आदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा!

carasole

शिक्षक म्हणून शिक्षणाच्या वाटेवरून प्रवास करताना एक ‘समज’ हळुहळू आतल्या आत विकसित होत गेली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या चांगल्या शाळांतही शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहून किंवा गणिती क्रिया आणि भाषिक कौशल्ये व तत्सम गोष्टी किती आत्मसात केल्या यावरून ‘गुणवत्ता’ मोजली जात होती! साक्षरता म्हणजे गुणवत्ता असा अर्थ घेतला जात होता! सरकारचा लेखन-वाचन हमी कार्यक्रमदेखील तसाच आग्रह धरत होता.

दुसरीकडे, माझ्यातल्या शिक्षकाबरोबर पालक म्हणूनही बरेच काही शिकत होतो. म्हणतात ना- ‘Child is father of father.’ त्याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत गेला. माझा मुलगा पहिलीत गेल्यापासून माझ्याकडे इंटरनेटच्या जोडणीसह संगणक आहे. तो संगणक आणि इंटरनेट यांच्या मदतीने अनेक गोष्टी सहज आणि मुख्य म्हणजे आनंदाने शिकतो! ते देखील अनौपचारिक पद्धतीने. त्याचे ते सगळे पाहून एका टप्प्यावर माझे असे मत झाले, की आपण शाळांमध्ये जे काही शिकवत आहोत ती निव्वळ घोकंपट्टी आहे. त्यातल्या अनेक गोष्टी मुलांच्या मनावरचा ताण आणि मेंदूवरील भार वाढवतात. माहितीच्या थप्प्या रचून ठेवायला मुलांची डोकी म्हणजे गोदामे नव्हेत! डिजिटल युगात पाढे पाठांतराला काय अर्थ आहे? असेही वाटायचे.

एका बाजूला आमचे ‘बे एके बे’ असे पारंपरिक शिक्षण सुरू होते, त्याच वेळेला जाणकार बाहेर भाषणात, गप्पांत बोलताना ‘सध्याच्या संगणक युगात ज्यांना संगणकावर काम करता येणार नाही, ते लोक निरक्षर ठरतील..!’ अशी भीती दाखवत होते. ते त्यासाठी निरनिराळे दाखले देत होते. समाजाची ‘डिजिटल’ आणि ‘नॉन डिजिटल’ अशा दोन गटांत विभागणी होणार असल्याचे भाकित केले जात होते.

जग बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणा-या तंत्रज्ञानाची आदिवासी, ग्रामीण मुलांना किमान ओळख झाली तर त्यांनादेखील ‘डिजिटल’ म्हटल्या जाणा-या समाजाबरोबर पुढे जाण्याची संधी मिळेल, अन्यथा ते मागे पडतील. माझा एम.के.सी.एल.चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्याशी मुलाखतवजा वार्तालाप सुरू होता. त्यांनी बोलण्याच्या ओघात संगणक आणि आपले भावी जगणे यावर काही मते मांडली. माझ्या मनात द्वंद सुरू झाले, की आपण शाळेत जे शिकवतो ते मुलांना त्यांच्या भविष्यासाठी पुरेशी शिदोरी देणारे आहे काय? आधुनिकतेची आव्हाने पेलण्याची क्षमता त्यांना उपलब्ध शिक्षणात आहे काय? त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असताना माहिती तंत्रज्ञानाचा पारंपरिक शिक्षणात वापर करण्याविषयीचे विचार मनात घोळू लागले.

सुरुवातीला, आम्हा शिक्षकांच्या डोक्यात असा विचार आला, की एखादा संगणक विकत घेऊ आणि इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना जमेल तेवढ्या गोष्टी दाखवू. गणेशोत्सवाच्या दरम्यान गावात अखंड हरिनाम सप्ताह असतो. सप्ताहाची सांगता झाली की, हिशोबाला गावातले कारभारी जमतात. शाळेच्या शेजारी हनुमान मंदिर आहे. तेथे गावकरी सन २००८ च्या उत्सवानंतर हिशोबाला जमले. आम्ही शिक्षकही गावक-याच्या येण्याची वाट पाहत तिथे ‘दबा’ धरून बसलो होतो. काही पालकांच्या कानावर विषय घालून ठेवला होता. ‘फिल्डिंग’ लावली होती! ‘काळाची पावले ओळखून आपणही बदलले पाहिजे…’, ‘संगणक शिक्षण नाही मिळाले, तर आपली मुले मागे पडतील…’ अशी ‘मांडणी’ केली. संगणक घेण्यासाठी लोकवर्गणी जमवण्याची विनंती केली. जमलेल्या गावक-यांनी कल्पना उचलून धरली. गावक-यानी त्या वर्षाच्या उत्सवातून उरलेले साडेसतरा हजार रुपये संगणक खरेदीसाठी आमच्या स्वाधीन केले. आम्ही शिक्षकांनी वर्गणी काढून उरलेले पैसे घातले. संगणक घेतला. आमचा हुरूप वाढला होता. आम्ही हळुहळू दानशूर व्यक्ती, संस्था यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्यातून आणखी तीन संगणक मिळवले. चार वर्गांना चार संगणक झाले!

