गणेशोत्सव – रामदासांचा साक्षात्कार !

1
114

गणेशोत्सवाला 2022 साली तीनशेसेहेचाळीस वर्षे पूर्ण झाली. गणपती हा सर्व कार्यांत प्रथम पूजला जातो. ‘सुखकर्ता दुःखहर्ता…’ ही गणपतीची आरती रामदास स्वामी यांनी रचली आहे. त्यांनीच गणेशोत्सवाची कल्पनाही राबवली. याबाबतची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. रामदास स्वामी यांनी गणेशोत्सव सुरू केल्याची नोंद अशी आहे –

समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
सकळ प्रान्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!

हा उल्लेख उत्सव भाद्रपद ते माघ महिन्यापर्यंत असा असल्याचे गिरिधरस्वामींच्या समर्थ प्रताप ग्रंथ यावरून दिसून येते. गिरिधरस्वामी हे रामदासांचे शिष्य, सुमारे दहा वर्षेपर्यंत त्यांच्या समवेत राहत होते. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या श्लोकातील उल्लेख महत्त्वाचा ठरतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना अकरा मुठी धान्य पाठवा असा निरोप दिल्याचा उल्लेखही दिसून येतो. समर्थांनी या अकरा मुठी ‘हनुमानाच्या मुठी’ गृहित धरल्या असाव्यात. शिवाजीराजांना ते उमजले. त्यांनी एकशे एकवीस खंडी धान्य पाठवले. त्याचा अर्थ सरासरी दररोज सहाशेपंच्याहत्तर किलो धान्य दिवसाच्या महाप्रसादासाठी लागले. त्याचाच अर्थ प्रतिदिनी नऊ हजार पाचशे लोक तेथे महाप्रसादास आले. तेथूनच गणेशोत्सव कोकणात सर्वत्र पोचला असावा !

गणेशोत्सव रामदासांच्या सुंदरमठात शनिवारी, 11 सप्टेंबर 2010 रोजी, तीनशेपासष्ट वर्षांनंतर साजरा करण्यात आला. रामदास पठार गावातील दहा गणेशमूर्ती आणि सुंदरमठातील अकरावा गणपती असे चित्र त्या साली दिसून आले.

समर्थांनी ‘आनंदवनभुवनी’ कवनात लिहिलेल्या सतराव्या कडव्यातील हा विचित्रयोग चक्रावणारा आहे.

‘आक्रा आक्रा बहु आक्रा । काय आक्रा कळेचि ना ।
गुप्त ते, गुप्त जाणावे । आनंदवनभुवनी ॥’

गणेशोत्सव हा रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफझलखानाच्या स्वराज्यावर आलेल्या संकटापासून शिवाजीराजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलेली आहे… ‘दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!’ अफझलखानाने शिवाजीराजांच्या प्रांती येऊन कान्होजी जेधे यांस त्याच्या मदतीस येण्याचा हुकूम पाठवला. त्यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथर घळीमध्ये रचलेली ‘सुखकर्ता दु:खहर्ता । वार्ता विघ्नाची ।…संकटी पावावे । निर्वाणी रक्षावे ।’ ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होय ! समर्थ त्याच सुमारास, 1571च्या आषाढ महिन्यात पंढरपुरास जाऊन आले होते आणि त्यांनी भाद्रपदमासी ‘समर्थे सुंदरमठी गणपति केला !’

चाफळ अधिष्ठानी श्रीराम संस्थापल्यानंतर रामदास स्वामी ह्यांचे वास्तव्य सुंदरमठावर झाले. समर्थ नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये साधुसंतांच्या भेटी घेऊन परत शिवथरला आले.

रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरता शिवथरच्या घळीत आले. त्यांचे तेथील दहा वर्षांचे वास्तव्य पूर्ण झाले, तेव्हा ते नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरता 1658 साली निघाले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. त्यांना घळीत असताना अफझलखान नावाचे ‘नवे विघ्न’ स्वराज्यावर चालून येत आहे ही बातमी कळली. तेव्हा रामदासांनी प्रथेप्रमाणे गणपतीची स्तुती करून प्रार्थना म्हटली. तीच ती गणपतीची प्रसिद्ध आरती ! त्या आरतीच्या पहिल्या चरणात ‘वार्ता विघ्नाची’ ह्या शब्दात अफझलखानाच्या स्वारीच्या उल्लेखाचा संदर्भ आहे असे म्हणतात.

रामदासांचा हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे. त्याचा उल्लेख शिवाजी महाराजांच्या मोडी पत्रात आढळतो. समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात; तसेच, समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्याही पत्रात तो आढळतो. भट हे रामदास स्वामी आणि शिवराय यांच्यामध्ये असणारा दुवा मानले जातात.

सुंदरमठाचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. सुंदरमठ, शिवथर घळ (रामदास पठार) ही दासबोधाची जन्मभूमी होय. शिवकालीन सुंदरमठाशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचे पुरावे त्या स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. तेथेच शिवाजीराजे आणि रामदास स्वामी या दोघांनी मिळून हा गणेशोत्सव 1675 साली भाद्रपद शु.चार (गणेश चतुर्थी ) ते माघ शु.पाच म्हणजे गणेश जयंतीपर्यंत पाच महिने साजरा केला. तो गणपती कोणत्याही ‘मंडळाचा राजा’ नाही तर तो हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजीराजांचा गणपती आहे ! त्या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. त्यांनी त्या साली  एकशे एकवीस खंडी धान्य त्या उत्सवाला देणगी दिली. त्याचा उल्लेख इतिहासात असा लेखात सापडतो – समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!

शिवाजीराजे, कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी यांनी सुरू केलेल्या उत्सवाची प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई, गुरुकुल येथे 2009 ला गणेशोत्सव सुरू केला व 2010 ला सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसांचा उत्सव सुरू झाला आहे.

रामदास पठार म्हणजेच सुंदरमठावर येण्याकरता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरीजवळ कमानीखालून डाव्या हाताने सरळ पुढे पाच किलोमीटर मठाच्या माळावर शेवटपर्यंत डांबरी रस्त्याने यावे. निवास, भोजन व्यवस्था विनामूल्य होऊ शकते.

महेश कदम +971 – 561360155 kadamahesh@gmail.com

———————————————————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. रामदास स्वामी आणि शिवरायांचा अन्योन्य संबंध दर्शवीणारी माहीती पुरविल्या बद्धल धन्यवाद !🙏🏻🙏🏻🙏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here