केकावली (Kekavali)

0
626
_kekavali

 

‘केकावली’ ही मोरोपंताची रचना प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. मोरोपंत हे पंडित कवी.  त्यांनी ‘श्लोक केकावली’ लिहिण्यापूर्वी ‘आर्या केकावली’ नावाची रचना केली होती. त्यातील आर्या सुंदर व भावस्पर्शी आहेत. उदाहरणार्थ, ‘श्रीरामा तू असशी, माझ्या शिरावरी जागा | आम्हां तुझ्या पायावाचून निर्भय नसे दुसरी जागा’ अशी सुंदर रचना ‘आर्या केकावली’मध्ये होती.

‘श्लोक केकावली’मध्ये शब्दांच्या चमत्कृतीकडे जास्त लक्ष दिले गेले आहे. मयुराने स्वतःच्या उद्धारासाठी जो करूण टाहो फोडला त्या केका म्हणजे मयुराच्या केकांचा संग्रह म्हणजे ‘केकावली’ होय. ‘केकावली’ हे प्रतीक अतिकारूण्यपूर्ण उतरले. त्याची रचना दीर्घ समासाची, त्यामुळे समजण्यास कठीण झाली आहे. बुद्धिवैभव, विरहव्याकुळता, उपदेश, देवाविषयी लडिवाळपणा असे श्लोक ‘केकावली’त आहेत. श्लोकांत सुसंगती सदा घडो । सुजन वाक्य कानी पडो । कलंक मातीचा झडो । विषय सर्वथा नावडो । अशा स्वरूपाचे व्यापक विचार मांडले गेले आहेत. आत्मिक उन्नती साधणे हा ‘केकावली’चा उद्देश दिसतो. रसिकांचे अंतकरण श्लोक ‘केकावली’ वाचताना द्रवल्याशिवाय राहत नाही. ते काव्य अप्रतिम, अतिप्रेमळ आहे. मोरोपंत यांच्या बुद्धीचा पूर्ण विकास त्यात दिसतो. देवाविषयी लडिवाळपणा, भय, प्रेम, कवित्व, बुद्धिवैभव या सर्वांचे मधुर मिश्रण म्हणजे ‘श्लोक केकावली’ होय. न.र. फाटक यांनी ‘श्लोक केकावली’ची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. 

-नितेश शिंदे info@thinkmaharashtra.com
(आधार – समग्र राजवाडे, मराठी वाड्मयाचा इतिहास – स.गं. मालशे, शं.गो. तुळपुळे)

About Post Author

Previous articleअमृतानुभव (Amrutanubhav)
Next articleमहाराष्ट्रातील पहिला नवरात्रोत्सव
नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरिंग आणि एम ए (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. ते क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांच्या साथीने 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे संपादन केले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांनी ‘आशय’ या नियतकालिकाच्या ‘मुंबई’, ‘पु.ल.देशपांडे’ आणि ‘त्रिवेणी’ या विषयांवरील विशेषांकांचे संपादन केले आहे. नितेश यांना ‘के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ (2017) हा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.