इरवीर

0
72
इर साजरा करताना भगत अंगात आल्याप्रमाणे नाचतो. इर साजरे करण्यासाठी तो गावक-यांचा मार्गदर्शक असतो.
इर साजरा करताना भगत अंगात आल्याप्रमाणे नाचतो. इर साजरे करण्यासाठी तो गावक-यांचा मार्गदर्शक असतो.

श्रद्धेपायी केवढा खटाटोप!

शेताच्या बांधावर स्थापलेले इर दैवत. रात्रीची जेवणे सुरू होती. भावाच्या दोन नातवंडांमध्ये मारामारी झाली. पुतणीचा मुलगा अमोल आणि पुतण्याचा मुलगा विवेक. कारण काय, तर विवेकने अमोलची शेंडी जोरात ओढली! त्याने असा प्रकार अनेक वेळा केला. त्यामुळे अमोलला वेदना व्हायच्या. तो कळवळून आईकडे तक्रार करायचा, पण कोणी त्याच्याकडे फारसे लक्ष देत नसे. त्यामुळे त्याने विवेकवर हल्ला केला. दोघांचे भांडण सोडवताना शहाण्या माणसांचीही दमछाक झाली, पण अमोलचा राग काही थंड होत नव्हता. तेव्हा वहिनी (नातवंडांची आजी) मुलीला म्हणाली, “तुले बी ती कातरीसनी ठी देवाले काय झाय? शायमान तो जाई तव्हय आणखी पोरे ओढतीन” मोठा भाऊ बापू हा माझ्याकडे पाहून म्हणाला, “हाही असाच भटूगुरूजींची शेंडी ओढून त्यांना लहानपणी त्रास द्यायचा.”

मी शाळेत जात होतो, त्यावेळी वर्गामध्ये चार-पाच मुले शेंडीवाली असायचीच. त्यांच्याही शेंड्या ओढण्याचा प्रकार घडे. त्यामुळे मुलांमध्ये शिवीगाळ, मारामारी व्हायची. गुरुजी मग अशा मुलांना चांगले बदडून काढत. मुले टोप्या घालत तोपर्यंत त्यांना शेंडी लपवता येई. टोप्या हळुहळू लुप्त झाल्या. मुले चांगली दहावी-अकरावीत येईपर्यंत त्यांच्या डोक्यावर शेंडी असे. कधी कधी कुस्तीच्या कड्यामध्येही (आखाड्यात) एखादा पैलवान शेंडीवाला दिसे. काही काही मुलांच्या डोक्यावर दोन-दोन शेंड्या असायच्या. एक टाळूवर तर दुसरी मानेच्या बाजूने, डोक्यावर साधारणपणे टक्कल पडते त्या ठिकाणी. टाळूवरची शेंडी शाकाहारी देवाची, नवसाची तर दुसरी इरांची, बोकडबळीची. ती डोक्याच्या शेंड्यावर असते म्हणून तिला शेंडी म्हणत असावेत.

शेंडी उतरवण्याचा कार्यक्रम विवाह सोहळ्याप्रमाणे पार पाडावा लागतो. ज्याच्या घरात इर असत त्याच्या घरातील सर्वांत ज्येष्ठ मुलाची फक्त शेंडी ठेवली जायची. डोक्यावरच्या शेंडीचा भार उतरल्याशिवाय मुलाच्या लग्नाचा मार्ग मोकळा होत नसे. शेंडी डोक्यावरून सरळ इरांना अर्पण केलेली अधिक चांगली असे. कापून ठेवली तर ती सांभाळायचा घोर आणि यदाकदाचित हरवली किंवा काही झाले तर इरांचा कोप व्हायची भीती! त्यामुळे कोणाचा शेंडी कातरून ठेवण्याकडे कल फारसा नसे. ही प्रथा-परंपरा पिढ्यान पिढ्यांपासून चालत आलेली आहे आणि तीच आम्ही पुढे चालवतो असे बरेचजण सांगतात. त्यामुळे त्‍या विषयाविषयी अनुमानानेच निष्कर्ष काढता येतील.

