अनंत काणेकर – अस्सल मराठी बाणा

0
233

अनंत काणेकर नेहमी म्हणत, ‘माणसाने नुसते जगू नये, जगण्याला काही अर्थ आहे का हे सतत शोधत राहवे’. काणेकर स्वत: त्यांचे पंच्याहत्तर वर्षांचे आयुष्य अर्थपूर्ण, आनंदी वृत्तीने जगले आणि त्यांनी त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्व आबालवृद्धांना प्रसन्न वृत्तीने कसे जगावे हे शिकवले. त्यांचे मूळ गाव मालवणचे मेढे. काणेकर यांचा जन्म 2 डिसेंबर 1905 रोजी मुंबईच्या गिरगावातील एका चाळीत झाला. वडील आत्मारामपंत काकडवाडी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल होते. वडील अनंत काणेकर अवघे तीन वर्षांचे असताना अचानक निर्वतले. त्यांच्या आईने एकुलत्या एका मुलाला घेऊन माहेराचा आसरा घेतला.

मामा परमानंद हे अनंत काणेकर यांचे मामा. ते प्रार्थना समाजाशी संबंधित होते. अनंत काणेकर गिरगावातील चिकित्सक शाळेत जाऊ लागले. ते हुशार विद्यार्थी होते. ते मॅट्रिक 1922 साली झाले. पुढे, त्यांनी एम ए, एलएल बी या पदव्या संपादित केल्या. त्यांनी वकिली चार-पाच वर्षे करून पाहिली. मात्र त्यांचा पिंड अध्यापकाचा होता. त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम मुंबईच्या खालसा कॉलेजात पाच वर्षे आणि सिद्धार्थ महाविद्यालयात चोवीस वर्षे केले. ते उमद्या मनाचे असल्यामुळे सहकारी प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना प्रिय होते. त्यांना पुस्तके वाचण्याची आवड होती. त्यांनी मराठीप्रमाणे निवडक इंग्रजी साहित्याचे वाचनही डोळसपणे केले होती.

त्यांनी लेखनाला सुरुवात वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी केली. त्यांचा ओढा कवितेकडे प्रारंभी होता. लोकमान्य टिळक यांचे निधन झाले तेव्हा काणेकर पंधरा वर्षांचे होते. त्यांनी त्यावेळी भावनेच्या आवेगात लोकमान्य यांच्या मृत्यूवर शे-पन्नास ओळींची दीर्घ कविता लिहिली. त्यांचे कविता लिहिणे पुढील काळात चालू राहिले. त्यांचे सहाध्यायी के. नारायण काळे यांच्या नजरेस त्या कविता पडल्या आणि त्यांनी त्या ‘रत्नाकर’ मासिकात प्रसिद्ध केल्या. त्यांचा ‘चांदरात’ हा कवितासंग्रह 1933 साली प्रकाशित झाला. काणेकर यांचे ते पहिले पुस्तक गाजले. त्यात अवघ्या अठ्ठेचाळीस कविता होत्या. त्या चिमुकल्या संग्रहाचे कौतुक सर्वसामान्य वाचक व चिकित्सक समीक्षक यांनी मनापासून केले. पु.ल. देशपांडे काणेकर यांच्यासंबंधी म्हणाले, ‘‘त्यांची साहित्यक्षेत्रातील ‘एण्ट्री’च मुळी टाळ्या घेणारी ठरली…’’

‘चांदरात’चे वैशिष्ट्य असे, की त्यांच्या कवितेवर त्यांच्या पूर्वीच्या कोणत्याही लोकप्रिय कवीची वा काव्य पद्धतीची छाप नाही. अकृत्रिम भाषा, आधुनिकता, असांकेतिक प्रतिमा यांमुळे त्या कविता टवटवीत वाटतात. कवितांत आढळणारी भावविवशता त्यात नाही, ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी ! प्रितीची हूल फुकट ना तरी ||’ असा रोखठोकपणा त्यांच्या कवितांत आहे. ‘आला खुशीत समिंदर’ ही त्यांची कविता गाजली. त्या कवितेमधील अवखळपणा आणि त्यांच्या इतर विडंबन काव्यातील मिस्किलपणा यांमुळे त्याच शीर्षकाच्या संग्रहाला आकर्षण प्राप्त झाले आहे.

