आड – ग्रामीण जलस्रोत

2
113
carasole

आडखूप वर्षांनी गावाकडे गेलो होतो. उभ्या गल्लीतून मित्राच्या घराकडे चाललो होतो. मध्यावर आल्यावर मला एकदम चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागलं. पायाखाली काही पडलं, राहून गेलं असं वाटू लागलं. मी खिसे चाचपून पाहिलं. काही हरवल नव्हतं. मी तिथंच उभा राहून गल्लीत इकडेतिकडे पाहत राहिलो. शेजारी मित्राचं घर गावठी पत्थरनं बांधल्याचं दिसतं होतं. विष्णू वाण्याचं आकर्षक वाटणारं घर टेकू देऊन उभं होतं. त्याच्या भिंती पडाऊ झाल्या होत्या. हे बदल मला नवीन दिसत होते. पण त्याच्यानं माझं समाधान झालं नाही. कुठलीतरी एक गोष्ट मला खटकत होती, पण आठवत मात्र नव्हती. ब-याच वेळपर्यंत मी वेड्यासारखा तिथं उभा होतो. गल्लीतील काही आयाबाया मी काय पाहत आहे, विचार करत आहे हे हातातलं काम सोडून पाहत होत्या. पण तरीही माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही आणि अचानक माझं लक्ष प्रभाबोयच्या आडाकडे गेलं!

गावचा आड मुलांनी टाकून दिलेल्या एखाद्या म्हाता-यासारख्या अडगळीत पडला आहे. गावात पाण्याची टाकी झाल्यामुळे गावाला नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावातील गटारी बांधल्या गेल्या. गटारी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घरांच्या जोत्यांना खेटून आल्यामुळे गावातील आडव्या आणि रस्त्याच्या मधोमधल्या गटारी नाहीशा होऊन गल्ली ऐसपेस दिसायला लागली आहे. प्रभाबोयच्या आडाच्या सांडपाण्यामुळे खूप मोठी आडवी गटार रस्त्याच्या  बरोबर मध्यावर झालेली होती. ती गटार इतकी मोठी आणि खोल होती की लहान मुलांनाच काय पण चांगल्या मोठ्या माणसांनाही गटारीच्या कमी रुंद असलेल्या भागाकडून जावं-यावं लागत असे. कित्येक वेळा, त्या गटारीत बैलगाडीची चाकं एकदम गपदिशी खड्ड्यात जायची आणि एखाद्या चाकाची पाटं मोकळी होऊन त्यांची मांडोळी निघायची. नाहीतर जू मधून एखादा बैलच मान काढून घ्यायचा आणि गाडीवानाची फजिती व्हायची. लहानपणी आम्ही ती गटार उडी मारून पार करायचो. अंधा-या रात्रीत तिच्यातलं पाणी चमकून ती जमीन असल्याचा भास व्हायचा आणि उडी चुकायची आणि बरोबर त्या गटारीतच उडी पडून पाय आणि कबंरडं चिखलानं भरायचं!

