आमच्या कोपरगावची दिवाळी (Diwali At Kopargaon)

1
42

कोपरगाव हा प्रगत शेतीने संपन्न अहमदनगरजिल्ह्यातील तालुका. तेथील अर्थकारण शेतीविशेषतः ऊसाची शेतीसाखर कारखाने आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक राजकीय संस्थांशी निगडित आहे. दिवाळी हा सण येतो तेव्हा खरिपाच्या शेतीचा हंगाम पूर्ण झालेला असतो, अर्थकारण तेजीत असते आणि मग त्या नुसार दिवाळी साजरी कशी होणार हे ठरते. कारण दिवाळी हा एकमेव असा सण आहे, की त्या निमित्ताने अनेक वस्तूंची बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल होत असते. अगदी मातीच्या पणतीपासून ते चार चाकी वाहनापर्यंत. मला अजूनही आठवते ती कोपरगावची दिवाळी! दसरा झाला की दिवाळीची लगबग सुरू होते, कारण सर्व तयारीकामे ही घरचीच मंडळी कर. त्यामध्ये कुटुंबातील प्रत्येकाचा सहभाग असे. अगदी साफसफाई, सजावट, आकाशदिवे, पानाफुलांची तोरणेसडारांगोळी आणि सर्वा महत्त्वाचे म्हणजे दिवाळीचा फराळ तयार करणे. तयारी पूर्ण होते की लगेच दिवाळी येई. एकेका दिवसाचे रूढी आणि परंपरा यांनुसार स्वागत करून तो तो दिवस साजरा होई.

          पहिल्या, वसुबारस या दिवशी सवत्स गायीची पूजा केली जाते. गायीला झेंडूच्या फुलांच्या माळा घालून, पायांवर पाणी घालून गोड पदार्थ नैवेद्य म्हणून खाण्यास देतात. त्या दिवशी घरात गवारची शेंग आणि बाजरीची भाकरी असा बेत असतो. घराघरांसमोर मातीच्या पणत्या लावतात. आकाशदिवे लावले जातात आणि सुरेख रांगोळी काढली जाते.

          दुसरी तिथी धनत्रयोदशी. त्या दिवशी घरातील महिला पहाटे अभ्यंग स्नान करतात. त्या दिवशी व्यापारी वर्ग जुनी नाणी, हिशोबाच्या वह्या यांची पूजा करतात. वैद्यकीय क्षेत्रातील लोक धन्वंतरी देवतेची पूजा करतात. त्या दिवशी धने आणि गूळ एकत्र करून त्यांचा प्रसाद वाटला जातो.

          दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते. त्या दिवशी घरातील पुरुष मंडळींना सुवासिक तेलउटणे लावून अभ्यंग स्नान घातले जाते. तसेच, स्नान करताना कणकेच्या दिव्यांनी औक्षण केले जाते. त्या दिवशी जो स्नान सूर्योदयापूर्वी करणार नाही तो नरकात जाणार अशी एक मजेशीर आख्यायिका सांगितली जाते. पहाटे उठून अभ्यंग स्नान म्हणजे रोमांचक अनुभव असतो.

          दिवाळीच्या चौथ्या दिवशी मुख्य पूजा असते. त्या दिवशी घरात सकाळी लवकर उठून दिवसभर तयारी सुरू असते. त्या मध्ये सडा टाकून आकर्षक रांगोळी काढली जाते. आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांच्या माळा आणि तोरणे प्रत्येक दरवाज्याला लावतात. आमच्या कोपरगावला एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी घरोघरी जाऊन तोरणे लावण्याची परंपरा आहे आणि ती आजही कायम आहे! मग त्या नंतर त्यांना नवीन कपडे आणि फराळाचे पदार्थ दिले जातात. संध्याकाळी प्रत्येक घरात श्री महालक्ष्मी पूजन केले जाते. घरातील सर्व धनदागिनेहिशोबाची वही यांची पूजा केली जाते. तसेच मातीचे बोळकेपणतीकेरसुणी यांचीपण पूजा केली जाते. गावाकडे केरसुणीला लक्ष्मी मानतात. त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि घरी केलेले फराळाचे सर्व पदार्थ पूजेसाठी ठेवले जातात. साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचा प्रसाद वाटला जातो. लक्ष्मी पूजन झाले की सगळे जण फटाके फोडून आतषबाजीचा आनंद लुटतात.

