कुंभमेळा २०१९ – सावधान, गंगे!

0
40
_Kumbhamela_2019_2.jpg

श्रद्धाळू लोक स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न नदीत स्नान करून साधतात. कुंभमेळ्यात तर करोडो लोक नदीत बुडी मारतात. सहा वर्षांच्या अंतराने अर्ध कुंभमेळा हा प्रयाग (अलाहबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे नदीच्या काठी आळीपाळीने भरवण्यात येतो. कुंभमेळ्यात पापे धुऊन निघतात व मोक्ष प्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. त्याच चार ठिकाणी बारा वर्षांनंतर पूर्ण कुंभ भरवला जातो. एकशेचव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो. त्याच शृंखलेतील कुंभमेळा 2019 प्रयाग येथे जानेवारी 2019 पासून सुरू होत आहे.

कुंभमेळे भरवण्याच्या प्रथेस किती वर्षे झाली हे सांगता येणे कठीण आहे, पण हे नक्की, की हे मेळे आयोजित होणे जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून गंगा, गोदावरी आणि शिप्रा या नद्या दूषित होणे सुरू झाले. कुंभमेळ्यातील यात्रेकरूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चार लाख लोक 1903 मध्ये कुंभला गेले होते, तर 1998 साली दहा दशलक्ष, 2001 साली चाळीस दशलक्ष गेले होते,  तर 2007 साली सत्तर दशलक्ष आणि नुकत्याच झालेल्या 2013 साली प्रयाग येथील कुंभमेळ्यात तर एकशेवीस दशलक्ष भाविकांनी मेळ्यास हजेरी लावून गंगेत आंघोळी केल्या होत्या. मेळा पंचावण्ण दिवस चालला. मौनी अमावस्येला म्हणजे 10 फेब्रुवारी 2013 ला एकाच दिवशी तीस दशलक्ष भाविकांनी एकाच दिवशी गंगेत स्नान केले. कुंभमेळ्याव्यतिरिक्त वर्षभर काहीना काही सण असतातच, की ज्यावेळी गंगास्नान पवित्र समजले जाते. रोजच्या आंघोळी आणि कपडे धुणे हे वेगळेच. गंगेत इतक्या मोठ्या आणि वाढत्या प्रमाणात होणाऱ्या आंघोळींचे प्रमाण बघता विचार करण्याची वेळ आली आहे, की गंगेत स्नान करणे म्हणजे पवित्र होणे खरे आहे का? किंवा लोकांच्या त्या कृत्यामुळे गंगा नदीच्या पवित्रतेत किंवा शुद्धतेत फरक पडतो आहे का?

गंगा 1985च्या आधीपासून कारखान्यांतून निघणाऱ्या दूषित पाणी आणि नदीवर आस्थेने आणि विश्वासाने येत असलेल्या लोकांनी केलेल्या घाणीमुळे दूषित होत आहे. गंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने एम. सी. मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली व न्यायालयानेदेखील तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना गंगेत होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यानंतर ‘गंगा अॅक्शन प्लान’ सुरू झाले. त्यात करोडो रुपये खर्च झाले असून गंगा स्वच्छ होणे दूरच, ती अधिक प्रदूषित होत चालली आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे वाढते औद्योगिकीकरण, लोकांची गंगेवर असलेली श्रद्धा आणि शहरातून वाहत येणारे मलयुक्त सांडपाणी.

_Kumbhamela_2019_4.jpgकारखान्यांतून वाहत येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदी पंचवीस टक्के दूषित होते, तर लोकांची गंगेवर असलेली श्रद्धा आणि शहरांतून वाहत येणारे मलयुक्त सांडपाणी यांच्यामुळे पंच्याहत्तर टक्के.