शेंडीला भार समजण्यात येई. कारणही तसेच होते. शेंडीचा कार्यक्रम हा छोटेखानी लग्नसोहळ्यासारखा करावा लागे. इरांना बोकडाचा बळी लागे. मांसाहार न करणार्‍यांसाठी गोड जेवणाचा खर्च वेगळा. इरांना गावभर नाचवायला वाजंत्री, अहेर देणे-घेणे हा खर्च बराच असे. पूर्वी गरीब आणि सर्वसामान्य परिस्थितीच्या लोकांना तो खर्च करणे अवघडच. भाऊबंदकी चांगली असली तर दोन-चार-पाच मुलांच्या शेंड्या एकत्र उतरवून खर्चात बचतीचा प्रयत्न व्हायचा. तरी बोकड मात्र प्रत्येकाचा स्वतंत्र लागे- परिस्थिती असो वा नसो, बरेच जण तो कार्यक्रम आनंदाने तर काही जण नाईलाजाने करत. इरांचा कोप होईल ही भीती मनात कायम असे.

धुळे-बोरकुंद (ता.जि.धुळे) या गावी माझे ऐंशी वर्षीय वृद्ध चुलतभाऊ निंबागुरुजी यांनी दिलेली माहिती अशी, की पूर्वी नातेवाईकांना एकमेकांकडे जाण्यायेण्यासाठी निमित्त लागे. त्यामुळे इरांचे फक्त निमित्त. शिवाय आज जसे चार मित्र एकत्र आले म्हणजे पार्टी करतात, एखाद्या हॉटेलात जाऊन खाण्यापिण्याची मौजमजा करतात तसाच तोही प्रकार असावा. नेमके इर हे होळीच्या ‘कर’ला (काही सणांना सणांच्या दुसर्‍या दिवशी कर साजरी करतात. होळी , पोळा , संक्रात यांना कर असते) काढतात. हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने कमी कामांचा काळ असतो. हंगाम जवळजवळ संपलेला असतो.

आमच्या गावात कोळी लोकांचेही इर आहेत. गल्लीतील हिरामणबाबा हे पंच्याहत्तर वर्षीय गृहस्थ. ते त्यांच्या इरांबद्दल माहिती देताना सांगतात, की आमच्यात पहिल्या मुलाची शेंडी अर्धी पिराला तर अर्धी कान्होबाला (कानिफनाथ) देतात. प्रत्येक ठिकाणी बाजरीच्या भाकरीवर बोकडाच्या काळजाच्या तुकड्याचा नैवेद्य.

गावात कुंभार लोकांकडेही इर आहेत. तेही इर सजवून गावात नाचवतात-कुदवतात. पण त्यांचे इर घरातल्या देव्हार्‍यातील देवापुढेच शांत होतात. त्यांच्या इरांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य चालतो.

इर साजरा करताना भगत अंगात आल्याप्रमाणे नाचतो. इर साजरे करण्यासाठी तो गावक-यांचा मार्गदर्शक असतो. इर काढणार्‍यांपैकी बरेच जण अशिक्षित, अल्पशिक्षित, काही संकटग्रस्तही आहेत. बाकी लोक त्यांच्यावरची संकटे आपल्यावर येऊ शकतात या भीतीपोटी इर काढतात. काहींना या निमित्ताने गावात, नातेवाईकांमध्ये आपली प्रतिष्ठा किती आहे हेही दाखवायचे असते.

भाऊबंदकीत या ना त्या कारणाने भानगडी होत असतात. कारणे अगदी साधी असतात. कधी बांधावरून, कधी आंब्याच्या कैर्‍यांच्या वाटणीवरून…… अशी अनेक कारणे असतात. मग अशा वेळी भाऊबंदकीतला दुरावा सांधण्याचा, त्यांना एका धाग्यात बांधण्याचाही काही समंजस लोकांचा हा प्रयत्न असतो. यावेळी सर्वजण रुसवेफुगवे, हेवेदावे विसरून भाऊबंदकीतला कार्यक्रम म्हणून एक होतात.

घरातून फक्त पहिल्या मुलाची (ज्येष्ठ) शेंडी द्यायची असल्याने घराण्यात तो कार्यक्रम बर्‍याच वर्षांनंतर येतो. कोणाकडे इर असले तरच शेतातील इरांच्या दगडांना नव्याने शेंदूर लावला जातो. एरवी- त्यांच्याकडे सहसा कोणाचे लक्ष नसते. बर्‍याच ठिकाणी इर अजूनही उघड्यावर आहेत. कोणी त्या दगडगोट्यांना साधा चौथराही बांधायच्या भानगडीत पडलेले नाहीत. इरांचे मंदिर कुठेही असल्याचे ऐकिवात नाही.

आमच्या गावात कुणबी पाटील, कोळी, कुंभार या जातींत इर निघतात, हे मी पाहिलेले आहे. मात्र काहींच्या म्हणण्यानुसार ब्राम्हण, मारवाडी आणि वाणी ह्या जाती वगळल्या तर इतर सर्व जातींमध्ये इर आहेत.