प्रभाबोयचा आड चोवीस तास चालू असायचा. भल्या पहाटेपासून दिवस उजाडेपर्यंत तिथं खूप वर्दळ असायची. आड नुसता गजबजलेला असायचा. प्रभाबोयच्या भिंतींचा कोपरा सोडला तर बाकी सा-या बाजूंनी लोक पाणी काढायचे. आड दगडी आहे. त्याचा कठडा जमिनीपासून थोडा उंच आहे. जवळपास आडातल्या पाण्यापासून तो बांधून काढला आहे. सकाळी पाणी भरणीच्या गर्दीच्या वेळी तर एकाच वेळी अनेक बायामाणसांच्या कोणाच्या बादल्या तर कोणाच्या घागरी एकमेकांमध्ये अडकायच्या. काहीजण मात्र एवढ्या गर्दीतही सराईतपणे कोणाच्या दोरात, बादलीत, घागरीत न अडकता पाणी काढायचे; त्यांचं मला भारी कौतुक वाटे. कित्येक वेळा, मी तो ‘सीन’ मोठ्या कुतूहलानं पाही. एखादं वेळी मध्येच एखाद्याच्या घागरीचा, बादलीचा दोर तुटायचा. भरलेली घागर, बादली बुडुमदिशी आडात पडून तळ गाठायची. दुपारी मग तो घागर, बादलीवाला कोणाचीतरी बिलायती (जहाजाच्‍या नांगराप्रमाणे दिसणारी. तिला आजूबाजूला आकडे असतात.) मागून आणून आणायचा. आडाच्‍या स्वच्छ स्थिरावलेल्या पाण्यात तळ गाठलेली घागर, बादली स्‍पष्‍ट दिसत असे. मग तो बिलायतीच्‍या साह्याने बादली-घागर बाहेर काढी. बिलायतीला बादली पटकन लागायची. पण घागरीचं तोंड छोटं असल्यामुळे आणि ती जर पाण्यात उपडी पडली असेल तर मात्र त्यावर बिलायती मात्रा खूप प्रयत्न करूनही चालायची नाही. मग एखादा पोहणारा पटाईत माणूस शोधून आणून त्याच्याकरवी ती घागर काढली जायची.

आडात कधीतरी कोणी एक कासव सोडलं होतं. ते भरदुपारी पाणी शांत असताना दिसायचं. ते विहिरीच्या कठड्यावरून  पाहण्यातही मोठी मौज वाटे. कधी कधी, ते एखाद्याच्या बादलीत अचानक येई. तो परत त्याला पाण्यात सोडून द्यायचा. मलाही ते कासव आपल्या बादलीत यावं असं वाटे, पण ते कधी माझ्या बादलीत आलं नाही. नंतर ते कासव कुठे गायब झालं, कोण जाणे!

आडावर अर्धं अधिक गाव पाणी भरायचं. आड गावाच्या मध्यवर्ती होता. तिथं सारी गल्ली पाणी भरायचीच, पण दुसरी उभी गल्ली, नवं गाव, खोल गल्लीही त्याच आडावर पाणी भरायला यायची. दुस-या उभ्या गल्लीत, प्रभाबोयच्या आडापासून जवळ आणखी एक आड होता. पण तो पाणी तोलून काढायला जरासा कराळ (जास्‍त अवघड) होता. आणि त्यामुळे त्या आडाच्या पाण्याचा उपसा तेवढासा व्हायचा नाही. परिणामी, लोक त्याचं पाणी प्यायला वापरायचे नाहीत. वापरायचं पाणी त्या आडावर तर प्यायचं पाणी ह्या आडावर असा प्रकार होता.

आमच्या अंगणातही आड होता. पण त्याचंही पाणी आम्ही प्यायला वापरायचो नाही. कारण आड निंबाच्या झाडाखाली होता. त्यात नेहमी लिंबाचे पत्ते आणि लिंबोण्या पडून पाणी घाण व्हायचं. त्यातच आडाजवळ ब-याच वेळा बैलांचा चारा पडलेला असायचा. तोही उडून विहिरीत पडायचा. त्यामुळे पाणी खराब व्हायचं. ब-याच वेळा, आम्ही भावंडांनी आमचा शेजारी सुपड़ू याच्‍या साह्यानं आड उपसून त्याचा वापर पाणी पिण्यासाठी सुरू केला. पण तो प्रयत्न काही जास्त यशस्वी व्हायचा नाही. पुन्हा त्याच्यात पालापाचोळा पडून पाणी घाण व्हायचं. त्यामुळे त्या आडाचं पाणी फक्त वापरण्यासाठी उपयोगात यायचं. पिण्यासाठी प्रभाबोयचा आड होताच. तसा तो घरापासून फार लांबही नव्हता.

