किन्होळा गावचा स्वामी विवेकानंद आश्रम

2
284

चाळीस वर्षांचे जालन्याचे शिक्षक नारायण कौतिकराव भुजंग हे विवेकानंदांचे वाङ्मय वाचून प्रेरित झाले आणि त्यांनी त्यांच्या किन्होळा या गावी स्वामी विवेकानंद आश्रम काढला. त्यासाठी स्वत:ची तीन एकर जमीन दिली आणि केंद्र चालवण्यासाठी ते दरवर्षी पस्तीस-चाळीस हजार रुपये खर्च करतात. किन्होळा हे गाव बदनापूर तालुक्यात आहे. किन्होळा या गावामध्ये प्रवेश केल्यानंतर, पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर तीन एकर परिसरामध्ये त्या आश्रमाची स्थापना करण्यात आलेली आहे. आश्रमाची स्थापना डिसेंबर 2016 मध्ये झाली. आश्रमाचे संस्थापक नारायण भुजंग हे शेतकरी कुटुंबातून शिकून शिक्षक झाले. नारायणराव एम ए, बी एड शिकलेले आहेत. त्यांची नोकरी जालन्याच्या लोकमान्य विद्यालयात आहे. ते इंग्रजी विषय शिकवतात. ते दर रविवारी किन्होळ्याला केंद्राच्या कामासाठी आणि ध्यान व चिंतन यासाठी जातात. ते तेथे जातात तेव्हा बरोबर अनेक माणसांना जालन्याहून व किन्होळ्याहून घेऊन जातात आणि अशा प्रकारे केंद्राच्या कार्याचा प्रचार करतात. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रभावित होऊन वडिलोपार्जित डोंगर परिसरातील जमीन या कार्यासाठी दान दिली व स्वत:च आश्रमाची स्थापना केली. ते म्हणाले, की मी विवेकानंदांची दहा खंडांतील ग्रंथावली 2015 साली सुट्टीत वाचली आणि त्यांतील विचारांनी भारावून गेलो. वाटले, की आजच्या संभ्रमित समाजाला याच विचारांची गरज आहे. म्हणून त्यांचा प्रसार केला पाहिजे.

सध्या आश्रमामध्ये वीस बाय वीस जागेवर रामकृष्ण-विवेकानंद ध्यानकेंद्र आहे. तेथे विद्यार्थी, तरुण ध्यान करण्यासाठी येत असतात. नारायण भुजंग हे सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ आश्रमामध्ये घालवतात. ते तेथे विद्यार्थ्यांना बाल संस्काराचे, तसेच विवेकानंद यांच्या विचारांचे धडे देतात.

आश्रमामध्ये महत्त्वाचे विविध कार्यक्रम वर्षभर सुरू असतात. आश्रमामध्ये करंज, कडुनिंब, आवळा, नारळ, चिकू, जांभूळ, फणस, वड, पिंपळ अशी झाडे लावण्यात आली आहेत. त्यामागे पर्यावरणीय दृष्टिकोन आहे. झाडांचे संगोपन चांगल्या रीतीने करण्यात येत आहे.

आश्रम निसर्गाच्या कुशीत वसलेला असल्याने तेथे प्रवेश केल्यानंतर मन प्रसन्न होते. ध्यान केंद्रामध्ये ध्यान केल्यानंतर मनाला नवीन ऊर्जा प्राप्त होते. आश्रम डोंगररांगांमध्ये आहे. तेथे हरीण, मोर, ससे, सांबर या वन्य प्राण्यांचेही दर्शन होते. भुजंग यांनी दोनशे नवी झाडे आश्रम परिसरात लावली आहेत. निसर्गाच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे मनाशी संबंधित अनेक समस्या आपोआप सुटतात याची अनुभूती आश्रमाला भेट दिल्यानंतर येते.

आश्रमाचे सदस्य विवेकानंदांच्या विचारांची व्याख्याने आश्रमाच्या वतीने जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये, कारागृहे या ठिकाणी आयोजित करतात. त्यामध्ये विवेकानंदांच्या सकारात्मक विचारांची माहिती देऊन शेवटी सर्वांना विवेकानंदांच्या पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येते. विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. तिला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. दरवर्षी आश्रमातर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येते. विवेकानंदांचे सकारात्मक विचार, आश्रमातर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम यांची माहिती दिनदर्शिकेत असते. तिचे मोफत वाटप ग्रामीण व शहरी भागांत करण्यात येते. आश्रमाच्या सदस्यांचा अभ्यासवर्ग दरमहा भरतो. त्यामध्ये सर्व सदस्य त्यांची मते दिलखुलासपणे व्यक्त करतात. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका !’ असे विवेकानंद सर्वांना सांगत. तेव्हा सर्वांना त्यांचे ध्येय साध्य करून घेण्यासाठी त्यांच्या या विचारांची व आश्रमाची निश्चितच मदत होईल असा आत्मविश्वास वाटतो. आजपर्यंत पंचक्रोशीतील तसेच शहरी भागातील अनेक विवेकानंद विचारप्रेमींनी या आश्रमाला भेट देऊन त्याची माहिती करून घेतली आहे.

नारायण भुजंग यांचे आईवडील गावी असतात. ते त्यांची सहा एकर शेती कसतात. त्यात कापूस, मका अशी पिके घेतात. नारायण यांच्या तीन बहिणी परिसरातच दिलेल्या आहेत. त्या सर्वांच्या संमतीने विवेकानंद आश्रमास जमीन दिली असे नारायण भुजंग सांगतात. त्यांची पत्नी व दोन मुले असा संसार जालना शहरात थाटला आहे.

– राजेंद्र साळवे 8412842013 rajendrads84@gmail.com

—————————————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. विवेकानंदांचे विचार खरोखरच आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरू शकतील. भुजंग सरांनी चांगले कार्य सुरू केले आहे.

  2. नारायण भुजंग सर यांचे कार्य महान आहे. कारण स्वामी विवेकानंद यांनी जे आदर्श विचार, मार्गदर्शन, अध्यात्मक धर्म, व्यक्तीच्या जडणघडणीत आजच्या काळात स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्येक व्यक्तित ऊर्जा निर्माण करू शकते. जे सेवा व कार्य नारायण भजन सर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here