तलवारी घेऊन नाचणारे इर अंगावरून गेल्यास रोगराईपासून बचाव होतो अशी श्रद्धा आहे. आमच्या भाच्याच्या शेंडीची गोष्ट तर काही औरच आहे. त्यावेळी बहिणीचे यजमान पुणतांबा स्टेशनजवळच्या चांगदेवनगर साखर कारखान्यात नोकरीला होते. कारखाना परिसरात कामगारांसाठी आणि कर्मचार्‍यासांठी थोडीबहुत घरे. गरजेपुरती दुकाने. त्याठिकाणी बहिणीच्या सासुबाई नातू, अमोलला ‘कटिंग करायला’ म्हणून न्हाव्याच्या दुकानात घेऊन गेल्या. न्हावी कोणाची तरी दाढी-कटिंग करत होता, नातवाच्या कटिंगला वेळ लागेल म्हणून आत्याबाई बकरीसाठी चारा घेऊन तो चारा घरी पोचवायला म्हणून गेल्या. त्या नातवाला आपण न्हाव्याच्या दुकानात बसवून आल्याचे जवळपास विसरल्या. आठवण आल्यावर त्या धावत दुकानाजवळ गेल्या. तोपर्यंत न्हाव्याने अमोलची कटिंग केली होती. आत्याबाईंनी नातवाच्या डोक्याकडे भर- नजरेने पाहिलं. त्या चरकल्याच. नातवाच्या डोक्यावरची शेंडी गायब झाली होती! आत्याबाईंनी न्हाव्याला विचारलं, “शेंडी कुठे?”

“शेंडी होती?” न्हावी थंडपणे उत्तरला.

“काय रे बा, तुला कशी दिसली नाही ती शेंडी?” असे म्हणून आत्याबाईंनी न्हाव्याने केस जिथे फेकले होते तिथून ते उचलून आपल्या पदरात घेतले. घरी येऊन कोर्‍या फडक्यात बांधून ठेवले. इरांचा कोप होऊ नये म्हणून ही काळजी!

आत्याबाईंना दोन मुले- मोठा प्रेमराज, लहान सुरेश, सुरेश हे बहिणीचे यजमान. परंपरेप्रमाणे मोठा मुलगा, प्रेमराजची शेंडी राखून ठेवली. आत्याबाईंच्या सासर्‍यांचे गाव म्हणजे आमचे कोळगाव. पुढे, ते तामसवाडी, पारोळा असे करत श्रीरामपूरला कामानिमित्त फिरत राहिले. आत्याबाईंचे यजमान दारुडे. त्यामुळे आत्याबाईंनी स्वत:च्या कष्टातून लहानसा बोकड विकत घेतला. तो बोकड मोठा झाला म्हणजे आपण आपल्या मुलाच्या डोक्यावरच्या शेंडीचा भार उतरवू ही त्यांची कल्पना, पण दारूड्या नवर्‍याने बोकड विकून टाकला. मूळ गाव (इरांचे) दूर राहिले. ओढगस्तीचा संसार, त्यामुळे मुलाची शेंडी द्यायचे राहून गेलं. पुढे मुलगाही व्यसनी निघाला. त्याने एक सोडून दोन बायका केल्या. पण तरीही संसार सुखाचा झाला नाही. आत्याबाई हा सारा इरांचा कोप समजतात. आत्याबाईंनी आपल्या नातवाच्या आयुष्यातही असे काही घडू नये म्हणून न्हाव्याच्या दुकानातून नातवाच्या कटिंगचे केस उचलून आणून बांधून ठेवले. डोक्यावर दुसरी डुप्लिकेट शेंडी राखून ठेवली, ती वेगळी…..

इरांना देण्यात येणारा मांसाहारी आणि शाकाहारी नैवेद्य कोळगावात त्यांची भाऊबंदकी सर्वात मोठी. पण तीन-चार पिढ्यांपासून अंतर पडलेले. त्यातच त्यांचे इर हे गावापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर नावरे गावी. तिथे जायला रस्ता बरोबर नाही आणि मधे गिरणा नदी. त्यामुळे बारा किलोमीटरचा फेरा पडे.

आत्या नव्वदीत आहेत. त्यांना बहिणीच्या लग्नाच्या वेळी आईनेच त्यांच्या इरांची आठवण करून दिली. त्यांनी भाऊ बापूला बैलगाडे जुंपायला लावून नवर्‍याला इरांच्या पाया पडायला पाठवले. त्यामुळे पुढे त्या मुलाचा संसार चांगला चालला असे त्यांना वाटतं. त्यांना दोन मुले आणि दोन मुली झाल्या. त्यांचेही शिक्षण, नोकरी ह्यात प्रगती झाली असे आत्या मानतात.