          पाचव्या दिवशी बलिप्रतिपदा आणि पाडवा असा दुहेरी सण साजरा केला जातो. त्या दिवशी पत्नी तिच्या पतीला औक्षण करून त्यांची ईडा पिडो जावो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना कते. पतीदेखील पत्नीसाठी भेट म्हणून साडी किंवा एखादा दागिना देतो. पतीपत्नी यांच्या नात्याला या अशा गोष्टींमुळे एक नवा आयाम प्राप्त होतो. मराठी पंचांगानुसार पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असतो. त्यामुळे तो दिवस शुभकार्य करण्यासाठी निवडला जातो. नवीन वस्तूची खरेदीविविध प्रकारच्या आस्थापनांचे उदघाटन अशा गोष्टी, घटना त्या दिवशी साधल्या जातात. आमच्या गावात त्या दिवशी महीषराजाची अर्थात रेडयाची मिरवणूक काढली जाते. प्रथम त्याला नदीवर स्नान घातले जाते आणि झेंडूच्या फुलांच्या माळा घालून ग्रामदैवताच्या दर्शनासाठी हलगी वाजवत, मिरवत नेले जाते. घराघरांतून धान्याचा नैवेद्य दाखवला जातो. हलगीच्या तालावर लहानमोठे, सगळे नाचतात.

          दिवाळीचा सहावा आणि शेवटचा दिवस म्हणजे स्त्रीमनाच्या कप्प्यातील सुंदर मोरपीस! कारण त्या दिवशी भाऊबीज असते. आमच्या कोपरगावात भाऊ बहिणीला माहेरी घेन जाण्यासाठी येतो, त्याला मुराळी घेण्या येणे असे म्हणता. गृहलक्ष्मी दिवाळीच्या माहेरपणासाठी कित्येक दिवस आधीपासून आसुसलेली असते.

          अशा प्रकारे हा सण एक आठवडाभर साजरा केला जातो. त्यांतील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्या सणाची परंपरा जपली गेली आहे. अजून तरी त्यास तद्दन बाजारू स्वरूप आलेले नाही. सणाच्या निमित्ताने मित्रमंडळीनातेवाईक यांना फराळासाठी आवर्जून बोलावले जाते. भेटींची देवाणघेवाण होते. नोकरीधंद्यानिमित्त परगावी राहणारी मुलेसुना आणि नातवंडे गावी येतात आणि स्नेहाचा हा गोडवा वर्षभरासाठी साठवला जातो. तेत्या सणाचे महत्त्वाचे आकर्षण! शहरी संस्कृतीचे थोडेफार आक्रमण दिवाळी सणावर झाले असले तरीही आमच्या गावात मात्र दिवाळी आजही परंपरागत पद्धतीने कुटुंबा कुटुंबात साजरी केली जाते.म्ही त्या सणाचे मांगल्यपावित्र्य टिकवून ठेवले आहे.

उर्मिला गिरमे 9763029434 urmilajbadave@gmail.com

उर्मिला गिरमे यांचा  जन्म, शिक्षण आणि नोकरी कोपरगाव येथेच झाली. त्यांनी कोपरगावातील आत्मामालिक ध्यानपीठ या अध्यात्मिक संस्थेच्या शाळेत आठ वर्षे इंग्रजी विषय शिक्षिका आणि सोळा वर्षे मुख्याध्यापिका म्हणून सेवा केली. त्यांना शालेय जीवनापासून विविध प्रकारच्या लेखनाची आवड आहे. त्या सध्या त्याच संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याच्या एका निवासी शाळेत अध्यात्मिक विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
———————————————————————————————————————

About Post Author

Previous articleपौर्णिमेपर्यंत सण (Diwali At Latur)
Next articleवसुबारस (Vasubaras)
उर्मिला गिरमे यांचा जन्म, शिक्षण आणि नोकरी कोपरगाव येथेच झाली. त्यांनी कोपरगावातील आत्मामालिक ध्यानपीठ या अध्यात्मिक संस्थेच्या शाळेत आठ वर्षे इंग्रजी विषय शिक्षिका आणि सोळा वर्षे मुख्याध्यापिका म्हणून सेवा केली. त्यांना शालेय जीवनापासून विविध प्रकारच्या लेखनाची आवड आहे. त्या सध्या त्याच संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याच्या एका निवासी शाळेत अध्यात्मिक विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 9763029434

1 COMMENT

  1. खूप छान! अहमदनगर जिल्ह्यात जवळपास प्रत्येक गावातच अशीच दिवळी साजरी करतात.आमच्या संगमनेरलाही हा असाच अनुभव आम्ही गेली साठ वर्षांपासून आजवर घेतला आहे.पुनःप्रत्ययाचा आनंदमिळाला.प्रसन्न वाटले.धन्यवाद.💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here