आमच्या मोरीच्या बाजूलाच हा आड होता. पण मोरीची भिंत बांधलेली होती. मोरीच्या भिंतीला आडाकडे जायला छोटासा दरवाजा होता. पण तो कायमचा बंद केलेला होता. त्यामुळे थोडंसं फिरून येऊन पाणी भरावं लागे. आडामुळे आम्हाला कधी हौदाची गरज भासली नाही. आडच आमचा हौद होता. आडावर आमचा एक दोर कायमचा असायचा. तो जवळजवळ सारी गल्ली वापरायची.

आडआमचा आड खोल नव्हता. आजुबाजूनं चुनगती बांधलेला होता. पाण्यापासून त्याचं बांधकाम दगडी होतं. त्यात पाणीही नसायचं. जास्तीत जास्त पाणी माणसाच्या छातीइतकं असायचं. कधी बादली आडात पडली तर आम्ही बिलायतीऐवजी मच्छरदाणी टांगण्याचा पलंगाचा गज वापरून आडात पाण्यापर्यंत कंगोरे धरून-उतरून बादली काढत असू. आडात एकदा शेजारची मुलगी पाणी काढताना पडली. बुडुमदिशी आवाज झाला. पण तशाही स्थितीत ती पोरगी ओरडत विहिरीच्या दगडी भिंतींना पकडून आणि दोन्ही बाजूंना दोन पाय फटरवून उभी राहिली. तोपर्यंत गल्लीतले आम्ही बरेच लोक जमा झालो. तिला बाहेर काढलं. एरव्ही, त्या आडावरून आम्ही इकडून तिकडून उड्या मारत असू.

आडात कधी हिरवे सापही निघायचे.  मग काटेरी झुडूप दोराला बांधून आडात सोडायचं, तो साप त्या झुडूपावर केव्हा तरी येऊन बसायचा. तसा तो आला की मग ते झूडूप ओढून बाहेर काढल्यावर साप मारला जायचा.

खोल गल्ली पाण्याच्या बाबतीत मात्र फार दुर्दैवी. खोल गल्लीत एक आड होता. पण त्यात कधी बादली बुडालेली मी पाहिली नाही. अनेक  भावांमध्ये एखादा भाऊ गरीब, दरिद्री असावा, तसा तो आड होता. गावातल्या प्रत्येक आडात पुरूष-दोन पुरूष पाणी असायचं. पण हा आड म्हणजे नुसता एखादी झिरा. गल्लीतील लोक जागसूद झोपायचे. सकाळी दोन वाजता जो उठेल तो पाणी भरून घ्यायचा. त्याचीच बादली बुडली तर बुडली! त्यानंतर चार वाजता उठणार्‍यालाही बादलीत दोन-तीन तांब्यांवर समाधान मानावं लागायचं. संबंध दिवसभर कोणीतरी;  पोरंसोरं त्या आडावर पाणी भरत असायची. त्यामुळे  बादल्यांचा खडंगखडंग आवाज दिवसभर येतच राहायचा. तळाला पक्का दगड असल्यामुळे लोखंडी बादल्याही बसून जायच्या. त्या गल्लीतील लोकांनी सुरूंग लावायचा एकदोन वेळा प्रयत्न करून पाहिला पण तरी त्या आडाला पाणी कधी वाढलं नाही. गाव बागायती भागात असूनही खोल गल्लीतील लोकांना पाणी जपून वापरावं लागे. कारण त्यांना लांबून प्रभाबोयच्या आडावरून पाणी भरावं लागे. त्यामुळे की काय खोल गल्लीतील लोक काटकसरी आणि उद्योगी होते.

