उमर खय्यामची फिर्याद

0
128

‘उमर खय्यामची फिर्याद’ हे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर ऊर्फ ‘श्रीकेक्षी’ यांचे गाजलेले पुस्तक. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेख महाराष्ट्राबाहेरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ यासंबंधित आहेत. पुस्तकात एकूण बारा लेख असून सर्व लेख दीर्घ आहेत. ते लेख एवढे सखोल चिंतन करून लिहिले आहेत, की टीकात्मक लेखन कसे करावे याचा वस्तुपाठच ते पुस्तक वाचकांना देते…

श्रीकृष्ण केशव क्षीरसागर हे ‘श्रीकेक्षी’ या नावाने महाराष्ट्रात ओळखले जातात. श्रीकेक्षी हे केवळ अग्रगण्य वाङ्मयीन टीकाकार नव्हते, तर त्यांनी आध्यात्मिक, राजकीय आणि सामाजिक विषयांवरही टीकात्मक लेखन केले आहे.

त्यांचे ‘उमर खय्यामची फिर्याद’ हे गाजलेले पुस्तक. ते प्रथम 1961 साली प्रसिद्ध झाले. ते पुस्तक शिवाजी विद्यापीठाने बी ए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले होते. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेख महाराष्ट्राबाहेरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ या संबंधित आहेत. त्यात उमर खय्याम, संत मीराबाईरवींद्रनाथ टागोर, शरदबाबू यांसारखे लेखक आहेत, तर हॅम्लेट, गझल, कृष्ण, द्रौपदी असे इतरही विषय आहेत. पुस्तकात एकूण बारा लेख असून सर्व लेख दीर्घ आहेत.

संत मीराबाईंच्या जीवनाचा आणि मरणाचा अर्थ लेखकाने सांसारिक जीवनात अनुभवलेल्या प्रसंगामुळे गडद झाला, त्यातून लेखकाला संत मीराबाईंवर लिहिण्याची प्रेरणा मिळाली. लेखकाचा ‘गझल’ हा तर अनेक वर्षे अभ्यासाचा विषय होता. पुस्तकातील पहिलाच लेख हा ‘उमर खय्यामची फिर्याद’ असा आहे. उमर खय्याम हा लेखकाच्या चिंतनाचा विषय. त्याने लिहिलेल्या कविता ‘रुबाया’ या नावाने ओळखल्या जातात. माधवराव पटवर्धन यांनी त्याच्या ‘रुबायां’चे मराठीमध्ये भाषांतर केले. लेखकाने त्या रुबायांची पारायणे केली होती. उमर खय्याम हा दहाव्या शतकातील पर्शियात जन्मलेला लोकप्रिय कवी. तो साहित्याबरोबरच गणिती, खगोलशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी म्हणूनही प्रसिद्ध होता. उमर खय्याम त्याच्या रुबायांत म्हणतो, की मानवाला सृष्टीतील सौंदर्य हे चिरतरुण वाटते किंवा सृष्टीतील सौंदर्याचा बहर हा कायम चालू राहतो असे वाटते आणि तेवढ्यात सृष्टीचे दुसरे रूप त्याच्यासमोर येते; त्यामुळे अचानक उदासपणा, उजाडपणा येतो व विश्वासाला धक्का बसतो. या मनःस्थितीतून बाहेर येण्यासाठी तत्त्वज्ञान माणसाला दृश्याकडून दृष्टी काढून ती अदृश्य सृष्टीकडे वळवण्यास सांगते; म्हणजेच ऐहिकातून आसक्ती काढून ती पारलौकिकाकडे वळवण्यास सांगते. पण उमर खय्याम भावी व अज्ञात अशा पारलौकिक कल्याणाचा धिक्कार करताना आढळतो व जीवन ऐच्छिक उपभोगार्थासाठी सार्थकी लावण्याचा संदेश देताना दिसतो.

उमर खय्याम याचे वैशिष्ट्य हे, की तो परम जीवनभक्तही होता आणि जीवनाच्या नश्वरतेमुळे परम दुःखीही होता. त्याच्या मनात जीविताचा विचार येताच मरणाचा विचारदेखील येत असे. सौंदर्याचा विचार मनात येताच त्याची नश्वरता त्याला व्याकूळ करी. पण तो कोणावर रागवत नाही, की वैतागून वैरागी होऊ पाहत नाही. त्याचे दुःख शांत, सात्त्विक आणि समाधानी आहे. त्याचे खरे सुख निसर्गसौंदर्यात आहे. वरवर पाहणाऱ्याला उमर खय्याम हा केवळ सुखवादी वाटेल; त्याहून थोडे खोल पाहणाऱ्याला तो सौंदर्यपूजक व जीवनपूजक वाटेल; पण त्याच्या काव्यावरून सांगणे झाले, तर त्याच्या जीवाला भक्तीपेक्षा शोकच अधिक व्यापून राहिला होता असे वाटते.