काणेकर त्यानंतर लघुनिबंधाकडे वळले. प्रभाकरपंत कोल्हटकर यांच्या ‘संजीवनी’ साप्ताहिकात एक पानभर मजकूर संपादकांच्या आग्रहामुळे नियमितपणे लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्या लघुलेखांचे पुढे ‘लघुनिबंध’असे नामकरण झाले. ते लघुनिबंध 1934 साली ‘पिकली पाने’ संग्रहात समाविष्ट झाले. पुढे त्यांचे सात संग्रह प्रकाशित झाले. त्यांचे निबंध विनोद आणि नाट्यपूर्णता या वैशिष्ट्यांमुळे वाचनीय होतात. त्यांच्या लघुनिबंधांचे स्वरूप एकाद्या मित्राशी मारलेल्या स्वैर, ऐसपैस गप्पांसारखे असते. काणेकर स्वत: गोष्टीवेल्हाळ होतेच. त्यांचे लघुनिबंध आणि प्रवासवर्णने त्यांच्या त्या गुणांमुळे रोचक व वाचनीय झाली आहेत. काणेकर यांनी लघुनिबंध लेखनात जी उदाहरणे दिली ती सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील आहेत. परिणामी, ती वाचकांना चटदिशी भिडतात. त्यांच्या लघुनिबंधांत पुन्हा पुन्हा भेटणारी गणुकाका ही व्यक्तिरेखा सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारी, रूढीप्रिय अशी आहे. गणुकाकांची मते चमत्कारिक, जुनाट, पारंपरिक आहेत, पण त्या मतांच्या मागे त्यांचे विशाल, सात्त्विक, निर्मळ मन आहे. गणुकाकांशी वाद घालताना पुरोगामी विचारांचा बुद्धिवादी, चिंतनशील लेखक जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडतो, मानवी स्वभावाविषयी चमकदार विधाने करतो. ‘काणेकर यांची भाषा अस्सल मराठी बाण्याची आहे. विचारप्रधान निबंधाला आवश्यक अशी सोपी, साधी, रोखठोक अर्थवाही… तिच्यावर संस्कृतचा किंवा इंग्रजीचा प्रभाव नाही.’ असे वि.स. खांडेकर यांनी म्हटले आहे.

काणेकर यांच्या मिस्किल स्वभावाने 1947 साली मोठी खळबळ उडवून दिली होती. त्या काळात खलील जिब्रान यांच्या कणिका मराठी वाचकांत लोकप्रिय झाल्या होत्या. काणेकर यांनी ‘रूपेरी वाळू’ हा कणिका संग्रह प्रसिद्ध करून खलील जिब्रान यांच्या कणिकांचे रूपांतर केल्याचे सुरुवातीस नमूद केले. त्या वाचकांना अस्सल जिब्रान यांच्या वाटल्या. जिब्रान यांच्या अभ्यासकांनीसुद्धा त्या डोक्यावर घेतल्या, आणि मग तीन वर्षांनंतर एक दिवस काणेकर यांनी त्या कणिका त्यांच्याच आहेत असे शांतपणे जाहीर केले !

काणेकर यांचे खेळकर; पण गंभीर, चतुरस्र आणि प्रसन्न व्यक्तित्व त्यांच्या प्रवासवर्णनांतून सहजपणे गोचर होते. नवीनता ही त्यांची सहज प्रेरणा असल्याने ते मार्क्सवादाकडे ऐन तारुण्यात आकृष्ट झाले. त्यांना क्रांतीनंतरचा रशिया प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहवा असे तीव्रतेने वाटू लागले. ते रशियाला लंडनमार्गे जाऊन आले आणि त्यांनी ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’ हे नितांतसुंदर प्रवासवर्णन लिहिले. त्यांनी चित्रकार दीनानाथ दलाल यांच्यासमवेत भारतातील विविध स्थळांना भेटी दिल्या आणि ‘आमची माती आमचे आकाश’, ‘निळे डोंगर तांबडी माती’ ही प्रवासवर्णने लिहिली. ‘खडक कोरतात आकाश’ हे त्यांचे अमेरिकेचे प्रवासवर्णन वेगळे आहे. एका रसिक, जिज्ञासू, बहुश्रुत मनावर धावत्या प्रवासात जे विविध संस्कार उमटले त्यांची ती सहज वर्णने आहेत. काणेकर प्रवासात निसर्गापेक्षाही माणसांमध्ये अधिक रमलेले दिसतात. काणेकर हे उत्कृष्ट निवेदक आहेत, संभाषणचतुर आहेत याचा प्रत्यय प्रवासवर्णने वाचताना येतो.

