निर्मळ महात्म्यातील एकशेआठ तीर्थकुंडांपैकी एक म्हणजे आद्यनाशी; म्हणजेच आगाशी. ते गाव त्या तीर्थकुंडाभोवती वसले आहे. परशुरामाच्या दिव्य शौर्याची गाथा म्हणजे निर्मळ महात्म्य. त्यात एकशेआठ तीर्थकुंडांचे वर्णन आहे. अगस्थ मुनींचे वास्तव्य तेथे असल्यामुळे ह्या गावाला ‘आगाशी’ हे नाव प्राप्त झाले असेही सांगितले जाते. ‘सात काशी तेथे एक आगाशी’ असे आगाशी गावाचे महात्म्य सांगितले जाते.
आगाशी भौगोलिकदृष्ट्या श्रीमंत आहे. त्या गावाला नैसर्गिक साधनसंपत्ती प्राप्त होण्याचे कारण म्हणजे उत्तरेकडे नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या डोंगरातून वाहत येणारी वैतरणा नदी तर पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि पश्चिमेला अरबी समुद्र. गावाच्या प्रगतीचा इतिहास पौराणिक काळापासून आढळतो. वैतरणा नदी पवित्र. तिच्या काठचे गाव म्हणून आगाशीला आगळे महात्म्य लाभले आहे. गुजराती भाषेमध्ये म्हण आहे, की नवखंड पृथ्वी, दसमो खंड अशी आणि आग्यारमो ‘आगाशी’.
आगाशी हे व्यापाराचे केंद्रही पूर्वापार आहे. पोर्तुगीजांनी वसईला जगाच्या इतिहासात नावारूपाला आणले. त्यांनी आगाशी, भाटी ह्या ठिकाणी बंदर बांधले व त्यामुळे आगाशीला महत्त्व प्राप्त झाले. त्या अगोदर बिंबराजाने त्या विभागात लहान गढीकोट बांधला होता. तेव्हापासून ते एक प्रसिद्ध बंदर नव्हे, तर मोठी बाजारपेठही होऊन गेली होती. त्या ठिकाणी लाकडाच्या व्यापाराची उलाढाल मोठी होत असे. जहाजे बांधण्याचा धंदा त्या ठिकाणी नावारूपाला आलेला होता. पोर्तुगीज जहाजांशी स्पर्धा करणारी व युरोपच्या प्रवासाला उपयुक्त अशी जहाजे त्या ठिकाणी बांधण्यात येत. पिराद दी केवल हा पोर्तुगीज प्रवासी त्याच्या रोजनिशीमध्ये त्या संदर्भात लिहितो, की स्पेनच्या आरमाराकरता काही जहाजे त्या ठिकाणी बांधण्यात आली. ‘बॉम्बे गॅझेट’ त्याबाबत म्हणते, की आगाशी गावी जरी मोठमोठ्या इमारती 1530 साली नव्हत्या तरी ते लाकडाच्या व्यापाराचे प्रसिद्ध केंद्र होते.
चिमणाजी भीमराव, मोराजी शिंदे, शंकर केशव फडके या शिलेदारांनी सोपारा बंदरावरील तीन बुरुज 1737 मध्ये जिंकले. तेथून मराठी फौजा अर्नाळ्यास गेल्या. ते स्थळ जिंकणे सोपे नव्हते. मराठ्यांच्या स्वारीत गलबतांचा व आरमाराचा समावेश पुरेसा नव्हता. म्हणून मराठे आगाशीला आले. त्यावेळी पायदळ लोकांना बारा कोसांची चाल पडली होती. म्हणून विसावा घेऊन, बरवाजी ताकपीर त्यांचे स्वार घेऊन आगाशी माडीवर (म्हणजे तळावर) चालून गेला. मराठ्यांच्या आवेशापुढे पोर्तुगीजांनी माघार घेतली. आगाशी मराठ्यांनी काबीज केली. चिमाजी अप्पांनी वसई पोर्तुगीजांच्या हातांतून 1739 च्या दरम्यान मुक्त केल्यावर त्या गावाचे प्रशासन चालवण्यासाठी त्यांनी सर सुभेदार म्हणून शंकर केशव फडके यांची नियुक्ती केली. त्यांनी फडकेवाडा उभारून आजुबाजूला ‘मराठा’ सरदारांचे वाडे उभे केले. चिमाजी अप्पाने वसई जिंकल्यावर सुडाचे राजकारण न करता उदार मनाने तेथील ख्रिस्ती लोकांना तहात अनेक सवलती दिल्या.
