाली. भैरवनाथ क्रिकेट संघाची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली. गोरेगावचे नाव घेतले, की क्रिकेट प्रेक्षकांच्या भुवया पश्चिम पट्ट्यात उंचावतात. संघनायक सतीश गवारी (2019) आहे. 

_maruti_mandirगावात पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी-परंपरा तशाच चालू आहेत. गावात हिंदू धर्माप्रमाणे येणारे सण-उत्सव सगळे साजरे होतात. विज्ञानयुगामुळे त्या परंपरेत खूप फरक-बदल होत आहेत. जुन्या काळी गावासमोर एखादा वाद झाला किंवा भांडण आले की ते गावाच्या प्रमुखांकडून सोडवले जाई. व्यक्तीच्या शब्दाला इतका मान होता, की त्यांनी सांगावे आणि सर्वांनी ऐकावे. मात्र परिस्थिती बदलली आहे. गावाची ग्रामपंचायत 1993 मध्ये स्थापन करण्यात आली. त्यावेळी गावचे सरपंच किसन भागित हे होते. त्या काळातही सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या निर्णयाला मान होता. गावाच्या कामाचा आराखडा आधी ग्रामस्थांसमोर मांडल्यानंतर तो  ग्रामपंचायत सभेत मांडला जाई. त्यानंतर तो ठराव मंजूर केला जाई. परिस्थिती तशी राहिली नाही. ज्याला सरपंच व्हायचे आहे तो तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करून, डिपॉझिट भरून, फॉर्म भरून, प्रचार करून निवडून येतो. पूर्वीच्या काळात शिक्षण घेणारी फार थोडी माणसे होती. तेच गावकीचा कारभार पाहत असत. कै. कृष्णा गवारी, गेनू गवारी, विठ्ठल गवारी, धोंडू लांघी, रामभाऊ गवारी, कान्हू लाडके, लक्ष्मण गवारी, दाजी गवारी (कोतवाल) यांनी पूर्वीपासून गावाचा कारभार व्यवस्थित चालवला आणि तो वारसा आताच्या पिढीला बहाल केला आहे.  

– दिलीप चिमटे 9552196554
chimatedilip1967@gail.com

About Post Author