गणपत लक्ष्मण कोण होते? (Ganpat Laxman’s Writing Published After One Hundred Fifty Years!)

1
46

गणपत लक्ष्मण यांचे पहिलेवहिले लेखन (1842) त्यांच्या मृत्यूनंतर एकशेपंच्याहत्तर वर्षांनी (मृत्यू : 6 जुलै 1844), 2019 साली प्रकाशित झाले आहे! ‘मराठी संशोधन मंडळाने ते पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. मराठी संशोधन मंडळ हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा (दादर-मुंबई) विभाग आहे. गणपत लक्ष्मण यांचा मूळ इंग्रजी लेख आणि त्याचा मराठी अनुवाद (अरुण नेरूरकर) असे त्या पुस्तकाचे स्वरूप आहे.

गणपत लक्ष्मण यांनी ‘Eassy on the promotion of Domestic Reform among the natives of India’  हा निबंध इंग्रजीत दीडशे वर्षांपूर्वी लिहिला. जनरल असेंब्लीच्या संस्थेने त्या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. गणपत लक्ष्मण यांनी तो निबंध त्या स्पर्धेसाठी लिहिला. त्या निबंधास पहिले पारितोषिक प्राप्त झाले. दुसरा पारितोषिकप्राप्त निबंध गोविंद नारायण यांचा होता. गणपत लक्ष्मण यांचा निबंध ‘The Oriental Christian Spectator’ मध्ये सहा भागांत क्रमश: प्रकाशित झाला – पहिला हप्ता एप्रिल 1842 साली. अंकाचे संपादक जॉन विल्सन यांचे छोटे टिपण प्रस्तुत निबंधाला जोडण्यात आले आहे. त्यांनी लिहिल्याप्रमाणे, मुंबईच्या काही एत्तदेशीय तरुणांनी मिशन हाऊस, अम्ब्रोली येथेबैठका एप्रिल-मे 1841 मध्ये आयोजित केल्या होत्या. त्यावेळी तरुणांनी देशांतर्गत सुधारणा कशा घडवून आणता येतील या विषयावर चर्चा केल्या. त्या चर्चेच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून जॉन विल्सन यांना आमंत्रित केले होते. ती चर्चा आणि जनरल असेंब्लीच्या संस्थेने जाहीर केलेली निबंध स्पर्धा यांमुळे प्रेरित होऊन गणपत लक्ष्मण यांनी प्रस्तुत निबंध लिहिलेला दिसतो.

मुंबई व आसपासच्या भागातील हिंदू कुटुंबे 1840 च्या आगेमागे कशी होतीघरात वातावरण कशा प्रकारे होते? मुलांचे संगोपन कशा प्रकारे केले जात असे? घरातील स्त्रियांची स्थिती कशी होती? स्त्रिया आणि पुरुष यांच्या कामांची विभागणी, जबाबदारी, त्या जबाबदाऱ्या पेलण्याची असलेली वा नसलेली क्षमता, हिंदू तरुणांचे वागणे, व्यसनाधीनता, त्यांच्यावर कोणाचाच न उरलेला धाक, संस्कार-संगोपनाची आबाळ, चूल आणि मूल याच चक्रात गाडल्या गेलेल्या माता आणि त्यामुळेही पुंडझालेला तरुणवर्ग अशा अनेक बाबींचे प्रतिबिंब त्या निबंधात पडलेले आहे. गणपत लक्ष्मण यांची निरीक्षणशक्ती आणि आकलनशक्ती काही प्रसंगी अचंबित करते. ते निर्भीडपणे निरीक्षणे नोंदवतात, उपाय सांगतात. त्यांना स्त्रियांना शिक्षण नसल्याची खंत सतावते. त्यांच्या मनाला दु:ख तरुणांचे आयुष्य वाया जात आहे याचे होत आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या इंग्रजी दैनिकात पडून राहिलेले कौटुंबिक सामाजिक चित्र त्या निबंधातून हाती येते. ते आधुनिकझालेल्या मुंबईचे प्रारंभीचे वास्तव वर्णन ग्रंथरूपाने उपलब्ध झाले आहे. गणपत लक्ष्मण यांचा मूळ इंग्रजी निबंध आहे. तो पुनर्मुद्रित केला असून त्या निबंधाचा मराठीत अनुवादही केला आहे.

गणपत लक्ष्मण यांचा निर्देश वाङ्मयेतिहासात कोठेच सापडत नाही. मी सूची वाङ्मय चाळत असताना, मला गंगाधर मोरजे यांनी तयार केलेल्या ज्ञानोदय सारसूचीत गणपत लक्ष्मण यांच्याविषयीच्या दोन नोंदी सापडल्या. गणपत लक्ष्मण यांच्या इंग्रजी निबंधाला संपादक डॉ.जॉन विल्सन यांनी टिपण जोडले आहे. त्यातून जुजबी माहिती हाती आलीच होती. जॉन विल्सन यांनी असे लिहिले आहे, की ‘The successful competitors are Ganpat Lakshuman, a student in the Elphinstone Institution…’ म्हणजे गणपत लक्ष्मण एलफिन्स्टन संस्थेत 1841 साली शिकत होते.

