कल्हणाची राजतरंगिणी – लेखनाचा इतिहास!

कल्हणाचा ‘राजतरंगिणी’ हा भारतात उपलब्ध झालेला, इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा सर्वात जुना एकमेव ग्रंथ आहे. तो ग्रंथ सुमारे साडेआठशे वर्षांपूर्वी खंडकाव्याच्या स्वरूपात संस्कृत भाषेत लिहिला गेला. कल्हणाने हा ग्रंथ काव्यस्वरूपात लिहिलेला असला तरी तो इतिहास लिहीत आहे याचे त्याने जपलेले भान जागोजागी आढळून येते.

ग्रंथाचा पहिला अनुवाद, पंधराव्या शतकात काश्मीरचा सुलतान जैनुल अबीदीन याच्या प्रेरणेने झाला. तो पूर्ण ग्रंथाचा अनुवाद नव्हता. ग्रंथाच्या काही भागांचा अनुवाद ‘बहरूल अस्मर’ (म्हणजे ‘कथासमुद्र’) या नावाने फारसी भाषेत झाला. तो मूळ ग्रंथनिर्मितीनंतर तीनशे वर्षांनी झाला. सम्राट अकबराने जेव्हा काश्मीर जिंकून घेतले (त्या अनुवादानंतर शंभर वर्षांनी) तेव्हा त्याने अब्दुल कादीर अल बदायुनी याला त्या ग्रंथाचा संपूर्ण अनुवाद सिद्ध करण्याचा आदेश दिला. अबुल फजलच्या ‘आई – ने – अकबरी’मध्ये काश्मीरचा इतिहास त्याच ग्रंथाच्या आधारे नोंदला गेला. पुढे, जहांगीरच्या काळात, मलिक हैदरने त्या ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ती तयार केली.

युरोपीयन विद्वान कोलब्रुक याला ‘राजतरंगिणी’ची अपूर्ण प्रत 1805 साली मिळाली. त्याने त्या प्रतीच्या आधारे ग्रंथाचे विवरण प्रसिद्ध केले. त्यावेळचे काश्मीरचे महाराज राजे रणजितसिंह यांच्या संमतीने मूरक्राफ्ट या युरोपीयन विद्वानाने प्राचीन शारदा लिपीतील ‘राजतरंगिणी’ची संस्कृत संहिता देवनागरी लिपीत 1823 साली सिद्ध केली. ते पायाभूत काम होते. त्या मूलपाठाच्या आधारे 1852 साली कोलकातानिवासी संस्कृतज्ज्ञ अभ्यासक ए. ट्रॅायर यांनी त्या ग्रंथाचा अनुवाद फ्रेंच भाषेत केला. त्यानंतर काही वर्षांनी योगेशचंद्र दत्त या बंगाली विद्वानाने त्या ग्रंथाचा अनुवाद इंग्रजीत केला.

ऑरियल स्टाईन या ब्रिटिश विद्वानाने पंडित गोविंद कौल यांच्या मदतीने ‘राजतरंगिणी’ची नवी संशोधित संस्कृत संहिता सिद्ध केली. एज्युकेशन सोसायटी प्रेस (मुंबई) यांनी ती मूळ संहिता व स्टाईनने तिचा दोन खंडांत केलेला इंग्रजी अनुवाद 1892 मध्ये प्रसिद्ध केले. त्याच दरम्यान निर्णयसागर प्रेसने पंडित दुर्गाप्रसाद यांची संपादित संहिता मुंबईतून प्रसिद्ध केली. डॅा. होरॅस विल्सन यांनी त्यांच्या एका दीर्घ निबंधात ‘राजतरंगिणी’च्या पहिल्या सहा तरंगांचा सारांश त्यापूर्वी, 1825 मध्ये समाविष्ट केला होता.

रणजित सीताराम पंडित या मराठी विद्वानाने  ‘राजतरंगिणी’चा पुन्हा एकदा इंग्रजी अनुवाद उत्तम टिपांसहित 1935 साली सिद्ध केला. ‘साहित्य अकादमी’ने त्या अनुवादाचे पुनर्मुद्रण 1968 मध्ये प्रसिद्ध केले. रणजित सीताराम पंडित हे विजयालक्ष्मी पंडित यांचे पती. विजयालक्ष्मी ही पंडित नेहरू यांची बहीण. म्हणजेच रणजित पंडित हे नेहरूंचे मेव्हणे व प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे वडील!