तेथील सामवेदी ब्राह्मणांचा समूह उत्तर भारतातून वैतरणा नदीमार्गे स्थलांतरित झालेला आहे. सोपारा बेटातील जवळ जवळ सर्व ब्राह्मण सामवेदी होते असे शिलालेखातील उल्लेखावरून दिसून येते. पोर्तुगीज कालखंडात सामवेदी ब्राह्मणांचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात करण्यात आले. नंतर, सामवेदी ब्राह्मण समुदायात दोन भाग पडले. धर्मांतरित ख्रिश्चनांचा समूह ‘कुपारी’ नावाने तर वाडवळ (पानमाळी) धर्मांतरित ख्रिश्चनांना ‘कोपात’ नावाने ओळखले जाऊ लागले. ख्रिस्ती समाजाची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्या लोकांतील रोटीबेटीचे व्यवहार वसईतील वसईतच होतात. त्यामुळे त्या समाजाचा विस्तार नियंत्रित झालेला आहे. त्यांच्यात परधर्मीयांबरोबर लग्न करणे निषिद्ध मानले जात असे; अर्थात आता तसे राहिले नाही. त्याचप्रमाणे, तेथे जे ‘क्रिपाळ’ भंडारी आहेत. ते मराठ्यांनी वसई 1739 मध्ये जिंकल्यानंतर पुन्हा हिंदू झालेले आहेत. पेशव्यांचे गुरू ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या प्रोत्साहनाने ख्रिस्ती झालेल्या त्या जमातीचे पुन्हा धर्मांतर करण्यात आले व त्यांना ‘क्रिपाळ’ म्हणजे पूर्वीच्या क्रिया पाळण्याची किंवा क्रियाकर्म करण्याची परवानगी मिळाली आणि बहुतेक भंडारी पुन्हा हिंदू झाले.
बाळाजी बाजीराव व वसईचे सरसुभेदार शंकर केशव फडके ह्यांनी ठिकठिकाणी मंदिरे बांधली. त्यांनी आवश्यक तेथे मंदिरांचा जीर्णोद्धार केला. चिखलडोंगरी ही आगाशीची वस्ती वैतरणा नदीकाठी वसली आहे; वैतरणा त्र्यंबक डोंगरात गोदावरी जवळ उगम पावते व अरबी समुद्राला मिळते. भवानी शंकर मंदिर हे पुरातन मंदिर आहे. शंकर केशव फडके यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आगाशी झेंडाबाजार येथे मोठा तलाव आहे. तो तलाव सांगली येथील पटवर्धन घराण्यातील असाध्य रोगांनी पछाडलेल्या एका गृहस्थाने 1740 च्या दरम्यान बांधला. त्याने तलावात सहा महिन्यांपर्यंत प्रात:स्नान केल्याने तो रोगमुक्त झाला. म्हणून त्याने तलाव स्वखर्चाने बांधून काढला अशी कथा सांगितली जाते.
हनुमान मंदिर हे आगाशीतील मोठ्या तलावाच्या काठावर वसले आहे. त्या मंदिराची पुनर्बांधणीदेखील पेशवेकालीन शंकर केशव फडके ह्यांच्या द्वारे करण्यात आली. मंदिराचा जीर्णोद्धार त्यानंतरही पुन्हा करण्यात आला आहे.
