केशवसुत यांचे मालगुंड – मराठी कवितेची राजधानी! (Keshavsut, The Marathi Poet Remembered)

3
107

केशवसुत स्मारक

केशवसुतस्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी 08 मे 1994 रोजी कुसुमाग्रजांनी केलेले भाषण –

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री राम शेवाळकर, समस्त मराठी लेखक, ज्यांच्या संबंधात सर्वजण नेहमी धास्तावलेले असतात ते माजी सत्यकथेचे संपादक श्री.पु. भागवत, मधुमंगेश आणि मित्र हो!

कुसुमाग्रज

मी न बोलण्याच्या निर्धाराने येथे आलो होतो, पण माधवरावांनी  (गडकरी) स्वत:च्या अधिकारामध्ये तो निर्णय घेऊन टाकला आहे. अर्थात संपादकांना आपण बऱ्याच सवलती दिलेल्या असतात. ते आपल्या लेखामध्ये तर खाडाखोड करतातच. परंतु आपल्या जीवनाच्या व्यवहारातही पुष्कळदा खाडाखोड करतात. तेव्हा न बोलण्याचा निर्धार एवढ्याचसाठी, की केशवसुतांसंबंधीची महती किंवा त्यांचा मोठेपणा यांच्या पुनरुक्तीचे आता खरोखरीच कारण नाही. काळ हा सर्वात मोठा समीक्षक आहे. त्या काळाने केशवसुतांचे मराठी साहित्यातील, कवितेतील सर्वोच्च स्थान सिद्ध केले आहे.

आपण त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या परिसरामध्ये त्यांचे स्मारक करत आहोत ही गोष्ट अतिशय आनंदाची आहे. आणि या घटनेला माझा हातभार कोठेतरी लागावा (तेलभार नव्हे) म्हणून मी या ठिकाणी समईची एक ज्योत पेटवली. ते केशवसुतांना केलेलं अभिवादन आहे. या ठिकाणी हे जे स्मारक झालेले आहे ते उत्तम स्मारक झाले आहे यात शंकाच नाही. केशवसुतांचे स्मारक कसे असावे या संबंधी माझ्या काही कल्पना आहेत. येथे तुमच्यासमोर केशवसुतांच्या कविता म्हटल्या गेल्या, वाचल्या गेल्या. खरं तर, मला असं वाटतं, की केशवसुतांच्या कविता सभास्थानी वाचू नयेत. केशवसुतांची कविता ही एकांतात, स्वत:वाचण्यासाठी आहे. ती कविता हजारो लोकांसमोर वाचण्यासारखी नाही. काहीही असो. पण या ठिकाणी सुंदर सभागृह उभारलं आहे, त्याप्रमाणे त्यांच्या घराची डागडुजीही करण्यात आली आहे. आणि या आसमंतामध्ये आणखी काही तरी करावं;  व्हावं अशी सूचना मी कर्णिक यांना केली आहे. केशवसुतांचा पुतळा उभारावा असं मी म्हणणार नाही. इथं मागे पुतळा आहे. प्रश्न असा आहे, की केशवसुतांचे विश्वासार्ह असं एकही छायाचित्र उपलब्ध नाही. चित्र उपलब्ध नाहीच आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये म्हटलेलं होतं, की  कोणीही पुसणार नाही, कवी तो होता कसा आननीमाझं काव्य जेव्हा सर्व लोकांच्यापर्यंत जाऊन पोचेल; त्याचा सुगंध; त्याचा प्रवाह जेव्हा रसिकांपर्यंत पोचेल तेव्हा हा कवी कसा होता? त्याचा मुखवटा कसा होता? तो गोरा होता, की काळा होता? उंच होता, की ठेंगणा होता? हा प्रश्न पुन्हा जाहीरपणे विचारला जाणार नाही. आणि तशी वेळ येणार नाही, म्हणजे येऊ नये. अनेक कवितांमध्ये केशवसुतांनी हे सांगितलेले आहे, की कवी आणि कविता यांच्यामध्ये एक अभिन्नता आहे. ही अभिन्नता तशीच राहू द्यावी. त्यांची एक कविता आहे. अशी असावी कविता फिरून कशी नसावी कविता फिरून असे सांगायला तुम्ही कोण आलात?” त्याच कवितेमध्ये त्यांनी म्हटलंय, की कवितेबरोबर राहू द्यावे. तुम्ही त्याच्यामध्ये व्यत्यय आणू नका. तुम्हाला ती कविता ऐकायची असेल तर ऐका, खिडकीखाली उभे राहा आणि ती कविता ऐका. प्रत्यक्ष कवीला भेटू नका.जॉर्ज बर्नार्ड शॉ याने त्याच्या एका नाटकामध्ये त्या अर्थाचे एक छान वाक्य लिहिलं आहे. त्यानं लिहिलं आहे कवी तुमच्याशी नाही बोलत, कवी स्वत:शी बोलत असतो. तो मोठ्याने बोलत असतो आणि भोवतालचं जग ते ऐकत असतं.केशवसुतांची काव्यासंबंधीची कल्पना तीच आहे. त्यांनी तेच म्हटलं आहे. माझी कविता मी स्वत:शीच गुणगुणत आहे; हा माझा स्वत:शीच चाललेला एक संवाद आहे. आणि या संवादामध्ये कुणीही व्यत्यय आणू नये. म्हणून केशवसुत हे त्यांच्या कवितेपासून किंवा कवितेचे जे काही परिणाम असतात त्यांच्यापासून सतत दूर राहिले आहेत. 