कुंभार्‍या आड हा आमच्या गावातील सार्‍या आडांचा राजा. कारण त्यांचं पाणी चवदार होतं. ज्यांच्या तोंडी त्या आडाचं पाणी बसलं ते दूरूनही त्याच आडाचं पाणी भरायचे. आड एरव्ही उन्हाळ्यात काय पण बावन्न सालच्या दुष्काळातही आटला नाही. आड नदीच्या काठी होता. दगडी बांधकाम असल्यामुळे दिमाखदार दिसायचा. त्याच्या बाजूला कुंभाराचा आवा (कुंभाराची मडके भाजण्‍याची भट्टी) होता. गल्ली छोटीशी. कुंभारांची इनमिनतीन घरं. पण त्यांच्या नावानं आड ओळखला जायचा. आड तसा समाजवादी. कारण त्या आडावर भिल्ल लोक कायम पाणी भरायचे. भिल्ल लोकांना गावात कोणी अस्पृश्य समजत नसे. भिल्लांपेक्षा महार सुशिक्षित आणि सुधारलेले होते, पण तरीही गावातील आडांवर महार लोक पाणी भरताना कधी दिसले नाहीत. आजोबांच्या काळात आईवडील वरच्या गल्लीत राहत असताना त्याच आडावर पाणी भरायचे. नंतर आमचा मामा त्या घरात राहायला लागल्यामुळे, कधी कधी. आम्हाला कुंभार्‍या आडाच्या पाण्याची चव चाखायला मिळायची.

गावाबाहेर नदीकाठी एक आड होता. त्याच्यावर महार, मांग पाणी भरायचे. आड छोटा होता. त्याचा कठडा दगडी होता. जमिनीपासून दीड-दोन फूट उंच होता. त्याच्यावर चोहोबाजूंनी उभे राहून लोक पाणी भरायचे. पुढे, आड तीन-साडेतीन फूट उंच चोहो बाजूंनी बांधला गेला. त्याला वर चढायला ऐसपैस पायर्‍या होत्या. बांधकाम आकर्षक होतं. पावसाळ्यात नदीला पूर आला म्हणजे कधी कधी आड पुराच्या पाण्यानं भरून वाहायचा. आडावर सुरुवातीला बाजारपट्टयातील हॉटेलवाला आणि नंतर जवळपास संपूर्ण सुतारगल्ली पाणी भरायची.

गिरणा कॅनॉलच्या बंगल्यातील आड हाही बर्‍याच अंशी समाजवादी होता. कारण बंगल्यातील पाटखात्यातील नोकर वेगवेगळ्या जातीजमातींचे असल्यामुळे सर्वचजण त्या आडावर पाणी भरायचे. गावातील एकाही आडावर रहाटाची सोय नव्हती. पण बंगल्यातील आडावर मात्र रहाट होता. आम्हाला रहाटावर पाणी काढायची भारी हौस, पण ती कधी पुरी झाली नाही. आम्ही बंगल्यात कोणी नसताना रिकामा रहाट गरगर फिरवत असू. तेवढंच समाधान. माझा दलित मित्र नाना मात्र बंगल्यातील आडावर पाणी भरून रहाट खेचायचा पुरेपूर आनंद लुटायचा.

कुंभा-या आड सोडला तर गावातील बाकीचे सारे आड कणगीप्रमाणे दाणे भरून घ्‍यावेत इतके कोरडे ठणठणीत पडायचे. अशा वेळी गावाबाहेरील नदीकाठी असलेली गावविहीर उपसून लोकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी सोय करून दिली जायची. विहिरीजवळ कुंडं आणि मोठी हाळ होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीला विहिरीवर पाणी उपसण्यासाठी लिलाव व्हायचा. एखादा शेतकरी मग रोज सकाळ-संध्याकाळ विहिरीवर मोटेनं पाणी काढून हाळ भरायचा. हाळीतील पाण्याचा उपयोग फक्त जनावरांसाठी व्हायचा. गावातील लोकांना हाळीतील पाणी वापरायला बंदी असायची. गावातील गव्हारक्यांची ढोरं, शेतकर्‍यांची ढोरं आणि चुकार ढोरं यांना पाण्याचा आसरा होता. ती विहीर इतर वेळी बहुतेक पोहण्यासाठी उपयोगात यायची. उन्हाळ्यात धुणं धुण्यासाठी बाया मग विहिरीवर दोर-बादली घेऊन यायच्या आणि मग त्यानं पाणी काढून विहिरीच्या बाजूला विहिरीत पाणी उडणार नाही अशा बेतानं धुणं धुवायच्या. ज्यांना पाणी काढणं त्रासाचं वाटायचं किंवा ज्यांचं जास्त धुणं आहे अशा बाया डोहावर जाऊन धुणं धुवायच्या. पुढे पुढे, मोटेची जागा किर्लोस्कर इंजिननं घेतली. इंजिनवाला मात्र बर्‍याच वेळा लोकांना इंजिन चालू असताना पाणी भरून द्यायचा. कधी कधी, तो लोकावर रागावायचाही; पण आमच्यावर मात्र कधी रागावला नाही.