गणपत लक्ष्मण आणि गोविंद नारायण यांचे ते निबंध जनरल असेंब्ली संस्थेच्या वार्षिक परीक्षेत वाचण्यात आले होते. मात्र गणपत लक्ष्मण यांना मिळालेले बक्षीस किती रुपयांचे, कधी दिले गेले वगैरेचा तपशील विल्सन यांच्या टिपणात नाही. त्याच वेळी ज्ञानोदय सारसूचीची नोंद असे नमूद करते, की गणपत लक्ष्मण याच्या निबंधास पंच्याहत्तर रुपये बक्षीस मिळाले. स्त्रियांना शिकवण्यात प्रापंचिक व पारलौकिक फायदा आहे. त्या नाजूक असल्या तरी त्यांना विद्यादी संस्कार आवश्यक ठरतात. त्या ज्ञानसंपन्न झाल्या तर फार सुखी होतील. कौटुंबिकांचे त्यात सहस्रश: स्वार्थ होतील.

मोरजे यांच्या सूचीतील दुसरी नोंद गणपत लक्ष्मण यांच्या मृत्यूची बातमी देणारी आहे: गणपत लक्ष्मण हा विद्वान साष्टी बेटातील ठाणे येथे जुलैच्या 6 तारखेस (6 जुलै 1844) मरण पावला. त्याने घरगुती सुधारणेविषयी इंग्रजी ग्रंथ लिहिला. तो इंग्रजी लेखनात प्रवीण होता. त्याचे वागणे स्वदेशी तरुणांत आदर्श झाले असते; त्याने मिशनरींशी वहिवाट ठेवून ज्ञान मिळवले. त्याला वाचनाचे वेड होते. परंतु तो धर्माचा अभ्यास न करताच मरण पावला. त्याने एक इंग्रजी ग्रंथ लिहिला असे ज्ञानोदयकारांचे म्हणणे आहे.

या सर्वावरून काय चित्र दिसते. 1. गणपत लक्ष्मण हे एलफिन्स्टन विद्यालयाचे विद्यार्थी एप्रिल-मे 1841 मध्ये होते, 2. ते ठाण्याचे रहिवासी होते, 3. एप्रिल-मे 1841 मध्ये एतद्देशीय तरुणांनी मिशन हाऊस, अम्ब्रोली येथे ज्या बैठका आयोजित केल्या होत्या, त्या चर्चेत गणपत लक्ष्मण सहभागी झाले असावेत, 4. ते विद्वान म्हणून लौकिकास पात्र ठरले होते, 5. त्यांच्या निबंधाने पुढे नावलौकिक प्राप्त केलेल्या गोविंद नारायण माडगांवकर यांच्या निबंधालाही मागे टाकले होते. त्यांना प्रथम क्रमांकाचे पंच्याहत्तर रुपयांचे पारितोषिक मिळाले होते.

मोरजे यांनी नोंदीच्या खाली अमेरिकन मिशन प्रेस, मुंबई, टी.ग्रॅहम प्रिंटरअसा जो संदर्भ दिला आहे, तो कशाचा? असा प्रश्न पडतो.विल्सन यांनी टिपणात म्हटले आहे, की गणपत लक्ष्मण यांनी सुचवलेल्या सुधारणा देशी आणि युरोपीयन सुधारणावाद्यांना निश्चितच उपयोगाच्या आहेत. विल्सन यांनी लेखकाचे वर्णन बोलके केले आहे : या लेखकाचे शिक्षण ख्रिश्चन संस्थेत झालेले नाही. तरीही जगातील शक्तिशाली देशांमध्ये मान्यताप्राप्त अशा या विशिष्ट धर्मश्रद्धेविषयी गांभिर्याने विचार करू नये असे त्याला वाटत नाही. उलट, लोकहितेच्छेने प्रेरित होऊन, ख्रिश्चन धर्माच्या अभिवृद्धीसाठी प्रवृत्त होणारे आणि दैवी संस्थांविषयी (Divine Truth) मोकळेपणाने चौकशी करणाऱ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवणारे, या सर्वांप्रती तो समाधान व्यक्त करतो.

गणपत लक्ष्मण यांना आयुष्य अधिक लाभते तर ते त्यांचे समकालीन गोविंद नारायण माडगांवकर यांच्याप्रमाणे उत्तम ग्रंथकार झाले असते. गणपत लक्ष्मण यांचे आडनाव काय होते ते सापडू शकले नाही; परंतु प्रियोळकर यांनी गोविंद नारायण माडगांवकर : व्यक्ती आणि वाङ्मयया पुस्तिकेत, त्यावेळी आडनावे लावण्याची पद्धत नव्हती, 1857 ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर आडनावे लावण्याची पद्धत रूढ झाली असे म्हटले आहे.