मालगुंड

केशवसुतांचीकाव्यासंबंधीची भूमिका काय होती याबद्दल त्यांचे एक वाक्य लक्षात घ्यायला फार चांगलं आहे. त्यांनी एका कविमित्राला लिहिलेलं आहे. त्या मित्रानं त्यांच्याकडे काही कविता पाठवल्या असतील. त्यावर केशवसुत  म्हणतात, बाबारे, कविता ही आकाशातून कोसळणारी वीज आहे आणि ती धरण्याचा प्रयत्न करणारे शेकडा नव्याण्णव टक्के लोक होरपळूनजळून जातात. म्हणून तुला इशारा देऊन ठेवतो. होरपळूनजळून गेलेले कवी लक्षात घे. त्यांच्या काव्यामध्ये त्या जळण्याच्या जखमा आहेत आणि तरीसुद्धा ते महान काव्य आहे. वीज त्यांनी पकडली आहे, ती पकडल्यावर यातना होणार, वेदना होणार, जखमा होणार. माणूस जळणार, सर्व काही होणार.केशवसुतांच्या बाबतीत ते सर्व झाले आहे. दैन्य, दारिद्र्य आणि लाचारी- लाचारी नव्हती पण दैन्य होतं, दारिद्र्य होतं. आणि तशा परिस्थितीमध्ये आणि वयामध्ये त्यांनी त्यांचं सर्व आयुष्य काढलं. आणि कविता ही त्यांनी त्यांच्या श्रद्धेचा विषय बनवली. त्यांच्या दृष्टीनं, कविता किंवा काव्य हे एक व्रत आहे. मी तर असं म्हणेन, की कवितेला व्रत मानणारा केशवसुत हा गेल्या शंभर वर्षांमध्ये एकमेव असा कवी आहे, दुसरा कोणी नाही. आम्हीही नाही आहोत. आम्ही त्या कवितेचा व्यवसाय केलेला आहे. व्यवसाय करण्यामध्ये चूक काहीही नाही. सैन्य पोटावर चालतं असं नाही तर कवीही पोटावर चालतो. त्यांनाही पोट असतं. त्यांच्यासाठी हे करावं लागतं. तेव्हा व्यवसाय करण्यामध्ये गैर काहीही नाही. परंतु केशवसुतांनी व्यवसाय केला नाही तर ते एक व्रत मानलेलं आहे. आणि ते व्रत मानल्यामुळे कवितेपासून त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही. पैशाची केली नाही, भीतीची केली नाही आणि लोकांनीही त्यांची अपेक्षा मान्य केली. ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या कवितेकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यांचा पहिला कवितासंग्रह ते गेल्यानंतर पंधरा वर्षांनी प्रकाशित झाला आणि तो हरि नारायण आपटे यांनी केला आहे. केशवसुत तेव्हा लोकांसमोर आलेले आहेत. गडकरी हे लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेले कवी, नाटककार. बालकवी प्रसिद्ध कवी. त्या दोघांनी सांगितलं, की आम्ही केशवसुतांचे चेले आहोत!’ त्यांना लोकप्रियता समाजात प्रचंड प्रमाणात मिळाली आहे. त्यांचे गुरू केशवसुत आहेत. केशवसुतांना जी काही प्रसिद्धी मिळाली; लौकिक मिळाला तो त्यांना त्यांच्या मरणानंतर अनेक वर्षांनी मिळाला आहे. परंतु त्याची खंत तुम्हा-आम्हाला वाटली तरी केशवसुतांना नव्हती. केशवसुतांनी कधीही यशाची, पैशाची, कीर्तीची अपेक्षा केलेली नाही. त्यांनी असं म्हटलंय, की कवीला भेटायचं असेल तर त्याच्या कवितेत भेटा. म्हणून केशवसुतांचा पुतळादेखील उभारायचं कारण नाही. त्यांच्या कवितांचे पुतळे या ठिकाणी उभे करा. झपुर्झासारखी कविता आहे, नवा शिपाई सारखी कविता आहे, ‘तुतारीसारखी कविता आहे. ते शिल्पकाराला आव्हान आहे. प्रचंड पाच-दहा एकराची जागा मिळवा. सरकारकडून घ्या. सरकार जरूर देईल.