शासन कारखाने आणि सांडपाणी यांनी गंगेचे प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने STP लावून प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याकरता परदेशातून तांत्रिक आणि आर्थिक मदत घेणे सुरू आहे, पण कुंभमेळ्यादरम्यान निघणारे सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत प्रवाहित करण्यात येते. तो आकडा दोनशे MLD पर्यंत जातो. तो लोकश्रद्धेचा प्रश्न असल्याने केंद्रशासन आणि राज्यशासन ते कसे आवरणार? हिंदू लोकांच्या श्रद्धेला किंवा विश्वासाला आळा घालता येईल का? जर ते करणे शक्य नसेल तर गंगा स्वच्छ किंवा शुद्ध कशी होणार? कुंभाच्या व्यतिरिक्त रोजच्या आंघोळी, कपडे धुणे, गंगेची पूजा, फुले-पत्रावळी गंगेत सोडणे हे सुरूच असते. ते प्रदूषणाचे स्रोत आहेत. चारधामच्या यात्रादेखील गंगा दूषित करण्यात अजून भर घालतात. गंगोत्रीपासून डायमंड हार्बरपर्यंत फिकल कॉलिफॉर्मचे (विष्ठाद्रव्ये) प्रमाण मान्य पातळीपेक्षाही जास्त आहे व ते दरवर्षी वाढतच आहे. रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग येथेही विष्ठाद्रव्येचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. त्याला जबाबदार कोण? तर नक्कीच यात्रेकरूंची वाढती संख्या आणि सरकारची पर्यटन नीती.

गंगेचे वाढते प्रदूषण पाहून उत्तरांचल राज्याच्या पर्यावरण विभागाने पाण्याचे वर्गीकरण चार प्रकारे केले आहे – अ. पिण्यायोग्य, ब. अंघोळीयोग्य, क. शेतीयोग्य आणि ड. अतिप्रदूषित. विभागाने गंगेचे वर्गीकरण “ड” मध्ये केले आहे. त्याचा सरळ  सरळ अर्थ हा, की गंगेचे पाणी कोठल्याही कामाकरता उपयोगाचे नाही!

1903 ते 2015 एवढ्या काळातील कुंभांच्या दरम्यान गोदावरी एकशेतीस पटींनी प्रदूषित झाली आहे. किती दिवस, किती वर्षे आणि किती पैसे लागतील ते प्रदूषण दूर  करण्याला याचा अंदाज लावणे कठीण आहे. तेवढ्या काळात किती लोकांचे पाप धुतले गेले आणि किती लोकांना मोक्ष मिळाला हा भाग नंतरचा आहे. पण (अंध)श्रद्धाळू लोक त्यांच्या  स्वार्थासाठी व ‘प्रेमा’पोटी देशाच्या म्हणजे त्यांच्याच बहुमूल्य नैसर्गिक संपत्तीचे हनन करत आहेत, हे  नक्की.

_Kumbhamela_2019_1.jpgहैदराबाद येथील नॅशनल सेंटर फॉर काँपोझिशनल कॅरॅक्टरायझेशन ऑफ मटिरियलने 2013 जानेवारीच्या कुंभ दरम्यान गंगेच्या पाण्याचे नमुने घेऊन प्रकाशित केलेल्या अहवालाचा उल्लेख नमूद करावासा वाटतो. पाण्यात क्रोमियम सहाचे प्रमाण, निर्धारित केलेल्या मात्रेपेक्षा पन्नास पटींनी जास्त आहे. तशा पाण्यात नुसती डुबकी जरी मारली तरी गंभीर आजार होऊ शकतात. त्यात कॅन्सरची शक्यताही टाळता येणार नाही. अलाहाबाद आणि वाराणसी ह्या ठिकाणी रोज लाखो लोक गंगेत आंघोळ करण्यास येतात. तेथील पाण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला माहिती देताना केंद्र शासन म्हणते, की ह्या दोन्ही ठिकाणी बीओडीचे प्रमाण निर्धारित केलेल्या तीन मिलिग्रॅम पर लिटरपेक्षा कितीतरी मात्रेने जास्त असल्याकारणाने गंगेचे पाणी आंघोळ करण्यालायक नाही; ते पिणे ही तर दूरची गोष्ट.

