असोशीने जगणारी व लिहिणारी लेखिका : वासंती मुझुमदार

वासंती मुझुमदार म्हणजे लेखणी व कुंचला याचा दुर्मिळ संगम असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कवितेचा उत्कट प्रतिमासृष्टी, चपखल शब्दकळा हा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यात मानवी नाती व त्याचा परस्पर संबंध याचे मनोज्ञ दर्शन घडते. वासंती यांच्या कुंचल्याची कधी लेखणी होते, तर कधी लेखणीचा कुंचला होतो ते कळत नाही…

वासंती मुझुमदार हे नाव मराठी माणसाला नामवंत लेखिकाचित्रकार म्हणून परिचित आहे. त्यांनी त्यांच्या विविध पुस्तकांची आकर्षक व कल्पक मुखपृष्ठे रेखाटलेली आहेत.

वासंती यांना रंग-रेषा-आकार, स्वर-लय-ताल आणि शब्द अशा कलाजाणिवांचा वरदहस्त लाभलेला होता. त्यामुळेच त्यांच्यातील लेखनाच्या, निर्मितीच्या शक्तीला वेगवेगळ्या जाणिवांचे नि त्यातून आविष्कारांचे आकार गवसत गेले. वासंती यांना ‘काव्य’ या प्रकाराबद्दल ओढ-आकर्षण होते. त्या गोडीमुळे त्यांचे कवितांचे वाचन-पाठांतरही अफाट होते. बरोबरीने त्यांना संगीत, चित्रकला या अभिजात कलांची मर्मज्ञ जाण होती. त्यामुळे वासंती यांच्या व्यक्तिमत्त्वाला माणूस म्हणूनही आणि साहित्यिक म्हणूनही वेगळी परिमाणे मिळत गेली आणि त्यांची प्रतिबिंबे त्यांच्या लेखनातही उमटली. काव्य लेखनापासून त्यांच्या लेखनाची सुरुवात 1957 साली झाली. त्यांच्या प्रारंभीच्या कविता ‘रूप’ या नियतकालिकातून प्रकाशित झाल्या आणि नंतर सत्यकथा, अनुष्टुभ, स्त्री, दीपावली यांमधून नियमितपणे प्रकाशित होत राहिल्या.

‘सहेला रे’ हा त्यांच्या निवडक कवितांचा पहिला संग्रह 1957 ते 1981 या काळातील आहे. वासंती यांच्या कवितेची वैशिष्ट्ये त्या संग्रहातून ठसठशीतपणे सामोरी येतात. त्यांना ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा प्रदीर्घ आणि जिव्हाळ्याचा मातृवत सहवास लाभला. साहजिकच, त्यांच्यावर इंदिरा संत यांचे आणि त्यांच्या काळातील इतर कवयित्री पद्मा, संजीवनी, शांताबाई शेळके यांच्या कवितांमधील विदग्ध वाङ्मयाचे संस्कार झाले. वासंती यांची कविता त्यांच्या कवितांशी नाते सांगणारी आहे. तरीही, ती स्वत:चे स्वतंत्र रूप व अस्तित्व घेऊन अवतरली. त्यांच्या काव्याचे चटकन् लक्षात येणारे विशेष म्हणजे उत्कटता, तरलता आणि संवेदनशीलता हे होत. ‘सहेला रे’मधील बहुतेक कवितांत ‘निसर्ग’ हे आशयसूत्र आहे. कवयित्री निसर्गाच्या माध्यमातून भावानुभावाच्या अनंत छटा-मूड मांडते. कवयित्री ‘सहेला रे’मधील काही कवितांतून जगण्याचा अर्थ शोधताना स्वत:चाही शोध घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे- आत्मशोधाची जाणीव प्रकट करते. ‘अन्वय’ (पृष्ठ ३) सारखी कविता मृत्यूच्या जाणिवेने अस्वस्थ हुरहूर व्यक्त करते. कवयित्री आनंद-सुख-वेदना-तगमग, अस्वस्थता, बेचैनी अशा वेगवेगळ्या जाणिवांच्या अनुभूतींना भिडताना अंतर्मुख होते आणि तीव्र अशा संवेदनशीलतेने ती त्या अनुभवांना निसर्गप्रतिमांतून चित्रित करत राहते.