पावसाळ्यात पाऊस महामूर पडायचा. गावातील सार्‍या आडांमधलं पाणी मातायचं. आड तुडुंब फुगायचे. खोलगल्लीतील खडखडाट्या आडही हातानं पाणी काढावं इतका तुडूंब भरायचा. मग गावातील लोकांची पाणी प्यायची दैना व्हायची. मग, नदीत झिरे छापून ते पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं. झिर्‍यामधून ग्लासनं घागर, बादली भरून पाणी आणावं लागे. कित्येक वेळा, खोडकर पोरं त्या झिर्‍यांमध्ये ढुंगण धुवायचे किंवा मुद्दाम तशी अफवा उठवून स्वत:ला चांगलं स्वच्छ पाणी भरण्यासाठी सोय करून ठेवायचे. शंका आल्यास वाळुतला तो झिरा उपसून मग परत भरावा लागे. पावसाळ्यात मात्र स्वच्छ पाणी मिळायची मारामारी व्हायची. शुद्ध पाणी म्हणजे काय हे फक्त शाळेत शिकवलं जायचं. कधीतरी ग्रामपंचायतीचा शिपाई येऊन विहिरींमध्ये पोटॅशियम परमॅंगनेट टाकून जायचा, तेवढाच. पावसाळ्यात गावात रोगराई पसरायची. डॉक्टर रोग्यांना पाणी उकळून प्यायचा सल्ला द्यायचे. आमची आई पाणी गरम करून थंड पाण्याच्या तांब्यात ठेवायची. चर्र असा आवाज झाला म्हणजे झालं पाणी शुद्ध. गावात जवळजवळ हीच पद्धत अंमलात आणली जायची. पावसाळा संपला म्हणजे मग गावातील सारे आड पिण्याच्या पाण्यासाठी खुले केले जायचे. पुन्हा आड गजबजू लागायचे.

आमच्या घरासमोरच्या रघुसरांच्या घरीच फक्त घरात आड होता. आम्ही त्यांच्या घरूनही कधी पिण्यासाठी पाणी भरायचो. तो आड मोठ्या रांजणासारखा होता. थोडा खोल होता. पण एका वेळी एकच जण पाणी काढू शकेल असा होता. दुसर्‍यानंही बादली टाकली तर ती एकदुसर्‍यात अडकेल! पाण्यापासून पक्क्या विटांनी बांधलेला होता. खोदणार्‍यांनी तो कसा खोदला असेल कोण जाणे. आडावरही रहाट नव्हता. पाणी तोलून काढावे लागे. आड चक्क स्वयंपाकघरात चुल्यापुढे होता. त्याच्याकडे कोणी लहान मुलं नव्हती पण चुकून तिथं अपघात घडल्याचं आठवत नाही. घरातले सराईतपणे आड टाळून घरात वावरायचे. आमच्या आईचीही घरात आड असावा अशी इच्छा होती. आईची समजूत काढण्यासाठी वडील कधी कारागिराला घरी घेऊन येऊन, जागा वगैरे दाखवून चर्चा करायचे. पण प्रत्यक्षात कधी घरात आड खोदला गेला नाही.