गंगेच्या पाण्याची अवस्था इतकी वाईट असताना कुंभ दरम्यान आणखी आंघोळी करून तिला प्रदूषित करण्याचे पाप लोक करत आहेत, याचा विचार करणे प्रत्येकाचे काम आहे. नुसती प्रथा पडली आहे म्हणून ती पार पाडायची पण त्यात देशाचे आर्थिक नुकसान व वेळ किती वाया जातो हा विचार करणेही गरजेचे आहे.

गंगा गंगोत्रीपासून डायमंड हार्बरपर्यंत दोनहजार पाचशे किलोमीटर लांब आहे. गंगा डायमंड हार्बरला समुद्रात प्रवेशते. ती संपूर्ण प्रदूषणाने लिप्त आहे. भारतीय लोकांच्या भावना गंगेशी जुळलेल्या आहेत, ते नदीला मां गंगे किंवा गंगा मैया म्हणतात. त्यांच्या मातेची स्थिती दयनीय तर आहेच, पण त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान मोठे होत आहे. शासन कारखानदारांवर दबाव आणून त्यांना दूषित पाणी नदीत सोडण्याअगोदर प्रक्रिया करण्यास बाध्य करू शकते. शासन स्वतः सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडण्याचा प्रयत्न ठेवते, पण नदी लोकांची श्रद्धा, आस्था आणि विश्वास यांमुळे दूषित होत असेल तर  त्यावर नियंत्रण कसे आणणार? आणि तेच खरे गंगेचे दुर्भाग्य आहे. तो हिंदू लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्या भावनेपोटी 1985 पासून झालेला खर्च –

1. 1985 ते 2000 गंगा एक्शन प्लान – बाराशे कोटी
2.  2009 मध्ये वर्ल्ड बँकेकडून एक बिलियन अमेरिकन डॉलर
3. 2014 मध्ये नमामी गंगे करता वीस हजार कोटी रुपये

आणि  इतका पैसा ओतूनही  नदी प्रदूषण थांबेल याची काही शाश्वती नाही.

कारखान्यांतून निघालेल्या दूषित पाण्यापेक्षा नदी दूषित होण्यामागे निर्माल्य जास्त कारणीभूत आहे. प्रदीपकुमार मैती हे पश्चिम बंगालचे विद्वान. ते माहिती देतात, की रोज गंगेत दोन लाख टन निर्माल्य नदीला दूषित करते. नदीला फुले वाहून पूजा करणे म्हणजे तिला दूषित करण्यासारखेच आहे. लोक ते कृत्य नकळत, अजाणता करत असतात.

गंगा नदीमधे स्वतःला स्वच्छ करण्याची शक्ती होती. पाण्यात असणारे व्हायरस आणि जल वनस्पती हे जलप्रदूषणाची काळजी घेत. पण वाढत्या प्रदूषणामुळे त्या दोन्ही गोष्टी नष्ट होत आहेत.

– विनोद हांडे, vinod_khande@rediffmail.com 

About Post Author

Previous articleसंवेदनांचा शुद्ध अनुभव – कोबाल्ट ब्लू
Next articleजीवनकौशल्य शिक्षणाचा अरूणोदय!
विनोद हांडे नागपूरला राहतात. ते 'बी.एस.एन.एल' कंपनीतून सहाय्यक मुख्‍य व्‍यवस्‍थापक पदावरून 2011 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी पाणी आणि पर्यावरण या विषयांवर लेख लिहिण्‍यास आणि भाषणे देण्‍यास सुरूवात 2012 पासून केली. त्‍यांनी ‘बिसलेरी सारख्या पाण्याचे व बाटलीचे, मनुष्यावर आणि पर्यावरणावर होणारे दुष्‍पपरिणाम’, धर्मांमधील दहन-अफन विधींमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, श्वास घेऊद्या गंगेला, मधुमेही' महाराष्ट्र असे अनेक विषय हाताळले आहेत. हांडे यांनी लिहिलेले लेख अनेक मासिके आणि वृत्तपत्रांतून प्रकाशित झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9423677795