‘रात्र निर्भर मोकळेली, जवळ केवळ सावली, सावलीला गंध नाही, रात्र निर्मम चालली’

कवयित्री ‘वेळीअवेळी येतेस जुईसारखी भरल्या आणि तुझ्या हसण्याच्या सांडतात लक्ष कळ्या’ पृष्ठ (27) अशा निसर्गप्रतिमांतून तिची भावस्थिती वा भावस्पंदने मांडते. ती उत्कट प्रतिमासृष्टी हे त्यांच्या काव्यप्रतिभेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ती ‘माघारीण सुखावून जावी तसा कावळ्याच्या शब्दांतून शकून आला’ (पृष्ठ 2) असे म्हणते, तर ‘दिशांतून येणाऱ्या स्वच्छंद प्रकाशात तिचे प्रारब्ध तिला पारखून घ्यावे वाटते’ (पृष्ठ ३) वा ‘एका सुन्न कातरवेळी तिला आभाळ वेडेबावरं भासतं…’ (पृष्ठ 2). अशा निसर्गाच्या बदलत्या आंतरिक ओढीतून अनुभवांच्या जाणिवा समृद्ध करते व तरल निरीक्षण शक्तीचे प्रत्यंतर देते. चपखल शब्दकळा हा त्यांच्या कवितेचा आत्मा आहे. त्या एक मूडमध्ये पहाटेला ‘करूण’ संबोधतात, तर दुसरीकडे ऊन त्यांना ‘गर्भवती’सारखे वाटते. पावसाला त्या ‘पाऊसपान’ म्हणतात, तर सोनेरी मावळती संध्याकाळ त्यांना ‘सोहन’ संध्याकाळ वाटते. त्या पिसाऱ्याला ‘तनुल’ असे संबोधतात. हळुवार, मृदू अशा शब्दांतून एकीकडे निसर्गचित्र भासणारी त्यांची कविता त्या अनुभवाची संवेदना अशी दृश्यात्मक रूपात मनात चैतन्य निर्माण करत राहते.

वासंती यांचा दुसरा काव्यसंग्रह ‘सनेही’. सनेही म्हणजे स्नेही, जिवलग… आणि हा जिवलग आहे पाऊस. त्या पावसाशी जुळलेली अनेक नाती, भावबंध कवितांतून व्यक्त होतात. वासंती यांनी ‘कवितावली’ हा काव्यप्रकार निवडला आहे. तो ‘सनेही’चे वैशिष्ट्य ठरतो. कवयित्री म्हणते, पाऊस : कधी जिवलग, कधी सखा, कधी स्नेही, कधी दूरचा अगदी आतला : अनाम… नात्यातला. हाच पाऊस कधी देहात उसळून मोरपंखी रंगाने दिशा उजळणारा. कधी दर्शन न देता जीव हळवा करणारा, कधी आवेगाने कोसळताना स्वत:च केविलवाणा वाटणारा, तर कधी जीवनाचे आदिम सत्य-मरण त्याची जाणीवही पेरणारा… पावसाची अनेक रूपे या ‘कवितावली’त येतात, पण तरीही त्यात सांकेतिकता नाही. त्यातील प्रत्येक पावसाच्या रूपाला जिवंत अस्तित्व प्राप्त झाले आहे आणि त्या बरोबरीने कवयित्रीचे मनस्वीपणही वाचकाला सामोरे येत जाते. पाऊस जसा कवयित्रीला जाणवतो, तसाच अनेक संवेदनांनी वाचकांनाही अनुभूती देतो- कधी चैतन्याची जाणीव, कधी तगमग, कधी रितेपणाची पोकळी, कधी विरहाची हुरहूर, कधी विकल करणारी सैरभैरता, कधी अनामिक अस्वस्थता… या विविध भावनांच्या प्रगल्भ भावानुभूतीतून आत्मकेंद्री अनुभवांचे हे क्षितिज विस्तारत जीवनसाथीची कितीतरी वलये वाचकांपर्यंत कवयित्री पोचवत राहते. कवितावली छंदबद्ध नाही, पण तरीही तिच्यात एक आंतरिक लय आहे. त्यामुळेही ‘सनेही’ वाचणे हा आल्हादक असा अनुभव आहे.

वासंती यांचा ‘नदीकाठी’ हा ललित लेखसंग्रह आहे. ‘आत्माविष्कार-स्व’ची अभिव्यक्ती हा वासंती मुझुमदार यांच्या ललित लेखनाचाही गाभा आहे.

