कविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे

12
101

प्रभाकर बरवे हे भारतातील श्रेष्ठ चित्रकारांपैकी एक होते. त्यांचे भारतीय आधुनिक कलेतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची कलेवरील निष्ठा व कलेशी बांधिलकी हे गुण संशयातीत होते. ते त्यांना झालेल्या व्याधीमुळे मृत्यूपूर्वीचे शेवटचे जवळजवळ दोन महिने सायन इस्पितळात होते. ते चित्रकलेवर इस्पितळातील खाटेवर पडून तासन् तास बोलत असत; रात्री अगदी एक वाजेपर्यंतसुद्धा. इस्पितळातील काळोख, औषधांचा दर्प, विव्हळणारे इतर रुग्ण आणि त्यात आमची कलेवरील चर्चा! ते मिश्रण विचित्र वाटत असे. बरवे यांचे दुर्बल झालेले शरीर व त्यांना सततची वेदना असतानासुद्धा ते कलेचा विचार कसा काय करू शकतात असा प्रश्न मला पडत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या अवस्थेतसुद्धा त्यांची विनोदबुद्धीही तल्लख राहिली होती.

माझी त्यांच्याशी पहिली भेट झाली ती 1972 मध्ये. त्यावेळी माझे जहांगीर आर्ट गॅलरीत समूह प्रदर्शन भरले होते व ते बघण्यासाठी ‘विव्हर्स सेंटर’मधील काही चित्रकार आले होते. त्यात बरवेही होते. बरवे यांना माझी चित्रे आवडली व त्यांनी मला समोवार येथे चहापानासाठी (समोवार हा जहांगीर आर्ट गॅलरीतील कॅफे 2015 पर्यंत चालू होता) बोलावले. त्यांनी त्यांना माझी चित्रे का आवडली ते थोडक्यात सांगितल्यावर, ते ‘आता स्टुडिओवर येत जा’ असे म्हणाले. मला आनंद झाला.

त्यांचा स्टुडिओ ग्रँट रोड स्टेशनजवळील गावदेवी भागात ‘रावते चाळ’ येथे होता. स्टुडिओ म्हणजे साधारण 10 x14 फूट आकाराची खोली होती. ते पूर्ण झालेली चित्रे खोलीतील एका कोपर्‍यात ठेवत. त्यांचे चित्रकाम उरलेल्या भागात चालत असे. ते पूर्व कुर्ल्याच्या शिवसृष्टी वसाहतीत राहण्यास 1980 च्या सुमारास गेल्यावर घरातच काम करत असत.

ते चित्रांविषयीची चर्चा मी स्टुडिओवर पोचल्याबरोबर, वेळ फुकट न घालवता सुरू करत. चर्चेला प्रारंभ साधारणतः त्यांनी नुकतेच पूर्ण केलेले किंवा अर्धवट झालेले चित्र यापासून होई. त्यांच्या बोलण्यात चित्राच्या यशस्वी भागापेक्षा, त्यांना चित्र करताना, काय काय अडचणी आल्या ते अधिक असे. चित्राच्या दृश्य भागापासून सुरू झालेली चर्चा चित्रातील घटकांचे परस्परसंबंध व त्यानंतर त्या चित्राला प्रेरक ठरलेला अनुभव किंवा प्रेक्षकाला त्यातून काय प्रतीत व्हावे अशा क्रमाने चालत असे.

बरवे यांची भेट होईपर्यंत, माझी कृतिशील चित्रकारांविषयी (Practising artist) कल्पना अशी होती, की ते सौंदर्यशास्त्र या कलेचे तत्त्वज्ञान यावर फक्त बोलत असावेत, पण बरवे प्रत्यक्ष काम व त्यांची प्रक्रिया यांवर चर्चा करत. त्यामुळे मला जरा हायसे वाटले. मला वाटले, की मी अशा चर्चेत सहभागी होऊ शकेन! पुढे, असे जाणवले, की ती त्यांची युक्ती समोरच्या व्यक्तीला चर्चेत सहभागी करून घेण्यासाठी असे. खरे तर, ते स्टुडिओवर कामासाठी आलेल्या सुताराला किंवा इलेक्ट्रिशीयनलाही चित्राविषयी काय वाटते असे विचारत. त्यांचे नीट ऐकूनही घेत व नंतर ते स्वतःचे त्यावरील निरीक्षण इतरांना सांगत. तो त्यांचा प्रयत्न एक प्रकारे सामान्य व्यक्ती चित्राकडे कशी बघते, त्याला काय समजते हे जाणून घेण्याचा असे. एका श्रेष्ठ चित्रकाराच्या मनात, त्याच्या विचारप्रक्रियेत त्या प्रकारच्या गप्पागोष्टींमुळे प्रवेश करता येत असे.