‘राजतरंगिणी’चा पहिला मराठी अनुवाद माधव व्यंकटेश लेले यांनी 1929 मध्ये केला. पण त्याची दखल मराठी साहित्यात व अभ्यासात फारशी घेतली गेली नाही. ‘राजतरंगिणी’चा अरूणा ढेरे व प्रशांत तळणीकर यांनी मराठीत केलेला अनुवाद 15 ऑगस्ट 2017 रोजी प्रसिद्ध झाला आहे. तो मराठी अनुवाद सरहदचे संजय नहार, खडके फाऊंडेशन व चिनार प्रकाशन यांच्या संयुक्त पाठबळामुळे प्रकाशित होऊ शकला. ‘राजतरंगिणी’ने संस्कृतपासून मराठीपर्यंत येण्यासाठी इतका प्रदीर्घ प्रवास केला आहे.

त्या ग्रंथाचा आणखीही एक प्रवास आहे. कल्हणाने त्या ग्रंथाद्वारे उत्तरकालीन कवी-इतिहासकारांसाठी एक आदर्श घालून दिला. कल्हणाने 1159 पर्यंत इतिहास नमूद केला. पंडित ज्योत्स्नाकर तथा जोनराज यांनी ‘राजतरंगिणी’ची नवी रचना करून 1456 पर्यंतचा काश्मीरचा राजेइतिहास सिद्ध केला. तो इतिहास जयसिंह राजापासून कोटा राणीपर्यंत आहे. जोनराजाचा शिष्य विद्वान कवी आणि संगीतज्ञ श्रीवर याने तो इतिहास आणखी पुढे नेला. ‘जैन राजतरंगिणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चार प्रकरणांच्या या ‘राजतरंगिणी’त 1486 पर्यंतचा काळ समाविष्ट झाला आहे.

कल्हणाला अनुसरून काश्मीरचे इतरही काही इतिहास अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत लिहिले गेले. ‘तवारिख-ए-काश्मीर’ हा हसन अली काश्मिरीचा ग्रंथ 1616 पर्यंतचा इतिहास सांगतो. तर नारायण कौल अजीज यांच्या तवारिखीत 1710 पर्यंतचा इतिहास ग्रंथित झाला आहे. मुहम्मद आजम कौल यांनी ‘वाक्याते कश्मीर’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने -ख्वाजा मुहम्मद अस्लम यानी तो ग्रंथ पुढे नेत ‘गौहरे आलम’ या ग्रंथाची रचना केली. बिरबल कचरू या प्रसिद्ध फारसी विद्वानाने एकोणिसाव्या शतकात ‘मुख्तसर तारीख- ए- कश्मीर’ म्हणजे ‘काश्मीरचा संक्षिप्त इतिहास’ हा ग्रंथ लिहिला. कल्हणाने काश्मीरचा इतिहास लिहिण्याची परंपरा निर्माण केली ती थेट एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू राहिली ही एक अभूतपूर्व घटनाच म्हणावी लागेल!

‘राजतरंगिणी’चे एक अनुवादक प्रशांत तळणीकर यांनी सांगितले, की राजतरंगिणीचे चार भाग आहेत. सध्या केला आहे तो पहिला भाग. ते स्वत: पुढील तीन भाग अनुवादित करत आहेत. त्यामध्ये १४८६ पर्यंतचा इतिहास येतो. तो संस्कृतात आहे. त्यानंतर मोगल काश्मिरात आले. त्यापुढील राजतरंगिणी फारशी भाषेत लिहिली गेली आहे.  

विद्यालंकार घारपुरे ९४२०८५०३६०, vidyalankargharpure@gmail.com
 

 

About Post Author

Previous articleदुष्काळाचे बदललेले स्वरूप!
Next articleकल्हणाची राजतरंगिणी – कवितेची लज्जत
विद्यालंकार घारपुरे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1960 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झाले आहे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून उपप्रबंधक (डेप्युटी मॅनेजर) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती 2007 साली घेतली. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे सक्रिय कार्यकर्ता म्हणून 1986 ते 1997 या काळात काम करत होते. त्यांना बालसाहित्यात विशेष रुची आहे. त्यांचे 'बबडूच्या गोष्टी' 'वनशाहीच्या कथा' व 'बेटू आणि इतर कथा' हे बालकथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच 'छोटा डॉन' आणि 'लिंबू तिंबू' हे बालकविता संग्रह आणि 'बदल' ही बालकादंबरीही प्रकाशित झाली आहे. त्यांना 'चालनाकार अरविंद राऊत पुरस्कार' 2015 सालासाठी मिळाला आहे. सध्या त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ हा लेखन व सामाजिक कामासाठी दिलेला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9420850360