खांबपिंपरीचे बारववैभव !

0
724

नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील खांबपिंपरी हे गाव म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या मोठा खजिना आहे ! ते गाव पुरातत्त्वीय दृष्ट्या पांढरीच्या टेकाडावर वसलेले आहे. त्या गावातील शिल्पसमृद्ध बारवशेतात विहिरी खणू लागल्यावर सापडणाऱ्या अनेक प्राचीन वस्तू व घर बांधणीत चार फुटावर पाया खोदल्यावर सापडणारे माणसांचे सापळे या गावाबद्दल अधिकच कुतूहल निर्माण करतात...

वास्तुकलेचा उत्तम नमुना पैठणजवळच्या खांबपिंपरी या निसर्गरम्य गावात उपेक्षित स्थितीत पडलेला आहे. ती आहे एक विहीर– पायऱ्या असलेली विहीर म्हणजे बारव. खांबपिंपरी येथील विहीरमंदिर आणि सभामंडपाचे अवशेष त्यांचे सौंदर्य टिकवून आहेत. खांबपिंपरी हे गाव नगरपासून शेवगावमार्गे एकोणनव्वद किलोमीटरवर आणि पैठणपासून फक्त सतरा किलोमीटरवर काटकडी नदीच्या काठी वसले आहे. आव्हाणे येथील निद्रिस्त गणपती आणि घोटण येथील मल्लिकार्जुनाचे प्राचीन मंदिर हेसुद्धा त्याच परिसरात आहेत. नगर जिल्ह्यातील खांबपिंपरी हे गाव म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या मोठा खजिना आहे ! तेथेच ती शिल्पसमृद्ध बारव आहे. ती पुष्करणी म्हणूनदेखील परिचित आहे.

खांबपिंपरी या नावापासूनच त्या गावाबद्दलचे कुतूहल चाळवले जाते. खांबपिंपरी हे काय प्रकरण आहे ते गावात गेल्यावर समजते. पिंपरी नावाची गावे अनेक आहेत. पण या पिंपरी गावात एक मोठा दगडी खांब उभा आहे ! त्यामुळे ते झाले खांबपिंपरी. पण बोलताना मात्र त्याचा उल्लेख खामपिंपरी असा होतो. हळुहळू, गावाचे ते नाव रूढ होऊन जाईल अशीही शक्यता आहे. गावातील तो खांब प्राचीन मंदिराच्या सभामंडपाचा असावा. तो अंदाजे दहा फूट उंचीचा दगडी झुकलेला असा आहे. त्याला रणखांब असेही म्हटले जाते. महाभारतात अर्जुन व त्याचा मुलगा बभ्रुवाहन यांचे युद्ध झाले होते. त्यावेळी तो रणखांब उभारला अशी दंतकथा सांगत त्या खांबाला महाभारत काळाशीदेखील जोडले जाते. खांबाच्या माथ्यावर हंसांची नक्षी आहेतो एका चौथऱ्यावर ठेवलेला आहे. ज्या अर्थी तो खांब तेथे आहेत्याअर्थी तेथे एखादे मोठे मंदिर अस्तित्वात असणार. पण त्याचे बाकी अस्तित्व काही तेथे दिसत नाही. मात्र मूर्तींचे काही अवशेष इतस्तत: विखुरलेले आहेत. गावकरी तसाच आणखी एक खांब जवळच्या लखमापुरी गावात असल्याचे सांगतात. खांबाचा वरील भाग युद्धाच्या वेळी शेजारील लखमापुरी गावात पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. खांबाजवळ शिवमंदिर असून तेथे गाभाऱ्यात शिवपिंड आहे. नंदीची मूर्ती सभागृहात दिसते. मंदिराच्या खांबांवर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. खांबांच्या वर उलटे नाग कोरलेले दिसतात. बारव शिवमंदिराला लागून आहे व ते खांबपिंपरी गावाचे वैभव म्हणता येते !

त्या खांबावर कोरीव काम केलेले असून त्यावर सप्तमातृका कोरल्या आहेत. त्याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विशेष बाब म्हणजे सप्तमातृका अन्य ठिकाणी बसलेल्या अवस्थेत आढळतात. मात्र त्या खांबावर त्या उभ्या दर्शवल्या आहेत. तेथे काळभैरवाचे दुर्मीळ शिल्प आहे. तेथील माजी सरपंच लक्ष्मण पावशे म्हणाले, की 1987 साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तेथे जाऊन बारव व खांब यांची पाहणी केली होती. त्यावेळी निधी उपलब्ध करून हा ठेवा जतन करू असे सांगितले होते. मात्र निधी मिळाला नाही !