संत जेम्स हे चर्च इसवी सन 1568 च्या दरम्यान बांधले असून ते धर्मगुरूंच्या अधिकारक्षेत्राखाली आहे. येशुसंघीय धर्मगुरूंनी तेथे प्रथम प्रवचन 25 जुलै 1568 रोजी केले. तो दिवस संत जेम्स यांच्या वाढदिवसाचा असल्याने आगाशीतील ख्रिस्ती लोक प्रत्येक वर्षी 25 जुलैनंतर येणाऱ्या रविवारी चर्चचा सण आनंदाने साजरा करतात.
वसईच्या ख्रिस्ती शैक्षणिक इतिहासात आधुनिक काळामध्ये आगाशीला मानाचे स्थान मिळाले आहे. मुंबई धर्मप्रांताचे आर्च बिशप, रेव्हरंड टी. रॉबर्ट्स यांनी तेथील शैक्षणिक कायापालट केला. 1868 साली ख्रिस्तवासी रेव्हरंड फादर सॉक्रिटिस डिसूजा यांनी येथे सेंट जेम्स प्राथमिक शाळेची स्थापना केली आणि प्रबोधनाचा अग्रहक्क आगाशीने कायम राखला. ‘होली मार्टर्स’ नावाची शाळा 1938 पूर्वी तेथे होती. शाळेमध्ये चौथीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाई. त्यावेळी आगाशीत ती एकमेव शाळा होती. इंग्रजी शाळा 1938 मध्ये बंद करून संत जेम्स मराठी प्राथमिक शाळा सुरू केली गेली. जॉन 23rd इंग्लिश मिडियम, सेंट जेम्स हायस्कूल, सेंट जेम्स प्रायमरी स्कूल, सेंट जेम्स इंग्लिश मिडियम या शाळांचे कार्य उल्लेखनीय आहे.
जैन धर्मीयांच्या चोवीस तीर्थकरांपैकी तीन तीर्थंकरांची देवळे आगाशीत आहेत. त्यांपैकी सर्वात जुने मंदिर आगाशी चाळपेठ येथे असून ते एकशेसत्याऐंशी वर्षांचे जुने आहे. त्या मंदिरांव्यतिरिक्तही जैन मंदिरे आहेत.
अर्नाळा हा पूर्वी आगाशीचा पाडा होता. त्यांचे पोस्ट ऑफिस आगाशी होते. आगाशी हे गाव वसई-विरार महापालिकेत असूनही तेथील पाणी पुरवठा महापालिकेकडून होत नाही. त्यामुळे घराघरांच्या मागच्या बाजूंना विहिरी किंवा बोअरवेल पाहण्यास मिळतात. पाण्याचा उपसा विद्युत पंपांनी केला जातो. पाण्याचा उपसा जास्त असल्यामुळे पाण्याची चव पूर्वीसारखी राहिलेली नाही. चवीत खारेपणा आला आहे. तेथील बागायतदेखील विहिरीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. नारळी, पोफळी, केळी तर फुलांमध्ये मोगरा, शेवंती, जाई-जुई, अबोली व गुलाब यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. शेती हाच व्यवसाय बऱ्याच जणांचा आहे. तेथील परिसरात ‘पानवेल’ (विड्यांची पाने) हा मुख्य धंदा होता. पानवेलीवर तेथील अर्धा अधिक शेतकरी जगत होता. त्याची लागवड1880 पासून केली जात होती. कोळी विड्याची पाने लाहोर, पेशावर यांसारख्या भागात अतिशय लोकप्रिय होती (कोळी म्हणजे कोवळ्या देठाची). वसई तालुक्यातील पानवेलीवर ‘मर’ नावाचा असाध्य व चमत्कारिक रोग 1920 च्या सुमारास आला. पुढे तो व्यवसाय बंद झाला. आगाशी-वसईची सुकेळीही जगप्रसिद्ध होती. ती सुकेळी उत्पादकांच्या उदासीनतेमुळे इतिहासजमा झाली. सुकेळी ही राजेळी केळ्यांपासून बनवली जातात. परंतु, आता आगाशीला राजेळी केळीच रुजत नाहीत. राजेळी पिकलेली केळी