आत्याबाईंनी नातवाच्या शेंडीवेळी सगळी काळजी घेतली. त्यांच्या भाऊबंदकीत बरेच जण इर सजवत नाहीत, नाचवत नाहीत. कोणी बोकडाऐवजी फक्त इरांपुरते कोंबड्यावर भागवतात, तर काहीजण फक्त अंडे अर्पण करून बाकीचे गोड जेवण देतात. पण अजूनही काहीजण, बोकडाचा बळी दिला पाहिजे नाहीतर इरांचा कोप होतो, मुले आजारी पडतात, मुलांवर संकट येतात या विचाराचे आहेत.

पूर्वजांमध्ये कोणीतरी लढाईत मारला गेला, त्याची आठवण म्हणून हे इर काढतात अशी माहिती मिळाली. पूर्वी हंगामाच्या वेळी पेंढार्‍यांचा उपद्रव होई. ते मोठ्या प्रमाणात लुटालूट करत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी गावातील तरूण मुले रात्र-रात्र जागत. हे जागरण सशक्त असे. अशा एखादे वेळी गावातील तरूण मुले आणि लुटारू पेंढारी यांच्यात लढाई होई. त्यात एखादा तरुण मारला गेला तर त्यांचे भाऊबंद शेतात त्याची आंब्याच्या झाडाखाली घडी (दगडी किंवा नुसते दगडी गोटे मूर्ती) घालत. तो तरूण आपल्या खानदानासाठी मेला म्हणजे हुतात्मा झाला! पुढची पिढी त्याची आठवण म्हणून होणार्‍या पहिल्या मुलाची शेंडी ठेवून ती उतरवण्याच्या वेळी इर सजवून, गावभर वाजंत्री लावून-नाचवून-कुदलून ते शेतात शांत केले जात. त्याला विधीचे रूप आले आहे.

वाजंत्रीच्या तालावर नाचणारे इर. पूर्वी त्यांच्या हातात टोकावर लिंबू टोचलेल्या लोखंडाच्या तलवारी असत. आता लाकडाच्या असतात. बहुदा इर होळीच्या ‘कर’ला काढले जातात. पाच इर सजवले जातात. – चार भाऊबंदकीतले तर पाचवा पाहुणा. मी लहान असताना सगळे इर हे धोतरवाले असायचे. आता सुट–पॅण्टवाले असतात. इरांना डोक्यात शिरस्त्राण म्हणून पागोटी घालतात. पूर्वी पागोटी सहज मिळत, आता ती दुर्मीळ आहेत. कमरेला गेजा (घुंगुरमाळा) बांधतात. इरांना दंडात बायांच्या वेल्यापण घालत. एका हातात तलवार. ती पूर्वी लोखंडी असायची, आता लाकडी असते. हातापायांना हळद थोडीफार लावली जायची. त्यावर कुंकवाचे पाणी करून नक्षी काढत. डोक्यात काजळ भरत. ही कामे महिलांकडे तर त्यानंतरचा महत्त्वाचा कार्यक्रम भाऊबंदकीतला. एखादा माणूस तांब्यातून आणलेली दारू इरांना थोडी थोडी पाजत असे. मग इर वाजंत्रीच्या तालावर उड्या मारत. इर घरातील देव्हार्‍यासमोर लोटांगण घालून गल्लीत उतरतात. प्रत्येक भाऊबंदाच्या घरी जाऊन तिथल्या देव्हार्‍यातल्या देवांना नमस्कार करून गावभर मिरवले जातात. वीर गावातील महत्त्वाच्या देवांना जातात. तिथे नमस्कार करून नैवेद्य दिला जातो. महत्त्वाचा कार्यक्रम होळी चौकात होतो. तिथे इर अंडे उडवतात. गावात असला तर एखादा भगतही इरांबरोबर असतो.

शेवटी, शेतात इराची समाधी असलेल्या ठिकाणी शेंडी असलेल्या मुलाची शेंडी त्याची आत्या पदरात झेलून ती इरांपुढे जमिनीत गाडली जाते, सोबत बकरे कापून त्याचे रक्त जमिनीत खड्डा करून बुजवतात. घडीला शेंदूर लावतात. अहेराचा कार्यक्रम झाल्यावर दोन ठिकाणी पंगती बसतात- एक वरण-भातवाली तर दुसरी बोकडाच्या मटणाची. एका श्रद्धेपायी केवढा खटाटोप!