संगणक मिळाले खरे, पण त्यांचा नेमका वापर कसा करायचा? याबाबत दिशा सापडेना. कारण त्याबाबत कोणी अभ्यासक्रम किंवा आराखडा बनवलेला नाही. त्यात योग्य ते प्रशिक्षणही नाही. आम्हाला इंटरनेटचे कनेक्शन घ्यायला प्रॅक्टिकल अडचण होती. ती म्हणजे गावात फोनचे एकही लँडलाईन कनेक्शन नव्हते! बी.एस.एन.एल.च्या ऑफिसला हेलपाटे मारायचो पण ते राजी होईनात. त्यामुळे केवळ वर्ड, पेंट, गेम्स…असे काहीतरी  सुरू  होते. कष्टाने मिळवलेले आमचे संगणक धूळ खात पडलेले आम्हाला पाहायचे नव्हते!  शिवाय, गावाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवायचा होता.

आम्ही इंटरनेटचे तरंग सेवेचे कनेक्शन घेऊन काम सुरू केले. इंटरनेटला गरजेइतके स्पीड मिळत होते. मुलांना निरनिराळी संकेतस्थळे दाखवणे, काही चित्रपट दाखवणे, कविता-गाणी ऐकवणे, फोटो दाखवणे असे आमचे उद्योग सुरू झाले. ‘अजिंठ्याची सहल’ हा धडा शिकवायचा ना, मग त्याआधी मुले तिकडची व्हर्च्युलअल सैर करून यायची. कोकणातली कविता शिकण्याआधी विद्यार्थ्यांना कोकण पाहायला मिळू लागला. चयापचय क्रियेवर भाषण देऊन मुलांना जे समजणार नाही तो विषय मुलांना थोड्या वेळात सहज समजत होता. मुले फोटो, व्हिडीओ पाहू लागली. टिपणे काढू लागली. त्यांचे शिकणे आनंददायी होत गेले.  विद्यार्थी विविध संकेतस्थळांना भेटी देऊन माहिती घेऊ लागले. त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होत गेली. इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण झाले ते असे!

बहिरवाडी म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील अमृतवाहिनी, प्रवरा नदीकाठावर वसलेले, सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी वेढलेले लहानसे आदिवासी खेडे. अवघ्या हजारभर लोकवस्तीचे. गावात शिक्षणाची मुहूर्तमेढ १९४८ साली प्राथमिक शाळेच्या रूपाने रोवली गेली. एक शिक्षकी शाळा सुरू झाली. शाळा गावातल्या देवळात भरायची. त्याच शाळेने तिथल्या माणसांना अक्षरांची ओळख करून दिली. पिढ्यानपिढया काळ्या मातीत राबणा-या पंखांना बळ दिले. सुधारणांचे वारे जसे वाहू लागले, तसे गावक-याच्या सहभागातून गावाचे आणि शाळेचे रूप पलटत गेले.

डॉ. विजय भटकर यांच्या ‘एज्युकेशन टू होम’ (eth) या संस्थेची माहिती मिळाली. आम्ही त्या संस्थेशी संपर्क केला. आमचे प्रयत्न दस्तुरखुद्द विजय भटकर यांच्या कानावर गेले. त्यांनी आमचे कौतुक केले. त्यांनी त्यांच्या सहका-यांना बहिरवाडी शाळेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्या्नंतर ‘इटीएच’चे तंत्रज्ञ पुण्याहून बहिरवाडीच्या शाळेत आले. सगळे संगणक ‘लोकल एरिया नेटवर्क’ने (LAN) जोडले. ‘डिजिटल क्लास’ आणि शाळा व्यवस्थापन प्रणाली ‘इन्स्टॉल’ केली गेली. शिक्षकांनाही त्याचे विशेष प्रशिक्षण दिले गेले. बघता-बघता, भटकर यांच्या मदतीने बहिरवाडीची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ‘डिजिटल स्कूल’ बनली! माहितीच्या महाजालाशी जोडली गेली.

डिजिटल क्रांतीने जगभरातील शिक्षणाचे सारे संदर्भ बदलले गेले आहेत. इंटरनेट आणि डिजिटल क्लास सुरू झाल्याने शाळेची प्रतिमा उंचावली गेली. अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वय यातून  मुलांचे शिक्षण गतिमान आणि अर्थपूर्ण होत गेले. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेताना विद्यार्थी दृकश्राव्य अनुभव घेऊ लागले. स्वाध्याय सोडवताना उत्तर बरोबर आले, की शिक्षकांची शाबासकी मिळतेच; पण ‘गणपती बाप्पा’ हातावर मोदकाचा प्रसादही देतो! मुले ते पाहताना- खेळताना-अनुभवताना हरखून जातात. एकूणच मनोरंजक खेळ, उपक्रम स्वाध्याय, चाचण्या यांच्या मदतीने शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लागली आहे. काही मुले संगणक हाताळतात. हव्या त्या वेबसाईटला भेट देतात. माहिती घेतात. काहीजणांनी शिक्षकांच्या मदतीने स्वतःचे इमेलचे खाते उघडले आहे. शिक्षकांनी निरनिराळ्या वेबसाईटचे पत्ते मिळवले आहेत. बहिरवाडीच्या शाळेची स्वतःची वेबसाईट आहे. राज्यभरातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची ही पहिलीच वेबसाईट!