सोलून मांडवावर वाळत टाकली जातात. काही दिवसांनी त्यांतील मधासारखा पदार्थ वर येतो. तेव्हा त्याची गोडी वाढते. उन्हात ठेवलेली केळी काही दिवसांनी सुकून त्याचे रूपांतर सुकेळीत होते. नर्सरीचा व्यवसाय मात्र टिकून आहे. त्या व्यवसायात देवराव पाटील, किरण आपटे, विकास वर्तक व लोपीस ही नावे आघाडीवर आहेत. तेथे कापडाचा धंदा जोर धरून होता. परप्रांतीय लोक घरोघरी जाऊन कापड, ड्रेसमटेरियल, साड्या, लहान मुलांचे कपडे विकू लागल्यामुळे स्थानिक धंद्यावर परिणाम झाला आहे. डायमेकर व नकली ज्वेलरी बनवण्याचा धंदा घरोघरी होता. तो व्यवसायही आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे चालू ठेवणे कठीण झाले आहे. तो धंदा परप्रांतात गेला आहे. अविनाश लेले आणि इतरांचा गणपती बनवण्याचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढत असून मुंबईच्या उपनगरांतसुद्धा त्यांच्या मूर्तींना मागणी असते. आगाशीत दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. त्याला सत्तर वर्षांचा जुना इतिहास आहे.
सार्वजनिक शिक्षणाला आगाशीमध्ये 1925 च्या आसपास सुरुवात झाली होती. धोंडोपंत गोखले, मराठे हे शिक्षक बरीच वर्षें मोबदला न घेता शिकवत होते. पुढे ते वर्ग बाजीमामा फडके यांच्या वाड्यात व नंतर मराठ्यांच्या वाड्यात भरत असत. नावारूपाला आलेल्या काशिदास घेलाभाई हायस्कूल या शाळेस 2017 साली पंच्याहत्तर वर्षें पूर्ण झाली; अमृत महोत्सव पार पडला.
ज्येष्ठ विज्ञान लेखक लक्ष्मण लोंढे, ज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी, कादंबरीकार सतीश रणदिवे यांचे वास्तव्य काळ आगाशीत होते. ज्येष्ठ लेखक ना.सी. फडके यांचे भाऊ समाजवादी सुधीर फडकेही काही वर्षें आगाशीत होते. टेंभीपाड्यातील गणेश उत्सव तालुक्यात प्रसिद्ध असून त्या मंडळाने लोकमान्य टिळक यांनी सांगितलेली परंपरा चालू ठेवली आहे.
आगाशी येथील सार्वजनिक ग्रंथालय तलावाच्या काठावर 1914 मध्ये उभारले गेले. तो आगाशीतील विकासाच्या इतिहासात अभिमानाचा तुरा आहे. ते ग्रंथालय सुरुवातीला मंदिरात होते. पुढे कै.शेठ नथुभाई व घेलाभाई ह्यांच्या स्मरणार्थ मिळालेल्या देणगीतून 11 जून 1939 रोजी सरस्वती भुवन येथे हलवण्यात आले. ग्रंथालयाला लोक देणगीरूपे मदत करतात.
आगाशीला येण्यासाठी विरार स्थानकावर उतरावे लागते. तेथून एसटीने वा रिक्षाने येणे सोपे आहे.
– बिपीनचंद्र अ. ढापरे 9637323129
अभ्यासपूर्ण लेख
अभ्यासपूर्ण लेख
अत्यन्त माहितीपूर्ण असलेला…
अत्यन्त माहितीपूर्ण असलेला
हा लेख वाचून खूप आनन्द झाला. के.जी.हायस्कुल ची विद्यार्थिनी म्हणून आगाशीशी नाते…जणू नाळ जुळली आहे. समृद्ध आगाशीचे विस्तृत वाचून अभिमान वाटला…आपल्याला खूप धन्यवाद??
माहितीपुर्ण लेख
माहितीपुर्ण लेख
Sir. Number send me
Sir. Number send me
Comments are closed.