आमचे एक सर शेजारच्या पिप्री (पिंपरी) गावात घर पाहायला गेले होते. त्यांनी सहज पाणी किती लांबून आणावं लागेल म्हणून विचारणा केल्यावर तिथल्या म्हातार्‍यानं त्यांना, ‘भाऊ, ह्या गावमान बिन बायकोना रांडका माणूस सापडी पण बिना आडनं घर सापडणार नाही’ असं उत्तर दिलं. कजगावच्या वडिलांच्या मित्रांच्या, दादाभाऊच्या घरीही घरातच आड आहे. त्यावर रहाटही आहे. ते सकाळी चार-पाच वाजता उठून रहाटानं पाणी काढून थंड पाण्यानं अंघोळ करतात. कित्येक दिवसांपासून त्यांचा हा नित्यक्रम चालू होता.

पाट बाराही महिने चालू झाला तसं गावातल्या आडांना उन्हाळ्यातही भरपूर पाणी राहू लागलं. गावाबाहेरची विहीर मग उन्हाळ्यात बंद पडली. पाटापासून खालच्या भागात नदीला उन्हाळ्यातही भरपूर पाणी वाहू लागल्यामुळे गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. पाटाला बारमाही पाण्यामुळे गावातल्या आडांना पाटाच्या पाण्याचा जिव्हाळा राहिला. तरीपण खोलगल्लीतल्या आडाची खडखड काही कमी झाली नाही!

गावात कुठे लग्नकार्य वगैरे असलं म्हणजे तिथं पाणी भरण्याचं काम कोळी लोकांचं असायचं. कोळी लोक हे कारू-नारूंपैकी. (अलुतेदार-बलुतेदार) त्यांच्याकडे पाणी भरायला कावड असायची. इतर वेळी ते बहुधा हॉटेलांवर पाणी भरायचे. सालदार, कोळी गावातील मोठमोठ्या घरी पाणी भरायचे. नोकरदार लोकांच्या घरी गावातील काही लोक पाणी भरायचे. त्यांच्यापैकी आमचा एक शाळकरी मित्र होता. त्याचे आईवडील देशावर कामाला गेलेले असायचे. तो एकटा घरी राहायचा. किरकोळ खर्चासाठी कोणाकडे पाणी भरायचं काम करायचा. त्याच्याकडे जर कोणाचे पैसे देणे असले तर तो कळवळून म्हणायचा, देख, महिना भरना का मंग देस तुले. (महिना भरला, की पैसे देतो.) तेव्‍हा पोरं त्याच्या ‘महिना भरना’ (गरोदर बाईचा महिना भरला या अर्थाने) यावर हसायची.

आमच्‍या गावात आड अजूनही दिसतात. मात्र ते वापरात नाहीत. सर्व आड आता बुझवलेले आहेत. गावात  जिकडेतिकडे नळ आलेत. ब-याच लोकांच्‍या घरी पाण्‍याचे कनेकशन आहे. लोक अगदीच पाण्‍याची गरज पडली तर गावाबाहेरील शेतातील विहिरीकडे धाव घेतात. कोळगाव गिरणा नदीपासून दोन मैलांवर आहे. त्‍यामुळे विहिरींना पाणी मुबलक आहे. जुन्‍या काळी लग्‍नांमध्‍ये आडाची पूजा करत असत. आता ना आड राहिले ना त्या परंपरा.

साहेबराव महाजन
मु. पो. कोळगाव, तालुका भडगाव,
जिल्‍हा जळगाव, पिन कोड – ४२५१०५
९७६३७७९७०९

About Post Author

2 COMMENTS

  1. उत्तम माहिती
    उत्तम माहिती

  2. खूप छान
    खूप छान

Comments are closed.