काणेकर यांनी स्वतंत्र कथा लिहिल्या आणि निवडक पाश्चात्य कथांचे रूपांतर केले. त्यांनी लिहिलेल्या स्वतंत्र एकांकिका या त्यांतील संवादांची सहजता आणि कथावस्तूंची आकर्षक पद्धतीने केलेली मांडणी या वैशिष्ट्यांमुळे रोचक झाल्या आहेत. ‘धूर’, ‘सांबर’, ‘पैजार’ या एकांकिका त्या दृष्टीने वाचण्यासारख्या आहेत. त्यांची सर्व नाटके मात्र रूपांतरित आहेत. त्यांनी स्वत:हून ‘घरकुल’ हे इब्सेनच्या ‘डॉल्स हाऊस’चे रूपांतर केले. तर ‘निशिकान्तची नवरी’, ‘पतंगाची दोरी’, ‘फास’ व ‘झुंज’ ही नाटके निर्मात्यांच्या मागणीवरून रूपांतरित केली. ती रूपांतरे सरस उतरली आहेत. काणेकर यांनी त्यांचे समानधर्मी श्री.वि. वर्तक, के. नारायण काळे यांच्या सहकार्याने ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था 1933 मध्ये स्थापन केली. जुनाट संकेतांच्या भोवऱ्यात घोटाळणाऱ्या मराठी रंगभूमीवरील कोंडी फोडण्याचा हेतू त्यामागे त्यांचा होता. त्या संस्थेने अल्पावधीत रंगभूमीवर नवा इतिहास घडवला ! काणेकर यांनीच ‘प्रभात’च्या गाजलेल्या ‘माणूस’ या चित्रपटाचे संवाद व गाणी रचली आहेत. त्यांची रचना असलेली ‘आता कशाला उद्याची बात’, ‘आम्ही वळखलं गं’, ‘जा जा मुशाफिरा तू रे’, ‘प्रेमाची फुटली पेठ’ ही अविस्मरणीय गाणी श्रोत्यांच्या आठवणींत आहेत. मराठी चित्रपटांच्या इतिहासात ‘माणूस’ मैलाचा दगड ठरला !

कादंबरी हा प्रकार वगळता, काणेकर यांनी साहित्याचे विविध प्रकार समर्थपणे हाताळले आणि त्यावर स्वत:ची स्वतंत्र मुद्रा उमटवली. ते उत्कृष्ट वक्ते होते. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 1957 साली असताना ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रा’चा हिरिरीने पुरस्कार केला. शासनाने त्यांना सर्व प्रकारच्या समित्यांवर व मंडळांवर नेमले होते. ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने 1965 मध्ये सन्मानित झाले.

काणेकर दिसत रूबाबदार ! रोममधील शिल्पे पाहताना मला काणेकर यांची आठवण झाली. ते ऐन सत्तरीत इतके देखणे दिसायचे की व्यासपीठावर त्यांच्या आजुबाजूला बसलेल्या व्यक्ती खुज्या वाटत ! ते वृत्तीने अखेरपर्यंत तरुण होते. त्यांनी साहित्यातील साऱ्या नव्या प्रवाहांचे तोंड भरून स्वागत केले. त्यांनी बदलत्या काळाबरोबर सहजपणे पावले टाकली. किंबहुना ते काळाच्या पुढे चालत राहिले. त्यांना बुरसटलेल्या, सांप्रदायिक विचारांविषयी मनापासून तिटकारा होता. त्यांनी त्यांच्या मतांवर, विचारांवर गंज चढू दिला नाही. सर्वार्थांनी ते पुरोगामी होते. या अजातशत्रू लेखकाचे निधन 4 मे 1980 रोजी झाले.

अनंत काणेकर (जन्म 2 डिसेंबर 1905, मृत्यू 4 मे 1980)

साहित्य संपदा

काव्य

  1. चांदरात 1933

रूपक कथा

  1. रूपेरी वाळू 1947

नाटक

  1. निशिकांताची नवरी 1938, 2. फास 1943, 3. पतंगाची दोरी 1951,
  2. झुंज 1954

एकांकिका

  1. धूर आणि इतर, 2. सांबर आणि इतर, 3. पैजार

प्रवासवर्णन

  1. धुक्यातून लाल ताऱ्याकडे, 2. आमची माती आमचे आकाश,
  2. निळे डोंगर तांबडी माती, 4. खडक कोरतात आकाश

आत्मवृत्त

  1. अनन्तिका

लघुनिबंध

  1. पिकली पाने, 2. उघड्या खिडक्या, 3. तुटलेले तारे, 4. पांढरी शिडे

 टीकाग्रंथ

  1. राखेतले निखारे, 2. हिरवे कंदिल, 3. रसेल नीती

– सुभाष भेंडे
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here