बारव चौरसाकृती आहे. बारवेचा तळ त्याची देखभाल-दुरुस्ती अवघड होत असल्यामुळे मातीने बुजवून बंद केला आहेमात्र जमिनीपासून पंचवीस फूट खोलीपर्यंत पायऱ्यांच्या माध्यमातून खाली उतरता येते आणि पाहण्यास मिळतात त्या चौसष्ट योगिनी. ते सुंदर कोरीव काम आहे. तो रेखीव मूर्तींचा जणू पटच दिसतो. योगिनी म्हणजे आभाळातून मुक्‍त संचार करणाऱ्या देवता. योगिनी साधना अवस्थेत बसलेल्या असून प्रत्येक मूर्तीच्या हातात जपमाला आहे. मूर्ती सातवाहनचालुक्यवाकाटक अशा विविध काळांशी निगडित आहेत. मूर्ती तिन्ही बाजूंनी कोरलेल्या आहेत. स्त्री व पुरुष देवतांच्या अशा मिळून एकोणपन्नास मूर्ती तेथे आहेत. प्रत्येक मूर्तीच्या हातात पाशत्रिशूळफळ अशी विविध आयुधे दिसताततसेच, प्रत्येक मूर्तीच्या दोन्ही बाजूंना नर्तिका नाहीतर वादक आहेत. आख्यायिका अशी सांगितली जातेकी त्या चौसष्ट योगिनी रक्‍तबीज दैत्याचा वध करण्यासाठी भूतलावर आल्या होत्या. रक्‍तबीज दैत्याला वर होताकी त्याच्या रक्‍ताचा थेंब जमिनीवर सांडला तर त्यामधून आणखी दैत्य तयार होतील. त्यामुळे त्या योगिनी आकाशातून आल्या व त्यांनी रक्‍तबीज दैत्याचा वध आकाशातच केला आणि त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू दिला नाही. योगिनी हे स्त्री शक्तीचे एक रूप आहे.

बारवेत पाणी नाही. दोन लहान दालने बारवेच्या दोन कोपऱ्यांत आहेत. बारवेच्या दोन भिंती आणि बाजूला दोन खांब उभारून अंदाजे सहा फूट उंचीचे चौरसाकृती मंडप दिसतात. मूर्ती मंडपातसुद्धा कोरलेल्या आहेत. तेथे गणपतीभैरव अशा सुंदर मूर्ती पाहण्यास मिळतात. मूर्तींनी इतकी मढलेली बारव; मात्र तिच्याकडे ना मान्यवरांचेना इतिहासतज्ज्ञांचेना पर्यटकांचे लक्ष वेधले जात महाराष्ट्रातील बऱ्याच बारवांमध्ये देवकोष्ठे (देवाची मूर्ती असलेले कोनाडे) केलेली दिसतात. त्या कोष्ठांमध्ये कधी मूर्ती असतात तर बऱ्याचदा ती रिकामी असतात. परंतु खांबपिंपरी येथील बारवेमध्ये मात्र मूर्तिकला भरभरून अनुभवण्यास मिळते.

बारवेचे महत्त्व आणि कौतुक स्थानिकांना फारसे नसावे. बारवेच्या एका बाजूचे दगड वापरून मारुतीचे मंदिर बांधले गेले आहे. जुने मंदिर पडले होतेसोयीचे म्हणून ग्रामस्थांनी बारवेचे दगड वापरून ते मंदिर उभारले म्हणे. बारवेला त्या बाजूला मूर्ती नव्हत्याच असा युक्तिवाद ग्रामस्थांनी केला. तेथील काही मूर्ती कोणा संशोधकाने मागितल्या म्हणून ग्रामस्थांनी त्यांना देऊन टाकल्या ! गावाने औदार्य एवढे दाखवलेकी त्या कोणाला दिल्या हेदेखील त्या मंडळींना माहीत नाही. बारवेच्या काठावर पुरातन महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या जीर्णोद्धाराच्या वेळी या बारवेलासुद्धा काही प्रमाणात सिमेंट लागलेले दिसते.  दुसऱ्या कोपऱ्यावर अखंड शिळा आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना दिसतात आणि चारही बाजूंनी गोपिका नृत्य करताना कोरलेल्या आहेत. त्याच शिळेच्या बाजूला महालक्ष्मीचे मंदिर आहे

गाव पुरातत्त्वीय दृष्ट्या पांढरीच्या टेकाडावर (प्राचीन/पुरातन वस्तीची शक्यता असलेले ठिकाण) वसलेले आहे. शेतात विहीर खणू लागले, की अनेक प्राचीन वस्तू जसे की खापरे, मोठ्या आकाराच्या विटा सापडतात (आणि अर्थातच त्या फेकून दिल्या जातात). गावच्या परिसरात कोठेही नवीन घर बांधणे झाले तर त्यासाठी चार फूटाचा पाया खोदला, की माणसांचे सापळे सापडतात ! सर्वत्र सापडणारे हे सापळे गावकऱ्यांच्या अंगवळणी पडले आहेत. त्यामुळे त्यांचे भय वाटत नाही. सापळा ‘निघाला की त्याला नदीमध्ये प्रवाहित करायचे किंवा त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची आणि काम सुरू ठेवायचे हे ग्रामस्थांना नेहमीचे झाले आहे.

गावात दोन-तीन जुन्या विहिरी आहेत. कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते; तसेच, बोराची झाडेसुद्धा भरपूर आहेत.

– आशुतोष बापट 8605018020 ashutosh.treks@gmail.com

(अधिकची माहिती दिलीप पोहनेरकर 9422219172 (जालना येथील पत्रकार) यांच्या लेखातून)

———————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here