…तर असा हा उमर खय्याम पराभूत वृत्तीचा नाही. त्याचे जीवनही अपयशी माणसाचे नव्हते. त्याने इराणच्या पंचांगात सुधारणा केल्या. तो तरुणपणातच अधिक आकांक्षांमुळे येणाऱ्या निराशेच्या पलीकडे पोचला होता. तो म्हणत असे, की यश आणि अपयश यांत या जगात फरक असा फार थोडाच, अशा स्थितीत भावी आकांक्षा अथवा भावी तरतूद यांच्या गोष्टी करणे म्हणजे वास्तव दृष्टीचा अभाव होय.

लेखक ‘माझे पहिले प्रेम, अर्थात गझल’ या लेखात म्हणतो, की गझल हा जितका गायनाचा प्रकार आहे, तितकाच तो काव्याचाही प्रकार आहे. गझलगायनाची मोहिनी शब्दांत आहे, सुरात आहे, की तालात आहे हे सांगणे मुश्कील आहे. एवढे मात्र खरे, की त्या सर्वांचेच मूळ गझलमध्ये व्यक्त होणाऱ्या सर्वथैव असाधारण अशा प्रेमप्रकारात आहे. गझल हे नुसते काव्य नव्हे, गझलमध्ये प्रेमाचे माधुर्य मिळते व विरहाची यातनाही कळते आणि दुःख तर अनुभवता येते, दुःखावर मिळवलेला विजयही अनुभवता येतो. सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचे वडील रसिकाग्रणी रामूभय्या दाते यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, “गझल ही जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी आहे.”

“माणसाच्या संपूर्ण जीवनाची मिळून एक स्थायी भावना मानली, एक सतत चालणारा सूर मानला, तर माझ्या जीवनाचे भाव-सूर-ताल गझलमध्ये सामावले आहेत असे मी म्हणेन.” या वाक्यातून लेखकाचे पराकोटीचे गझलप्रेम दिसून येते. लेखकाने गझल प्रथम ऐकली ती चौपाटीवर हातपेटी घेऊन बिदागीखातर गाणी गाणाऱ्या गायकाच्या तोंडून आणि त्यावेळी लेखकाच्या लक्षात आले, की गझलगायनात आर्ततेइतकीच निरिच्छताही व्यक्त करता येते. गझलबद्दलचे लेखकाचे विचार लक्षणीय आहेत. गझलमध्ये सूफी तत्त्वज्ञान पुष्कळदा ध्वनित असते; पण गझला साध्या मानवी भावनाही हृदयाला इतक्या नेऊन भिडवतात, की गझल हे प्रेमभावनेचे एक वाहन बनते. गझलचा मुख्य विषय ‘इश्क’ हा आहे. त्यात स्त्री-पुरुष प्रेमाव्यतिरिक्त इतर भाव व वृत्ती येत नाहीत असे नाही. मीलनाचा रोमांचकारी क्षण हा गझलचा खास प्रांत नव्हे. प्रियेच्या स्वतःच्या, समाजाच्या अथवा प्रेमिकांच्या वाट्याला चिरविरह आल्यावर त्या दुःखालाही प्रेम समजून पाषाणाला पाझर फोडणाऱ्या उद्गारात उर्दू गझलची खास वैशिष्ट्ये दिसून येतात.

लेखकाने त्याच्या आवडत्या गझल गायक-गायिकांविषयी भरभरून लिहिले आहे. त्यात आगा फैजभाई छेला, बाई सुंदराबाई, अख्तरीबाई फैजाबाई व कमला झारिया यांचा खास उल्लेख करावा लागेल. पाकिस्तान रेडियोवर स्त्री-पुरुष गायक त्यांच्या त्यांच्या विशिष्ट ढंगात गालिब, मीर, सौदा या कवींच्या गझला गातात, तर मुनव्वर सुलताना, इकबाल बानू, नजिर बेगम यांसारख्या गायिका ढंगदार व उत्कट गझलगायन करतात. लेखक या गझल गायक-गायिकांना ऐकूनदेखील शेवटी लता मंगेशकर यांनाच मानतो. लता मंगेशकर यांची गझल गायनाची ढब आणि त्यांचे उर्दू-फारसी भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्यासारखे आहे, असे ते म्हणतात. गझलची वैशिष्ट्ये प्रेमाच्या रमणीयतेत, त्यागाच्या उदारतेत, शब्दांच्या नाजूक खेळात वा काव्यगायनाच्या मोहक ढंगात असली, तरी गझलला जे गूढ स्थान सौंदर्यवादी व्यक्तीच्या जीवनात प्राप्त होते, त्याचे कारण गझलची असाधारण अंतर्मुखता हेच होय, असा दृष्टिकोनही ते मांडतात.

या लेखांसारखेच इतर सर्व लेख एवढे खोलात जाऊन, चिंतन करून लिहिले आहेत, की टीकात्मक लेखन कसे करावे याचा वस्तुपाठच ते पुस्तक वाचकांना देते.

पुस्तकाचे नाव- उमर खय्यामची फिर्याद

लेखक- श्री. के. क्षीरसागर, प्रकाशक- पॉप्युलर प्रकाशन, पृष्ठे- 142

– माधव ठाकूर 9137927299 sahitya.mandir@yahoo.in

(साहित्य मंदिर, मे 2022 अंकातून उद्धृत)

———————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here