मला आठवते, की आम्ही 11 फेब्रुवारी 1977 हा संपूर्ण दिवस त्यांच्या स्टुडिओमध्येच घालवला होता. त्या दिवशी एका मंत्रिमहोदयांचे निधन झाल्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती, पण तोपर्यंत सकाळचे दहा वाजले होते. मी म्युझियममध्ये (माझ्या कार्यालयात) पोचलो होतो. माझ्या लक्षात आले, की बरवेही ‘विव्हर्स सर्विस सेंटर’मध्ये पोचले असणार. कारण ते वक्तशीर होते. मी लगेच त्यांना फोन केला व विचारले, ‘मी सुट्टीमुळे मोकळा आहे. तुमच्या स्टुडिओवर येऊ का?’ ते म्हणाले, ‘ऑफिसमध्ये या.’ मी तिकडे पोचलो व तेथून आम्ही दोघे चालत त्यांच्या स्टुडिओवर गेलो. ‘काण्टेप्लेशन’ हे चित्र त्यांनी त्यावेळी नुकते पूर्ण केले होते. त्यांनी मला 1970 च्या दशकातील त्यांच्या कामाची प्रक्रिया व तंत्र त्याच्या अनुषंगाने सांगितले. त्यामुळे मला ते एनॅमल रंगद्रव्य का वापरत याचा काहीसा उलगडा झाला. तो म्हणजे रंगद्रव्य हे अपारदर्शक व तत्काळ वाळणारे माध्यम असल्यामुळे सुकल्याबरोबर उत्स्फूर्तपणे काम करण्याला अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे चित्रात झपाट्याने फेरफार करणे शक्य होत असे. त्यांनी तेच माध्यम नंतर वेगळ्या पद्धतीने हाताळलेले दिसते. त्यांनी ती चित्रे 1980 च्या दशकात काढली. त्यांच्या चित्रांतील प्रतिमा 1980 नंतर अधिकाधिक विशिष्ट (specific) होत गेल्या व त्यात अवकाश त्रिमित होत गेले. तेथे त्यांना तरल अशा रंगछटा वापरणे गरजेचे होते. त्या प्रकारचे तंत्र त्यांच्या ‘एक्झिस्टन्स’ या चित्रात दिसते.

बरवे यांचे दृश्यकलेखालोखाल प्रेम होते ते कवितेवर. त्यांच्या काही कविता साहित्याला वाहिलेल्या ‘सत्यकथा’ ह्या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचे आवडते कवी म्हणजे ऑक्टोविया पाझ व बालकवी. त्यांच्या बऱ्याच चित्रांची शीर्षकेही काव्यात्मक आहेत. जसे, ‘अदर शोअर’, ‘रिवर ऑफ सायलेन्स’, ‘दि लास्ट कॉल’ वगैरे. एकदा ते म्हणाले, की त्यांच्या ‘ब्लू क्लाऊड’ या चित्राची प्रेरणा आहे कालिदास यांच्या मेघदूत या काव्यात. त्यांना त्यातील ढग हा संदेशवाहक दूत ही कल्पना आवडली होती. ते म्हणाले, की मलाही तशीच, ढग हा संदेशवाहक दूत म्हणून कविता लिहायची होती. तेव्हा मी विचारले, ‘कोठे आहे ती कविता?’ त्यावर ते म्हणाले, ‘नाही लिहू शकलो.’ मी विचारले, ‘का?’ तर हसत हसत म्हणाले, ‘आमचा ढग संदेश-निरोप विसरला व त्यामुळे त्याला परत यावं लागलं!’