लेखिकेचे बालपण कृष्णाकाठच्या निसर्गरम्य परिसरात गेले, तेथील संस्कृती, रूढी, परंपरा, सण, मूल्य यांची संचित रूपे आणि त्याच मातीतील आठवणींत घट्ट रुतून राहिलेली माणसे, त्यांच्या जगण्यातून हाती आलेले अलवार अर्थ, पारदर्शक क्षण यांची मनोहारी चित्रे वासंती यांच्या ‘नदीकाठी’ आणि ‘सकाळ’ या ललितलेख संग्रहात आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या भाषेत, ‘नदीकाठी उगवलेल्या हिरव्या कोवळ्या गवतातून हिंडून यावे तसा प्रसन्नतेचा अनुभव देणारे असे त्यांचे ललितलेखन आहे.’ मंजी या मुलीच्या चौकस, कुतूहलमिश्रित नजरेतून नदीकाठचे हे जीवन वाचकांसमोर येते. ही मंजी म्हणजेच किशोरवयीन वासंती यांचेच एक रूप. मंजीची भावसृष्टी विलक्षण तरलतेने वाचकांच्या दृष्टीसमोर चित्रित होत जाते. वासंती यांचे हे आत्मकथन आहे नि ते एका छोट्याशा गावाचे, तेथील माणसांच्या जगण्याचे, त्या मातीशी जडलेल्या नात्याचे वेधक असे भावचित्रही आहे. ‘नदीकाठी’मधील ही अनुभवचित्रे ‘झळाळ’मध्ये विस्तारली आहेत. किशोरवयीन मंजी ‘झळाळ’मध्ये प्रगल्भपणे, अधिक समंजस दृष्टीतून माणसे न्याहाळते आणि अनुभवांकडे अधिक अलिप्तपणे पाहते. अनुभवांचा व्यापक आणि संवेदनक्षम अन्वयार्थही लावताना दिसते. ‘नदीकाठी’, ‘झळाळ’ या दोन्ही लेखसंग्रहात घरातील माणसांची आणि संगीत-चित्रकला अशा कलाक्षेत्रातील नामवंत दिग्गजांची व्यक्तिचित्रे आहेत. त्या व्यक्तिचित्रणांत जिवंतपणा आला आहे, त्याचबरोबर त्या त्या व्यक्तींमधील गुणांबरोबर दोषही रेखाटले गेल्यामुळे त्या चित्रणात मन:पूर्वकता व प्रामाणिकपणाही आला आहे. संगीताच्या क्षेत्रातील प्रयोगशील गायक कुमार गंधर्व आणि विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या व्यक्तिचित्रणातून एकाच व्यक्तीतील माणूस आणि कलावंत या दोन पातळ्यांवरील त्यांचे जगणे, त्यांच्या कलांमागील प्रेरणा, निर्मितीच्या कक्षा या सगळ्या अंगांनी वासंती त्या व्यक्तींना समजून घेण्याचा, त्यांच्यातील माणूस, कलावंत खोलपणे शोधण्याचा, त्यातील गुंतागुंत वाचण्याचा-उकलण्याचा प्रयत्न करतात. त्या बारीकसारीक तपशील देतात. तसेच, एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रण आहे ते रंगनायकी. वडिलांकडून आलेला चित्रकलेचा वारसा जपणाऱ्या आणि त्यांच्या जाण्याने उद्ध्वस्त झालेल्या एकाकी चित्रकर्तीचे, रंगनायिकेचे – व्यक्तिचित्र मन हेलावून टाकणारे आहे.

