कार्तिक पौर्णिमा!

0
21
kartik_pornima

     कार्तिक मासात महिनाभर नित्य, पहाटे स्नान करतात, त्याला कार्तिकस्नान असे म्हणतात. हे एक व्रत असते अश्विन शुध्द दशमी, एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी स्नानाचा प्रारंभ करून कार्तिकी पौर्णिमेस त्याची समाप्ती करतात. स्नान पहाटे दोन घटका रात्र उरली असता, नदीत किंवा तलावात करतात. प्रथम संकल्प करून उर्ध्व देतात आणि नंतर पुढील मंत्र म्हणून स्नान करतात.

कार्तिकेS हं करिष्यामि प्रात:स्नानं जनार्दन |
प्रीत्ययं तव देवेश जतेSस्मिनं स्नातुमृहात: |

     अर्थ- हे जनार्दना, देवेशा, मी तुझ्या प्रीतीसाठी या जलामध्ये कार्तिक मासात प्रात:स्नान करीन.
हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी घेतलेले असेल तर स्नानानंतर अभिकाष्ठक नावाचे स्तोत्र पठण करतात. स्नानानंतर पुनश्च उर्ध्व देऊन स्नानविधी पूर्ण करतात. संपूर्ण महिनाभर प्रात:स्नान करणे शक्य नसल्यास कार्तिक शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत निदान पाच दिवस तरी ते करावे असे सांगितले आहे. या व्रतामुळे वर्षभरातील सर्व पापांचे क्षालन होते!

     कार्तिक पौर्णिमा या दिवशी कार्तिक स्नानाची समाप्ती होते. ही तिथी उत्तर भारतात पवित्र व पुण्यप्रद मानली जाते. या दिवशी सोनपूर, गढमुक्तेश्वर (मेरठ), वरेश्वर (आगरा), पुष्कर (अजमेर) इत्यादी ठिकाणी जत्रा भरते. या शुभदिनी स्नान व दान करणे आवश्यक मानले जाते. पुष्कर, कुरुक्षेत्र आणि वाराणसी ही तीर्थक्षेत्रे स्नान व दान यासाठी महत्त्वपूर्ण मानली जातात.

     हे झाले कार्तिकस्नानाचे पूर्वापार चालत आलेले माहात्म्य, असे वाटते की पहाटेच्या शांत वेळी देवळाच्या पवित्र वातावरणात घाटावर किंवा नदीकाठी पाण्यात अर्घ्य वाहून, त्यात पापाने मलिन झालेले मन शुध्द करण्याचा प्रयत्न, हा धर्मसंमत मार्ग असावा. मनातल्या मनात, सगळ्या वर्षात कळत-नकळत झालेल्या पापांची उजळणी करुन त्याबद्दल पश्चात्ताप! पापाची कबुली देणे आणि पश्चात्ताप करणे हा विधी पाश्चात्यांच्या धर्मशास्त्रात अधिक स्पष्ट स्वरूपात नमूद केला आहे. ते ख्रिश्चन धर्माचे वैशिष्ट्य आहे. ह्यामुळेच काही वर्षांपूर्वी, क्रिकेट जगतात दक्षिण अफ्रिकेच्या हॅन्से क्रोनियेने ‘मॅचफिक्सिंग’ केल्याच्या अपराधाची कबुली दिल्यानंतर संपूर्ण जगात वादळ निर्माण झाले होते. “कन्फेशन” दिले की अपराध माफ व्हावा का?  त्यामुळे अपराध क्षम्य ठरतो का? हा प्रश्न त्यातून निर्माण होऊ शकतो.

     कोणतीही संस्कृती ही मानवी जीवन जास्तीत जास्त निर्मळ, निकोप, उन्नत व्हावे ह्यासाठी नीतिनियम ठरवत असते. कार्तिकस्नान हेही असेच व्रत. पण आजच्या जगात अशी शांत, पवित्र, ठिकाणेच उरलेली नाहीत. पहाटे उठणे ही गोष्ट कालबाह्य झाली आहे. अफाट लोकसंख्येमुळे जिथे कुठे अशी सामुदायिक स्नान वगैरे होतात, तिथे परिस्थिती नियंत्रणापलीकडे जाते. अशा ठिकाणी अनारोग्याचा फैलाव होतो. भागदौड होते आणि पाचपन्नास जीव नाहक बळी जाऊ शकतात.

     तर पूर्वजांच्या ह्या व्रतात थोडासा बदल करून आपल्याच घरी शांत मनाने, अंतर्मुख होऊन, आपल्या मनात कळत-नकळत घडून गेलेल्या वाईट गोष्टींची उजळणी करून, त्याबद्दल माफी मागून त्यांची पुनरावृत्ती होणार नाही असा संकल्प करावा, असे सुचवावेसे वाटते.  शास्त्र आणि मानसशास्त्रही ह्याचा पुरस्कार करतात.

ज्योती शेट्ये
भ्रमणध्वनी : 9820737301
jyotishalaka@gmail.com

About Post Author

Previous articleनाना प्रयोगाकारणे
Next articleमानवतावादाचा अर्थ
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.