त्याच ‘ब्लू क्लाऊड’ चित्राला ‘ललित कला अॅकॅडमी’च्या दिल्ली येथील प्रदर्शनात राष्ट्रीय पारितोषिक 1976 मध्ये मिळाले. ते पारितोषिक साजरे करण्यासाठी आम्ही चार मित्र बरवे यांच्या स्टुडिओत जमलो होतो. त्यात चित्रकार वानखेडे, पत्रकार व कलासमीक्षक विजय शर्मा, बरवे आणि मी होतो. त्यावेळी चित्रांच्या शीर्षकावरून चर्चा चालू असताना, मी बरवे यांना म्हटले, की ‘ब्लू क्लाउड’ हे शीर्षक फार वर्णनात्मक आहे व उलट, ते चित्र खूप काव्यात्मक व रोमँटिक आहे. त्यामुळे शीर्षक विषयाचे सूचन अप्रत्यक्षपणे करणारे पाहिजे होते. त्यावर विजय शर्मा थोडे रागावले. कारण मी एवढ्या मोठ्या चित्रकाराच्या शीर्षकावर आक्षेप घेतला होता व एक प्रकारे, त्यांच्या दृष्टीने चित्रकाराचा अपमान केला होता! पण राग आवरून विजय शर्मा म्हणाले, ‘त्यापेक्षा तू चित्राकडे नीट बघ’ व नंतर विनोदाने म्हणाले, ‘तुला माहीत आहे ना शेक्सपीयर काय म्हणाला- नावात काय आहे? माझेच बघ. माझे नाव आहे विजय, पण मी नेहमीच असतो पराभूत.’ त्यावर तात्काळ बरवे म्हणाले, ‘तो म्हणतोय ते बरोबर आहे. माझे नाव आहे प्रभाकर म्हणजे सूर्य. मी आहे मात्र ‘प्रभाकर’ कंदील.’’ प्रभाकर ब्रँडचा कंदील 1950 ते 60 च्या काळात खूप लोकप्रिय होता, पण त्यामुळे त्या प्रसंगीचा ताण नाहीसा झाला.

‘अस्तित्व’ या नावाचा चित्रकारांचा गट 1974 मध्ये स्थापन झाला होता. त्यात बरवे यांचाच पुढाकार होता. तो ग्रूप फार काळ टिकला नाही. तरी त्यातील काही सभासद कलाविषयक चर्चा करण्यासाठी नियमितपणे आठवड्यातून एकदा एलफिन्स्टन कॉलेजजवळच्या ‘मिल्कबार’मध्ये भेटत असत. त्यात स्वत: बरवे, भारती कपाडिया, शकुंतला कुलकर्णी व मी होतो. शिवाय, आमची काही मित्रमंडळीही चर्चेत सामील होत असू. माधव इमारते, भद्रकांत झव्हेरी, गुजराथी नाटककार विरचंद धरमसी वगैरेही येत असत. कधी तेथे अकबर पदमसी, अतुल दोडीया, सुदर्शन शेट्टी, लक्ष्मण श्रेष्ठ हे चित्रकार व रवी कुळकर्णी यांचीही चक्कर असे. मुंबईच्या आर्ट गॅलरीतील प्रदर्शन किंवा साहित्य-कला यांवर चर्चा चालत असे. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग असा होता, की बरवे चर्चेला उपलब्ध असत; शिवाय, ते स्वत:ची प्रतिक्रिया, त्यांचे मत कोठल्याही बाबतीत राखून न ठेवता तात्काळ देत. त्यामुळे मला माझे विचार-कल्पना त्यांच्याबरोबर पडताळून पाहता येत असत. कधी कधी, ते त्यांच्या चित्रांवर परदेशी चित्रकार किंवा समकालीन चित्रकार यांनी केलेली नकारात्मक टिकासुद्धा स्पष्टपणे सांगत असत व त्याबरोबर, त्यावर त्यांनी काय म्हटले हेही सांगत. मग चर्चा त्या दिशेला वळत असे.

बरवे अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या ‘रेसिडेन्सी प्रोग्रॅम’अंतर्गत भारतीय चित्रकार म्हणून अमेरिकेतील याडो येथे 1988 मध्ये गेले होते. ते आम्हा मित्रांना तिकडून नियमितपणे पत्रे पाठवत. त्यावरून ते आम्हाला कोठे आहेत व त्यांची इतर चित्रकारांशी झालेली चर्चा हेही कळत असे. त्याच ठिकाणी बरवे यांची भेट एका अमेरिकन व्यक्तीशी झाली. त्या दोघांची मैत्री झाली. त्यांची चर्चा कविता व दृश्यकला या विषयांवर चालत असे. बरवे यांनी त्या कार्यशाळेत म्हणजे याडो येथे एक चित्र काढले होते. त्यातील एक प्रतिमा होती ‘गोगलगाय’. ती अमेरिकन कवीला त्या चित्रात अनपेक्षित असावी. म्हणून त्याने बरवे यांना विचारले, ‘ती गोगलगाय तेथे काय करत आहे?’ बरवे यांना त्यात थोडासा उपरोधाचा वास आला. म्हणून त्यांनी ते स्पष्ट न करता तिरकस उत्तर दिले, ‘ते माझ्या प्रगतीचे प्रतीक आहे!’