वासंती यांच्या लेखनात गत आठवणींचे, अनुभवांचे चित्रणही येते – ‘हस्ताचे दिवस’सारख्या लेखातून हादगा या लोकपरंपरेचे रसाळ उत्कंठावर्धक कथन येते, तर ‘नदीकाठी’ लेखात नदीकाठाशी जुळलेले हरतऱ्हेचे नाते- माणूस संपला, की त्याचे प्राक्तनही तेथे नदीत येऊन मिसळते – या अंतिम शाश्वत सत्यापर्यंत जुळले जाते. ‘नहाण’सारखा लेख वयात येतानाच्या मुलीची शारीरिक-मानसिक स्पंदने-आंदोलने हळुवारपणे उलगडत नेतो. ‘पाखरांची शाळा’, ‘परसातलं मुंगुस’, ‘अजुनी बकरी’… हे लेख वासंती यांच्या जीवनविषयक असोशीची, जीवन भरभरून जगण्याच्या – आस्वादण्याच्या वृत्तीची प्रतीके ठरतात. शिवाय, वासंती माणूस आणि प्राणी यांच्यातील अगम्य नात्याचा अपूर्व वेधही त्यातून घेताना दिसतात. त्यांतील काही लेखांचे स्वरूप नॉस्टेल्जिक असे आहे. मात्र ते भावूक, कृत्रिम नाही. वासंती यांच्या ललित लेखनाला आणखी मिती आहे ती गूढ, रहस्यमय अनुभवांची आणि आध्यात्मिक, देवत्वाच्या जाणिवेची. अदृश्य गूढ शक्तीबद्दलचे भययुक्त कुतूहल ‘झळाळ’मधील ‘आनंदाचा दिवा’, ‘निरास’, ‘गुहा’ यांसारख्या लेखांतून व्यक्त होते. गूढरम्य चिंतन आणि ऐंद्रिय अनुभव यांना शब्दांत असंदिग्धपणे पकडण्याचे सामर्थ्य त्या लेखांत दिसते. ‘पांडुरंग सखा’सारखा लेख देवत्व संकल्पनेला मूर्तरूप देऊ पाहतो, तर ‘मोकळीक’ हा लेख स्वत:चीच अनामिक ओळख शोधण्याचा स्वत:पासून दूर होत, स्वत:लाच शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी ‘श्री.पु. भागवत : व्यक्ती आणि संपादक’ व ‘साहित्याची भूमी’ या पुस्तकांचे संपादनही केले.

वासंती यांच्या ललित लेखनाचे हे वेगवेगळे अवकाश-प्रदेश वाचताना सर्वात मोठे वैशिष्ट्य – एक शक्तिस्थान- जाणवते ते त्यांच्या काव्यात्मक भाषेचे. मंगेश पाडगावकर यांचे शब्द सार्थ वाटतात – “वासंती यांच्या कुंचल्याची कधी लेखणी होते, तर कधी लेखणीचा कुंचला होतो ते कळत नाही.” माणसांच्या लकबी असोत वा त्याच्या स्वभावाचे, रूपाचे वर्णन; वासंती त्यासाठी मोजक्या, पण मार्मिक शब्दांचा आधार घेतात आणि त्यातून त्या पूर्ण व्यक्तीला साक्षात सजीव रूप देऊन जातात. संस्कृत श्लोक, जुन्या कवितांच्या-गीतांच्या ओळी, संस्कृत वचने, सुभाषिते यांचे अगणित संदर्भ, संस्कृत शब्दांबरोबरच वेगवेगळ्या बोलीभाषांतील शब्द वा प्रतिमा, उपमा यांचे चपखल उपयोजन आणि गंध-स्पर्श-रूची-नाद अशा संवेदना जागवणारे तपशील या सगळ्या विशेषांमुळे त्यांच्या ललित लेखनाला त्रिमिती सौंदर्य येतेच, परंतु त्यांचे गद्यही कधी काव्य, कधी चित्र होऊन संवाद करत जाते. वासंती यांचे ललित लेखन दुर्गा भागवत, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या नितळ ललित लेखनाच्या पंरपरेशी जाऊन पोचते. जीवन आसुसून आणि रसिकतेने जगण्याची उत्कंठा, असोशी ही वासंती यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी खूण होती.

चित्रकलेतील रंग, त्यांच्या अनंत छटा – त्यांची झळाळी जशी कधी म्लान होत नाही, संगीतातील स्वर जसे न मिटता शाश्वत, चिरंतन निनादत राहतात; तशाच, वासंती शेवटपर्यंत राहिल्या होत्या. कदाचित, त्यांच्यात ती जिगिविषा जगवत-जागवत ठेवली असेल ती त्यांच्या कलांच्या दैवी स्पर्शाने, त्यांच्यातील सर्जनशीलतेने. त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या रेषा-रंगांनी, त्यांना भुरळ घालणाऱ्या कुमारांच्या स्वरांनी किंवा हातात असणाऱ्या सतारीसारख्या वाद्याच्या सुरांनी – देव जाणे, पण तीच वासंती मुझुमदार या व्यक्तिमत्त्वाची, त्या व्यक्तिमत्त्वातील एका लेखिकेचीही ओळख सांगण्यास पुरेशी बोलकी ठरून गेली.

वासंती मुझुमदार यांचा जन्म 5 एप्रिल 1939 रोजी झाला, तर मृत्यू 7 नोव्हेंबर 2004 रोजी झाला.

मोनिका गजेंद्रगडकर 9820535649 monikagadkar@gmail.com

———————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here