गणपत लक्ष्मण यांच्याबरोबर ज्यांच्या निबंधाला दुसरे पारितोषिक मिळाले होते त्या गोविंद नारायण माडगांवकर यांच्यावर अ.का.प्रियोळकर यांनी चरित्रात्मक टिपण लिहिले असून त्याला त्यांच्या वाङ्मयाची सूची जोडली आहे. ती पुस्तिका मराठी संशोधन मंडळाने प्रकाशित केली आहे (माडगांवकर यांचे संकलित वाङ्मय- खंड 1 ते 3 संपादक:प्रियोळकर, मालशे, चुनेकर) सूचीत माडगांवकर यांच्या या पारितोषिकप्राप्त इंग्रजीत लिहिलेल्या निबंधाचा उल्लेख नाही. जो निबंध माडगावकर यांनी लिहिला होता, त्याचेच ते पुस्तक असेल काय? माडगांवकर यांची पुस्तके (शुचिर्भूतपणा, ऋणनिषेधक बोध, नीतिसंवाद इत्यादी) अमेरिकन मिशनतर्फे 1841 पासून छापण्यात आलेली दिसतात. हे दोन पारितोषिकप्राप्त निबंध अमेरिकन मिशनतर्फे युरोपीयन लोकांकरता इंग्रजी भाषेत ग्रंथरूपाने प्रकाशित केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैकी गणपत लक्ष्मण यांचा पहिलावहिला एकुलता एक ग्रंथ म्हणून आणि माडगांवकर यांचाही पहिला ग्रंथ म्हणून दोन्हींचा शोध महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या मूळ प्रती सापडतील काय?

गोविंद नारायण यांची विद्यार्थिदशा 1842 ला संपली व ते त्याच संस्थेत शिक्षक म्हणून 1843 मध्ये लागले. प्रियोळकर यांनी सदाशिव काशिनाथ छत्रे, बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर, हरि केशवजी पाठारे आणि गोविंद नारायण माडगांवकर यांचा उल्लेख केला आहे. ते अर्वाचीन कालखंडातील आरंभीचे पहिले चार वाङ्मयसेवक म्हणून होते. गणपत लक्ष्मण जर जास्त जगले असते तर त्यांचाही समावेश त्यांच्यामध्ये झाला असता काय? कोण जाणे, कदाचित झालाही असता!

(मराठी संशोधन पत्रिका त्रैमासिकावरून (ऑक्टो.-नोव्हें.-डिसे. 2019) उद्धृत, संपादित, संस्कारित)

प्रदीप कर्णिक 9821299736  karnikpl@gmail.com

प्रदीप कर्णिक हे रूपारेल महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल. ते मराठी संशोधन मंडळाचे सचिव आणि मराठी संशोधन पत्रिकेचे संपादक आहेत. त्यांच्या पीएच डी च्या प्रबंधाचा विषय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयस्थित असलेल्या दादर नायगाव परिसरावर असलेला सांस्कृतिक प्रभावहा होता. त्यांनी ग्रंथालयशास्त्रया विषयातील विद्यापीठीय अभ्यासाची पुस्तकेही लिहिली. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्याज्ञानगंगोत्रीया त्रैमासिकाचे संपादक म्हणून काम केले. ग्रंथ, ग्रंथालय ग्रंथसंस्कृती‘, ‘जावे ग्रंथांच्या गावा‘, ‘ग्रंथपुण्यसंपत्ती‘, ‘ग्रंथसामर्थ्यही त्यांची प्रकाशित पुस्तके आहेत. त्यांनी कथात्म साहित्य आणि नाटकेही लिहिली आहेत.

—————————————————————————————————————————————

About Post Author

Previous articleकृषी कायदे – सरकारचा हेतू काय? (Agitation in Delhi – Punjab Farmers object Govt. bonafides)
Next articleवराहमिहीर: भूगर्भजलाचा पहिला अभ्यासक (Varahmihir – Groundwater Scientist of India’s history)
प्रदीप कर्णिक हे रूपारेल महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल. ते ‘मराठी संशोधन मंडळा‘चे सचिव आणि ‘मराठी संशोधन पत्रिके‘चे संपादक आहेत. त्यांच्या पीएच डी च्या प्रबंधाचा विषय ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय‘स्थित असलेल्या दादर नायगाव परिसरावर असलेला सांस्कृतिक प्रभाव‘ हा होता. त्यांनी ‘ग्रंथालयशास्त्र‘ या विषयातील विद्यापीठीय अभ्यासाची पुस्तकेही लिहिली. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ‘ज्ञानगंगोत्री‘ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून काम केले. ‘ग्रंथ, ग्रंथालय ग्रंथसंस्कृती‘, ‘जावे ग्रंथांच्या गावा‘, ‘ग्रंथपुण्यसंपत्ती‘, ‘ग्रंथसामर्थ्य‘ ही त्यांची प्रकाशित पुस्तके आहेत. त्यांनी कथात्म साहित्य आणि नाटकेही लिहिली आहेत.9821299736

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here