शाळेत ‘मल्टीमीडिया गॅलरी’ तयार करण्यात आली आहे. शिक्षणात मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव देण्याच्या दृष्टीने गॅलरीची रचना करण्यात येत आहे. त्यात अनेक प्रकारच्या क्लिप्स आहेत. अरविंद गुप्ता यांची वैज्ञानिक खेळणी बनवण्याची सचित्र पद्धत, निरनिराळ्या प्रकारच्या घडीच्या वस्तू बनवण्याची रीत, चित्रकलेचे धडे (क्लिप्स),  खगोल व भौतिकी क्षेत्रांतील घटनांचे व्हिडीओ (उदा. चांद्रयानाचे प्रक्षेपण व इतर ) प्रेरणादायी व्हिडीओ, उत्तम दर्जाचे मनोरंजन मूल्य आणि सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील आशयसंपन्न चित्रपट यांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थी चित्रपट पाहून त्यावर चर्चा करतात. त्याशिवाय अॅनिमेटेड फिल्मचा त्यात समावेश आहे. विविध विषयांवरील माहितीपट आणि प्रयोगशील शाळांतील प्रयोग यांच्या व्हिडीओंचे संकलन करण्यात आले आहे. निरनिराळे शेकडो फोटो आहेत.

इंटरनेटवर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, पण त्याला एक मर्यादा असते. कारण कधी कधी स्पीड न मिळाल्याने चित्रफिती पाहता येत नाहीत. मधेच अडथळा येतो. गॅलरीमुळे मुलांना काल्पना का होईना, अनुभव देणे शक्य होते. त्यात निरनिराळ्या गोष्टींची भर पडत आहे. लोक आमची शाळा पाहायला येतात. त्यातून प्रयोगाचे अनुकरण होते.

बहिरवाडीची चौथीपर्यंत असलेली शाळा सातवीपर्यंत वाढत गेली. शाळेला नवीन टुमदार इमारत झाली आहे. तेथे प्रत्येक वर्गखोलीत बत्तीस इंची मॉनिटर बसवले आहेत. शिक्षक आणि गावकरी यांनी पाठपुरावा केल्याने इंटरनेटसाठीचे ब्रॉडबँड कनेक्शन खास बाब म्हणून मिळाले आहे. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढला आहे. नवनवे प्रयोग सुरू आहेत. पाठ्यपुस्तकातील धडे आणि कविता संबंधित लेखक आणि कवींकडून समजावून घेण्याची संधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी दुस-या मजल्यावर मोठा हॉल बांधण्याचे नियोजन आहे. काम खर्चिक आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी भरभरून दान शाळेच्या पदरात टाकले आहे. ते सत्पात्री कसे लागेल यासाठी शिक्षक मेहनत घेत आहेत. शाळेत शिकणा-या एकूण एकशेपंचाण्णव विद्यार्थ्यांपैकी शंभरेक मुले खुद्द गावातली आहेत. गावातली मुले बाहेर इंग्लिश मीडियमच्या शाळेत जात नाहीत. त्याउलट शेजारच्या गावांतली मुले शाळेत येताहेत.

शिक्षण प्रक्रिया मुलांच्या जीवनाशी जोडण्यासाठी परिसर भेटी, अभ्यास सहली, बोली भाषेतले हस्तलिखित, संशोधन प्रकल्प असे काही उपक्रम राबवले जातात. एक हात संगणकाच्या की बोर्डवर असेल तर दुस-या हातात टिकाव-फावडे असले पाहिजे. पु.ल. देशपांडे त्यालाच ‘ऋषी आणि कृषी संस्कृतीचा मेळ’ असे म्हणत असत. तो मेळ घालण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे. शिक्षकांच्या धडपडीला गावक-याची तोलामोलाची साथ आहे.  समाज खंबीरपणाने पाठीशी उभा आहे.

-भाऊसाहेब चासकर

Last Updated On – 24th August 2016

About Post Author

5 COMMENTS

 1. .सर आपण खरच आपल्या शाळेसाठी
  सर, आपण खरच आपल्या शाळेसाठी खूप कष्ट घेतले. आपण मुलांना अत्याधुनिक शिक्षण देऊन मुलाना जगाच्या संपर्कात आणले. ही आजच्या काळाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण केली आहे.

 2. आपण शुन्यातून निर्माण केले
  आपण शुन्यातून निर्माण केले आहात. प्रथमत: आपले अभिनंदन! आपला आदर्श घेऊन आम्ही नक्कीच वाटचाल करू.

 3. खूप प्रशंसनीय काम. चांगले काम
  खूप प्रशंसनीय काम. चांगले काम करायची इच्छा व त्यासाठी लागणारे कष्ट करायची तयारी असेल तर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण. अनेकांना प्रेरणादायी.

 4. उपक्रम अतिउत्तम
  उपक्रम अतिउत्तम

Comments are closed.