नंतर कधी तरी त्या कवीने त्यांची कविता बरवे यांना वाचून दाखवली. त्या कवितेची पहिली ओळ होती – ‘बॉम्बे इज ए बिग गार्बेज-बिन!’ संपूर्ण कविता मला माहीत नाही, पण त्या ओळीवरून कवितेच्या आशयाची कल्पना करता येते. बरवे ती कविता ऐकल्यावर अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांनी नंतर मला सांगितले, की ‘मी त्या दिवशी संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही, नुसता तळमळत होतो.’ तो त्यांचा तेथील वास्तव्याचा शेवटचा दिवस होता.  त्यामुळे त्यांनी कवीला एक चिठ्ठी लिहून, त्याच्या खोलीवर ठेवून दिली. त्या चिठ्ठीत लिहिले होते, की ‘तुम्ही मला मी त्या ‘गार्बेज-बिन’मध्ये परत जाणार आहे याची आठवण करून दिली आहे.’

मला बरवे अमेरिकेहून परतल्यावर चित्रकार रॉबर्ट रॉसेनबर्ग व जेस्पर जोन्स यांच्या कामाने प्रभावित झालेले आढळले, ते पण कामाच्या गुणवत्तेबरोबर त्यांनी केलेले भरपूर काम व त्यांच्या चित्रांना लिलावात मिळणारी प्रचंड मोठी किंमत बघूनही काहीसे हबकले होते.त्या काळात भारतामध्ये लिलाव नुकते सुरू झाले होते. माझ्या आठवणीप्रमाणे भारतातील पहिला लिलाव 1986 साली झाला. त्या सगळ्यामुळे ते काहीसे संभ्रमित झाले होते. त्यांना त्यांचे ते दोन नवीन अमेरिकन आदर्श व त्यांचा जुना भारतीय आदर्श – ‘संत तुकाराम’, यांचा मेळ कसा घालावा असा प्रश्न पडला होता. कारण त्यांच्या दृष्टीने ‘संत तुकारामां’चे काव्य-अभंग हाही एक प्रकारे समर्पण भावनेतून केलेला आत्माविष्कारच आहे. तो भौतिकवादी स्पर्धात्मक जगापासून दूर होता. त्याउलट, रॉसेनबर्ग व जोन्स हे व्यावहारिक स्पर्धात्मक जगाचे जणू प्रतिनिधीत्व करणारे होते. त्यातून बरवे यांनी त्यांचा मार्ग ठरवला. तो म्हणजे काम करत राहणे व केलेले काम प्रदर्शनरूपाने लोकांसमोर मांडणे, स्पर्धात्मक जगाची चिंता न करता!

त्यांनी अगदी अखेरपर्यंत त्यांचे काम चालू ठेवले. ते इस्पितळातही सभोवतालच्या वस्तूंचे रेखाटन वहीमध्ये थरथरत्या हातांनी करत. त्यांच्या शेवटच्या काही चित्रांपैकी एक रेखाचित्र आहे ते ‘ग्लुकोजचे ड्रीप’. ते एकदा म्हणाले, मी रात्री त्या ड्रीपकडे बघत बसतो- त्यातून ठिबकणाऱ्या थेंबाथेंबांतून माझ्या शरीरात प्रवेश करणाऱ्या ऊर्जेकडे.
दुर्दैवाने तसे काही घडले नाही. बरवे त्यातून बाहेर आले नाहीत व त्यांचे निधन 6 डिसेंबर 1995 या दिवशी झाले.

दिलीप रानडे dilipranade@hotmail.com

About Post Author

12 COMMENTS

 1. Forwardedcthis article to my…
  Forwardedcthis article to my relatives who are relatives of Barve

 2. फारच सुंदर लेख सर. तुम्हाला…
  फारच सुंदर लेख सर. तुम्हाला बरवेंचा सहवास लाभला होता हेच किती भारी आहे. तुमच्या दृष्टिकोनातून बरवे समजून घेताना छान वाटलं. अजून वाचायला आवडेल सर.

 3. chupach chan lekh lihila…
  chupach chan lekh lihila. whachun chup chan vatle.
  ranade sir. namaskar……….

 4. Ranade sir thank you for the…
  Ranade sir thank you for the sharing your association with Mr.Prabhaker Barber you are blessed to be knowing him so closely.lovely memories to read and know him and understand as an artist. Thank you

 5. सर, लेख छान लिहिला आहे…
  सर, लेख छान लिहिला आहे. तुम्हाला बरवेंचा सहवास मिळाला हेच खूप आहे.

 6. Very important article sir…
  Very important article sir for the documentation of Indian visual art history expecting more n more Sir ..very thankful to u n think Maharashtra…

 7. Very nice Sir very important…
  Very nice Sir very important article for documentation of Indian visual art history expecting more n more Sir very thankful to u n think Maharashtra.

 8. खूपच सुंदर लेख होता सर आणि…
  खूपच सुंदर लेख होता सर आणि तुम्ही तो आमच्या बरोबरshare केला म्हणून मनापासून आभार….

Comments are closed.