मी लहान असताना जे इर पाहिले ते खरोखर इर वाटत. कारण त्यांच्यात बरेचजण धष्टपुष्ट, कसलेल्या- कमावलेल्या शरीराचे असत. इरांच्या हातातल्या लोखंडी तलवारी आणि एकदंर त्यांना ज्या पद्धतीने सजवलं जाई त्यावरून ते इर म्हणजे प्रत्यक्ष रणांगणावर लढणार्‍या योद्ध्यांचा भास होई. इरांच्या बाबतीतले कुतूहल कायम आहे. त्यांच्या हातातील तलवारीच्या टोकाला लिंबू का खोसवतात? डाव्या हातातील हातरुमालात बांधलेली वाटी असते. ती ढालीसारखी असावी. चोर-दरोडेखोरांच्या बंदोबंस्तासाठी हातात लाठ्या-काठ्या, भाल्यांची गरज असते. निव्वळ गोफणीने दगड भिरकावूनही त्यांना पिटाळून लावले जात असावे. म्हणून हे इर पूर्वी लढाईत मारले गेले असावेत असे वाटते.

इर साजरा करण्याच्या निमित्ताने जमलेले गावकरी आणि इर यासंबंधात एक राक्षसी प्रकारही ऐकायला मिळाला. इर जिथे शांत (थंडे) केले जातात तिथे बोकड कापून त्याचे रक्त एका भांड्यात जमा करतात. म्हणजे बोकडाच्या मानेखाली पातेले ठेवले जाते, मग खाटिक त्याच्या मानेवर सुरा चालवतो. म्हणजे मग ते रक्त पातेल्यात झेलले जाते. एकजण ते भांडे तोंडाला लावून दूध प्यावे तसा रक्त घटाघटा प्राशन करतो. अशा वेळी लोकांनी त्याला कितीही आवरले तरी तो आवरत नाही. त्याने दोन-तीन वेळा असा प्रकार केल्यावर मग त्याचे भाऊबंद त्या दिवशी त्याला घरात कोंडून ठेवतात, नाहीतर झाडाला बांधून ठेवतात.

आता गावात जे इर निघतात ते इर वीर वाटत नाहीत. नाचून-कुदून गावाबाहेरच्या इरांच्या ठिकाणी जाणे एवढा उत्साह तरुणांमध्ये दिसत नाही. एका ठिकाणी नाईलाजाने एका निर्व्यसनी तरुणाला इर व्हावे लागले. प्रथेप्रमाणे इरांना दारू पाजतात तशी त्यालाही ती बेमालूमपणे पाजली गेली. सुरुवातीला तो एक-दोन गल्ल्या चालू लागला. पुढे तर त्याच्याने चालवेना, तेव्हा त्याला एक-दोघांनी आधार दिला. कसेबसे गावाबाहेर नेले. अजून वीरस्थळ दूर होते! मग त्याची टांगाटोली करून त्याला वीरस्थळापर्यंत नेले गेले. इरांच्या पाया पडायलाही त्याच्यात त्राण उरले नव्हते. त्याची आई त्याचा घाम पुसत पदराने हवा घालत होती आणि तो ‘का ओ मा मी पेस का? मी जर पेत नही तर मग माले पाजी कोणी?’ असे म्हणत होता. पण आईनेही कुठल्या भाऊबंदांना ‘माझ्या निर्व्यसनी मुलाला दारू का पाजली?’ म्हणून दोष दिला नाही. एवढा इरांना पाजावी लागते हा समज दृढ झालेला!

साहेबराव अर्जुन महाजन,
गजलक्ष्मी-रो-हाऊस,
रूम नं. ४, मुरलीधर नगर,
नाशिक-१०
भ्रमणध्वनी: ९७६३७७९७०९

About Post Author

Previous articleसांगलीची हळद बाजारपेठ
Next articleपुण्याची मंडई!
साहेबराव अर्जुन महाजन हे धरणगाव येथे ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये शिक्षक अठ्ठावीस वर्षे होते. त्यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील कोळगाव हे आहे. ते तेरा वर्षांपासून नाशिक येथे वास्तव्यास असतात. त्यांचे लेखन ‘हंस’, ‘पारिजात’ या मासिकांतून व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध होत असते. जुन्या पुस्तकांचे वाचन, लेखन व गाणी ऐकणे हा त्यांचा विरंगुळा आहे.