एक प्रसिद्ध वाक्य आहे. जगात दोन गोष्टी अशा असतात, की त्यांच्यासंबंधी कोणीही सतत बोलत असतात. एक हवा आणि दुसरी गोष्ट सरकार. आणि ती बोलायची खोड असते. परंतु ती लोकांची वृत्ती आहे. सरकारही काही करत असते. आणि या स्मारकासाठी काही तरी आपल्या शासनाने मदत केली आहे. या परिसरामध्ये केशवसुतांच्या कवितांचे पुतळे-भव्य पुतळे उभारा, तरच ते महाराष्ट्राच्या कवितेचे तीर्थस्थान होईल. मालगुंड हे गाव केशवसुतांचं जन्मगाव आहे. त्या ठिकाणी स्मारक केलं आहे. त्यामुळे मी तरी असं म्हणेन, की मराठी काव्याची राजधानी म्हणून मालगुंड हे गाव प्रसिद्धीस यावं.केशवसुतांच्याकाव्याचं एक भव्य स्मारक त्या ठिकाणी उभं राहवं. ते उभं करण्याची ताकद मधुमंगेशआणि त्यांचे इतर सहकारी यांच्यामध्ये जरूर आहे. तेव्हा त्यांनी मोठ्या स्मारकाची योजना करावी. महाराष्ट्राचं साहित्यविषयक तीर्थस्थान अशी प्रतिष्ठा त्या गावाला प्राप्त व्हावी आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्व वाङ्ममयप्रेमी लोक तिथं यायला पाहिजेत अशा प्रकारचं या स्मारकाचं स्वरूप असावं अशी विनंती करून आणि सूचना करून आणि या ठिकाणी उद्घाटन करण्याचा आपण मला जो सन्मान दिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी आपला निरोप घेतो.

संग्रहराम देशपांडे 8600145353/7385401938

———————————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

  1. नाशिकचे भूषण ,ज्ञानपीठ पारितोषिक विजेते , आदरणीय कवी, नाटककार कुसुमाग्रजांचे कवीवर्य केशवसुतांविषयीचे खुप छान भाषण वाचावयास मिळाले.

  2. कुसुमाग्रजांनी केशवसुतांच्या स्मारक उद्घाटन प्रसंगी केलेले भाषण भावले. उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार!

  3. लेख खुपच अप्रतिम आहे, यामुळे कवीची ओळख होते. कवी स्वःतशी बोलत असतो. कवीला प्रत्यक्ष भेटु नका, त्यांच्या कवितेत त्याला पहा व भेटा. संजय कुळकर्णी जळगांंव ९८२२५४८१६०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here